Monday, September 14, 2026
मी किनारी राहतो
तेच तेच
तेच तेच राजा राणी
तोच राक्षस तोच पोपट
तोच पिंजरा तीच कहाणी
तोच ब्रम्ह तीच देव
तोच साधू तोच शाप
तीच गुहा अक्राळ विक्राळ
तेच भूत प्रेत पाप
चांदोबाच्या गोष्टींमध्ये
नवीन कोणी येणार काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
डोंगर बिंगर हिरव्या वाटा
तीच वाळू मधली नावं
पुसणाऱ्याही त्याच लाटा
माडाची बनं, कोवळी उन्हं
तेच सूर संध्याकाळी
तीच पश्चिम, तोच सूर्य
तीच हुरहूर कातरवेळी
शब्दांचा हा ढीग थोडा
आवरून बिवरून ठेवता काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
स्तब्ध शांत गाभाऱ्यातील
तीच पणती, तेल, वाती,
तेच कर्म प्रारब्धातील
तेच खांब कळस कासव
तीच घंटा तोच नाद
तीच तीच रोज प्रार्थना
तेच तीर्थ तोच प्रसाद
देव थोडा बदलुन स्वतः
देव होऊन बघता काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
आठवणींचा रडका पाऊस
हृदयामध्ये टपटपणारा
प्रेमाने भिजलेला पाऊस
त्याच त्याच खिडकीमध्ये,
पानांमध्ये दिसत असतो
तोच श्रावण तोच आषाढ
चिंब करून सोडत असतो
आता जरा दमला आहे
उद्या पुन्हा याल काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
तीच दारे खिडक्या वासे
तीच फुले प्राजक्ताची
तेच दव आनंदाचे
तेच कोनाडे अन भिंती
त्याच ओव्या जात्यावरच्या
तेच तुळशी वृंदावन अन
त्याच चिमण्या माडीवरच्या
घर आता जरा नवे
मोठे घेऊन बघता काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
तोच हट्ट रुसवा फुगवा
तेच भांडण तीच समजुत
तोच शब्द हळवा हळवा
बंद पंखा वाढव पंखा
माझी थंडी तुझा उकाडा
माझे बाण तुझी तलवार
नात्यांचा उद्धार, चुराडा
शेजारी अन ऑफिस मध्ये
इकडे तिकडे बघता काय
त्याच त्याच गोष्टीचा
कंटाळा नाही आला काय
Sunday, September 6, 2026
आनंदाचा प्रवासी
पंख लावुनी रोज मनाला
फिरुन येतो कवटाळुनिया
अपुल्या इवल्या आभाळाला
पावसातुनी कधी सुगंधी
दरवळतो मृद्गंध होऊनी
कधी होउनी नाव कागदी
अलगद येतो भेटायला
खेळ खेळतो किना-यावरी
कधी होउनी अल्लड लाटा
आणिक वाळूमध्ये ओल्या
ठेऊन जातो अस्तित्वाला
कधी होऊनी नात्यामधला
हात कुणाऱ्या हातामधला
ज्योत लावतो मैत्रेयाची
प्रत्येकाच्या दिव्या दिव्याला
हातावरल्या काही रेषा
पुन्हा भेटण्या नव्या जगाला
सोडुन द्यावे म्हणतो
शून्य तेवढे मागे सोडुन जावे म्हणतो
डाव्याला उजवे, उजव्याला डावे म्हणतो
मौनाचे गाणे कुठलेसे गावे म्हणतो
ते स्वप्नाचे दार मिटोनी घ्यावे म्हणतो
नदी सोडुनी दर्यासागर व्हावे म्हणतो
शिंपल्यामधे मोती ठेवुन जावे म्हणतो
Sunday, May 7, 2023
मेघ काही...
परतुनी जातात काही, रडवुनी जातात काही
कोरड्या डोळयात देखिल आसवे दिसतात काही
मागुनी निःशब्द हळव्या सावल्या उरतात काही
एकटा असतो अता अन पावले दिसतात काही
देव नसतो पण तिथे आता, असे म्हणतात काही!
Friday, March 31, 2023
शेवटची भेट
अपुल्या शेवटच्या भेटीचा
पाऊस अजूनही आठवतो
कधी अवेळी एकांती मग
पुनश्च डोळ्यांतुन कोसळतो
कधी उमगले नाही की ती
भेटच शेवटची होती
क्षण ओसरले किती तरीही
श्वास एकटा गहीवरतो
गहिऱ्या हिरव्या डोहामध्ये
तुझ्या स्मृतींना लोटून देखिल
विस्कटलेल्या आठवणींतुन
जीव अजूनी घुटमळतो
क्षितिजावरती पेरत जाता
अपुल्या आठवणींच्या बागा
सुगंध मुक्याने इथे कोरड्या
अश्रूंसंगे दरवळतो
आदित्य
अमृताचे कुंभ जैसे..
अमृताचे कुंभ जैसे चांदण्यातुन ओघळावे,
मी तुला हलकेच माझ्या भोवताली पांघरावे.
दाटले असता कधी नयनी बिलोरी चंद्र माझ्या,
मेघ मोती होत जावे अन मिठीतुन कोसळावे
ओंजळीतुन सांडता कविता कधी वाळूप्रमाणे,
वेचताना शब्द तेथे मोतियाचे सापडावे
शब्द माझे बापडे होतात जेव्हा मूक काही,
तू अशा कवितेस माझ्या डोळीयांतुन ओळखावे.
भेटलो नाही जरी प्रत्यक्ष आपण एकदाही,
पापण्यांतुन स्वप्न माझे रोज नयनी पाझरावे.
आठवांच्या पुस्तकाचे नेमके ते पान यावे,
हासणे ते आठवावे, अन् तुझे मी होत जावे
आदित्य
Thursday, June 16, 2022
सल
Saturday, April 9, 2022
बासरी
घनदाट आठवांच्या डोहात एकटी मी
वाहून जात आहे कोठे अशी कशी मी
लाभेल का मलाही कोठे तुझा किनारा
तेथें तुझ्या सुरांची होईन बासरी मी
Sunday, February 6, 2022
देव निघून गेला
Friday, February 4, 2022
रात्र
Tuesday, February 1, 2022
किनारा किनारा
Monday, January 31, 2022
तुकडे तुकडे
Friday, January 28, 2022
शब्द डोळ्यांत दाटले
Saturday, January 22, 2022
पैलतीरी वाट पाहे
Wednesday, January 5, 2022
निमित्त काही लागत नाही
Thursday, December 2, 2021
ओला पाऊस पाऊस
ओला पाऊस पाऊस
आला अनाहूतपणे
उभ्या डोळ्यांत डोळ्यांत
चांदण्याचे बरसणे
निखळून गेली पार
हळवीशी मोती माळ
आठवांचा तळ्याकाठी
थिजूनिया जाई काळ
चिंब बरसे अल्लड
ढग पांघरून झूल
गंध-मातीचे उभारे
नभापर्यंतचा पूल
भिजूनिया कवडसे
उतरती अंगणात
खेळ चाले पावलांशी
अन हुंदका मनात
धुके खिडकीमधुनी
पसरते घरातून
ओला निरोप मिळतो
पानांवर दवातून
गेला पाऊस पाऊस
मागे सोडून उसासे
स्वप्नांमधून उरती
रोज रोजचे दिलासे
आदित्य
Thursday, November 18, 2021
अमृत गोडी
आयुष्याला अवघ्या लाभो
अनंत अमृत-गोडी
पदरी लोभसवाणी सुंदर
नक्षत्रांची जोडी
नभी विलक्षण उत्सव
घडतो अमूर्त आनंदाचा
उजळुन जाई उत्साहाने
पडदा अवकाशाचा
ममतेचा गंगौघ कोसळे
मनात ठायी ठायी
हृदयी कवटाळूनिया होई
धन्य धन्य ती आई
काळोखाला उजळुन आली
सूर्याची नव किरणे
आता केवळ उत्साहाने
आनंदाचे झरणे
अद्वैताचे बंध जुळूदे
लक्ष्मी सरस्वतीचे
आशीर्वाद उभयतां लाभो
अखंड शिवशक्तीचे
आदित्य
Tuesday, November 2, 2021
उजळू दे
Tuesday, October 26, 2021
कधी सांजवेळी
Thursday, October 21, 2021
काय सांगू
आसवांची मी कहाणी काय सांगू....
प्रेम का ठरले अडाणी, काय सांगू ...
खेळ अर्ध्यातून का सोडून गेले
तोच राजा, तीच राणी, काय सांगू ...
मोजकी उरलीत आता फक्त मागे
तेवढी गीते पुराणी, काय सांगू...
भेटलो जर आठवांच्या लक्तरांशी,
ओळखीची मी निशाणी काय सांगू ?
रोज माझ्या मैफिलीमध्ये अताशा,
नांदते केवळ विराणी, काय सांगू...
Saturday, April 17, 2021
निचरा
Thursday, April 15, 2021
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
Monday, April 12, 2021
रंगवू अंधार माझा
Thursday, April 1, 2021
पण कसे विसरून जाऊ
Tuesday, March 23, 2021
शहीद-पर्व
Sunday, March 21, 2021
कृष्ण सख्या..
कविता
Friday, March 5, 2021
परतीचा प्रवास
Tuesday, December 1, 2020
आज एकट्या संध्याकाळी
Thursday, November 26, 2020
तेजाची गाथा
पाऊस ओला..
Saturday, November 21, 2020
पाऊस थोडा
Friday, November 20, 2020
आपल्यातले अंतर
तू जरी नसलीस येथे,
मी तुझ्यापाशीच आहे
आपल्यातले अंतर केवळ
सांगण्यापुरतेच आहे
तू मला दिसतेस सध्या
रोज कोठेही अचानक
Thursday, November 19, 2020
मला वाटते जे..
Tuesday, November 17, 2020
भरारी
Sunday, November 15, 2020
आणि तू..
Saturday, November 14, 2020
भेट अशी तू मला
दिव्य दिवाळी
Thursday, November 5, 2020
तर्पण
Sunday, November 1, 2020
खिडकीमधला पाऊस
Thursday, October 22, 2020
देणाऱ्याचे हात माग तू
Saturday, October 17, 2020
घे पुन्हा अवतार तू
Monday, October 5, 2020
पिंपळ
Friday, October 2, 2020
अत्तरात मी बुडून येतो
Saturday, September 26, 2020
तू मला विसरून जा
वास्तवाचा लेश
Thursday, September 24, 2020
माझिया क्षितिजास ओलांडून गेलो
Saturday, July 18, 2020
मनात साठवलेला पाऊस
Tuesday, July 14, 2020
आठवण
अंधुक चित्रे जुळुनी आली लख्ख उजेडी सारी
पडदा पडला होता मोकळ्या मंचावरती
नशा शिल्लक होती केवळ माझ्यापुरती
लाल रंग होता डोळ्यांवरती चढला
काचेच्या तुकड्यांमधुनी तुझाच चेहरा दिसला
स्मृृती झळकली प्रेमाच्या त्या शपथांची मग सारी
मी तिथेच अर्धा पेला आलो होतो सोडून
डोळ्यात निखारा घेउन हृदयात शहारा घेउन
हात टाळ्या वाजवणारे थोटे झाले होते
नाटक अपुले मंचामगील खोटे झाले होते
बोच सोडुनी गेलीस तू कायमची जिव्हारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी
बंद करुनी वाटा मी काजळ धुतले होते
रंग नव्याने भवती मजला दिसले होते
कुलूप ठोकले होते काळ्या कोनाडयावरती
पत्रे पडली होती तेथे धुळीत चित्रांभवती
विस्कळीत अर्थाची पाने पाने माझी सारी
आज सामोरी पाहून तुजला ज्योत जागली होती
नसांमधुनी आठवणींची सळसळ झाली होती
जखमा उलून आल्या खपली गळून पडली होती
आठवणींची सुरी माझिया हृदयी घुसली होती
विरली मग त्या आठवणींची भुते शेेवटी सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी
-------- आदित्य देवधर
उत्तरे शोधू नको तू...
Monday, July 13, 2020
बाजी
Monday, June 29, 2020
फूल माझे...
चांदणे स्वप्नातले रडवेल जेव्हा
ते टिपूनी घेत मी उगवेन तेव्हा
भेटलो नाही जरी तुजला कधी मी
देउनी जाइन कळ्या माझ्या तरी मी
फूल माझे लाव तू परसात अलगद
रोज मी येइन स्मृतींच्या ओळखीने
दरवळू होऊन अत्तर सोबतीने
फक्त एकदा
Thursday, June 18, 2020
वेदनांचा बाजार
Wednesday, June 17, 2020
वाटले नव्हते..
Wednesday, June 10, 2020
एवढी का आवडावी
Sunday, June 7, 2020
पाऊस
भय इथले संपत नाही
Thursday, January 2, 2020
माणसे
खूप सारी श्वापदासम वागणारी माणसे
माणसांना माणसे ना मानणारी माणसे
लावुनी हसरे दिखाऊ चेहरे फिरतात ही
रोज अवघे सत्य खोटे पाडणारी माणसे
झापडे लावून येथे हरवती आयुष्य सारे
बंद डोळ्यांनीच मुक्ती शोधणारी माणसे
झाकलेली मूठ अपुली मिरवताना या जगी
सूर्य चष्म्याआड काळ्या झाकणारी माणसे
'त्रास होतो काजव्यांचाही अम्हाला' सांगती,
खोल अंधाऱ्या घरातुन राहणारी माणसे
जीव दुखवोनी कुणाचा वागुनी दैत्यापरी
देव दगडाला मनाने मानणारी माणसे
फक्त 'माझे', 'माझियापुरतेच' अंगण अन तिथे
'मी पणाचे' झाड मोठे लावणारी माणसे
आदित्य
Tuesday, December 31, 2019
यापुढे रडणे नाही
गेलेले क्षण आता काही मिळणे नाही
पुस तू डोळे, ठरव यापुढे रडणे नाही
वणव्यामध्ये सुद्धा अश्रू पिऊन अवघे
जळेन पुन्हा परंतु ओले उरणे नाही
खुशाल बघ तू स्वप्न उद्याचे आणि जाण की,
स्वप्न पाहणे, स्वप्नामध्ये रमणे नाही
असेलही तो ढगाएवढा ध्यास, सिद्धता
चुकेलही पण चुकूनही घाबरणे नाही
गीतातिल अर्थात खरी बघ गंमत आहे
गाणे म्हणजे कंठशोष ओरडणे नाही
मृत्यूलाही थांबवेन मी या शब्दांनी
जगलो नाही तोवर आता मरणे नाही
आदित्य
पुन्हा
रात्र ती हरखेल पुन्हा
तारका नटतील पुन्हा
संपलेल्या उत्सवांचा
सूर्यही उगवेल पुन्हा
एरवी थंडावलेल्या
शांतशा या मध्यरात्री
हरवलेली अचानक
माणसे दिसतील पुन्हा
काळ तो सरतोच आहे
वेळ ही भरतोच आहे
पण तरीही कोणते हे
सोहळे सजतील पुन्हा?
का उगा प्रश्नांस साऱ्या
रोज कवटाळुन बसावे
आज सोडू मोकळे, अन
ते उद्या हरतील पुन्हा
ओंजळीमध्ये जरासे
मावणारे क्षण सुखाचे
येउनी एकत्र येथे
मन्मने जुळतील पुन्हा
विसरुनी दुःखास आम्हीं
झिंगतो धुंदीत थोडे,
जोडतो अन धीर ऐसा
की मने लढतील पुन्हा
आदित्य
Tuesday, December 24, 2019
मन मारुन जगणे
निःशब्द करारांचे ऋण जिकिरीचे झाले आहे
मन मारुन जगणे आता सवयीचे झाले आहे
पापाच्या अन पुण्याच्या लक्ष्मण रेखांनी येथे
आयुष्याला कुंपण-पण सक्तीचे झाले आहे
आनंदाने तुरुंग नियमांचा उपभोगत जाता,
लालुच-लक्षण ध्येयाच्या पूर्तीचे झाले आहे
असुराला, दैत्याला घाबरता घाबरता आता,
पूजेचे कारण सुद्धा भीतीचे झाले आहे
खोट्या फसव्या चेहऱ्यांच्या या जगात साधे,
खरे बोलणे चुकूनही, चोरीचे झाले आहे
दिवसा ढवळ्या राज्य चालते अवसेचे जैसे,
शहर आंधळे कुचकामी दृष्टीचे झाले आहे
'नको सांत्वने, नको दिलासे, एकांत हवा मजला'
असे काहिसे म्हणणे या सृष्टीचे झाले आहे
चितेवर तरी मनाजोगता जगेन जळता जळता,
दोन घडीचे जगणे ते मर्जीचे झाले आहे
आदित्य
Thursday, December 19, 2019
रोज रोज ..
रोज रोज मी मरतो येथे, कसे बसे मी जगतो येथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे.
कुठले ओझे डोक्यावरुनी जीव बिचारा वाहत जातो
कामाला मी घर सोडुनिया डोळे मिटुनी धावत जातो
कुठे नोकरी, कुठे चाकरी, रस्त्यावरती जेथे तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कर्ज काढुनी नटतो सजतो, तसे दिखाव्यापुरते नुसते
दिवस रात्र साहेबासाठी, घरी फक्त पळ-घटिका उरते
सुटला नाही साहेब देखिल अशा दुष्ट चक्रातुन येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
श्वास चालती प्रत्येकाचे घड्याळातल्या काट्यावरती
हिशोब अन वेळेची केवळ सूत्रे आठवणींतुन उरती
चंद्रसूर्यही उरकुन जाती दिवसरात्र नावाला जेथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
चालू असती व्यायामाचे महागडे क्लासेस नव्याने
कधी पेव योगाचे फुटते, कधी नृत्यही नवे-पुराणे
तरी औषधासाठी रांगा लांब लांब दिसतातच तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
स्टोरी आणिक स्टेटसचाही महापूर येताना दिसतो
प्रत्येकाच्या मैत्रीचा बाजार केवढा उत्तम भरतो
माणुस उरतो परी एकटा सोशल होता होता येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
नाती उरती कागदावरी केवळ सध्या घराघरातुन
एकच घरटे दिसायला पण वेगवेगळे मनामनातुन
रेशिमगाठी आता दिसती सैल सैल होताना येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कशास आणिक कुठली शर्यत चालू असते ठाऊक नाही
अंत कधीही, कुणासही, स्पर्धेचा येथे दिसला नाही
मरताना परि जाणिव होते, हाय! हरवले जगणे येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
---आदित्य
पिंपळपान
नसेल आता तुझे असे उरलेले काही, हरकत नाही
स्मृती सुद्धा काहीशा अपुऱ्या जगण्यासाठी, हरकत नाही
निघून तू गेलीस जरीही कायमची मार्गातुन माझ्या
रोज तरी मी ओघळेन प्राजक्त होऊनी, हरकत नाही
कधी रडावे असे वाटता कुशीत तुझिया येऊन मजला,
पाखरांसावे धाडीन अश्रू तुझ्याच पदरी, हरकत नाही
आठवणींच्या कवितेमधुनी तरळुन जाइन अलगद अस्फुट
भेटत राहीन पिंपळपानापरी वहीतुन, हरकत नाही
जिथे कुठे असशील अता तू, झरे सुखाचे फुलतिल तेथे
इथे स्मृतींचा राहील थोडा ओलावा, पण हरकत नाही
आदित्य
Thursday, November 28, 2019
दोघांमध्ये
कशास काही विवाद व्हावा प्रेमामध्ये
मुक्यानेच संयोग घडावा दोघांमध्ये
तुझे ठेव तू तुझ्याच पाशी सल्ले सारे
उगा नको भलताच दुरावा नात्यामध्ये
तेच तेच ते रटाळ गाणे गाता गाता
फाटका तरी सूर जुळावा गाण्यामध्ये
असेच 'नाही' म्हण तू मजला लाजुन जाता,
की लाडिक होकार दिसावा जाण्यामध्ये
कधी भेटलो जर का आपण तसेच पुन्हा,
तशीच धडधड होईल का गे श्वासांमध्ये?
अजूनही मी लिहितो पत्रे तुला गुलाबी
अजूनही दव दिसेल तुजला शब्दांमध्ये
--आदित्य
Tuesday, November 26, 2019
ध्रुवतारा
यमदूताचाही जेथे जेथे थिजला पारा
उभा ठाकला रणी तूच होऊन सहारा
झेललास छातीवरती धगधगता वणवा
तूच अढळ शक्तीचा झेंडा , तू ध्रुवतारा
श्वास आजचे लाखो केवळ तुझ्याच पायी
एक एक किंकाळी घुमते ठायी ठायी
तिथे सांडले रक्त तुझे तू दैत्य जाळतो
नतमस्तक मी अभिषेकी अश्रूंस गाळतो
आदित्य
Monday, November 25, 2019
उरले सुरले
म्हणतो आता सारे काही
सोडुन द्यावे उरले सुरले
म्हणता म्हणता श्वास राहतिल
इथे मोजके उरले सुरले
आरोपांच्या फैरी झडती
तुझ्या नि माझ्या कितीतरीदा
माफी मागुन संपवून टाकू
हे नाते उरले सुरले
नसतिल जर का खोल वेदना
हृदयामध्ये जिवंत काही
नकोत फुटकळ आनंदाचे
क्षण-बिण साधे उरले सुरले
कधी हरवतो काचांमध्ये
खरा मार्ग शोधूया म्हणता,
आरशात मी मज सापडतो,
बाकी तुकडे उरले सुरले
उत्तरेच प्रश्नांची काही
घेऊन येती प्रश्न नव्याने
दोन घोट घेऊ त्यापेक्षा
प्रश्नच रिचवू उरले सुरले
मित्र जवळचे शोधत जाता,
सापडतो संकटात, उरतो
एकटाच लढणारा मी,
बघणारे बाकी उरले सुरले
मीच कधी माझ्याशी करतो
द्वंद्व मूळ तत्वांच्या साठी
लिहून जातो शब्द काहीसे
असंबद्ध अन उरले सुरले
आदित्य
मी कधी आयुष्य होतो
मी कधी आयुष्य होतो
सर्जनाचा थेंब होतो
रंगुनी पानफुलांनी
डोलणारा वृक्ष होतो
खेळतो सूर्यासवे मी
रोज नवखा डाव ऐसा
चंद्र होतो पौर्णिमेचा
अन कधी अंधार होतो
मी कधी तलवार होतो
शत्रुचा संहार होतो
थेंब रक्ताचाच माझ्या
तळपुनी अंगार होतो
शुभ्र आकाशात मिसळुन
रंग पांघरतो निळा मी,
कोवळ्या अन भाबड्या
मन-पाखरांचे पंख होतो
मोकळे अवकाश काळ्या
काजळीने व्याप्त होता
वादळाचे रूप घेतो,
अन कधी मल्हार होतो
श्वास येथे अडखळोनी
घुसमटू लागे अताशा,
पाहता तडफड कुणाची
मी पुन्हा विश्वास होतो
भूत सारी अन रिपूही
मोकळे, मोकाट होता,
रोज सत्याचा असत्याशी
इथे संघर्ष होतो
संभ्रमामध्ये कधी मज
प्रश्न पडतो 'हेच का ते
विश्व माझे गर्भ-सुंदर?'
आणि मी व्याकूळ होतो.
आग, वणवे अन मशाली
पेटती दररोज येथे
पाहतो की रोज जगती
सर्जनाचा ऱ्हास होतो
बैसलो आहे रुतूनी
दलदलीमध्ये जगाच्या
त्यातल्या कमळापरी मी
भंगलेले फूल होतो
संपुनी जातात सारे
स्वप्नवत क्षण त्या स्मृतींचे
विसरुनी जातो अता की
मी कधी आयुष्य होतो
आदित्य
काही जसे घडलेच नाही
आपल्यामध्ये कधी काही जसे घडलेच नाही!
अन तरी तुज बरसुनी जावे असे सुचलेच नाही?
चालले तैसेच मी, मज थांबणे कळलेच नाही
मोहरोनीही अताशा मी तशी फुललेच नाही
तीर माझे आठवांचे मज पुन्हा दिसलेच नाही
सांडले अश्रू निखाऱ्यावर तरी विझलेच नाही
Monday, November 18, 2019
वाट दोघे पाहतो
तू नको बोलूस काही,
गप्प मी ही राहतो
'कोण आधी बोलते'
बस वाट दोघे पाहतो
तू मुके बोलाव मजला
शब्द ना उच्चारता
ऐकूही येता न काही
मी तुझ्याशी बोलतो
शब्द अडखळती तुझे
अन श्वासही हेलावती
मी तसा डोळ्यांमधूनी
अर्थ सारे जाणतो
भेट व्हावी याचसाठी
येउनी जातेस तू अन
ते तुझे येणे नि जाणे
मी लपूनी पाहतो
बोलक्या नजरेमधूनी
गोष्ट सारी होत जाते
तू कधी लाजून जाता,
मी मनोमन हासतो
वेळ साधुन मी कधी
मग भेटण्या येतो तुला
अन तुझे लटकेच रुसवे
केवढे सांभाळतो
आदित्य
Thursday, November 14, 2019
मौनाचा करार
मौन पाळले ओठांशी आलेल्या शब्दांनी माझ्या
करार होता कसाबसा केलेला ओठांनी माझ्या
शिकलो आता मुक्यानेच सांगायाचे सारे काही
धीर सोडला तरी कधी वाहुनिया डोळ्यांनी माझ्या
असे वाटते फक्त मला जमले नाही विसरून जाणे
जमले सारे तुला मात्र मी सजलो जखमांनी माझ्या
तशी हासुनी मारून नेली वेळ भेटता तू जेव्हा
कोपऱ्यातला ओलावा टिपलेला डोळ्यांनी माझ्या
दिसे उभी तू तटस्थ पुनवेच्या राती स्वप्नातुन अन
चिंब चांदणे रिमझिमते डोळ्यांतिल चंद्रांनी माझ्या
काय नेमके झाले ऐसे मार्ग वेगळे अपुले गे,
दिलेस नाही उत्तर तू अन हरलो प्रश्नांनी माझ्या
हाय! अपेक्षा तुझी तुला मी क्षणार्धात विसरून जावे
खोटे का क्षण सारे जे अनुभवले श्वासांनी माझ्या?
करार मौनाचा अपुला पाळुन ठरलो पुरता वेडा
अजूनही तो जपतो, रडतो अवचित शब्दांनी माझ्या
आदित्य
