Pages

Saturday, November 2, 2019

दृष्टांत

खेळ भोवती चाले विझलेल्या दीपांचा
जगावेगळा उत्सव माझा अंधाराचा

प्रकाश ज्ञानाचाच असा तर मुळीच नसतो
उजेड पडतो चिकार येथे अज्ञानाचा

डोळे मजला लागत नाहित सुख शोधाया
दृष्टी घेते ठाव नेमक्या आनंदाचा

शब्द वेगळे, तर्क वेगळे, रंग वेगळे
अर्थ वेगळा होतो माझ्या आयुष्याचा

मिटून डोळे कळते मजला कोण भले ते
उघडुनही अंदाज कधी फसतो डोळ्यांचा

दिवसा ढवळ्या स्वप्न पाहतो पंख लावुनी
फरक तसा मग उरतच नाही रात-दिनाचा

चंद्र उजळला नाही माझा कधी तरीही
कृष्णदिव्यांनी लख्ख रोजचा सण अवसेचा

दीप नको मज मार्ग उजळण्यासाठी कुठला
मीच सूर्य माझ्या विश्वातिल वसुंधरेचा

एकच इच्छा भोळी भगवंताच्या ठायी
देत रहा दृष्टांत आंधळ्या विश्वासाचा

आदित्य

Sunday, October 27, 2019

रोज दिवाळी

अवतरली दीपांची माला
नक्षत्रांची प्रभा लेऊनी
लाजेने निस्तेज चांदण्या
अन उजळे अवसेला अवनी

प्रकाश उधळे कणाकणातुन
असंख्य किरणे नवतेजाची
तिमिर ओसरे अज्ञानाचा
लख्ख सोयरी दिशादिशांची

लखळखणारे कैक काजवे
दिवे घेउनी पाठीवरती
लवलवत्या ज्योतींच्या समयी
जणू अंगणी स्वैर नाचती

उजळोन काळा निजतम अवघा
सूर्य उगवला प्रत्येकाचा
राख जाहली रिपू रिपूंची
राम चहुकडे आनंदाचा

सृजनाचा अवतार दीप हा
हाच दीप उद्धार तमाचा
प्रेमाचीही ऊब तयाची
तेजस्वी ओंकार मनाचा

चला जागवू ज्ञानदीप मग
तुमच्या अमुच्या रोज मनातुन
सौख्याचा नित घडो महोत्सव
रोज दिवाळी घरा घरातुन

आदित्य

Friday, October 25, 2019

काळ कधीही कोणासाठी थांबत नाही

काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
रोजच मरणे, तिळतिळ तुटणे संपत नाही

एक मित्र अन गुरू लाभला निर्गुण ईश्वर
निर्विकार पण तोही काही बोलत नाही

सोडुन आलो कितीक शहरे तुला विसरण्या
स्मृती तयांची परंतु पिच्छा सोडत नाही

मावळतीला सूर्य बुडोनी गेल्यावरती
उजेड नाही म्हणून रडणे चालत नाही

शेवट काही नसेल जर दु:खांचा माझ्या
वेदनेस गोंजारून जगतो, हरकत नाही

पाप पुण्य चे हिशोब माहित असून येथे
कोण भक्त होऊन आमिषे भोगत नाही?

वाट पाहतो रोज तुझी मी निर्मळ कविते
मुक्त निरंतर घन-घन जोवर बरसत नाही

आदित्य

पौर्णिमेचा चंद्र माझा

पौर्णिमेचा चंद्र माझा
चांदण्याचा रंग माझा
गंधवेड्या चांदराती
तू कधी होशील माझा

रातराणी दरवळूदे
गंध माझा विरघळूदे
अंतरी येशील का तू
होऊनिया श्वास माझा

चांदण्यांमधुनी भिजावे
अन तुला भिजवून जावे
मी तुझा पाऊस होते
अन तुझा मृदगंध माझा

चांदण्याचा स्पर्श व्हावा
आठवांवर न्यास व्हावा
अन उठावे भास ऐसे
की शहारे देह माझा

लहरुनी पानांवरोनी
झिरपुनी खिडकीमधूनी
चांदणे देऊन जातो
पौर्णिमेचा चंद्र माझा

आदित्य

Sunday, October 20, 2019

काळे काळे

नकोच काही आता जगती काळे काळे
सफेद कपडे कृत्य झाकती काळे काळे

निळे निळे आभाळ कधी का नको कुणाला
परी ढगांचे रंग सुखवती काळे काळे

पांढरपेशा स्वच्छ मनांवर दिसती पाट्या
'नको मुखवटे आणिक चेहरे काळे काळे'

निषेध होतो सच्च्या शब्दांचा कारण की
डाग कागदावरती पडती काळे काळे

आरशामध्ये उमटे ना प्रतिबिंब अचानक
तेजही कसे होऊन गेले काळे काळे

लावला जरी आज दिवा प्रत्येक घराशी
अथांग हे अवकाश उद्याचे काळे काळे

आदित्य

Saturday, October 19, 2019

पुरे अता

तेच तेच गोड गोड बोलणे पुरे अता
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे अता

रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोज तू 'उद्या उद्या' सुनावणे पुरे अता

एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता तुझे दुरावणे पुरे अता

गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त तू कपास लावणे पुरे अता

साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक तू अशी दुजास मारणे पुरे अता

संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज रोज खेळणे पुरे अता

आदित्य

Sunday, September 29, 2019

सृष्टी अवघी जगते आहे

धरती की आभाळ यातले
कोण नेमके रडते आहे
पाणी परि भलत्याच कुणाच्या
डोळ्यांमधुनी गळते आहे

धूर सोडिती शहरे येथे
पडती भोके आभाळाला
दूर मात्र कोवळे निरागस
रान रोज धगधगते आहे

खेळ चालतो दोघांमध्ये
बुद्धिबळाचे डाव मांडुनी
पटावरी त्या लढता लढता
प्यादे नाहक मरते आहे

सौख्याचे अन आनंदाचे
होताना सण इथे साजरे
कुणी ललाटी बांधून कफनी
धारातीर्थी पडते आहे

अपराधाचा घडा अताशा
ओसंडुनिया वाहत आहे
चक्र सुदर्शन तरी एवढी
वाट कशाची बघते आहे

काळ कधी का कुणी जाणला
भविष्य सेतू कुणी पाहिला
तरी उद्याच्या आशेवरती
सृष्टी अवघी जगते आहे

आदित्य

Friday, August 2, 2019

सीता

असे कोणते पाप माझिया हातुनि घडले
किती भोगले दुःख तरीही कमीच ठरले

स्वयंवराच्या सोहळयात संयोग घडावा
तिथेच नियतीचा हा ऐसा डाव जुळावा
चुकले का मी मनोमनी श्रीरामा वरले?

सुखात होती मिथिलानगरीमध्ये जानकी
डोलत होती ऐश्वर्याची जणू पालखी
सोडुन सारे मी रामाच्या रंगी रमले

राज्याची नव्हतीच मनीषा मजला काही
जरी होतसे जयजयकार दिशातुन दाही
तरी तेवढे कारण शिक्षेसाठी पुरले

वरदान कुणी मागावे अन ते मी भोगावे
वने तुडवुनी अरण्यातुनी वास करावे
नशीबाचेही असेच काही होते ठरले

श्रीरामांच्या संगे केला राज्यत्याग मी
भगवे वल्कल नेसुन त्यजिली माझी भूमी
अन पदराशी शंकेहुन काही ना उरले

दु:खाचाही असा सोहळा आम्ही मांडला
आनंदाने छोटासा संसार थाटला
वैराग्याचे सुख नियतीला अशात सलले

पतिव्रता मी, हरुनी गेला रावण मजला
आकाशाचा श्वास नभातुन तिथेच थिजला
अंधारापलीकडले मज काही ना दिसले

जपले मी पावित्र्य मनाचे अन शरीराचे
भकास परी मी जगले जीवन सन्मानाचे
आकांते डोळ्यातील अग्नी देखिल विझले

साद घातली कितीकदा श्रीरामा तुजला
सोडव येउन कैदेतुन कायमचे मजला
विश्वासाच्या श्वासावर केवळ मी जगले

असुरांचा संहार जसा केला श्रीरामा
सीतेचीही परतुनिया आली मग गरिमा
शंकेचे परि काहूर मनी का ऐसे उठले

दगड ठेवुनी छातीवरती थेट निघाले
प्रवेश करुनी अग्नितुन मी पवित्र झाले
परीक्षेत या अनलाचेही डोळे भिजले

पावित्र्याची अशी परीक्षा का मी द्यावी
अन रामाची सुटका यातुन सहजच व्हावी
मीच एकटी का हे पातक घेऊन फिरले?

अता पोरकी झाली श्रीरामाची सीता
चारित्र्याच्या प्रश्नावर उरला ना त्राता
संशय घेणाऱ्यांशी का श्रीराम ना लढले?

न्याय मला मिळवोनी देण्या कुणी न आले
ना लक्ष्मण वा हनुमंताचे मन गहिवरले
भक्त फक्त रामाचे सारे कट्टर ठरले

पुन्हा घडे वनवास अता कायमच्यासाठी
राम उभा पुरुषोत्तम होउन लोकांपाठी
दुःख एकट्या मातेचे मातीतुन विरले

आदित्य

Tuesday, July 23, 2019

गंधवेल

ओल्या ओल्या हळदीमध्ये सांज रंगली
उन्हे सरींच्या सोबत अवघ्या नभी गुंतली
पाऊस होऊन मिसळुन जाता मातीतुन मी
गंधवेल सर्वांगी सृष्टीच्या दरवळली

मी धावावे तुला भेटण्या थेट नभातुन
अन भिजवावे तुजला हिरव्या दिशादिशातुन
कुंभ रिते तुझियावर होता माझे सारे
धरा सावळी रोमारोमातुनी हरली

सुरू जाहले वाऱ्याचे थैमान भोवती
केशर कुंद धुक्यातुन उधळे धुळीसोबती
थरथरत्या वेलीस बिलगता तुषार अवचित
धुंद मिठीतुन तारुण्याची कळी उमलली

शुभ्र कळ्यांची काच तडकते गगनामधुनी
थेंब चमकती आकाशाच्या आरशातुनी
पाण्यावरती तरंग उठता अन ओसरता
पावसातली गाणी ओठांवर अवतरली

चैतन्याचा पाट खळाळे जागोजागी
कणाकणातुन सुप्त स्पंदने होती जागी
मिसळुन जाता सूर पावसातिल नात्याशी
तुझ्या नि माझ्या नात्याची चांदणी उगवली

कोरून जाता पाऊस ऐसी संध्या हृदयी
इंद्रधनूची उधळण मनपटलावर होई
गंधवेल उगवून माझिया अंगणामध्ये
आनंदाची धारा आयुष्यात बरसली

आदित्य

Friday, July 19, 2019

क्षणात एका जगून जातो

नजर भेटता नजरेला मी
खोल कुठेसे बुडून जातो
कितीक क्षण मी आयुष्याचे
क्षणात एका जगून जातो

तुषार उडवत हलके हलके
झरे फुलविशी लोभसवाणे
तुझ्या तेवढ्या हास्यावरती
सर्वस्वे मी लुटून जातो

मेघ अंबरी विहरून येतो
श्रावण होउन माझ्यापुरता
ऋतूत तुझिया चातकापरी
पावसात त्या भिजून जातो

काळ थांबतो, श्वास थांबतो,
नजर तेवढी बोलत असते
बांध मुक्या शब्दांच्या वेगे
डोळ्यांमधुनी फुटून जातो

अवघी सृष्टी जुळून येते
पूर्ण होउनी माझ्याभवती
त्याच ठिकाणी येउन पुन्हा
त्याच क्षणांना जगून जातो

वाट तुझी मी होतो अन तू
प्रवास होशी माझा सारा
तुझी सावली होतो मी अन
तुझ्याच वाटेवरून जातो

आदित्य

तुझेच होऊन गेले सारे

तुझेच होऊन गेले सारे माझे काही उरले नाही
सरला नाही असा एकही क्षण की विरही झुरले नाही

कातरवेळा घेऊन येती पाऊस ओला वाऱ्यावरती
पण विरहाच्या सरींमधुनी निखार काही विझले नाही

मधेच पडला पडदा मंचावरती माझा प्रवेश होता
उभी तिथे मी तिष्ठत अजुनी नाटक तैसे संपले नाही

खिडक्या दारे बंद जाहली तशी अडकले घरात माझ्या
रातीचा मग चंद्र निमाला, कुठे चांदणे उरले नाही

मार्ग थांबले की थांबवले, जरी पावले उमटत होती
तुझी पावले जशी हरवली, मार्गही पुढचे दिसले नाही

आदित्य

आठवणींची पालवी

आठवणींची पालवी जशी गळू लागली
चाहूल शिशिराची हृदयातुन सलू लागली

मोहरणे स्वप्नातच आता उरले केवळ
कळी कळी खुलण्याच्या आधिच मिटू लागली

थांबवले दररोज स्वतःला जळण्यापासून
आणि स्वप्नं बर्फ़ाची माझी जळू लागली

हातावरल्या रेषांमधले मार्ग बदलता
नियतीच्या खेळाची पद्धत कळू लागली

जाग अचानक आली मजला हुंदके ऐकून
अन प्राजक्तासवे रात्र ओघळू लागली

गर्दीमध्ये अनोळखी मी धडपडताना
सावलीसुद्धा माझी आता लपू लागली

आदित्य

फक्त एवढे जाता जाता

फक्त एवढे जाता जाता करून जा तू
आठवणींतून माझ्यापाशी उरून जा तू

बाग कोवळी सुकून गेली आहे माझी
गंध फुलांच्या श्वासांमध्ये भरून जा तू

काय म्हणावे अपुल्यामधील नात्याला या
एकदा तरी उत्तर याचे लिहून जा तू

हसता हसता निरोप घेताना शेवटचा
तुझे तेवढे डोळे ओले पुसून जा तू

जाशिलही ओलांडुन दर्या क्षितिजापाशी
किनाऱ्यासही थोडे ओले करून जा तू

साठवलेला पाऊस आता आटत आहे
शेवटचे डोळ्यांतून माझ्या गळून जा तू

आदित्य

Tuesday, March 26, 2019

नशा

लाजऱ्या ओठी तुझी लाली मला अलगद टिपू दे
आज रसवंती नशेमध्ये तुझ्या मजला बुडू दे

मोकळ्या केसात तुझिया जागवू दे रात्र माझी
मोगऱ्याचा गंध सर्वांगावरी मज पांघरू दे

सोड सखये आज सारे नेहमीचे ते बहाणे
धुंद प्रेमाच्या मिठीतुन तोल थोडासा ढळू दे

स्पर्श लाभो चांदण्याचा पौर्णिमा होता तुझी अन
रान सर्वांगी शहाऱ्याचे अशा राती  उठू दे

संपुनी जातील सारी अंतरे ऐसे सखे तू
येउनी बाहूत माझ्या स्पर्श स्पर्शातुन भिनू दे

जाणवू दे मला हृदयातली धडधड तुझ्या गे
उष्ण श्वासांच्या लडी मानेवरी माझ्या झरू दे

भान विसरोनी जगाचे जागवू ऐसी निशा की
चंद्र बेधुंदीत प्रेमाच्या पहाटे विरघळू दे

आदित्य

Sunday, March 24, 2019

देव अताशा बोलत नाही

गाभाऱ्यातिल देव अताशा बोलत नाही
देव तिथे एकटा तयाला संगत नाही

मंत्र-यज्ञ चालती राऊळी वैदिक मोठे
परी आरतीसम मंत्रांना रंगत नाही

गर्दी जमते अलोट भाविक अन भक्तांची
रांग इथे इच्छा, नवसांची संपत नाही

ओरडून सांगा हो कोणीतरी एकदा
'हे देऊळ आहे, व्यापाऱ्यांची पंगत नाही'

नोटांनी ठरतो भक्तीचा दर, भाव मंदिरी
हृदयातील देवाला तिकडे किंमत नाही

देव कधीचा निघून गेला आहे आता
दगड होउन बसण्याची त्याची हिंमत नाही

देऊळ कसले दुकान हे श्रद्धेचे केवळ
चालू राहिल दगड जोवरी भंगत नाही

आदित्य

Friday, March 22, 2019

डोंबारी

एका अदृश्य दोरीवरून
डोंबारी चालतो आहे,
डोक्यावर एक गाठोडं घेऊन.
त्याचं ओझं पेलून.
एकीकडे जन्म, एकीकडे मृत्यू.
एकीकडे अंधार, एकीकडे प्रकाश.
या द्वंद्वात , स्वतःचा आणि जगाचा
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे

नावाला एक काठी आहे हातात.
तोल गेला तर आधार द्यायला.
पण जिथे थांगच नाही दोन्ही बाजूंचा
तिथे ती टीचभर काठी
फक्त एक उपचार म्हणून
वागवायची आयुष्यभर.
कदाचित टेकेल आणि वाचवेल,
या एक तुटपुंज्या आशेवर ,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे

दोरी कधी संपली तर ..
पाऊले आपली चुकली तर..
नुसत्या प्रश्नांनीच भीतीची वीज चमकते.
अन मग दिसतात .....
अंधारातले घुबडांचे डोळे!
चमकणारे, जणू पूर्वजांची पिशाच्चे
मानगुटीवर घेऊन फिरणारे!
केविलवाणे हसून त्यांच्या ....
हजार जिभांनी आलेले
प्रश्नांचे विषारी बाण
डोंबारी सहन करतो आहे.
जखमांकडे दुर्लक्ष करत,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे

त्याला कधी वाटतं संपवावं सगळं .....
द्यावं झोकून आणि जावं मृत्यू च्या कुशीत.
पण गाठोड्याची जाणीव होताच
पाय कापू लागतात.
कधी काचा, कधी काटे.
कधी विंचू कधी निखारे.
काहीही वाटेत आलं तरी...
पुढे चालू लागतात.
पर्यायच नसतो काही.
पुढच्या जन्माची स्वप्नं बघत...
असे गेले कित्येक जन्म
त्याच अदृश्य दोरीवरून,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे.
डोक्यावर एक गाठोडं घेऊन.
त्याचं ओझं पेलून,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे.

आदित्य

आराध्य तू

Happy Women's Day... 


आराध्य तू


जन्म देणारा जिवाला 

सर्जनाचा गर्भ तू

बाग फुलवी ते सुगंधी 

मृण्मयी वात्सल्य तू

जग तुझ्यावाचून उरती 

क्षुद्र निव्वळ श्वास काही

तेज देणारी तयांना 

शक्ति तू सौदर्य तू.


मर्त्य आणिक अमृताला

जोडणारा तू दुवा

कैकदा एकाच जन्मी

जन्म तू घेशी नवा

संकटांचे भस्म फासून 

रक्त भरशी मळवटी 

भैरवी माता जगाची

काल तू, मार्तंड तू


ना तुझ्या वाचून काही

जन्मले पृथ्वीवरी

देवही लोटांगणे घाली

तुला मन्वंतरी

देवळाचे देवपण 

ठायी तुझ्या गंगेप्रमाणे

अमृताचा ओघ तैसे

तेज तू, सामर्थ्य तू


भावनांची, लाघवांची

जोडीशी नाती किती

कल्पवृक्षांचीच रूपे

देवता आकारिती

कर्मयोग्याचे जणू तू

घेतले व्रत वैष्णवी,

लाभले अम्हास ऐसे

ओज तू, वरदान तू


वंचितांना दे अखंडित 

धार तू वरदायिनी

हात मायेचा तुझा दे

माय जीवन वाहिनी

एक देही, एकतारी

धारिसी रूपे किती 

सकळ जगती भावनांचे

मैत्र तू, आराध्य तू.


आदित्य

असा रंग चढतो...

असा रंग चढतो तुझा मजवरी की
असे वाटते तो उतरणार नाही
गंधाळलेला तुझा स्पर्श माझे
अंगांग सारे विसरणार नाही

वसंतात या मी अशी मोहरुनी
फुलले धुमारे असे आज काही
फुलांचेच होता आयुष्य माझे
ऐसा ऋतूरंग सरणार नाही

केसांत माझ्या असा वाहतो तू
जसा खेळतो धुंद वारा फुलांशी
तुझे श्वास लावे अशी आग अंगी
तुझ्यावाचूनी मुळी विझणार नाही

डोळे तुझे छेदिती मर्म माझे
संमोहूनी जादुई मंत्र जैसे
पिऊन जाशील नजरेतुनी ते
आणि भान मजला उरणार नाही

श्वासास माझ्या तुझा श्वास लाभे
जसे टेकवी ओठांवरी ओठ तू, अन
रंगून तुझिया रंगात अवघ्या
माझी अशी मीच उरणार नाही

--आदित्य

Tuesday, January 8, 2019

गुड मॉर्निंग ३

आज विवेक सकाळी लवकर उठला. म्हणजे जरा अंमळ लवकरच. त्याच्या कॉलेज च्या classmates  ची Reunion Trip  होती. आणि ट्रिप म्हणजे गाणी, गेम्स शिवाय काही खरं नाही. विवेक कॉलेजला असताना छान गायचा आणि त्याला हे माहित होतं. त्यामुळे याचा तो पुरेपूर फायदा करून घ्यायचा. गाणं कळणाऱ्या , ना कळणाऱ्या  अशा सगळ्यांना तो हवा असायचा. चांगलाच भाव मिळायचा त्याला. ही ट्रिप पण याला काही अपवाद  नव्हती. त्याचा गाण्याचा छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठीची गाणी, lyrics , त्यांचे tracks , स्पीकर वगैरे वगैरे तयारी चालू होती. सगळी कामं आटपुन, घरच्यांना टाटा बाय बाय करून विवेक ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहोचला. त्याला मुळात खात्रीच नव्हती कि बाकीचे वेळेत येतील. आधीचे ३५ येणारे आता १४ वर आले होते. एवढा 'दांडगा' उत्साह जरा चिंताजनकच वाटत होता त्याला. पण ७-८ ओळखीचे चेहरे बघून त्याला जरा बरं वाटलं. त्याला कल्पना नव्हती कि पुढे नेमकं काय घडणार आहे.
अक्षय, तुषार, मेधा वगैरे तेव्हाचे जवळचे चेहरे एकदम वेगळे दिसायला लागले होते. पोक्त, सुटलेलं पोट, डोळ्याखाली dark circles, टक्कल, पांढरे केस वगैरे वगैरे. वय वाढल्याची सर्व लक्षण अगदी सहजपणे दिसत होती. क्षणभर त्याला वाटलं, हेच का ते, ज्यांच्याबरोबर कॉलेज ला धम्माल केलेली...! अर्थात तोही बदलला होताच की. पण स्वतःलाच स्वतःमधले बदल सांगणारे आरसे अजून तयार व्हायचेत. त्यामुळे सगळेच जण एकमेकांची चेष्टा, मजा करत खिदळत जुन्या दिवसांची उजळणी करण्यात व्यग्र झाले होते.
तेवढ्यात विवेकला मागून "Hi विवेक " अशी हाक ऐकू आली. विवेकने Casually मागे वळून बघितलं. आणि क्षणभर त्याचं हृदय धडधडणं थांबलं. एक अनामिक शहारा अंगावरून सरसरत गेला. हाक मारणारी दुसरी कोणी  नसून अमृता होती. विवेकला पूर्णपणे अनपेक्षित होती ती इथे. काही क्षण विवेक तिच्याकडे हरवल्यासारखा पाहतच राहिला. ते काही क्षण तिथे केवळ तो आणि अमृता असे केवळ दोघंच होते. ट्रिप, गाणी, गेम्स आणि बाकी सगळं विसरला होता तो. आयुष्यात असे काही क्षण येतात कि जे साठवून पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. असाच होता हा क्षण त्याच्यासाठी. एक सुखद धक्का. हवाहवासा वाटणारा. अमृता फक्त स्मितहास्य करत विवेकला न्याहाळत होती. तर आनंद, रुसवा, प्रश्न, उत्तरं अशा भावनांची चेहऱ्यावर सरमिसळ होऊन विवेकचा झालेला पुतळा बघण्यासारखा होता. अमृताला तो १२ वर्षांनी भेटत होता. आणि ती काळाला ना जुमानता आलेल्या एका सुखद स्वप्नासारखी प्रत्यक्षात समोर दिसत होती. तेच खट्याळ डोळे, लोभस हसणं, भरभुरणारे केस, गळ्यातल्या scarf शी चालू असलेला चाळा ..काय काय म्हणून साठवू असं झालं होतं त्याचं.
"विवेक... गुड मॉर्निंग ..! पुन्हा थोडी लाडिक हाक मारत तिने हात पुढे केला. विवेक अजूनही धक्क्यातच होता. त्याने तंद्रीत तसाच हात पुढे करून तिला विष केलं. "गुड मॉर्निंग." आणि एकदम तो भानावर आला. स्थळ काळ प्रसंग लक्षात आल्यावर तो चटकन वळला आणि इतर मित्रांशी बोलायला गेला. प्रचंड आनंद झाला होता त्याला. त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. अमृताही हसून इतरांशी बोलायला गेली. तिला यापेक्षा काही वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. तिला 'विवेक तस्साच आहे अजून .. 'असं वाटून बरं वाटलं. खरं तर तिची परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. तिलाही खूप खूप आनंद झाला होता. तिने तो चेहऱ्यावर दाखवला नाही.. बस्स.

आता हा सीन बघून 'हरकत नाही... चालायचंच ..!' वगैरे म्हणून सोडून देणारे ते मित्र कसले. ट्रिप ला लागणारा मसाला मिळाला होता त्यांना आयताच. सगळ्यांना त्यांच्या नात्याची आणि सद्य परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. पण तरी विवेकला चिडवणं सुरु झालंच होतं. विवेक लाजत होता, अमृता हसत होती, आणि दोघांनाही ते कुठेतरी आवडत होतं. वर्तमानाच्या साखळ्या थोड्या सैल झाल्या होत्या... भूतकाळात थोडावेळ फिरून येण्यापुरत्या.
सगळ्यांचं एकमेकांना जुजबी भेटून झाल्यावर सगळे बसमध्ये बसले. त्यांनी ट्रिप साठी एक रिसॉर्ट बुक केलं होतं. आणि तिथे जाऊन फुल्ल टाईमपास होणार होता. तसा reunion  वगैरे ला फार काही वेळ लागत नाही. अर्धा पाऊण तास भेटून खरं तर जी व्हायची ती union होणार असते. पण हा अजेंडा नसतोच मुळी अशा ट्रिप ला. रोजच्या टाईमटेबल पेक्षा काहीतरी वेगळं, नेहमीच्या पब्लिक पासून दूर, काहीतरी नवीन अनुभवायचं असतं. किंबहुना अशी गरज असते प्रत्येकाची. असं काही केलं कि पुन्हा रोजच्या आयुष्यात oiling  केल्यासारखं नव्याने तुमचं इंजिन पळायला तयार! ही ट्रिप पण अशीच होती. बसमध्ये बसल्यापासून दुसऱ्या  दिवशी बसमधून उत्तरेपर्यंतचा प्लॅन  तयार होता. विवेक ऑलरेडी आत जाऊन खिडकी पकडून बसला होता. हळूहळू सगळे आपापली सोय बघून कुणाकुणाच्या बाजूला जाऊन बसले. पण विवेकच्या शेजारी मुद्दाम कोणी बसलं नाही.  सगळ्यांना वाटलं अमृता बसेल. विवेकलाही तसंच वाटलं. पण अमृता दुसरीकडेच जाऊन बसली. 'आपण का करतोय अपेक्षा हिच्याकडून? अशी कुठली आपुलकी उरली आहे कि तिने माझ्या शेजारी येऊन बसावं?' विवेक स्वतःलाच प्रश्न करत होता. पण जरा रागही आला होता त्याला. '१२ वर्षांनी भेटून देखील तिला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये की काय...? की मीच जास्त एक्ससिटेड आहे?' असही त्याला वाटून गेलं. थोडा खट्टू होऊन तो खिडकीबाहेर बघायला लागला आणि गाणी, भेंड्या, गप्पा सुरु झाल्यावर पुन्हा नॉर्मल झाला. विवेक आणि अमृता इतरांशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होते. पण एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत. दोघांची कित्येकदा नजरानजर झाली खरी. पण कधी विवेक नजर चोरत होता तर कधी अमृता. हे एक सोडलं तर ट्रिप ला लागणारे  बाकी सगळे ingredients तिथे उपलब्ध होते. फक्त विवेक आणि अमृताचं reunion  अजून झालं नव्हतं.
त्यांचा बसचा प्रवास ४-५ तासांचा होता. सुरुवातीचे २-३ तास सगळे किलबिलाट करून शांत झाले आणि जुन्या आठवणीत रमून गेले. विवेक अमृताची कट्टी अजूनही कायम होती. कोणी सुरवात करायची? काय बोलायचं? ... काय काय बोलायचं? असे अवघड प्रश्न भिंत बनून उभे होते दोघांच्या समोर. विवेक मनातून थोडा अस्वस्थ होता. त्याला अमृता भेटेल याची मुळीच अपेक्षा नव्हती. तिच्यासमोर कसं वागायचं, याची काहीच तयारी नव्हती त्याची. खरंतर बोलण्यासाठी एवढं  होतं... पण शब्द अजूनही वाट शोधत होते बहुतेक. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाही बसमध्ये. पण धीर होत नव्हता कि शब्द सुचत नव्हते हे त्याचं तोच जाणे. अमृता पण excited होती पण ती prepared होती. विवेक भेटणार याचा तिला कोण आनंद झाला होता. पण तिला तिथे सगळ्यांसमोर चेष्टेचा विषय व्हायचं नव्हतं. त्यांचं नातं म्हणजे चेष्टा नव्हती. नियतीने चेष्टा केली होती ही गोष्ट वेगळी. तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होता. एक ट्रिप अपुरी होती त्यासाठी. पण अधीरपणे वागून तिला या संधीचा चार्म घालवायचा नव्हता. तिला खात्री होती की दोघांना त्यांचा असा एकांत नक्की मिळेल. त्यामुळे संपूर्ण प्रवासात ती एकदम relaxed होती.

रिसॉर्ट वर पोहोचल्यावर ठरलेल्या प्लॅन प्रमाणे कार्यक्रम सुरु झाला. अशा reunion ला काही उत्साही मंडळी फार गरजेची असतात. हे सगळं ठरवणारी. गाणी म्हणून म्हणून किती म्हणणार. गेम्स, अंताक्षरी, quiz  वगैरे शिवाय अशा ट्रिप्स  ना काही मजा नाही. विवेक खरंतर यात पडणारा नव्हता पण तोही सगळ्यांसोबत उत्साहाने सहभागी होत होता. कारण अर्थातच 'अमृता' होती. डिनर / ड्रिंक्स ला संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते.  एकूणच सगळा माहोल नॉस्टाल्जिक झाला होता. सगळे वयाने १४-१५ वर्ष लहान होऊन भूतकाळात गेले होते. Time Travel केल्यासारखं. जुन्या आठवणी, किस्से, एखाद्या सरांची मजा, जुनी अफेअर्स ..वगैरे वगैरे....आठवून, चघळून सगळे नुसते खिदळत होते. विवेक आणि अमृता एकाच टेबल वर समोरासमोर बसले होते. मंद प्रकाश होता. जुनी गाणी चालू होती. दोघंही आता एकमेकांशी बोलायला लागले होते खरे. पण अगदीच गरजेचं म्हणून. सकाळचा awkwardness मात्र थोडा कमी झाला होता. जमलेला प्रत्येक जण ट्रिप साठी ठरवून दिलेली आपापली जबाबदारी चोख बजावत होता. कोणी DJ होता, तर कोणी ऑर्डर चं बघत होतं तर काही जण ड्रिंक्स ... अचानक विवेकच्या लक्षात आलं  तो आणि अमृताच बसले आहेत टेबल वर आणि बाकीचे कुठे ना कुठे बिझी आहेत. विवेक बळंच काहीतरी काम काढून उठला आणि जायला लागला.
"विवेक , थांब ना.. बस ना  इथेच. " अमृता हळुच त्याला म्हणाली. विवेकने तिच्याकडे बघितलं. त्या मंद प्रकाशात किती सुंदर दिसत होती ती. तिने बस ना अशी हातानेच खूण केली. विवेकचा तिथून जायचा विचार क्षणार्धात मावळला. तसं त्यालाही वाटत होतंच कि फक्त त्या दोघांना थोडा वेळ मिळावा. विवेक बसल्यावर तिने विचारलं "कसा आहेस?"
"छान" असं विवेकने थोडं रुक्ष आणि पुस्तकी उत्तर दिलं.
"सकाळपासून तुला आत्ता सुचतंय हे विचारायचं." एक उपरोधिक कटाक्ष टाकून विवेक म्हणाला. वास्तविक पाहता तो तरी कुठे काय बोलला होता तिच्याशी... पण तरी... उपरोधिक...! अमृता फक्त हसली. ती विवेकला ओळखत होती आणि तो अजून तसाच आहे याची पुन्हा तिची खात्री पटली.
"छान दिसतियेस.. म्हणजे अजूनही तेवढीच छान दिसतियेस!" विवेक थोडा लाजतच म्हणाला.
"थँक्स .. मी रोजच अशी दिसते. " अमृता मिश्कीलपणे म्हणाली आणि डाव्या हाताने केसांशी खेळत विवेकच्या उत्तराची वाट बघायला लागली
विवेकला उत्तराचा रोख कळला. तोही हसत म्हणाला "रोज अशी भेटलीस तर रोज असंच म्हणीन.छान दिसतीयेस. " अमृताला हे आवडलं. ती मनापासून हसली आणि म्हणाली, "मला आवडेल तुला रोज भेटायला. भेटशील का असाच...?"
विवेक एकदम पटकन म्हणून गेला... "हो नक्कीच... पण जर तू सोडून गेली नाहीस तर. " दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. विवेक एकदम गंभीर झाला. अमृताची नजर खाली होती. तिच्याकडे रोखून बघत विवेक तिला म्हणाला, "का सोडून गेलीस मला... ?" विवेक इतके दिवस साठवून ठेवलेले प्रश्न आता एकामागून एक विचारात होता.
"जायच्या आधी ना निरोपाची भेट, पोचल्यावर ना खुशाली...काय समजायचं मी? तुला एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही? मी कोणीच नव्हतो का तुझा...? तू तिथे पोचल्यावर आठवडाभराने मला इतरांकडून कळलं तू सुखरूप आहेस.. इतपतच होतं का आपलं नातं? मी काळजी करत असेन, वाट बघत असेन असं जराही वाटलं नाही तुला?"
विवेकचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. एक एक प्रश्न जुन्या जखमांना ओले करून जात होता. अमृता मधूनच विवेककडे बघत होती. पण त्याचा आवेश बघून काही बोलली नाही. पुन्हा नजर खाली करून फक्त ऐकत होती.
"अमेरिकेतली नोकरी, छान देश, चांगलं काम यात तू विसरून गेलीस मला." विवेक अगदी उपरोधिक आणि टोचून बोलत होता. नव्हे, इतकी वर्ष मनात दबलेली आग ओकत होता. गेल्या १२ वर्षांमधले हे निखारे विझेलच नव्हते. आणि आज अचानक अमृता भेटल्यावर ते अजून भडकून पेटून उठले.
अमृता अजूनही गप्प होती. भावनांच्या भरात तिला नात्याचा कायमचा कडेलोट नको होता. अजूनही शेवटचा नाजूक धागा शिल्लक होता तिच्या दृष्टीने.
विवेकचं चालूच होतं. "बरं गेलीस ती गेलीस..... परत आल्यावर माझ्याशी तुला एकदाही बोलावं वाटलं नाही..? मला आयुष्यातूनच काढून टाकलंस तू. " विवेकचा आवाज कापरा झाला होता. "आणि आता मी रोज अशीच दिसते म्हणून माझ्या जखमेवर मीठ चोळताना काहीच वाटत नाही तुला..?"
विवेक रागाने अत्यंत विखारी बोलत होता. त्याला भान नव्हतं आपण कुठे काय बोलतोय याचं. भिंत फोडून पाणी वाहत सुटलं होतं नुसतं. किनाऱ्या वरील नुकसानाची तमा न बाळगता. आणि पूर मात्र अमृताच्या डोळ्यांना आला होता. तिने बराच वेळ दाबून ठेवलेलं रडू शेवटी कोसळलंच. तरीही ती काहीही बोलली नाही. विवेकचा प्रत्येक आरोपावर तिच्याकडे उत्तर होतं. पण त्याने काय सिध्द झालं असतं?
विवेक कडे तिने जाणून बुजून बघणं टाळलं आणि केवळ खाली बघून रडत राहिली. आणि त्याचं जळजळीत बोलणं सहन करत राहिली.
विवेकच्या ही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. विवेक उठला. अमृताकडेपाठ करून उभा राहिला. आणि म्हणाला,
" मला तेव्हाच कळायला हवं होतं अमृता, की प्रेम वगैरे काही नसतं. खोटं असतं सगळं. स्वार्थ दिसला की ते गुंडाळून ठेवता येतं. आणि कार्यभाग साधला की आहेच वेळ उरलेलं प्रेम करायला.... "
हे वाक्य ऐकलं आणि अमृताचा धीर सुटला. तिला हुंदका आवरता आला नाही. लहान मुलीसारखी तोंड हातात लपवून ती ढसाढसा रडायला लागली. तिला वाटलेलं की ट्रीपला विवेक भेटेल, जुन्या गप्पा होतील, एक जी दरी निर्माण झाली आहे ती कमी व्हायला मदत  होईल... आणि हे भलतंच घडत होतं. विवेक इतकी टोकाची प्रतिक्रिया देईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं.
विवेक तिच्याकडे पाठ करून उभा होता. स्वतः च्या भावना लपवायला. खरंतर रडून कोणी दुर्बल ठरत नसतो. मनातल्या वादळाला वाट करून देण्यासाठी संयम सोडून वागण्यापेक्षा एक वेळ रडलेलं बरं. पण या तत्वज्ञानाच्या पलीकडे होती विवेकची मनस्थिती. जिची त्याने एवढी वाट बघितलेली, ती आता अशी परकी होऊन भेटल्यावर विवेक त्याच्या वागण्यातला ' विवेक ' आणि संयम विसरला होता. आणि याचा बळी ठरलं होतं अमृताचं प्रेम! जे तिला अजिबात सहन झालं नाही. बराच वेळ कुणीही काहीही बोललं नाही.  अमृताने डोळे पुसले. रडून डोळे आणि नाक
लाल झालं होतं. कापऱ्या क्षीण आवाजात अमृता म्हणाली, "मी या सगळ्यांची उत्तरं देऊ शकते विवेक. पण हे कुठलं कोर्ट नाही आणि मला काहीही सिध्द करायचं नाहीये. मला एकच सांग... माझ्याशी लग्न करायला नाही का म्हणालास...?" विवेक काही बोलला नाही. अमृता उठली आणि त्याच्या समोर जाऊन म्हणाली, "मला उत्तर हवंय विवेक. तू लग्नाला तयार का नव्हतास? " अमृताचं रडणं चालूच होतं. पण आवाजात थोडी कठोरता होती.
"मला पटेल असं उत्तर दिलंस तर मी याक्षणी निघून जाईन आणि पुन्हा कधीही तुला तोंड दाखवणार नाही आयुष्यात."
एवढं एक वाक्यही ती न रडता बोलू शकली नाही. विवेक तिच्या समोरच होता. या प्रश्नाचं तिला पटणारं उत्तर मात्र विवेककडे नव्हतं. अधून मधून विवेक तिच्याकडे बघत होता पण तिच्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत होत नव्हती. अमृता थेट या प्रश्नावर येईल असं त्याला वाटलं नव्हतं.
१२ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा विवेकने नाही म्हणून सगळ्यांनाच धक्का दिला. विवेकला तेव्हा धड नोकरी नव्हती आणि आयुष्यात काय करायचंय याबद्दल तो अजिबात सीरियस नव्हता. या उलट अमृता एकदम sorted होती.
"मला अजूनही हा प्रश्न खात असतो विवेक, नेमकं काय कमी पडलं म्हणून आपण एकत्र येऊ शकलो नाही. मी काय केलं असतं म्हणजे तू तयार झाला असतास...?" स्वत:ला सावरत, डोळे पुसत थोड्या कडक शब्दात, जाब विचारण्याच्या सुरात ती म्हणाली.
विवेक काही बोलणार हे जाणून तीच पुढे म्हणाली,
"मी तुला हजारदा विचारलं होतं  'जाऊ का' म्हणून. तुझ्या मनात काय चालू आहे ते अजिबात कळू दिलं नाहीस."
आता अमृता थांबणार नव्हती. त्याच्याकडे नजर रोखून ती म्हणाली,
"मलाच काय तुझ्या घरच्यांनाही विचित्र वाटलं तेव्हा. मी जायच्या आधी तुझ्या आईलाही भेटून आले, नेमकं काय झालंय ते जाणून घ्यायला. तुला मी का नकोय ते समजून घ्यायला." हे बोलताना तिला पुन्हा रडू आलं. विवेकने चमकुन तिच्याकडे बघितलं. त्याला हे अजिबात माहीत नव्हतं.
अमृताचं रडणं रास्तच होतं. गेली १२ वर्ष ती भावनांचं, प्रश्नाचं आणि अपेक्षाभंगाचं ओझं वागवत होती. मधल्या काळात विसर पडला होता याचा पण आज आत्ता हे सहन होत नव्हतं.
"तुझं माझ्यावर प्रेम होतं ना...?" तिच्या आवाजाचा रोख बदलला. " होतं की नाही ......?" ओरडलीच ती जवळ जवळ. नुसतं मान डोलवून विवेक हो म्हणाला. अजूनही तो खालीच बघत होता. वर बघायची हिम्मत नव्हती त्याच्याकडे.
"हो ना.... मग मला एकदा सांगून बघायचंस रे की जाऊ नकोस म्हणून. मी आनंदाने थांबले असते आपल्यासाठी. " तिच्या आवाजात कमालीची अगतिकता होती. पण ती आता रडत नव्हती.
"आणि तू मला दोष देतोयेस...? लाज वाटली पाहिजे तुला. स्वतः च्या नाकर्ते पणाचं आणि घाबरट पणाचं खापर माझ्यावर फोडताना थोडा तरी विचार केलास आधी...?" हवेत तलवार फिरावी असं तिचं धारदार बोलणं विवेकच्या चिंधड्या करून गेलं.
धक्का बसून डोळे विस्फारून तो अमृताकडे बघत होता. काय बोलावं काहीच सुचेना. ' नाकर्तेपणा, घाबरटपणा ' हे शब्द कानात गरम शीशाच्या रसाप्रमाणे ओतले गेले. असं याआधी त्याच्याशी याविषयावर कोणीच बोललं नव्हतं. स्वतःच रंगवलेल्या भ्रमाचा फुगा फाटकान फुटला होता.
"तुझी आर्थिक परिस्थिती, नोकरी धड नव्हती, तुझ्या    मनासारखी नव्हती, म्हणून मी स्वार्थी? माझ्या भावना खोट्या? माझी महत्त्वाकांक्षा चुकीची? " अमृता हाताची घडी घालून भुवया उंचावून त्याला जाब विचारत होती. विवेककडे यावर त्याची बाजू मांडता येईल असं काही नव्हतं. अमृता जे बोलत होती त्यात त्याला तथ्य दिसत होतं.
"खरी गोष्ट अशी आहे की तुला स्वतःला तुझ्या प्रेमाबद्दल विश्वास नव्हता. प्रेम निभावणं सोडून तू सोपा मार्ग पत्करलास. एकत्र न येण्याचा."
विवेकचं अवसानच गळून गेलं हे ऐकुन. दोन मिनिटं कोणीच काही बोललं नाही. विवेकच्या डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला जुने दिवस आठवत होते. प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहत होते. आणि तो स्वतःला चुकीचं वागत असताना बघत होता. आत्ता...... १२ वर्षांनी.
तो शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याला स्वतःबद्दल वाटणारी सहानुभूती पार धुळीला मिळाली होती. ' मी अमृतापेक्षा कमी प्रतीचा दिसेन म्हणून मी पळवाट काढली?' स्वतः ला तो हा प्रश्न विचारत होता आणि याचं उत्तर त्याला ' हो ' असं मिळत होतं. त्याच्या इतक्या वर्षांच्या धगधगत्या ज्वालामुखीवर अमृताच्या आजच्या बोलण्याने अमर्याद पाणी ओतलं होतं. त्याला रडू आवरलं नाही. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांतून पाणी ओघळत होतं. दोन्ही बाजूंनी त्याचं मन खात होतं. एकीकडे अमृताला मुद्दाम टोचून बोलल्याबद्दल आणि भूतकाळातल्या घटनांबद्दल. पण वेळ निघून गेली होती आणि खूप उशीर झाला होता. काळ कोणासाठी थांबत नाही, मात्र सरल्याच्या खुणा नक्की सोडून जातो, बोच ठेऊन जातो. वर्तमानकाळातील ही बोच दोघांनाही सलत होती. पण भविष्यकाळ मात्र त्यांच्या हातात होता.  आज ट्रीपला जे घडलं ते घडणं गरजेचंच होतं. मळभ निघून गेल्याशिवाय मोकळ्या निरभ्र आकाशात वावरता येणार नव्हतं.
बराच वेळ कोणीही काही बोललं नाही. विवेकला असं रडताना बघून अमृतालाच जरा वाईट वाटलं. ती या ट्रीप ला त्याच्या चुका दाखवायला, हिशोब करायला आली नव्हती. तिला फक्त विवेकला भेटायच होतं. तिला हे कळत होतं की...जुने दिवस परत येणार नाहीत पण पुढचे दिवस जुनं विसरून नव्याने नक्की जगता येतील, चांगले मित्र बनून..!
ती विवेक च्या जवळ गेली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विवेक डोळे मिटून च बसला होता. "विवेक" तिने हळूच हाक मारली. विवेक स्तब्धच.
"I am sorry विवेक." ती शांतपणे म्हणाली. "मला तुला दुखवायचं नव्हतं." विवेक काहीच बोलला नाही.
" मला खरंच तुला सॉरी म्हणायचंय. एक गोष्ट मला आयुष्यभर खात राहील.अमेरिकेहून परत आल्यावर मी तुला भेटायला हवं होता. इगो पायी नाही भेटले. भेटले असते तर आत्ता चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. या चुकीची शिक्षा मी आजवर भोगतिये. " तिच्या आवाजात खंत होती. पश्चात्ताप होता.
"तुझ्याकडे याची कबुली दिल्यावर मला जरा बरं वाटेल. किती दिवस हे ओझं घेऊन जगणार आपण. मला आपलं नातं liability म्हणून नकोय तर एक asset म्हणून हवंय."
विवेक एव्हाना थोडा शांत झाला होता. डोळे पुसून तो उठला. आणि एकदम अमृताला मिठी मारली.
"I am sorry  अमू. तुला कल्पना नाहीये तुझ्या असण्याने मी किती आनंदी असतो. आज तू मला बोलली नसतीस तर मी आयुष्यभर असाच मनात राग आणि विचारांत विखार घेऊन राहिलो असतो."
अमृताने त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि आश्वासक हसली.
" मी immature वागलो. पण म्हणून मी प्रेम केलं नाही असं नाही. माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर किंबहुना आहे. तू दूर होणार हे मला तेव्हा सहनच झालं नाही."
दोघांनाही एकदम हलकं, हायसं वाटलं. नंतर बराच वेळ दोघं बोलत होते. एकमेकांबद्दल, एकमेकांच्या घरच्यांबद्दल, आणि त्यांच्या नात्याबद्दल. फक्त त्यांच्या अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दिव्यावरची काजळी निघून गेली आणि लख्ख प्रकाश पडला.
त्यांना असं बघून  इतका वेळ दबा धरून बसलेली उरलेली  reunion शिट्ट्या मारत बाहेर आली. अमृता त्यांना thanks म्हणाली.... त्या दोघांना वेळ दिल्याबद्दल. दोघांनी एकमेकांचे नंबर save करून घेतले. त्यांना परत जायची इच्छा नव्हती पण जावं तर लागणारच होतं. त्यांचा वर्तमान त्यांची वाट पहात होता. आणि दोघंही आनंदाने एकमेकांना आपापल्या वर्तमानात सामवून घेणार होते. सकाळी सगळे आवरून बस मध्ये बसले. आता मात्र विवेक आणि अमृता शेजारी शेजारी बसले होते. ४- ५ तासांचा प्रवास होता. आणि त्या दोघांची मॉर्निंग कोणी गुड न म्हणताच गुड झाली होती.

आदित्य