Pages

Monday, September 21, 2026

नामदेवाची पायरी

विठू रंगात अवघ्या 
चंद्रभागा माझी भिजे 
कण कण वाळवंटी 
वारकरी होत सजे 

अभंगात सावळ्याच्या 
नाचे सारा भीमातीर 
सांडे अमृताचा घट 
माथी चंदन अबीर 

नाद टाळ मृदंगाचा 
संगे नामाचा गजर 
किती युगांचा प्रवास 
करे माऊली सुकर 

अभिषेक आसवांचा 
पायरीशी एक एक 
एका क्षणाचे दर्शन 
लाख जन्मांचे सार्थक 

तुला भेटण्या घालतो 
पार संसार पालथा 
कुठे शोधु मी कळस 
मृगजळाशी पायथा 

नामदेवाची पायरी 
ओलांडुन मन जाय 
वाट पाहते तिथेच 
लेकराची विठू माय

No comments: