Pages

Sunday, August 12, 2018

गुड मॉर्निंग

गुड मॉर्निंग

“तू मला wish केलं नाहीस तर माझी मॉर्निंग गुड होणार नाही का? रोज काय तेच तेच पाठवायचं?”

ऑफिस मधे लंच टेबल वर विवेक बोलत होता. किंवा भांडत होता म्हणा हवं तर.

“मॉर्निंग मधे गुड आणि बॅड काय असतं? सकाळ झालेली कळते मला. तू सूर्याला पण पाठवशील असा मेसेज….” विवेक उपहासाने म्हणाला.

“मी तुला थँक्स म्हणत जाईन आता. सकाळ झाल्याची बांग दिल्याबद्दल. “

योगेश नुसता हसत होता. मेसेज पाठवल्याचा जराही पश्चात्ताप नव्हता त्याला.

“तू पण पाठव किंवा ignore कर. चिडू नको ना पण. “ रितू विवेक ला समजावत होती.

“वाटल्यास मी तुला रोज नवीन gif पाठवत जाईन. ती तू फॉरवर्ड करत जा” रितू ने विवेकला डिवचण्यासाठी आगीत अजून तेल ओतलं आणि योगेश कडे बघून डोळा मारला.

“त्यापेक्षा तू माझ्या घरी येऊन मला wish का करत नाहीस. Gif मधले गुलाब, चहा, कॉफी, बाहुली आणि सर्व पंच महाभूते सादर कर प्रत्यक्ष. मी पण दाद देईन तुझ्या performance ला. “ विवेक खवचट पणे म्हणाला आणि

तिघंही मनापासून हसले यावर. रितू ला actually असं करताना imagine करून.

परत desk वर जाताना योगेश रितू ला म्हणाला “ काही नाही ग .. फुकट बडबड चालली आहे विक्याची. तू मेसेज टाकलास तर काही बोलणार नाही तुला. त्याला एका मैत्रिणीची गरज आहे…. “

रितू ने दोन साजूक शिव्या घातल्या आणि हसून दोघंही कामाला लागले.

विवेक काही बोलला नाही. हसल्या सारखं करुन त्याच्या डेस्क पाशी निघून गेला.

विवेक, योगेश आणि रितू गेली 6 वर्ष इथे काम करत होते. स्वभावाने भिन्न असूनही त्यांचं एकदम फिट्ट जमत होतं.

विवेक जरा विक्षिप्त, रितू फार मनस्वी आणि योगेश जगाचा मित्र. पण काहीतरी त्या तिघांना एकत्र बांधून होतं. विवेक चं लग्न झालं होतं. एक मुलगी होती त्याला. रितू divorced. आणि  योगेश अजून बॅचलर. आपापल्या role मधे तिघेही व्यवस्थित परफॉर्म करत होते.

पण समाधानी असेल तर तो माणूस कसला… आपल्या आयुष्यात काही thrill नाही, काही मजा नाही, असं विवेक ला नेहमी वाटायचं. ती म्हणायचा ..‘अडकलोय यार…..खुंटीला बांधल्यासारखा. सगळं छान चालू आहे. पण तेच तेच चालू आहे. तुमचं बरंय. खुंटी नाही की दोरी नाही. बोंबला हवं तिथे. मी बसतो पेस्ट कंट्रोल करत…!’

योगेश आणि रितू हसायचे. एकमेकांकडे बघायचे आणि नजरेतून एकमेकांचं सांत्वन करायचे. कदाचित विवेक ज्याला खुंटी म्हणत होता त्याची किंमत यांना कळली होती.

थोडक्यात..  तेच ते ऑफिस, तेच तेच काम , त्याच घरच्या कटकटी.. याला विवेक कंटाळला होता.

रोजचं गुड मॉर्निंग काही चुकत नव्हतं. आणि तरी एकही मॉर्निंग काही गुड होत नव्हती!

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे विवेक ऑफिसला जायच्या घाईत होता. घरातुन निघताना whatsapp नोटिफिकेशन ने फोन वाजला. योगेशला पुन्हा शिव्या घालून मेसेज न बघताच त्याने फोन खिशात टाकला आणि गाडी काढली. वाटेत सिग्नल ला पुन्हा फोन वाजला आणि विवेकने वैतागुन बघितलं की कोणाला तहान लागलीये एवढी….

आणि नाव बघून विवेक चपापला.

‘अमृता पारखी’. नेमकी काय reaction द्यावी कळलंच नाही त्याला. फोटो बघू की मेसेज.. असं झालं एकदम.

बाहेरच्या horns च्या आवाजांनी तो भानावर आला आणि सिग्नल सुटल्याचं लक्षात आल्यावर घाईघाईत गाडी पुढे घेतली आणि डावीकडे जागा बघून थांबला. त्याने मेसेज पुन्हा पुन्हा बघितला…….. ‘गुड मॉर्निंग’ !

त्याने परत खात्री केली दोनदोनदा फोटो बघून.

अमृता? खरंच.. अमृता…? तिन मला का ping केलंय? एवढ्या दिवसांनी आज का बरं केलं असावं? काहीतरी काम असेल.. नाहीतर उगीच कशाला ping करेल मला… की कसलं आमंत्रण देणार असेल… नवऱ्यासाठी रेफेरल वगैरे करायचं असेल… एक दोन नाही हजारो प्रश्नांचं जाळं. आपल्या परीने त्याने यांची उत्तरं शोधली आणि तंद्रीतच ऑफिसला पोचला. अमृताचा DP सतत डोळ्यासमोर येत होता.

अजूनही छान दिसत होती ती फोटोमध्ये. कॉलेज सारखीच.

आज विवेकची मॉर्निंग खरंच गुड झाली होती.

ऑफिस ला पोचल्यावर कोणाशी काही न बोलता विवेक गपचूप डेस्क वर गेला आणि कामाचं नाटक सुरू केलं. त्याला काम सुचणं शक्यच नव्हतं. सारखा फोन काढून तो मेसेज चेक करत होता. आणि अचानक त्याला जाणवलं की आपण रिप्लाय केलाच नाही…. भयंकर अपराधी वाटून त्याने लगेच रिप्लाय टाईप केला… ‘गुड मॉर्निंग डिअर….’

पण मग त्याचं त्यालाच वाटलं .. ‘डिअर काय डिअर… काय वाटेल तिला…. ब्लॉक करेल मला हे वाचून….नको.. डिअर नको.’ मग त्याने डिअर खोडलं आणि फक्त लिहिलं..

‘गुड मॉर्निंग…   अमृता’ आणि तिच्या रिप्लाय ची वाट बघू लागला.

पाच मिनिटं झाली तरी तिचा काही मेसेज नाही. विवेकचे डोळे, कान , विचार सगळे फोनवर एकवटले होते.

आपण उशिरा रिप्लाय केला म्हणून चिडली की काय असं विवेक ला वाटलं आणि अगदी खट्टू झाला.

‘जाऊदे … गेली उडत.. चिडली तर चिडली… मला काय इतर कामं नाहीत का.. ?’ असं म्हणून त्याने फोन बाजूला ठेवला आणि लॅपटॉप मध्ये डोकं खुपसलं.

'टिंग…’ wharsapp वाजलं. विवेक ने विजेच्या वेगाने फोन unlock केला.. अमृताचा मेसेज होता.

‘गुड मॉर्निंग.. कसा आहेस???’

‘सॉरी मीटिंग मध्ये होते. त्यामुळे फोन उशीरा बघितला. ‘

‘तू ऑफिस मध्ये बिझी आहेस का?’

क्षणाचाही विलंब न करता विवेक सरसावला

‘हेलो…! मी ठीक. तू कशी आहेस?’

‘बिझी वगैरे नाही ग… चालू आहे काम .. routine..!’

‘तूच बिझी आहेस. बोल… आज आठवण कशी काढलीस.’

‘काही विशेष काम?’

विवेक चाचपून बघत होता की नेमकं काय कारण असेल पिंग करण्याचं…? त्यांचा काही सध्या नेहमीचा संपर्क नव्हता. नक्कीच काहीतरी कारण होतं. विवेक ला गेल्या दोन महिन्यांत कित्येकदा वाटलं होतं की तिच्याशी बोलावं… पण धीर झाला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी विवेक च्या कॉलेज ची re union ची पार्टी झालेली. आणि तेव्हा विवेक तब्बल 12 वर्षांनी अमृताला भेटला. कॉलेज चा 4 वर्षांचा काळ आणि त्यानंतरची काही वर्ष झरकन डोळ्यासमोरून गेली. ती तशीच होती. जराही बदलली दिसली नाही. तोच अल्लडपणा, निरागसपणा, खळखळून हसणं.. काहीही बदललं नव्हतं. तिने तर विवेक ला लपून भोक्क पण केलेलं. कसला दचकलेला आणि वैतागलेला तेव्हा...पण तिचा उत्साह आणि चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याचा वैताग कुठल्या कुठे पळून गेला. दोघांनी एक टाळी दिली आणि जुन्या आठवणींत रमून गेले. खूप गप्पा मारल्या. नंबर वगैरे घेतले.. पण नंतर काहीच नाही…

आणि आज तिचा whatsapp बघून हे सगळं विवेकला आठवलं आणि उत्सुकता वाढली . … की काय काम असेल बरं….

‘टिंग’.. पुढचा मेसेज वाजला.

‘काही काम कशाला पाहिजे.. ‘

‘सहज पिंग केलं. आठवण आली म्हणून.’

‘की साहेबांची apointment वगैरे घ्यावी लागते की काय चॅट करायला..?

अमृताने हसणारा smily टाकला.

‘मलाही तुझी खूप आठवण येते ‘ अस विवेकला लिहावंसं वाटलं पण त्याने जरा आवरतं घेतलं. आजच feelings आल्या आणि संपल्या असं नको व्हायला…

‘छे.. appointment कसली..तुला लागणार नाही appointment ‘

‘आपण दोन महिन्यांनंतर आज बोलतोय… ‘

‘कुठे बिझी होतीस का?’

विवेक चा interview संपत नव्हता.

‘Onsite होते दीड महिना.. गेल्या आठवड्यात आले. ‘

विवेकला जरा बरं वाटलं. म्हणजे ती कामात असल्याने काही बोलणं झालं नाही, ती ignore करत नव्हती. सध्या एवढा दिलासा पुरेसा होता.

पुढे त्यांच्या चॅट वर थोड्या गप्पा झाल्या आणि दिवस संपल्यावर अत्यंत आनंदी मनाने विवेक ऑफिस मधून सगळ्यांना बाय करून जरा लवकरच निघाला.  आज तो योगेश आणि रितू शी भांडला नाही की ट्रॅफिक मध्ये चिडला नाही. गाडीत मस्त किशोर लावलेला आणि जरा लांबूनच चक्कर मारून घरी परतला.

अमृता विवेकला कॉलेज पासून आवडायची. प्रेम होतं का ते माहीत नाही पण तिच्या बरोबर वेळ छान जायचा. आणि कदाचित अमृताला पण विवेक च्या company मध्ये आवडायचं. दोघं couple म्हणून फेमस होते कॉलेज मध्ये.कॉलेज च्या त्या चार वर्षांत आणि नंतर नोकरीच्या 3 4 वर्षात अभ्यास, नाटकं, ट्रिप्स, भांडणं सगळं मनसोक्त एकत्र करून झाल्यावर एक दिवस असा प्रसंग आला की त्यांना लग्नाबद्दल विचार करणं भाग पडलं. अमृताला दोन वर्ष US ला जायची संधी होती…दोघांच्याही घरी त्यांच्या नात्याची कल्पना असल्याने दोन्ही घरचे मागे लागले की लग्न करून जा. पण लग्न म्हटल्यावर दोघांनी नकार दिला… हा निर्णय सर्वांनाच धक्कादायक आणि अनपेक्षित होता. मित्रांना, घरच्यांना आणि .. प्रत्यक्ष त्या दोघांनाही. खूप प्रश्न होते. स्वतःबद्दल, नात्याबद्दल, भविष्याबद्दल ….. पण कशाचीही उत्तरं नव्हती. एवढ्या relationship नंतर दोघे हा असा निर्णय घेतील असं कोणालाही वाटलं नव्हतं…

चांगला मित्र किंवा मैत्रीण लाईफ पार्टनर म्हणून नको असते का कोणाला? किंवा असा विचार करावा एवढी समज तरी आलेली असते का लग्नाच्या वयात? नसते बहुतेक. विवेक आणि अमृताला ही नव्हती. पण त्यांनी  एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. आता निर्णय कोणी मुद्दाम चुकीचा घेत नाही . भविष्य काळ तो चुकीचा किंवा बरोबर ठरवतो.

दोघांनीही नंतर का कोणास ठाऊक पण संबंधच तोडल्यासारखं केलं. Ego असेल का?.. किंवा नसेलही. की स्वतःबद्दलच शंका.. ? दोघांनाही स्वतःला वेळ द्यावासा वाटला असेल कदाचित.

या घटनेनंतर दोघांमध्ये ना फोन ना चॅट ना emails काहीच नाही. मधल्या काळात दोघांची लग्नं झाली, मुलं झाली आणि दोघांची आयुष्य समांतर रुळाप्रमाणे धावू लागली. एकाच शहरात. तरी एकाची दुसऱ्याला काही कल्पना नसल्या सारखी. कॉमन मित्रांकडून हाल हवाली कळत होती पण तेवढ्यापुरतंच.

आज या सगळ्याची आख्खी फिल्म डोळ्यासमोर सरकली आणि सगळ्या घटनांची उजळणी झाली विवेकची. घरी पोचला तेव्हा बायकोलाही ते जाणवलं. पण काही बोलला नाही. त्याला अमृताशी आधी बरंच बोलायचं होतं. प्रश्न विचारायचे होते. उत्तरं शोधायची होती. बरोबर आणि चूक च्या पलीकडली.

पुढच्या दिवशी सकाळी विवेक उत्साहात उठला. त्याने ठरवला होता आजचा दिनक्रम. फोन उचलला आणि अमृताला मेसेज केला.

‘गुड मॉर्निंग..!’

Wednesday, July 18, 2018

तुझ्या फुलांचे अत्तर

सये तुला मी निरोप देताना डोळे पाणावुन गेले
तुझ्या फुलांचे अत्तर माझ्या श्वासाशी रेंगाळुन गेले

थिजले होते पाय तिथे त्या जागेवरती तू जाताना
किती न जाणो क्षण तैसे नजरेतुन सारे सांगुन गेले

अनेकदा मी आवरले हुंदके नाटकी हसता हसता
फुटला नंतर बांध केवढे मळभ शेवटी वाहुन गेले

कितीकदा वाटले म्हणावे 'थांब, सोडुनी नकोस जाऊ'
कधी वेळ तर कधी धीर नव्हता नि सांगणे राहुन गेले

अता कधी भेटशील तू या प्रश्नाचे काहूर मनाशी
विरहाच्या वणव्यातिल आगीमधुनी राती जाळुन गेले

तुला धाडले पत्र एकदा पत्ता ठाऊक नसतानाही
कुठूनसे मग दोन पारवे तुझी खुशाली सांगुन गेले

पुन्हा चालतो एकटाच मी जुन्या रोजच्या रस्त्यावरूनी
पुन्हा तुझ्या वळणावर भासाचे मृगजळ मज चकवुन गेले

वळून तू बघताना मागे उलगडला पट अपुला सारा
आठवणींतिल रंग नेमके चित्र आपुले काढुन गेले

आदित्य

Tuesday, July 17, 2018

चल होऊया पाऊस आपण

चल होऊया पाऊस आपण
तू माझा हो तसा तुझा मी
भिजवू आणिक भिजून जाऊ
एक होऊनी अंतर्यामी

चल होऊया समुद्र सरिते
मधील नाते विरघळणारे
एकमेकांत मिसळू दोघे
सौख्याने उजळून किनारे

चल खेळूया इंद्रधनूच्या
रंगांसंगे क्षितिजावरती
रंग देऊनी अपुला त्यासी
उधळू आनंदी बरसाती

चल होऊया मित्र नव्याने
मैत्रीचा मृदगंध दरवळू
व्यापुन सारा आसमंत
नवचैतन्याच्या सरी झरू

चल होऊया दोघे ओले
न्हाऊन हिरव्या रंगामधुनी
निथळू दे अंगावर पाणी
चहूकडे आभाळामधुनी

चल होऊया टिपटिपणाऱ्या
थेंबांचा आवाज अनामी
तू माझ्या प्रेमाची झरझर
कोसळता पाऊस तुझा मी

आदित्य

Monday, July 16, 2018

अदृश्य अश्रू संचिताचे

अदृश्य अश्रू संचिताचे हासुनी मी गाळतो
भेगाळल्या मातीत माझे बी सुखाचे पेरतो

जे जे मिळाले ते स्वतःचे मानले अन भोगले
जे जे कधी नव्हतेच माझे, अर्घ्य त्याचे सोडतो

वाटेतले काटे अता गालातुनी हसती मला
की मी अजूनी थेट अनवाणीच त्यांना भेटतो

माझ्याच कुठल्या अपयशाचे भूत वेताळापरी
पाठीवरी घेउन तयाचे रोज ओझे वाहतो

अंधार सध्या वाटतो मज सोबती माझा सखा
माझ्या चुकांना, वेदनांना तोच केवळ झाकतो

प्रत्येक जन्मी धावतो बघण्या यशाची पायरी
विश्राम मी घेतो मधे अन तोच मृत्यू गाठतो

काळोख रात्री वेदनांचे टोचणारे पुंजके
माझेच मानुन मी तयांचे बोचणे कुरवाळतो

आदित्य

Monday, July 2, 2018

वास्तवातला पाऊस

आकाशातील घन मनकवडा
तृषार्त हृदयी चिंब बरसतो
वास्तवातला पाऊस नकळत
स्वप्नांमध्ये रोज झिरपतो

आभाळाचे पुसून काजळ
टिपूस गळती खाली जैसे
डोळ्यांमधला मेघ अचानक
चंद्र चांदण्यातुनी उतरतो

कधी घेउनी येतो वादळ
थेट धडकतो घरास माझ्या
कधी घालुनी हळूच फुंकर
वेदनेस माझिया हसवतो

ओले असुनी दिवस जाळतो
वेदनेतल्या आगीमधुनी
आणि कोरड्या राती देखिल
जागुन डोळ्यांतुनी भिजवतो

आज अपेक्षा, उद्या उपेक्षा
असूनही आशेचा मोहर
रोज नव्या अश्रूंच्या ठायी 
अंधाऱ्या रातीस बहरतो

पाऊस राती काजळवाती
लावून ओल्या चांदण्यामध्ये
मंतरलेला चंद्र पावसामध्ये
मिसळुन मंद उजळतो

घेऊन येतो पाऊस काही
स्मृतींस माझ्या तुझ्या सोबती
पाऊस सरता ओलाव्याचा
भास तेवढा मागे उरतो

आदित्य

Thursday, June 28, 2018

सवाल आहे एवढाच की

सवाल आहे एवढाच की तुझ्यात गुंतावे की नाही
सवय एवढी लागावी अन व्यसनाधिन व्हावे की नाही

श्रावणातल्या ओल्या हिरव्या नभात वारा पिऊन सारा
पाऊस होऊन फक्त तुझ्यावर अविरत बरसावे की नाही

प्रेम म्हणू की ओढ म्हणू की भासाच्या सावल्याच नुसत्या
आभासी मृगजळात ऐशा नाते रुजवावे की नाही

एका भेटीमधली ठिणगी उठवुन गेली वादळ वणवा
हव्याहव्याशा आगीतील या निखार विझवावे की नाही

कधी वाटते जावे आणिक संपवून टाकावे सारे
चिठ्ठीतुन शेवटचे तिजला निरोप कळवावे की नाही

तू असताना वा नसताना उंच खालती घेऊन झोके
धुंद नशेचे वा विरहाचे प्याले रिचवावे की नाही

नसतील ध्यानी तुझ्या जराही माझे असले प्रश्न कदाचित
अशात तुझिया स्मृतींत मी स्वप्नांना भिजवावे की नाही

जखमा माझ्या हृदयावरच्या तशा खोलवर नाहीत अजुनी
याच समाधानावर आता स्वतःस रिझवावे की नाही

भिडल्या जर दोघांच्या नजरा उमजुन सारे मुकेच नकळत
मोजुन मापुन दोन क्षणी मग खुशाल बिघडावे की नाही

आदित्य

Tuesday, June 26, 2018

तहानलेला

अन्योन्याच्या नात्यामधला समुद्र ऐसा गहिवरलेला
'अथांग पाणी सभोवताली असूनही मी तहानलेला'

निमित्त परतोनि भेटण्याचे कसेबसे साधले तरीही
पाय घराच्या उंबरठ्यावर नकळत माझ्या अडखळलेला

रोज इथे मी मूक झुरावे प्राजक्ताच्या झाडाखाली
रोज तिथे दारात तुझ्या पाऊस फुलांचा ओघळलेला

स्वप्नामध्ये क्षितिजाच्या पलीकडे तुला मी भेटून येतो
आणिक उरतो गात्रांमधुनी स्पर्श तेवढा शहारलेला

पक्षी होऊन मन माझे घुटमळते तुझिया खिडकीपाशी
गाऊन जाते गूढ मारवा कातरवेळी अवघडलेला

कुठेतरी जाणतो तुलाही ओढ असावी माझ्याइतकी
क्षण एखादा तरी असावा स्मृतींत माझ्या विरघळलेला

दोन किनारे दोघे आपण रोज वाहतो सोबत तरिही
थेंब माझिया पाण्यामधला तुला भेटण्या आसुसलेला

आदित्य

Friday, June 22, 2018

विरघळून जाती मने

ओल्या ओल्या पावसातल्या गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अल्लड अवखळ थेंब नाचती सभोवताली
छेड काढुनी केसांशी ओघळती गाली
ओठांनी हळुवार तयांना टिपण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

कोसळणारा पाऊस बघता खिडकीमधुनी
आठवणींचे तुषार उडती अंगावरूनी
विसरून जाते भान तशातच झुरण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

उसळून सागर मनात वादळ घेऊन येतो
हजार लाटांनी आलिंगन देण्या हुरहुरतो
वाट पाहता तुझी किनारी भिजण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

पावसामध्ये रुजून येती शब्द नव्याने
भाव उमलती अस्फुट उत्कट कळीप्रमाणे
प्रेमाच्या फांदीवर डोलत फुलण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

असा पेटतो वणवा अंगी स्पर्शामधुनी
धुके पसरते उष्ण धुराच्या वाफांमधुनी
चिंब ओल्या मिठीमधुनी जळण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अनुरागाचे सूर आपुले अवघे जुळले
नवे अर्थ सहवासामध्ये तुझ्या मिळाले
पावसातले स्पंदन उतरे गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

आदित्य

Monday, February 5, 2018

गंध तुझा रेंगाळत आहे

आठवणींची छाया माझे वर्तमान झाकोळत आहे
अजून मी संदिग्धपणे नात्यास जुन्या सांभाळत आहे

स्वप्नांची दाटली अताशा भुते मनाच्या अवतीभवती
वास्तवातला दाह तयांना रोज नव्याने जाळत आहे

कधी दिसावा तुझा चेहरा गर्दीमध्ये खुणावताना
कधी वाटते चोरून मजला बघूनही तू टाळत आहे

अदृश्य असो व दृश्य खुणांशी अडखळतो मी कितीतरीदा
जाणवते की नियती सध्या काहींना चुरगाळत आहेत

अजूनही ओघळतो नयनी सुगंध माझ्या तुझ्या फुलांचा
मोहाचे निर्माल्य अजूनी त्याच स्मृतींवर माळत आहे

भास असे होतात कधी की तुझ्याच हाती हात दिला मी
स्पर्शातील त्या ऊब अताशा डोळ्यामधुनी गाळत आहे

बहर जरी ओसरला असला तुझ्या नि माझ्या अनुरागाचा
श्वासाश्वासामध्ये तरीही गंध तुझा रेंगाळत आहे

Sunday, January 28, 2018

भेटला विठ्ठल अम्हाला

काय पुण्याई असे की वर कुणाचा लाभला

भक्तीने भिजूनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


पंढरीची वाट आम्हा लागली नाही धराया

घातले नाहीच लोटांगण तुझ्या पायी पडाया

न्हाऊनी आकंठ विठ्ठल आज गीतांतून प्याला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आमुच्या अंगात भक्ती, रक्त होऊनी प्रवाहे

श्वास होऊन स्वर तुझा प्रत्यक्ष गाभाऱ्यात राहे

नाद भक्तीचा स्मरोनी टाळ गाऊ लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


गांजल्या भक्तांस माया लाभूदे ऐसी निरंतर

पावुनी पतितास उद्धारून दे अवघे चराचर

आर्जवांचा ओघ नयनी मूक वाहू लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आदित्य

Wednesday, January 24, 2018

जाणतो ऐसे तुला की...

जाणतो ऐसे तुला की तू कधी माझीच होती
सोबतीची शपथ जैसे माझिया साठीच होती

यावरी विश्वास आता ठेवताही येत नाही
की जुन्या भेटींतली उब पेटण्यापुरतीच होती

वाटले विझवून टाकावे निखारे आठवांचे
आग हृदयातीलही केव्हातरी विझलीच होती

आसवांचे थांबले आहे जरी गळणे अताशा
कोरडी अन आटलेली वाट अश्रूंचीच होती

भूतकाळाच्या धुराचा दाटतो काळोख हल्ली
त्याच काळोखात जळती वातही माझीच होती

वाटते तुजला विचारावे तुझ्या हृदयातले
की तुलाही ओढ माझी तेवढ्यापुरतीच होती?

रंगल्या होत्या स्मृतींच्या परिकथा कित्येक पानी
पण भविष्याची पुरवणी आपली कोरीच होती

आदित्य

Tuesday, January 23, 2018

तू असताना

तू असताना माझ्यामधला मीच हरवतो
आयुष्याचा सूर नव्याने मग सापडतो

गंध दाटतो ऋतू ऋतूंचा तुझ्याच ठायी
धुंद तुझ्या सहवासामधुनी तो दरवळतो

तुझे नि माझे असे वेगळे नसे अताशा
श्वास सुद्धा एकाचा दोघांनाही पुरतो

रात्र तुझ्या उबदार मिठीतुनी मावळते
दिवस आपुल्या स्वप्नांसंगे उलगडतो

पडले अंतर जरी पुल्यामध्ये काही
थोडे तू अन थोडे मी चालुनी मिटवतो

सृजनाचा अध्याय नवा गे तुझा नि माझा
जीवनवेली वरती कोमल कळी फुलवतो

आदित्य

Monday, January 22, 2018

नजरेमधला तुझा दिखावा

नजरेमधला तुझा दिखावा तसा उशीरा कळला होता
मार्ग तुझा अपुल्याच दिशेला फसवुन जेव्हा वळला होता

अंधार दाटला असा अचानक डबडबलेल्या नभात जैसे
अवघडलेला सूर्य ढगांच्या आडून लवकर ढळला होता

वाळूमध्ये मी लिहिलेले नाव तुझे अन माझे जोडुन
लाटेने येऊन तुझा उल्लेख तेवढा पुसला होता

प्रत्येक माझी सांज तेवली होती अपुल्या प्रेमामध्ये
ठाऊक नव्हते नात्यामधला दिवा तुझा परि विझला होता

तुझ्यासाठी तो खेळच ठरला निरोप देण्याघेण्या पुरता
अन विरहाचा दंश माझिया अंगीअंगी भिनला होता!

एकदा जरी सांगितले असतेस मला तू खरे तेवढे
की गाण्याचा सूर मैफिली पुरता केवळ जुळला होता

रोज नव्याने स्वप्नांमध्ये तुला पाहतो शेवटचे मी
तोच तोच थिजलेला क्षण हृदयात खोलवर घुसला होता

तरळून गेल्या स्मृती तुझ्या गे डोळे  माझे मिटतानाही
आठवणींनी मृत्यू देखील क्षणिक तेवढा टळला होता

आदित्य

Wednesday, December 20, 2017

रोज तुझ्या प्रेमात

तुला पाहता स्वतःस पुरता विसरून जातो
रोज तुझ्या प्रेमात नव्याने हरवुन जातो

नजरेमधला भाव कधी ओठांवर येता
अबोल गाणे डोळ्यांमधले सुचवुन जातो

प्रकाश तव हास्याच्या ज्योतीमधुनी अवघ्या
क्षणांस साऱ्या प्रसन्नतेने उजळुन जातो

खट्याळ वारा उडवुन तव नाजूक बटांना
गंध कोवळा लेऊन मजला बिलगुन जातो

जादू चाले तुझी पावसावरती देखिल
तू नसता तो खिन्न मनाने परतुन जातो

संध्याकाळी हसून तू जाताना क्षण तो
स्वप्नमंजुषा धुंद क्षणांची उघडुन जातो

आदित्य

Saturday, December 16, 2017

टपोरी

आमचा आपला टपोरीपणा
थोडा त्यावर मुजोरीपणा
नसेल पटला ज्याला त्यांनी
खुशाल मिजासखोरी म्हणा

कुणी कशाचे दु:ख करावे
कधी कुणाचे शब्द खुपावे
कशास आम्हा चिंता याची
उगाच नुसता हळवेपणा

थेट बोलतो हृदयामधले
नाटक नसते अधले मधले
असाल जैसे वागू तैसे
जमतच नाही फसवेपणा

असेल मैत्री लाख शिव्यांशी
अंधारातील मंद दिव्यांशी
प्रकाश घेतो त्यांचा माथी
यथेच्छ त्याला चोरी म्हणा

आदित्य

Tuesday, December 12, 2017

तुझ्याच सोबत

तुझ्याच सोबत रहायचे मज आहे आता
स्वप्नांमधुनी जगायचे मज आहे आता

कसा तुला मी भेटू पुन्हा धुंद क्षणांतून
आठवणींतून उरायचे मज आहे आता

काय वाटते म्हणून सांगू तुझियाबद्दल
शब्दांमधुनी सुचायचे मज आहे आता

दाटून येता पाऊस नयनी तुझ्या कधीही
अश्रू होऊन वहायचे मज आहे आता

चाकरीतुनी श्वासांच्या मी सुटलो आहे
तुझ्या स्पंदनी स्फुरायचे मज आहे आता

--- आदित्य

Monday, October 16, 2017

तुझे होत जाणे

तुला पाहताना कसे काय जाणे
सुचे पावसाला तुझे गीत गाणे
मृदगंध वाहून आणे स्वरांना
भिजुनी तयांतून तुझे होत जाणे

स्वप्नांस माझ्या तुझा स्पर्श होतो
तुझ्या पावसाचाच मी थेंब होतो
उडतो नभातुन तुझिया सवे मी
जसे पारवे दोन प्रेमी दिवाणे

किती साठवू सौंदर्य लाघवाचे
डोळ्यांत माझ्या तुझ्या आठवांचे
घेऊन येतो पाऊस त्यांना
वेळी अवेळी करुनी बहाणे

मोत्या प्रमाणे असे हासते तू
मला श्रावणाची सर भासते तू
कधी उन्हाचे कधी पावसाचे
नाते नवे रोज वेडे शहाणे

झोकात उडवे वारा बटांना
फुटती धुमारे अवखळ क्षणांना
वाहून गंधास हलकेच येथे
संदर्भ उजळून जाती पुराणे

अशात माझी तुझी भेट होता
पाऊस तेथेही हजर होता
झेलून डोळ्यांतले थेंब अलगद
तुझ्या पावसाने भिजून जाणे

आदित्य