Tuesday, February 23, 2010
स्वामीसाधन
पहिल्या वर्षापासून यांचं Proffessional Training सुरु होतं. गणवेश मिळतो. यात पण choice आहे बरं का ! कोणी पांढरा डगला, तर कोणी काळा, कोणी भगवा सदरा तर कोणी पिवळा कुर्ता. तसंच साड्यांचं. हे रंग 'Major' प्रमाणे ठरतात. इथे दोन शाखा आहेत. एक 'अघोरी' तर एक 'अध्यात्मिक'. तुम्हाला पहिल्या वर्षापासुनच निवडावी लागते. दोन्ही शाखांना सामान स्कोप आहे. अघोरी शाखेला 'लिंबू विज्ञान' शिकवलं जातं तर अध्यात्मिक ला 'गूढ़ शास्त्र' असतं. एका अध्यात्मिक पास आउट चा मी Interview पहायला मिळाला. पहायला म्हणजे काय.. योगायोगानेच! एक भक्त त्याला प्रश्न विचारत होता. ( भक्त आणि तमाम शिष्य गण यांचे मुख्य मार्केट आहे.)
(स्वामी भगवा डगला घालून एका खोलीत गुबगुबीत गादीवर बसले होते. कपाळावर टिकली एवढ कुंकू. गळ्यात उपरणं. उदबत्ती आणि धुपाचा सुळसुळाट..स्पष्ट दिसू नये इतपत. 'ॐ' वाजणारी टेप. खोलीबाहेर गर्दीचा आव. )
भक्त : स्वामी , अर्घेश्वराय नम: !!! ( हे या पंथातलं 'Hello' किंवा नमस्कार शी समानार्थी ब्रीद. आणि अर्घेश्वर स्वामी हे यांचे नामकमल! हा भक्त इतर आणि स्वामी यांना जोड़णारा दुवा आहे. मधली खाबुगिरी आणि लोचटगिरी चांगली जमते यांना )
स्वामी : कल्या SSSSSSSS ण !!!! (आणि मागे घंटेचा आवाज --- back ground music हो ....!!!!)
भक्त : प्रातर्विधीत काही बाधा तर नाही ना ..!! ( भलते अर्थ काढू नका .... संध्या, पूजा, ध्यान वगैरे म्हणायाचं आहे !!)
स्वामी : क्षेम आहे (उपकाराचे भाव . नाहीतर भाव कसा मिळेल?? )
भक्त : (छताकडे बघून आणि हात उगीच वर नेऊन) अनंत उपकार आहेत !!! (समोर साक्षात् दत्त बसल्याचा भाव.आणि यांच्या प्रातर्विधी मुळे उपकार कसे झाले कोणास ठाऊक! ) काही गण आले आहेत ( जण च्या ऐवजी चुकून गण आलं बहुतेक तोंडात)
(काहीही न बोलता स्वामी मान डोलावतात. भक्त मागे वळून खेकसतो )
भक्त : दोघांना पाठव रे !!!! ( आत पाठवणारा गुपचुप दोघांना आत पाठवतो. याचा खिसा ही 'गळकी' दक्षिणा पेटी आहे हे लक्षात येतं.)
(दोन जण आत येतात. शिकविल्याप्रमाणे नमो नम: करतात आणि अपराध्यासारखे मान खाली घालून उभे राहतात.)
भक्त :स्वामी गांजले आहेत हे. काही प्रश्न घेउन आले आहेत.
( त्याला 'गंजले' म्हणायाचं असेल . सारखा चुकतोय हा दुवा. ते दोघं गांजलेले नक्कीच वाटत नव्हते . सुटलेलं पोट आणि फवारलेले कपडे घालून गांजलेले कमी पण माजलेले जास्त वाटत होते. एकमेकाना ओळख़त नसावेत. स्वामी काहीही न बोलता तोबरा प्राशन करून असतात. मंद स्मित करून मान डोलावतात. भक्त पात्र पुढे करतो. स्वामी त्यात पेंटिंग सुरु करतात.)
प्रश्नार्थी १: बिझनेसमन आहे. पैसा खुप आहे. पण झोप शांत नाही.
स्वामी: (स्मित चालूच आहे) या उपभोगाच्या मायाजालातून कोण सुटले आहे? मोक्षाचा मार्ग खडतर आहे.
प्रश्नार्थी ला काहीही कळत नाही. तो पुन्हा तोच वाक्य उच्चारतो ' पण झोप येत नाही.'
(डॉक्टर कड़े जायचं सोडून इथे का आलाय हा ......??)
स्वामी: ( पेंटिंग करत ) ध्यान धारणा करा. प्रभूच तुम्हाला मार्ग दाखवेल.
(भक्त तर आडवा पडण्याच्या बेतात आलाय. वाकून वाकून..
( प्रश्नार्थी बहुतेक झोप विकत घ्यायच्या उद्देशाने आला होता. त्याला असलं काहीतरी म्हणजे चेष्टाच वाटली. त्याने परत एक प्रयत्न करून बघितला)
प्रश्नार्थी 1 : जमवलेला पैसा निघून तर जाणार नाही याची सतत चिंता वाटते. लक्ष्मीचा लहरीपणा तुम्हाला माहितच आहे.
(या वाक्याने स्वामी जरा चपापतात. याला कसं माहीत अस एक प्रश्न चाटून जातो. पुन्हा भानावर येउन स्मित क्रमश: चालू...)
स्वामी: दान करा(मला दया) गरजूंना मदत करा. आश्रमासाठी खर्च करा. कल्याण होइल. चिंता मुक्त होशील. ..!!!
(प्रश्नार्थी भारावून जातो. नमस्कार वगैरे करून पाठ न दाखवता मान वाकवून उलटा चालत जातो . भक्त बाहेर खूण करून योग्य तो निरोप पोचवतो
आता पाळी दुसरयाची)
प्रश्नार्थी २: स्वामी तुम्ही वेद आणि गीता वाचलेत का ? मला काही प्रश्न आहेत. तुमचा सल्ला घ्यायला आलोय.
(पहिलाच बॉल बाउंसर. दोन क्षण स्वामी आणि भक्त त्याकडे पहातच बसतात. हा अता याची विकेट घेणार असं वाटून मीही खुष होतो.)
स्वामी: बोल वत्सा..(नाही म्हणून कुठे जाणार ....)
प्रश्नार्थी २: माणूस मेल्यावर त्याच्यासाठी उदक का सोडतात ?
(यॉर्कर... डायरेक्ट बुंध्यात !)
स्वामी: आत्म्याला शांती मिळावी म्हणून वत्सा...!(अत्तापुरती वाचवली विकेट)
प्रश्नार्थी २: एखाद्या संगमावर पाणी सोडून मेलेल्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? आणि एवढीच इच्छा असेल तर तो जिवंत असताना असं का करत नाहीत?
(स्वामींना घाम फुटतोय. भक्त प्रश्नार्थी कड़े रागाने अणि स्वामींकडे आशेने बघतोय.)
(अर्धा मिनिट कोणीच काही बोलत नाही. स्वामी पाणी मागवतात. पण पीतच नाहीत. वेळकाढूपणा... दुसरं काय ..?)
प्रश्नार्थी २: गीतेत म्हटल्याप्रमाणे माणूस आपले कर्म करत असतो. ते त्याने केलेच पाहिजे. चालू असलेला जन्म त्याच्या पाप पुण्याचा हिशोब आहे. मग अतिरेकी जे करतायत त्याला काय म्हणायाचं?
(आता भक्तही बेशुद्ध व्हायच्या मार्गावर आहे. स्वामींचा बहुतेक हा विषय राहिला असावा दोन चारदा. स्वामी विश्रांतीची वेळ झाली म्हणून उठतात आणि पुढची Appointment देतात.)
श्रद्धेचा बाजार झालाय सध्या. आणि या सारख्या स्वामींमुळे खरया साधक लोकांची सुद्धा चेष्टा होतीए. लोकांनी ठरवायाला हवे. अशा तोतया लोकांना किती थारा द्यायचाते.
मी त्या प्रश्नार्थी ला जाऊन भेटलो. तो एक पत्रकार होता. संस्कृत मधून डिग्री घेतली होती. आणि आशा बाबा लोकांचे बिंग फोड़ण्याचे एका संस्थेचे काम करत होता. कौतुक वाटले. तोही उत्साहात होता आणि पुढच्या appointment ची नोंद करून निघून गेला. अजुन एका स्वामींकडे!!!
Sunday, February 21, 2010
लढाई
घाव बुद्धीने दिला होता मनाशी
काय होता माज आलेला मतीचा
काय झाला खेळ भांडूनी कुणाशी
आर्जवे केली जरी त्याची हजारो
ठाम होता आज तो अपुल्या मताशी
थोरव्यांनी धीर ही मजला दिलेला
पाठ फिरता शेपटी त्यांची बुडाशी
लाळ गाळी जात कुत्र्यांची भिकारी
चाटुनी टाचा जमविती आज राशी
दान देताना खिसा माझा रिकामा
भीक घेता फाटली झोळी उपाशी
शेवटी जाता चितेवर प्राण माझे
आसवांची वाट मी पाहे चितेशी
-----आदित्य देवधर
चंद्रसाक्षी
पुन्हा पुन्हा उरातुनी उसळला ग चंद्र हा
कधी न जाणली तुझी मौनबद्ध मालकी
कधीच हा गुलाम तू पूर्ण जिंकला पहा
तुझ्याच आठवांतुनी रोज सांडला सडा
फुलून मोगरा तुझा दरवळेल गंध हा
ललाट रेषीचे तुझे लाल बिंब देखणे
सकाळची उजाडती स्वर्गसुन्दरी तरहा
हळूच डोळीयांतुनी तू भावपूर्ण पाहिले
कसे असेल वाटले समीप येउनी पहा
मुक्त सोडुनी दिली मनातली मी पाखरे
तुझ्याकडेच धावली न सांगता कुणी स्वत:
चंद्रसाक्षी प्रेम हे जपून ठेव साजणे
देह श्वास भारुनी अशीच व्यापुनी रहा
----- आदित्य देवधर
नकळत....
स्वप्नांमधुनी स्पर्शामधुनी ह्रुदयामाधुनी
तुझीच मूर्ती तुझीच तू अलबत्ता
आता कुठे जगाची चिंता
मी हरवलो विकला गेलो लिलाव माझा झाला
तुझ्या रुपाने केली खेळी खेळ संपला सारा
गुलामीतही आहे गोडी, तुझी गुलाबी सत्ता
आता कुठे जगाची चिंता
रस्ते वाटा गल्ली न गल्ली तुझ्याच घरला धावे
दिशादिशातुन कणाकणातुन तुझे चित्र उभरावे
आहेस तू जर अवतीभवती अशीच येताजाता
आता कुठे जगाची चिंता
ठाऊक आहे मजला तुझिया गुपीत हृदयातले
गवताचे मऊ पाते ओले लवलवते पावसातले
भान हरपुनी तू भिजलेली मिठीत माझ्या असता
आता कुठे जगाची चिंता
------ आदित्य देवधर
मन जुळले
घडले कसे हे सांगशील काय
स्पर्श रेशमी देऊन जाते गालावरची गुलाबी साय
खुणा दिशांच्या विस्कटलेल्या
काळवेळचे भानही नाही
वाट विचारी पत्ता मजला
काही केल्या उमगत नाही
तरी पावले रस्ता तुडवी दिशा तयांना देशील काय
डौलदार कमळावरती
पाण्याचाही मोह जड़े
सूर मारुनी क्षणोक्षणी
निर्झरातुनी उदक पड़े
सूर उधळूनी प्रीत झरा तुषार अंगी उडवून जाय
निर्मळ सुस्वर येती कानी
हसतेस मलमली जेव्हा
कृष्ण सावली सळसळती
केसात माळशी तेव्हा
छाया निर्मळ प्रेमाची तू केवळ मजला देशील काय
फुलेही पड़ती फिकी जयाने
गंध तुझा मी ल्यालेला
कोकीळ होई मुग्ध बापडा
सूर तुझा ओठी आलेला
प्रेमबंध सार्थकतेची पावती मजला देशील काय
------ आदित्य देवधर
विसर
खुजा वाटताहे पसारा नभाचा
तुझा स्पर्श होता मन हे थरारे
जसा थेंब पाण्यावरी पावसाचा
गर्द नभ काळा मनी दाटलेला
वरुण तयाची खूण झाकलेला
बरसला शुष्क कोरड्या धरेवर
चिंब भिजला जीव चातकाचा
दूर उभी ओली भिजलेली
मिठीस माझ्या आसुसलेली
मृदगंध स्वच्छंद उन्मत्त होता
विसर पडला क्षणाक्षणाचा
पावसात रे भिजता भिजता
ओला स्वर कानी रुणझुणता
मोती गालांवर ओघळता
टिपून घे हा क्षण प्रेमाचा
साक्ष द्यावया हाजिर सारे
अड़खळलेले श्वास सख्यारे
डोळे मिटूनी सावरला मग
धडधडता आवेग उराचा
सौख्य लाभले असे मला
सजवूनी तव मोह झुला
हिंदोळे घेताना अलगद
विसर पडला क्षणाक्षणाचा
------- आदित्य देवधर
Monday, February 15, 2010
तुला की मला
तुला दिले की मला दिले
कसे कुणास लाभले
तुला दिले ते मला दिले
गंधर्वाने तार छेड़ता
आसमंत व्यापून जाता
रंग नभी जे मधाळले
तुला दिले की मला दिले
मिसळून जाता रंगांमधुनी
भाव मर्म रूपात न्हाउनी
चित्र मनीचे चितारले
तुला दिले की मला दिले
तान थिरके न्यास मांडुनी
मल्हाराचे गीत गाउनी
थेंब धरित्रीवरी झुले
तुला दिले की मला दिले
वास करुनी अनंतातुनी
ज्योत कोवळी देही तेवुनी
जीवन अमृत शिंपडले
तुला दिले ते मला दिले
------- आदित्य देवधर
चाहुल
मंद लालसर सायंकाळी वारा फिरला उन्हें थबकली
जशी पाउले तुझी वाजली
पानांवर ओझरते पाणी हबकले जागीच थबकले
जाळीतुन विणलेली खूण दिसे परि मार्ग खुंटले
क्षणार्धात पानापानातुन नाजुक सळसळ झाली
जशी पाउले तुझी वाजली
वारा धावे सैरावैरा भान विसरुनी क्षितीजाचे
वीज डोकवी दाट ढगांतुन आभाळी करुनी खाचे
तुझ्या स्वागता थेंब निघाला चाहुल तुझी लागली
जशी पाउले तुझी वाजली
फुले तयांची करती उधळण भ्रमरही घिरट्या घाले
ओल्या हिरव्या वाटेमधुनी ओला मृदगंध दरवळे
वसुंधरेच्या कणा कणावर तुझीच जादू झाली
जशी पाउले तुझी वाजली
दूर वळणावर भिजलेली हसलीस तू पाहून मला
डोळ्यामधुनी अंतरातल्या शब्दांना आवाज दिला
रंगांची लेउन झालर सांज मन्मनी हसली
जशी पाउले तुझी वाजली
------आदित्य देवधर
तुझा...
रडतानाची ओढ़ तुझी अन हास्याचा रंग तुझा
थेंब गवतावरती पिवळ्या ओलावा थेंबात तुझा
लवलवणारी नाजुक पाती भिजण्याचा भास तुझा
संध्यासमयी पश्चिमेकडे लाल केशरी रंग तुझा
रात्रीच्या काळोखामधुनी अंधारी एकांत तुझा
चंद्र चांदणे अवकाशी निरखे सुंदर रूप तुझे
नक्षत्रांची तुझी पालखी अन पुनवेचा चंद्र तुझा
पाट पाट वाहे सरितेचा ओघवणारा मोह तुझा
सागरातुनी मिसळून जाण्या आतुरलेला थेंब तुझा
रूप पल्लवी तुझी अनोखी रसिक फुलांचा रंग तुझा
गंध वाहतो दिशादिशातून पण वारयाचा रोख तुझा
शब्दांवाचुन गाणे माझे गाणारा आवाज तुझा
मौनातुनही मर्म उमजुनी ऐकू येई सूर तुझा
-------- आदित्य देवधर
ग्रहण
कधी फाटलेला नभ माझ्या दिशेला
कधी थेंब परक्यास भिजवून गेला
मी वाट चाळलेली सोडून मुक्त झालो
पक्षी उडून गेला पिंजऱ्यात कोंडलेला
सोंगटी नसे उरली पटावरी तयाच्या
भिकारी तरी अपुले दान टाकून गेला
रातीस झोपलेली बद-जात माणसांची
मौनासवे तमाचे तो खेळ मांडून गेला
ओठांवरी उमटता तम-शब्द गूढ काही
ऐकून चंद्र भासे मजला ओशाळलेला
वाती जळून रात्री तेलात काजळीच्या
प्रकाशाने उपाशी अंधार चाख़लेला
सूर्यास झाकणारा छायेतुनी स्वत:च्या
कित्येक धुंद राती उजळून भोगलेला
ग्रहण लावणारा अवसेस फक्त मजला
मिरवुनी उधारीच्या तेजात गोठलेला
----- आदित्य देवधर
सावर सखे
नाव धाव घेऊ पाहे सोडुनीया तीर
ओठ टेकवून माथी उष्ण उष्ण भास
कोवळे तव कुंतल गाली चेतविती श्वास
नयन ओघळी चिंब भिजलेले नीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
जीव ओतुनी वदती पापण्या गुलाबी
भाव डोळ्यातले धुंद भासती शराबी
गूज काय सांगतो मुकेच पैलतीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
स्वप्न तुझे आतले हळूच सौम्य हासले
अबोल तुझे सूर मला प्रेमगीत भासले
पात्यांवर प्रीतछंद न्यास झिरझिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
शोधू पाही पारा अवघे थेंब करी गोळा
ह्रुदयाचाही चाले मग धडधडता चाळा
कोर नांदुनी ओठांवर नजर भिर भिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
---- आदित्य देवधर
शपथ
तप्त सख्त रक्ताची सळसळ
उचंबळूदे गगनी भिडूदे
ठोक बिलंदर मेघ गर्जना उभी धरा गलित गात्र होउदे
झटकून झापड़ क्षुद्र मतिचे
तोड़ बंध बुरसट जातीचे
गंध माखुनी तव रक्ताचे
भीष्मरक्त मग रक्तापाशी ललकारी देण्यास निघूदे
व्यसने मम चरणांच्या पाशी
आसक्ती झटकली सुखाची
चिता जाहलो स्वत: स्वत: ची
ज्वालाही आक्रंदून माझ्या भ्रष्ट मत्त जंजाल फुंकूदे
लगाम घे दुनियेचा हाती
लक्ष लक्ष पेटवून वाती
धारदार खड्गाची पाती
लवलवती सरसावून हाती बंडाचे रणशिंग फुंकूदे
शपथ तांबडया इतिहासाची
निरपराध अमुच्या रक्ताची
पात चमकावून परशूची
कफ़न ललाटी बांधून अंगी कालीचा संचार होउदे
-----आदित्य देवधर
Thursday, January 7, 2010
असे वाटते
असे वाटते झेप भरावी आज मनाच्या आत खोलवर
आरशातल्या अथांग वाटा साद घालती कुठे दूरवर
असेल कोणी तिथे राहते, हृदयामधले कंप जाणते
नसांमधुनी रोज वाहते असे वाटते
असे वाटते टाकुन द्यावी वस्त्रे लाजेची शोभेची
झटकून द्यावी धूळ तनाची फोल फुकाची भीती जनाची
तोंड फाडूनी बंद डोंगरी उष्ण उकळूनी गंधकापरी
लेउन लाव्हा अंगी दाही दिशांमधुनी मुक्त जळावे
असे वाटते
असे वाटते षडजावरती एक देखणे घर असावे
लहरींवरती विरघळणारे सूर अंतरंगी शिरावे
तानपुरा मग तार छेडूनी कंठ मनीचे मर्म छेदुनी
लख्ख ओंजळीतुनी स्वरांचे तीर्थ आपुल्या शिरी पडावे
असे वाटते
असे वाटते शब्दांसगे घ्यावे झोके चंद्रावरती
नक्षत्रांच्या ओवून माळा कवितेमधुनी गळ्याभोवती
क्षणात पुढच्या अवकाशातुन मंतरलेल्या पटलावरती
शब्दांच्या पलीकडले काही भावविश्व मग जूळून यावे
असे वाटते
असे वाटते हात असावा तिचा आपुल्या हाती
मंद सुरांचे झरे अन धुके ओलसर भवती
हरवून स्वप्नामधुनी , ती मिठीत माझ्या रमता
थिजून क्षण तो विसरून सारे श्वास तेवढे फक्त उरावे
असे वाटते
-----------आदित्य देवधर
Friday, November 27, 2009
सलाम
घरात बसुनी आम्ही ऐकतो गाथा सरल्या प्राणांच्या
उसना आणून गहिवर गोळा करुनी दुबळ्या हाती
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
मातीमधुनी पाय रोवण्या धीर जमवला नाही
अलंकार जखमांचे लेण्या वार पेलला नाही
सौख्य आमुचे असेच निद्राधीन उबेतुन गादयांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
थंड जाहले रक्त आमुचे पाठ घोकुनी मोलाचे
देऊन दीक्षा विकुनी विद्या दूकान फळले पैशाचे
घाव घालण्या तलवारीचे पदव्या कसल्या कामाच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
घोर लढाई चाले पेटे होळी ज्यांच्या देहाची
सैतानाचे हात टांगती लक्तर वेशी वस्त्रांची
मिटून डोळे करू प्रार्थना करुणा भाकू देवांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
स्मरण करतो आम्ही न चुकता ठरल्या दिवशी
शांत राहती कुणी कुणाचे हात वक्षापाशी
कुणी ठेवतो आहे चरणी देह आपुल्या मातेच्या
वंदन करतो शूरा गातो गाथा तुझिया शौर्याच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
------- आदित्य देवधर
Tuesday, November 24, 2009
तुझ्याविना
श्वास असा हृदयात दाटला
खोल खोलवर रुतू लागला
ह्रदय आंधळे पिसाट धावे
ठोका चुकतो तुझ्याविना
नाव उमटते तुझेच लिहिता
शब्द धावती तुझ्याकडे
आठवणींतून गुरफटलेला
जीव अधूरा तुझ्याविना
एक एक हुंकार दाटला
कंठामधला शब्द आटला
गात्रामधुनी खोल आतला
स्पर्श लोपला तुझ्याविना
तार एक मी छेडिलेली
धून एक अवघडलेली
गळा दाटुनी आला आणिक
सूर फाटला तुझ्याविना
भिंतीमधून अचेतन घरच्या
निराश वाहे लकेर कसली
पाश उदासीन अवतीभवती
मजला वेढी तुझ्याविना
खिडकीमधुनी उभा एकटा
शून्य गोठते डोळ्यांमधले,
वाट पाहुनी उड़े पारवा
सांज घेउनी तुझ्याविना
मिटून डोळे घेतो मी मग
पापण्यांतुनी उदास तगमग
हलके ओठांवरती पाणी
आसू भरती तुझ्याविना
--------आदित्य देवधर
Monday, November 23, 2009
गरम पाणी
कुण्डं उसंडे शेजारी
निखारयातुनी ओले होता
दोन नद्या त्या थेट उरी
धार संतत धार चालू
ओढ़ आतली धरुन किनारी
मार्ग आखुनी मार्ग मोकळे
प्रवाहातली बोच जिव्हारी
लाल जाळे लागे पसरू
शुभ्र मोकळ्या पटावरी
आरशावरी अनेक बिन्दु
ठेउन गेल्या कैक सरी
शांत जाहला पूर शेवटी
धग थांबली नसे जरी
शेष जाहती खुणा तयातुन
खारया वाटा दिसती परी
मिटूनी कळ्या डोहावरती
दव साचले कड़ेवरी
आत दाटली धूसर चित्रे
बंद ओलसर कुण्ड तरी
---------आदित्य देवधर
Saturday, November 21, 2009
तुझ्या देशीच्या वाटा
मला सोडुनी धरती सारे
रंगहीन पाखरे भटकती
मैफल सरली रंगांची
मला सोडुनी धरती सारे
शुद्ध हरपली रातीची अन
पुनवेलाही ग्रहण लावुनी
मला सोडुनी धरती सारे
बोडकी जुनी झाडे देखिल
सूर विराणी गाऊन जाती
पाऊस कोसळे कुंद ऋतूचा
वारा सत्वर आला इथवर
गाव दूरचा सोडून धरल्या
Thursday, November 19, 2009
जगाची कहाणी
गोल जगाची फोल कहाणी
हजारदा घोके गाथा
भस्मातुन लपलेला माथा
अर्थ टांगुनी वेशीवरती
हातावरुनी पाणी
उंच भरजरी नेसून कपडे
परमार्थी हे कैक आंधळे
भीक मंदिरी देती आणून
डोळ्यामध्ये पाणी
मयत जाता काष्ठांवरती
अग्नि देऊन देहावरती
वाट पाहती कितीक
खाण्या टाळूवरचे लोणी
पेशींमधुनी स्वार्थ कोंबला
कर्मांनी विश्वास सोलला
पानीपत मग घडते पुन्हा
रूप वेगळे तीच कहाणी
-------- आदित्य देवधर
Tuesday, November 17, 2009
निकाल सुख दु:खाचा
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
खड्डयांतून हिंदकळताना मणक्यांचे तुकडे पाडी
वर काम मारण्या माथी साहेब टपुनी बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
हिशोब आकड्यांचे अचूक लावतो आहे
मित्र मात्र अमुचा पायरी वरची चढला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
डोळ्यांच्या कोनामधुनी ती हळूच हासली होती
आज अचानक भाळी कुंकवाचा ठिपका दिसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
कोरुन कोरुन चित्रे अवघे उत्तर सुरेख सजते
घंटा होता कळते की पेपर अर्धा सुटला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
हप्ते देऊन देऊन आता खिसे रिकामे करतो
संसार उभा करण्या कर्जाचा डोंगर बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
चहा रोजचा एकच अन त्यातून मोजून साखर
पेला नव्हता माझा कसला पूर्ण कधीही भरला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
Sunday, November 15, 2009
वेळ
शब्द द्वयर्थी असतात पण एकाच संदर्भात एका शब्दाचा असा 'लिंग' बदल विरळाच!
कोणाला अजुन असे काही माहित असल्यास इथे जरूर भेट दया आणि कळवा.
--------- आदित्य देवधर
प्यादं
Sunday, November 8, 2009
पाऊस
पिवळ्या धूसर घुमटामधुनी गदगदला एक सूर
धूळ उडवित डोळ्यांमधुनी वारा नाचत होता
देवाघरचा कमंडलू वर तिरका झाला होता
क्षितिजावरती रंगांची ही झाली होती गर्दी
सोने मिसळून अवघ्या भाळी आषाढाची वर्दी
सूर्य एका अंशामधुनी खाली लपला होता
अन आकाशाने धरतीवरती लंब टाकला होता
कण अन कण धुळीचा उठला होता आनंदाने
चातक धावला होता पहिल्या थेंबा आवेशाने
झाडांनीही लवुनी पाती मुजरा केला होता
वरुणाच्या दूताने खाली धावा केला होता
तडतड करुनी धरणीवर फोडणी पडली होती
अंगाअंगा वरची लाही लाही फुटली होती
उष्ण उष्ण वाफांवर ओला शिडकावा झाला होता
मग मातीचा गंध हवेतून दरवळला होता
रस्त्यांवरल्या लोकांची धावपळ चालू झाली
छत्रीमधुनीही भिजण्याची गंमत मजला आली
टपरीवरती तेलामधुनी घाणा पडला होता
अन गार ओला वारा घेऊन पाऊस आला होता.
--------- आदित्य देवधर
Saturday, November 7, 2009
मुखवटे
सदासर्वदा चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
येती हात हजारो
मी खिसे पालथे घालू
की रस्ता अपुला बदलू
मनी प्रश्न पड़े मजला
मान वड्याचा पहिला
की लाडू आधी उचलू
कधी उमगले नाही
असाच वेळ मी दवडू
की हळूच पाकिट ढकलू
ऐकून कान बधीर
मी तिथेच चिंध्या फाडू
की शाबास बढिया बोलू
चाकरी साहेबाची
मी साफ़ झुगारून देऊ
की फ़ुटकळ कवड्या झेलू
अंतर्मुख मी होतो
मुखवटे ओढलेले
समोर ठेउन बघतो
चूक बरोबर कुठले
ही स्पर्धा यांची चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
Friday, November 6, 2009
नकोस काही सांगू.......
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
पाकळ्यांतुनी विसावणारे दोन टपोरे मोती
ओघळताना झेलले होते अलगद बोटांवरती
रातीच्या साजावरती ध्रुव जसा चमचमला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
शुभ्र गगनामधुनी काळे मेघ अवतरलेले
लुकलुकणारे तारे होते किंचित अवघडलेले
मंडळातुनी विस्कटलेल्या राग लटका दिसला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओंजळीतुनी कमळावरचे दव मी टिपले होते
शिंपल्यातल्या मोत्यांमधुनी भाव जाणले होते
गालावरचे ओघळ किंचित उष्ण भासले मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओठांवरती चंद्राची प्रथमेची नाजुक कोर
पौर्णिमेची प्रभा तयावर जशी उमटली गौर
चांदण्यातुनी नितळ गुलाबी गाली मोहर फुलला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
------------------- आदित्य देवधर
Tuesday, November 3, 2009
मी
मज कुणी पाहिला आहे
हृदया मधल्या देवळातुनी
तुझ्या अंतरी आहे
नसे मंदिरी मूर्तींमधुनी
व्यर्थ उभा त्या गाभ्यांमधुनी
दूर कोवळ्या शेतांतून
मी मुक्त डोलतो आहे
मूठ वळुनी तळहाताची
ज्योत ललाटी उभी तेजाची
घाम मिसळूदे रक्तातून
मी वाट पाहतो आहे
दगडाला पाझर फोडुनी
लाटालाटांतून उसळूनी
पावसातल्या थेंबा मधुनी
जसा बरसतो आहे
उजळुन समई अंधारातुन
तेज चहूकडे काळोखातुन
श्वास घेउनी तव हृदयी
मी तिथेच वसलो आहे
मी बुद्धी मी शक्ती आहे
मीच क्षति मी वृद्धी आहे
कणाकणातुन क्षणाक्षणातुन
तुला व्यापले आहे
-------- आदित्य देवधर
Friday, October 30, 2009
वेल
काही महिन्यांनी बखले कुटुंबिय पाच- सहा दिवसांसाठी कोल्हापुरला जाणार होते. स्मिताच्या मावस बहिणीच्या लग्नासाठी. एक दिवस अगोदर स्मिता दोन अडीच तास नुसतीच बागेत बसून होती. बागेतल्या सगळ्यांशी तिने गप्पा मारल्या. पुढचे पाच दिवस तिला तिच्या बागेत घालवता येणार नव्हते. शेजारच्या काकुंना सांगुन ठेवलं होतं तिने, कसं आणि कधी पाणी घालायचं ते. आपल्या बागेचं आता कसं होणार असं तिला वाटत होतं.
चित्रात रंगले
फूल उमलले होते पिवळ्या सोनसकाळी हर्षाने
पूर्वेकडुनी धावत होती लक्ष लक्ष किरणांची स्वारी
घेउन अपुल्या संगे छाया कोवळी तरतरीत न्यारी
फूल फूल हासले होते त्या छायेच्या अंगाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
किती रंगांची जमली मैफल वसुंधरेच्या ठायी
हिरव्या पिवळ्या पदरावरती काठ मोरपिशी वाही
केशर हलके मिसळून जाई बुट्ट्यांमधुनी नवख्याने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
निळ्या किनारी करडा दगडी घाट सजवला होता
तीवर हिरवा गार गालिचा सुबक ठेवला होता
नाव नेटकी उभी पाहिली नदीकिनारी डौलाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
खेळत होती लाट स्वच्छ हळुवार किनाऱ्यावरती
तुषार उडवत अल्लड अवघे अवती भवती
रांगोळीही क्षितिजावरती रंगवलेली कुंकवाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
---------- आदित्य देवधर
Tuesday, October 20, 2009
वसंतात एकाएकी मेघ बरसला होता
मेघ बरसला होता
प्रत्येक थेंब होऊन
मल्हार आला होता
घरट्यातून पाखराने
झेप घेतली होती
पंखातुन त्या कोवळ्या
मारुत आला होता
बाग़ बहु फुललेली
होती नदीकिनारी
पाण्यास मात्र अवघ्या
तीर आटला होता
प्रेम मुक्यांवर करुनी
आम्ही थोर जाहलो
भिकेस अवघडलेला
आवाज पारखा होता
चिखलात वाट जाता
पाय माखले होते
कमळाच्या देही भुंगा
गुंतून पडला होता
शांत समयी नकळत
भैरवी स्पर्शुन गेली
नयन मोकळे व्हावे
ऐसा मार्ग निवडला होता
------------ आदित्य देवधर
Wednesday, October 7, 2009
बाजार
देवाचाही भर रस्त्यावरी
बरबटलेल्या गर्दीमधुनी विकत घेतला
श्वास एक मी भर बाजारी
झाडांचे नरडे भेदुन शुष्क लाकडे
जाळत होती रोज चितांना
राख तयाची फ़िसकटलेली फासत होती
जिथे तिथे उघड्या अंगाना
तोंड माखले होते आणि लपलपणारी जीभ
वळवळी शार विषारी
बरबटलेल्या गर्दीमधुनी विकत घेतला
श्वास एक मी भर बाजारी
केवढेतरी गंध कोंडले होतेकितीक सारे तुकडे पडुनी इंद्रधनूच्या
पदरावरचे रंग सांडले होते
अन वजनाच्या काटयावरती तोलत होती
लाल कोवळे मांस शिकारी
बरबटलेल्या गर्दीमधुनी विकत घेतला
श्वास एक मी भर बाजारी
दुकान मांडले होते आणिक खुंटीवरती
जगण्यासाठी भाव टांगले होते
लिलाव चालू असती तैसे बोलींमधुनी
आयुष्याचे मोल ठरविले होते
लाज त्याच चिखलात लोटूनी डोळे मिटूनी
डाव लावला मी व्यवहारी
बरबटलेल्या गर्दीमधुनी विकत घेतला
श्वास एक मी भर बाजारी
Tuesday, October 6, 2009
युगे उलटली
कधी सूर्य थांबला नाही
स्थैर्य जीवनी इतुके वेड्या
फुका कशा तू शोधू पाही
गात्रे गाळुन झाड़ बोडकी
पान फुलांचे सडे सांडती
वसंतात परि लगडे वैभव
कुणी किमया केली काही?
जलधारा मग बरसून जाती
बीज अंकुरे अवनी पोटी
गार बोचरा वाहे वारा
खन्ड तया कधी पडला नाही
तुडवून वाटा मागे जाती
रेघा हाती मार्ग दावती
कुणा म्हणावे मार्ग आपुला
वळल्याविण कधी कळले नाही
कुणा लाभली माणिक मोती
कुणा नशिबी राख नि माती
कुणी बांधली बंगली मोठी
कुणास साधे छप्पर नाही
चालत राहणे धर्मं मानुनी
रस्ते वाटा पुन्हा शोधुनी
जगण्याइतके मोल सांग तू
कशास मोठे लागुन राही
----------आदित्य देवधर
Monday, September 28, 2009
प्रवासी
-----आदित्य देवधर
Wednesday, September 23, 2009
दृष्टी
-------- आदित्य देवधर
कागद
शब्दास मिळाला होता
ओळीमधल्या रेघांतून
हा कागद संपला होता
रेघांच्या तिरक्या वाटा
मी मागे सारत होतो
वळणावर कोपऱ्यावरच्या
हुंकार थांबला होता
एका नाजुक ओळीवरती
जखम जाहली होती
अदृश्य तिथे रक्ताचा
मी थेंब पाहिला होता
वर्षे लिहिण्यातच गेली
अन बोटे झडली आता
अखंड हळव्या शाईचा
अतिरेक जाहला होता
एका कातर सांजेला
आटली लेखणी माझी
रेघांच्या विळख्यातुन तेव्हा
हा कागद सुटला होता
----- आदित्य देवधर
Saturday, September 19, 2009
कमरा
कमरा बंद रखते हो पर चाबी खोने का गम नही
कोई झाँक कर देखे भी तो क्या देखे टूटी खिड़की से ,
अंधेरेसे गीली हुई जमीन और दीवारों पर नम कहीं
रौशन लकीरें तरस गयी है भीतर आने कों
खिड़की को भी साँस लेने दो कभी यूँही
ये सोई हुई यादें ताजा होने का डर है तुम्हें
और यादोंकों छुपना है सोये अन्धेरोमे कहीं.
अब यादोंको उजाला मिल भी जाए तो क्या हो
ये रोशन यादे जुगनू बनके उड़ने वाली नहीं
दीवारोंपे रंग भी लग जाए तो क्या हो
कमरे में बसी तस्वीर हटने वाली नही
--------------आदित्य देवधर
थेंब
फटीतून हळूच बघितलं मी कोण आलय लपून
थोडा ओलावा आलेला भेटायला सहजच
मी दरवाजा बंद करून घेतला हसून
एक थेंब तरी आलाच अन अनेक त्यामागुन!
थेंबात मी पाहिले, त्याचे अंग थरथरले
ओठावरचे हसू होते पण किंचित ताणलेले
कुठेतरी जायचे होते त्याला भेटायला
कोणीतरी असेल त्याची विचारपूस करायला
वेळेची वाट बघत होता तो इथेच गप्प बसून
पण एक थेंब आलाच अन अनेक त्यामागुन!
काय सांगू , चंद्र गाठायचा होता त्याला
प्रेमाचा स्वर्ग साधायचा होता त्याला
खुप खटपट पाहिली होती मी त्याची
कोंडलेल्या वेदनेला शांत करण्याची
संवेदना जिंकली अन बांध पडला तुटून
इथेच रडायचे होते त्याला माझ्यापाशी बसून
पुन्हा एक थेंब आला आणि अनेक त्यामागुन!!!!
--------- आदित्य देवधर
Friday, September 18, 2009
स्वप्न
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी
विझलेल्या रातीच्या प्रहरी
गुडूप गाढ झोपली सारी
अशी जाहली गम्मत न्यारी
वाऱ्यावर उडवून बटाना टाकून कटाक्ष जुलमी
आली सुंदर नार सामोरी निखळ रम्य हासुनी
डोळ्यावर विश्वास बसेना
हृदयाचा ठोका चालेना
झाले मजला काय कळेना
हात धरुनी माझा हाती स्वप्नसुंदरी वदली
तुला भेटण्या आले इथवर सर्व बंध तोडूनी
काय मी वर्णू रूप तिचे
चंद्राला लाजवेल असे
नक्षत्राचे तेज दिसे
आकाशातून शोधून कोणी तिला जशी आणली
तिच्या अभावी जणू तारका व्यथित जाहल्या गगनी
----------------- आदित्य देवधर
Wednesday, September 16, 2009
सोबत
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती
निरोप आला होता मजला खेळ संपल्याचा
स्मृतित तुझिया जगण्यामध्ये वेळ संपली होती
डोळ्यांच्या करुनी वाती मी रात्र जागवत होतो
लाल जांभळ्या पेल्यातून मी स्वत:स रिचवत होतो
डोळ्यांतुनी पेल्यात मूक आसवे झिरपत होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती
रात्र टपोरी होती न्हाऊन रूप उजळलेली
चंद्र उसळला होता नभी नक्षी विस्कटलेली
मी एकटाच चालत होतो , सावली सोडली होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती
दिसलीस मजला नदीकिनारी सोडून मोकळे केस
सोबत नव्हते कोणी चरणी निव्वळ अवखळ फेस
ओल्या वाळुत अलगद माझी अक्षरे उमटत होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती
-------------------------- आदित्य देवधर
