Pages

Saturday, September 25, 2010

आनंदी क्षण


मातीत एक थेंब
पडताच दिला सांगावा
भारलेल्या चैतन्याचा
भविष्याच्या अस्तित्वाचा

डोळ्यांत एक थेंब
मिटलेल्या पापण्यात दडला
दडपण सरल्याची भावना
दाटून म्हणाली जरा थांब ना
असा ओघळू नको लगेच
थोडा धीर धर
तुला संधी मिळणार आहे
हासत हासत ओघळण्याची
तू हसताना येण्यासाठी
जन्माला आला आहेस
शेजारचं एक स्वप्न बघ
तिथेच वाढीला लागलंय
त्यालाही तुझी सोबत
आणि तुला त्याची
अस्तित्वाची सान्निध्याची

तू रुजायला लागशील
मिळेल ओजाचं पोषण
एक हिरवा अंकुर फुटेल
या अंकुराच्या दृष्टीने बघ जरा
सगळे तुला बघायला आतुर
हसून, उत्साहाने, चैतन्याने
त्यांच्या ठायीही तुला दिसेल
डोळ्यांत एक थेंब
आकार घेताना
आनंदी क्षणासाठी जन्माला आलेला

-------आदित्य देवधर

मालकीण

        आमच्या मालकीणबाई म्हणजे तसं फार मोठं प्रकरण! प्रगल्भ आणि तेवढंच गूढ. उदात्त आणि तेवढंच विक्षिप्त. कामाचा प्रचंड उरक आणि पुढच्या कामांसाठी सदैव तयार. फार मोठा पसारा सांभाळतात. म्हणजे मला जो माहीत आहे तो मोठाच म्हणावा लागेल. माझ्यासारख्या ब-याच जणांची जबाबदारी त्या लीलया पेलताहेत. म्हणा मला दुसरा काही पर्याय नाहीये पण अशा सगळ्यांनाच त्यांनी आपल्या छायेखाली आश्रय दिला आहे. स्वत:च्या आणि आमच्या कामांचा रगाडा हाकताहेत. रोज त्यांचा दरबार भरतो. आम्हाला कधी जावं लागत नाही तिथं, पण तिथेच सगळे हिशेब चालतात. त्यांचा एक हसबनीस  आहे. फार चतुर आणि कर्तबगार. त्याला सगळं येतं. तो सगळ्यांचा नियमाप्रमाणे चोख हिशेब ठेवत असतो. बिनचूक अगदी. बोट ठेवायला जागाच नाही कुठे.

       बाईंनी आम्हाला आमची कामं अगदी सुरुवातीपासूनच वाटून दिली आहेत. कामाप्रमाणे मोबदला मिळावा ही साधी अपेक्षा आहे की नाही? पण तसं होत नाही. त्यांच्या कारभाराविषयी मला फार माहिती नाही. पण जरा अगम्य आणि विचित्र आहे. मी थोडा शोधण्याचा प्रयत्न केला पण 'अपने बस की बात नही' हे कळल्यावर नाद सोडून दिला. मोबदला आणि काम यांचं गणित काही जुळत नाही. तो हसबनीस  काय करतो कुणास ठाउक. दाद मागायला गेल्यावर अशी काही समीकरणं मांडून दाखवतो की घेरीच यावी सोडवता सोडवता. तरी माझ्या एका मित्राने तसं प्रयत्न केला होता. पण समाधान न झाल्याने बिचारा तसाच राहिला. मोबदला तर दूरच अजून गाडाभर कामं मागे लावली.

        मला त्या फारशा आठवत नाहीत. कशा दिसतात कशा राहतात , माहीत नाही. पण त्यांची खूप रूपे असावीत. एवढी कर्तबगार प्रतिमा.. एक थोडच असणार आहे? मग मी त्यांना काळ्या डगल्यात, कधी श्वेत वस्त्रात कधी आईच्या रूपात तर कधी मायेच्या रूपात कल्पित करतो. त्यांना कधी बघायला मिळेल असं वाटत नाही. एकदाच कधीतरी फार पूर्वी त्यांना भेटल्याच पुसट आठवतंय. पण ते अगदी त्यांच्याकडे काम सुरु करण्यापुर्वी. बराच काळ लोटला आहे त्याला. मलाही आता सांगता येणार नाही. आमचा काय कामापुरता संबंध. कामं आली की ती संपवायची. दुसरी कामं तयारच असतात. यातून सुटका नाही. मला तर वाटतं की गेल्या आणि त्याआधीच्यांही जन्मांमध्ये हीच बाई असणार मालकीण म्हणून.

        परवा एक विलक्षण गोष्ट घडली. देवाकडे गेलेलो. ८० वर्षांनी गेलेलो. ब-याच गप्पा झाल्या. अन् अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या. त्यांची बोलणी सुरु झाली देवाशी. त्यातली एक अत्यंत तेजस्वी स्त्री होती. आणि एक करारी पण अत्यंत वृद्ध असा पुरूष होता. मला उगाच आमच्या मालकीण बाईंची आणि त्या हसबनिसाची आठवण झाली. असेच दिसत असतील ते ..मी मनात म्हणालो.उगाच हसू आलं. रिकाम्या वेळी मनाचे घोडे कुठेही पळतात. असो. इतक्यात देवाने मला हाक मारली....
'वत्सा..... यांना भेट. यांच्याच सांगण्यावरून तुला पुढची कामगिरी देत आहे. बोलून घे एकदा'
मी चपापलो. माझी अवस्था ओळखून देव म्हणाला.
'तू ओळखत नाहीस? अरे ही नियती आणि हा निसर्ग.....!!! हीच तुझी मालकीण आहे आता.'

----- आदित्य देवधर

अस्तित्वाचे ऋतू

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती
मनीचे ऋतू बदलले किती

रंगांचाही जन्म इथे जाहला
असंख्य छाया , गूढ छटांचा अर्थ इथे लागला 
तेजामधुनी मिसळून जाती
हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या
हृदयामधल्या भरकटलेल्या अंधारातील गती
छटेचे ऋतू बदलले किती

रिमझिमती, धारा कोसळती 
आरशामध्ये अवघडलेल्या सरी धरेवर कोसळती
काळ्या चष्म्याआतून धारा
रंगीत  गाणी गाऊन जाती
कुणास स्मरती नाजूक साजूक ओघळती
सरींचे ऋतू बदलले किती

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती

------- आदित्य देवधर 

चुका

मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या
सह्या प्रशस्ती पत्रांवरती उगाच झाल्या अमुच्या

ओरडताना देठातून आवाज बिचारा बसला
बडवून एकच बाजू अमुचा डग्गा पुरता फुटला
मैफिली समेशी धडपडणा-या सुन्याच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

झिंग एवढी चढली की दिवस रात्र उमगेना
अस्तित्वाच्या ऋतूंबरोबर घासाघीस जमेना
तोल सावरता सावरता नशाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

पेल्यांमधुनी पिता पिता लाव्हाही डचमळला
उष्ण उष्ण वाफांच्या खाली कोणतरी तडफडला
कारण वणव्यालाही साध्या चुळाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

एक शूळ उमटला कोठे मातीत घराच्या अंगणी
उघड्या जखमा अंगावरती अंत:करणी दुखणी
दवा औषधी मर्दुमकीच्या पुचाट ठरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

धडधडणा-या हृदयामध्ये देव पाहिला आम्ही
लटपटणा-या पायांना आधार जाहलो आम्ही
अश्रद्धांचे श्राद्ध घालण्या मुठीच पुरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

----- आदित्य देवधर

Friday, September 3, 2010

जगून घे

आता जरासे हसून घे
श्वासांस थोडे जगून घे

जाता निघोनी लवाजमा
मागून त्यांच्या रडून घे

मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे

क्रांती जिथे पेटुनी उठे
ज्वालांत तेथे जळून घे

जाशी करायास सांत्वना
थोडे स्वत:चे करून घे

स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे

आता कितीसे जगायचे
पुन्हा नव्याने मरून घे

प्राणांस त्यागून शेवटी
वाटेल तैसे जगून घे

-----आदित्य देवधर

गोडवे गाऊ कुणाचे

गोडवे गाऊ कुणाचे, गीत आसुसल्या मनाचे

रेशमाच्या पालवीचे, गार हिरव्या सावलीचे
कोवळ्याशा सायलीचे, चाफयाच्या बाहुलीचे
मायभोळ्या माउलीचे, सोहळ्याच्या चाहुलीचे
देवळाच्या पायरीचे, धावणा-या शेवरीचे
शांतणा-या भैरवीचे, मुग्ध कर्णी बासरीचे
कोरलेल्या कोयरीचे, कुंकवाच्या सोयरीचे
पौर्णिमेच्या चांदण्याचे, ज्ञानगंगा वाहण्याचे
उंच उंची नारळीचे, सागराच्या मासळीचे
निर्झराच्या गारव्याचे, संधीकाली मारव्याचे
डोलणा-या केशराचे, कूजणा-या पाखराचे
गोडवे गाऊ कुणाचे खेळ सारे या मनाचे

मोकळ्या मऊ कुंतलाचे, गौरकांती सुंदराचे
नीलकमला डोळियांचे,अन गुलाबी पाकळ्यांचे
कर्ण भूषण लोलकांचे, शांत रेखीव काजळाचे
खळखळोनी हासण्याचे, वेळवोनी पाहण्याचे
काननी मृग चालण्याचे, कोकिळेच्या बोलण्याचे
डौलदार आलिंगनाचे, प्रेमस्पर्शी चुंबनाचे
वाट माझी पाहण्याचे, थेंब काही गाळण्याचे
भेटण्याच्या कळकळीचे, अंतरंगी धडधडीचे
थांबलेल्या क्षणभराचे, संपलेल्या अंतराचे
प्रेयसीच्या संगतीचे मोहवेड्या रंगतीचे
गीत धुंदी यौवनाचे, गोडवे माझ्या प्रियेचे

----- आदित्य देवधर

Tuesday, August 31, 2010

आनंद-पालखी

माझ्याच सावलीचे रे झाड लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

आयाम लाभले रे नवरूप चेतनेचे
दृष्टांत जाहले रे सृजनक्षम कवीचे
गाणे सुखावणारे हलकेच ऐकिते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

अमृत तेज लाभो ज्योतिर्मयी प्रकाशी
शक्ती उरी शिवाची लक्ष्मी वसे कराशी
दुर्गेस प्रार्थनेचा नैवेद्य दाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

बरसात धुंद होता न्हाऊन चिंब झाले
श्वासात ओजसाचे दैवी सुगंध आले
बागेतल्या कळ्यांशी लाडीक बोलते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

डोळे मिटून कल्पे हर एक त्या क्षणाला
आभास गोड मोठे ओवाळती स्वत:ला
मायेत चिंबलेली दिपमाळ लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

भिजताक्षणी फुटावी नवपालवी मनाला
हिरवे निळे उडावे रावे क्षणाक्षणाला
स्वप्ने अमूल्य काही स्वप्नात पाहते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी


------- आदित्य देवधर

काय हे अमुचे जिणे!

रोज यंत्राच्या प्रमाणे मानवी कळ दाबणे
पावलीच्या चाकरीचे काय हे अमुचे जिणे!
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

रातिचे अवघे करोनी सोहळे, जलसे असे
चांदण्याचीही इथे जंगी निलामी होतसे
सूर्यही झाके स्वत:ला पाहुनी हे वागणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भोवतालीची अधाशी पाशवी वृत्ती सले
झापडा बांधून डोळा चालतो आम्ही भले
जाहले वणव्यातले अमुचे खुळे बुजगावणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

आसवांनो दूर व्हा डोळ्यांकडे फिरकू नका
ओघळायाचे भुलोनी आतुनी रडणे शिका
येतसे आम्हा गिळोनी आसवे अमुची पिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

सांत्वनाचे शब्द आम्ही चार मोठे जाणतो
टचकनी डोळ्यांतुनी पाणी पुरेसे आणतो
विकुनिया या भावनांना पळभरी कुरवाळणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

स्वार्थ केवळ राहिले येथे भल्या नात्यांतुनी
मित्र सारे शोधलेले फायद्याचे पाहुनी
साचली खाती पुरेशी, प्रेम मायेचे उणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

मूठभर ती माणसे होती जयांना भ्यायलो
मान तुकवोनी उभे आम्ही कडेशी राहिलो
घेतले शिक्षण अशा शाळेतुनी शिकलो भिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भूक होती पेरली येथे सुखाच्या भोवती
केवढी हाडे इथे नरकात पोटे जाळती
बापडे मश्गूल आम्ही येथ भरण्या बोकणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

'उडवतो गाड्या जराशा काय या अमुच्या चुका?
चोचले पुरवू जिभेचे भागवू अमुच्या भुका
काच खाली घेउनी देतो गरीबाला चणे'
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

वस्त्र लज्जा झाकण्या पुरते कुणा ना सापडे
मोजुनी पैसे हजारो होत कोणी नागडे
फाडती कपडे नव्याने 'ते जुने होते' म्हणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

एकही आवाज येईना जरी मी बोललो
आग पेटवण्या कधी ठिणगी इथे मी जाहलो
विझवुनी तिजला दिले हाती जुनेसे तुणतुणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

--------- आदित्य देवधर

Monday, August 30, 2010

पाउस येता....

येता पाउस दाटुनी तममयी आभाळ हो जाहिले 
मृद्गंधी दव न्हाउनी कवडसे क्षितिजावरी पाहिले
धारा कोसळूनी उडे चहुकडे आनंद हृदयातुनी
शालू नेसून गार गार हिरवा धरती सुखाने डुले

ओला चिंब झरा पडे उसळुनी खाली प्रपातातुनी
मोत्यांची बरसात झेलून कुणी नाचे तुषारांतुनी 
थेंबांच्या जणु आरशातुन बघे रंगीत नवसुंदरा 
नवलाई डवरून अंगावरी तेजाळ कांती फुले

गारा वेचुन डोलुनी मयुर हा शोभे विहंगाग्रणी 
वाटा काढुन धावती शतमुखी फेसाळ सा-याजणी 
नाजुक नाजुक पान पान थिरके वा-यास बोलावुनी
रत्नांचे कित्येक घड इथे लडिवाळ रेंगाळले 

धारांचा रचुनी सुरेल मुखडा मल्हार आरंभिला 
अस्मानी धून जादुई मदभरी छेडून नभ डोलला 
ताना घेउन वीज कडकडकडे थाटात षड्जावरी
टाळ्या वाजवुनी नभी गडगडे कुंभात जल सोहळे 

डोंगरवट कुरवाळती घन-धुके होई प्रभा धूसरी 
गालीचा मऊ रेशमी पसरला वाटे जणू भूवरी 
पडदा ओढुन थंडिचा लपतसे यौवन हिरवे निळे 
करती किलबिल पाखरे सभवती आनंदरस ओघळे

--------- आदित्य देवधर 

Wednesday, August 18, 2010

पानिपत

     
       विश्वास पाटील यांचं 'पानिपत' वाचलं. त्यावर काही लिहिल्याशिवाय रहावत नाही. कायमचा लागलेला डाग, सततची बोच, गेलेला विश्वास, झालेली हानी..!!! सगळं काही परत न मिळवता येण्यासारखं. पानिपत जनमानसात एवढं कोरलं गेलंय की पानिपत आणि  'वाताहात', 'दाणादाण' वगैरे शब्द समानार्थी वाटायला लागतात. 'पानिपत झालं' एवढ्यातच काय ते कळुन चुकतं. एखादी घटना, स्थळ एवढं रुजावं की वाक्प्रचारासारखं वापरलं जावं, ही काही साधी गोष्ट नव्हे. पानिपतला सदाशिवराव  काय एका महिन्यात हरले नाहीत, ती बरीच मोठी 'पुण्याई' होती. रघुनाथराव अटकेहून परतल्यानंतर पेशव्यांच्या दशा काही चांगल्या नसाव्यात. जरीपटका अटकेपार लहरून आला पण त्याने मिळालं काय तर कर्ज आणि अंतर्गत दुही. पराक्रम झाला खरा पण त्याचं सत्तेत रूपांतर झालं नाही. एवढा मोठा इतिहास घडवताना पेशवे राजनैतिक महत्वाकांक्षा दाखवण्यात कमी पडले, असं मला वाटतं. दिल्ली काबीज केल्यानंतर बाद्शाहापादाची सूत्रे हाती घ्यायच्या ऐवजी आम्हाला त्यांचे रक्षणकर्ते होण्यातच धन्यता वाटली. पानिपताची कारणे आणि परिणाम हा आपल्यासारख्यांसाठी एक धडा आहे. गेल्या कित्येक पिढ्या लोकं डोळ्यांच्या कडा ओलावून पानिपत सांगत आहेत, ऐकत आहेत. पानिपताचे  परिणाम आपण अजूनही भोगत आहोत . खरं तर या पराभवातून खूप शिकण्यासारखं आहे. किती शिकलो माहित नाही. काही कारणं, ज्याला घोडचुका म्हणता येईल, अशी काही नमूद करण्याचा माझ्या परीने केलेला प्रयत्न. 
         पानिपताच्या आधीच दिल्ली मराठ्यांच्या पायाशी लोळण घेत होती. तिथला बादशाहा फक्त बाद होणं बाकी होता. त्यावेळीच मीरबक्ष  नजीब आणि तमाम सुभेदारांना देहदंड करून किंवा मांडलिक होऊन राहण्याची आज्ञा करण्या ऐवजी मराठे तहास तयार झाले. मिळालेला मामुली मान, तूट भरून काढता येईल इतपतच खजिना आणि फुटकळ किताब आणि सुभेदारी याच्या मोहापायी त्या धूर्त नजीबाशी केलेला तह हा कुठल्याच राजकारणी मुत्सद्द्यास शोभणारा डावपेच नव्हता. त्याचवेळी रघुनाथरावांनी बादाशाहापादाची सूत्रे हाती घेउन तो नेहमी छत्रपतींच्या सेवेत राहील अशी हमी किंवा तरतूद केली असती तर काय बिशाद होती त्या पठाणांची की त्यांने हिंदुस्थान च्या दौलतीकडे डोळे वर करून बघावं! शिवाजी महाराजांची १०० वर्षांपूर्वीची ----' अटक ते कटक आणि काश्मीर ते सिंहल प्रांतापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा '--- त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवली असती तर पेशवा फक्त पुणेरी उरला नसता तर हिंदवी झाला असता. हिंदुस्थानातील रहिवाशांचच या पवित्र भूमीवर राज्य उदयाला येताना दिसलं असतं.
        सगळं शौर्य, पराक्रम एका बाजूला आणि अंतर्गत कलह एका, अशा तराजूत कलहाचं पारडं जड झालेलच बघायला मिळेल. मराठ्यांच्या बाबतीत तर जास्तच. शिवाजी महाराजांनीही हे खूप भोगलं. तत्कालीन राजघराणी आणि सरदारांमध्ये असे बरेच कलह होते. हेवेदावे होते. त्यातूनच सुरु झालेल्या राजकारणी खेळ्यानी घात करायचा तो केलाच. पानिपत याला अपवाद नाही. अहो, आमचा शत्रू निदान धर्माच्या नावाखाली एकत्र येतो हो..!! आम्ही तर भाषा, प्रांत, धर्म या सगळ्याबाबतीत एकच  होतो. पण तरी निरनिराळ्या कारणांसाठी एकमेकांवर खार खात राहिलो. जात-पात, वर्ण भेद वारसा हक्क, सुभेदारी अशा नाना भांडणांनी मराठयांची भक्कम तटबंदी वेळोवेळी खिळखिळी केली आहे. त्यासाठी कुठली मुलुख-मैदान लागली नाही. इतर सरदारांपेक्षा आपलं महत्व जास्त असावं म्हणून काय काय कारस्थानं केली असतील! किती जीव अशा चढाओढी मुळे खर्ची पडले असतील!! होळकर जर वेळीच शिंद्यांच्या मदतीला गेले असते तर दत्ताजी सारखा मोहरा मराठ्यांना गमवावा लागला नसता.
        नजीबाने मराठ्यांची तत्कालीन राजनैतिक परिस्थिती योग्य ओळखली होती. थोरल्या बाजीरावांबरोबरीने घोडी उधळलेली सरदार मंडळी आता जुनी झाली आली होती. सैन्याचे लगाम आता नव्या दमाच्या रक्ताच्या हातात होते. अर्थात या बुजुर्ग मंडळींचे केस जरी पांढरे झाले असले तरी तरी तलवारीची रक्ताची तहान मात्र तशीच होती. परंतु वाटाघाटी आणि डावपेचातलं महत्व मात्र कमी झालं होतं. हे नेमकं हेरून नजीबानं मल्हारबाबांकडे आश्रय घेतला. अर्थात मल्हारराव त्याला सामील नव्हते. परंतु जिथे मुळात ज्याला ठेचायला हवा होता, त्याला दूध पाजणं चाललं होतं. इकडे मराठे नजीबाला धरण्यास राती जाळत होते, आणि नजीब मल्हाररावांबरोबर त्यांच्याच डे-यात भीक मागायचं नाटक खेळत होता. जर मल्हारराव त्याचे डाव हेरून त्याला जेरबंद करण्यात यशस्वी झाले असते, तर पुढचा इतिहास वेगळा झाला असता.
       अब्दाली दिल्ली जिंकायला परत येणार हे कळल्यावर रघुनाथ राव स्वत: उत्तरेकडे निघावायास हवे होते. पण तिथेही भाऊबंदकी नडली. तुलनेने कमी चढाया केलेले सदाशिवराव आणि कोवळा विश्वास यांच्यावर एवढी मोठी मोहीम सोडून रघुनाथराव पुण्यात गाद्या गरम करत बसले. एवढा शूर माणूस पण बायकोचा धूर्तपणा आणि सखाराम बापूंच्या लबाड पणामुळे त्यांनी तलवार म्यानात घातली. तीच जर पानिपतात तळपती, तर पानिपत पठाणांचे झाले असते आपले नाही. कर्तृत्व   युद्धात असो किंवा राजकीय कारभारात असो, मोल कमीजास्त याने ठरत नसतं. पण कारभा-यांनी युद्धात हिशेब मांडणं किंवा शूर सेनापतीने दप्तरीत जमाखर्चाचा ताळमेळ घालणं याला कुठला न्याय समजावा?
       सदाशिवराव मोठ्या फौजफाट्यासह उत्तरेच्या मोहिमेवर निघाले. फक्त फौज नाही तर निम्मं पुणं घेऊन निघाले. बाया-बायका, त्यांचे दास दासी व नातेवाईक , यात्रेकरू, ब्राह्मण, कितीतरी भाट आणि हुजरे असे कितीतरी. एवढा लवाजमा घेऊन जायची गरज ती काय. यांच्या सुरक्षेविषयी थोडाही विचार डोक्यात  आला नाही?. जरी 'खाशा' नी हट्ट केला तरी योग्य-अयोग्य उमजून पावलं उचलायला नको होती का पेशव्यांनी? राज्य चालवायला शिरावर घेतलेली जबाबदारी अशा हट्टापायी विसरायची? यामुळे झालं असं की आपला पडाव योजनेच्या मानानं दोन दोन महिने उशिरा पडायला लागला. चार महिन्यांची मोहीम ८-९ महिने लांबली. हा वाढलेला खर्च कुठून भरून काढणार होते? लुटून? तेच करावं लागलं शेवटी. मूळ उद्देश बाजूला ठेउन लूट करायाला गेलो आहोत आम्ही असा झालं. चुकलंच पेशव्यांचं!
       जर सदाशिवराव आणि तमाम दिग्गज आपलं हेर खातं चोख राखते, तर कदाचित युद्ध पानिपतात झालंच नसतं. दिल्लीजवळ अब्दाली यांच्या पापण्यां खालून अलगद आपलं सैन्य घेऊन अलीकडे येतो आणि आम्हाला काळातच नाही. कळतं ते समोर आल्यावरच! शिवाजी महाराजांनी ज्या हेर खात्यामुळे कित्येक कठीण प्रसंगी बाजी मारली आहे,शत्रूला हातावर तुरी दिली आहे ते खातेच मुळी नव्हते इथे! ऐनवेळी समोर आलेला शत्रू पाहून देखील एक वेळ अशी होती की आपण जिंकलो असतो पण नियतीला हे मंजूर नव्हतं. तिथेही आपण आपल्याच लोकाना नीचा दाखवायला गेलो आणि घात झाला. इब्राहीम गार्दीच्या तोफा अब्दालीची अक्षरश: चाळण उड़वत होत्या. पण गार्द्याला मदत करण्याऐवजी आपले काही शहाणे सरदार मधेच उभे ठाकले. शत्रु कोण अणि मित्र कोण अशी परिस्थिती असताना मित्रच शत्रु म्हणून समोर आला. तोफा शांत करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे अब्दालीने डाव साधला. त्याच्या तोफा धडाडल्या आणि अवघ्या काही घटिकात मराठ्यांना  पळता भुई थोड़ी  केली. पठाणांनी झाडून सगळ्यांना कापला(जे पळून आले त्यांचा अपवाद सोडून). हिरवे झेंडे फडकवून, भाल्याच्या टोकावर मुंडकी नाचवून हिंसेचा नंगा नाच केला पठाणांनी. कोणालाही सोडलं नाही. नाव, पैसा, वेळ, ताकद, मुलूख सगळं धुळीत मिळालं. पुणं तेव्हा खूप भेसूर रडलं असेल.एक एक किंकाळी घराघरातून घुमली असेल. एक एक वीट हादरली असेल.
          एवढं सगळं होउनही आपण यातून शिकत नाही. राजकारणी सोडा हो पण अगदी तुमच्या आमच्या सारखी सामान्य लोकंही पुन्हा पुन्हां त्याच चुका करतो आहोत. वर दिलेली आणि अशी अजूनही कारणं असतील यामागे. मी केवळ एक पुस्तक वाचून केलेला हा उहापोह कोणाला चुकीचा वाटू शकतो. याला इतर आयामही असू शकतात. पण ही  कारणं  मात्र चुकीची नाहीत. आणि ती समजून आणि सुधारून आपण अजूनही काही घरगुती, कौटुंबिक, सामाजिक पानिपतं टाळू शकतो असं  मला वाटतं.



(कोणास काही गैर वाटल्यास दिलगीर आहे. तपशील चुकीचा असल्यास जरूर कळवावे.)

------आदित्य देवधर

Thursday, August 12, 2010

निराशा

आटला आहे किनारा आटली हर एक आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा
 
बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा
 
सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा
 
खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'
 
दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
 
-----आदित्य देवधर

Tuesday, July 20, 2010

आहुती

हसली शलाका आभाळ भरून
वारं  गार गार  परते फिरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

तहान थिजून अडके घशात
थंडगार चूल घरात घरात
नजर भकास आसवे गिळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

उपाशीच श्वास उपाशी कपास
कोरडा कोरडा उपाशी प्रवास
उपाशी धरती रडते बघून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

फुलातून मध मिळेना चाखाया
पानेही लागली मरून पडाया
झाड झाड उभे गळून गळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

पाखरं किंकाळी फोडून रडती
दिशा स्तब्ध सा-या हेलावून जाती
ढगासही वाटे फुटावे वरून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

माय माझी माती अताशा थकली
भूक अनावर होउन फाटली
दिसे कलेवर भेगाभेगातून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

आहुती यज्ञात माणसांची माझ्या
अभिषेक केला आसवांनी माझ्या
वणवा बळींचा पाहतो तुटून
थकलेलं पाणी डोळ्यांत भरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

-------- आदित्य देवधर

Friday, June 25, 2010

तिचं हसणं.....

तिचं हसणं, तिचं रूसणं...
सारं सारं आठवतय
मन झुरणं, खळीत रुतणं...
अजूनही सावरतय

तिचं असणं , मला पुसणं
स्मृतींमधून  वावरतय
केस उडणं,  ते  सावरणं
डोळ्यांपुढून झरझरतय

तिचं वळणं, तिचं बघणं
श्वासांनाही  दमवतय
तिचं बोलणं, तिचं ऐकणं
दु:खालाही शमवतय

तिचं लाजणं, तिचं झुरणं
हृदयाला जे  सुखवतय..
तिचं नसणं, मुके रडणं
एकेक ठोका चुकवतय

----- आदित्य देवधर 

Wednesday, June 23, 2010

तिजोरी

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला भिकारी

करा साजरे सोहळे प्राक्तनाचे
दिवे लावतो घेउनी मी उधारी

तशी मोजकी आसवे 'एकटया' ची
उशाशी सकाळी मुकी वाटणारी

ज़रा चाखली वर्तमानात आशा
कळे ना कधी भूत झाले विषारी

अजूनी दिवा लावतो सांजवेळी
अजूनी उभा वाट पाहीत दारी 

तुझे नाव गेले झिजूनी अताशा
स्मृतीही तुझ्या आज झाल्या फरारी

------आदित्य देवधर

Wednesday, June 16, 2010

आवाज आसवांचा

हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

दुष्काळ दाटलेला आनंद आटवोनी
डोळ्यांस पूर आला का आज आसवांचा?

डोळ्यात कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

----आदित्य देवधर 

Thursday, June 3, 2010

कोडे

आयुष्याचे कोडे कधीच सुटले नाही
उत्तर या प्रश्नाचे कधीच सुचले नाही

झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही

कागद कागद ओला करतच गेली शाई 
अर्थालाही कसले कारण उरले नाही

कोणी आले नाही निरोप देण्या मजला 
मी गेल्यावर मागे कुणीच झुरले नाही

कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आभाळाचे  पाणी  कुठेच  मुरले  नाही

वाटेवरती माझ्या तुझी नजर उलगडली
(ओठावरती गाणे उगीच फुटले नाही!!)

-------आदित्य देवधर

Wednesday, June 2, 2010

ललकारी

घेऊन आन विसरून भान म-हाट शान दे झणी आज ललकारी
घुसळून रान बेधुंद जान उन्मत्त खान, कापुदे मर्द तरवारी
दे झणी आज ललकारी

पाषाण अंग म-हाट ढंग वादळी संग घेऊन निघाली छाती
तेजाळ रंग बांधून चंग आतंक भंग होउदे मुक्त ही माती
ओकून आग मिटवून डाग कामास लाग झाडून सोड लाचारी
दे झणी आज ललकारी

रक्ताळ वाट रान घनदाट स्वातंत्र्य घाट बांधून आज येथे 
सरदार थाट इथे सम्राट माय मरहाट नांदून आज येथे
येउदे पूर पालटे नूर गर्जुदे सूर जयघोष हाच दरबारी
दे झणी आज ललकारी

-------आदित्य देवधर 

Wednesday, May 26, 2010

भावना

           भावनांना भाषेच्या, रंगाच्या मर्यादा नसतात. ते तर केवळ एक माध्यम आहे. पण मनातलं सांगायला काही canvas  नको का? कोणाचा चेहरा तर कोणाची शाई, कोणाचे रंग तर कोणाचे सूर.. असे या भावनांना अडकू देत नाहीत. त्या किना-यावर येउन उसळतातच. त्यांचे तुषार मग अशी काही गुंफण करतात की त्यांचा शिडकावा रखरखीत दगडांवर  ओलावा आणि मार्दव निर्माण करतो. इतका की कधीकधी हे कठीण कण स्वत:चे अस्तित्व विसरून या सागरात मिसळून जातात. या भावसागरात. ते आता स्वत: भावनांच्या हिंदोळ्यावर झुलून मुक्त आनंद घेत जातात. असाच एक कण, भारलेला पुन्हा परत येतो. त्याला आता त्याचा canvas  मिळाला असतो. किनारी अंकुरणारी हर एक पालवी, हर एक आकृती त्याला प्रेरणा देते. कोण अडवणार त्याला..!!!
            ही भावनांची लाट  झिंग आणणारी आहे. या लाटेवर थोडं खेळायला हवं. स्वत: ला विसरायला हवं. शब्द ,सूर आपोआप सुचत जातील. रंग आपोआप आकार घेतील. एका तरी भावनेला canvas मिळेल!!


-------आदित्य देवधर 

जगायचे..मरायचे

जगायचे आहे तरी रोज थोड़े मरायचे
मरायचे आहे तरी आज थोड़े जगायचे

कुणीच कोणाच्या व्यथेला उराशी न लावते 
स्वत:च ही आभूषणे लेउनी मिरवायचे

शहारलेल्या नील धारा किनारी खुणावती
दुरून ओंजळीतुनी मृगजळी बुडायचे

अजून आभाळातली चांदणी दूर भासते
अजून काळोखातुनी अंतरंगी जळायाचे

चितेत ओली लाकडे देह जाळीत शेवटी 
मरायचे एकाक्षणी मातीतुनी उरायचे

-------  आदित्य देवधर

तेरे नज़ारे की

हमें उम्मीद न थी तेरे नज़ारे की
क़यामत दीवानी थी तेरे नज़ारे की

गुजरा करे गलीसे तेरी ए हुस्न वाले
बुझा दो प्यास हमारी तेरे नज़ारे की

बेताब दिल की जुबाँ कैसे बयाँ करू मैं
एक झलक तो पिला दो तेरे नज़ारे की

एक बार मुस्कुराके देखो ज़रा इधर भी 
गीली हसीं बरसा दो  तेरे नज़ारे की

लो चले हम उठकर दुनियासे तुम्हारी
तमन्ना बंद आँखों में तेरे नज़ारे की

पाँव मेरे लडखडाये कभी राह चलते
यादे मिली पुरानी तेरे नज़ारे की

------आदित्य

सावलीचे सोहळे

मेघ काळे लाघवी प्रिये दाटले केसात तुझ्या
हे कुणाचे दूत बावरे धावले केसात तुझ्या

संधिकाळी साठतो नभी रोज चाफ्याचा चुरा
फूल होते पीतवर्णी माळले केसात तुझ्या

दाट आभाळातुनी असे होतसे थेंबास कधी
वाहुनी एकदा जसे नांदले केसात तुझ्या
 
शुद्ध ना गे राहते मला पांघरोनी केस तुझे
रेशमाचे स्पर्श कोवळे लाभले केसात तुझ्या

दाटता अंधार हा कधी दूर ना व्हावा मुळी 
या तमाच्या सावलीचे सोहळे केसात तुझ्या

------आदित्य देवधर

Monday, May 24, 2010

चंद्र झालो

मी वाट चांदण्याची शोधीत चंद्र झालो
माझ्या कलाकलांना सजवीत चंद्र झालो

कल्याण आळवीती ओल्या मधाळ राती
गंधार भाववेडा ऐकीत चंद्र झालो

खाणाखुणा तमाच्या शोधून सांगताना 
शुक्रास मी ललाटी भाळीत चंद्र झालो

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या 
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र झालो

होता सभोवताली बेधुंद रोषणाई 
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र झालो 

रातीस पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत चंद्र झालो

-------आदित्य देवधर

Friday, May 21, 2010

वाट पाहे दारावरी

गोठुनी व्यापे निराशेची हवा दारावरी  
वाट पाहे सांजवेळी पारवा दारावरी

सैल होता आठवांची गुंफलेली मालती 
गीत गाता थांबतो गे मारवा दारावरी 

हीच का ती वाट होती हीच का माझी कथा 
हीच का ती सांडणारी चांदवा दारावरी 

पेटला वैशाख येथे पेटवोनी प्राक्तना
कोठुनी आणू सुखाचा गारवा दारावरी

तेज ओले होत जाता निर्बली झाली धुनी
प्राण ताजे फुंकणारा बोलवा दारावरी

वाट पाहे जीव माझा कैक वर्षांपासुनी
येउनी गेला कुणाचा कारवा दारावरी?

------आदित्य देवधर

Wednesday, March 31, 2010

आई

मायेचा परमेश्वर तू, वात्सल्याचा वसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

दैवी अमृताचा तू पान्हा मजला दिला
संस्कारगंध माझ्या श्वासात आरोहिला
परतोनी माय देऊ गंधास आता कसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

हाक कानी पहिली तुझीच ऐकू आली
दृष्टीस माझ्या, आई, तुझीच मूर्ती आली
शब्दास लाभला तुझिया, गंधर्वाचा ठसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

अंगणात अडखळताना आधार तुझा होता
भूक लागता मजला पहिला घास तुझा होता
डोळ्यात आनंदाचा गंगौघ दाटला जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

पिलास चिमण्या देशी तू ढगाएवढी माया
पंखाखाली घेशी माझी इवली इवली काया
थोपटताना पाठीवरला  हात राहुदे असा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

आशीर्वाद पाठी मजला तुझा सर्वदा मिळे 
पूत अंजनीचा जावोनी मग सूर्यालाही गिळे
तुझ्याच चरणी अर्पण माझ्या कर्तृत्वाचा पसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

तुझी घडावी सेवा आई भाग्य लाभुदे मला
कोटि कोटि उपकार तुझे, वंदन माते  तुला
निरपेक्ष तू, निस्वार्थ तू, कर्मयोगी जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

-------- आदित्य देवधर

Friday, March 26, 2010

गाणे

मज ठाऊक आहे तुझ्या मनीचे ओले भिजलेले गाणे
रुसवे फुगवे लाख लाख परी मृदुल तराणे गाणे
हृदयामधुनी ओठांवरती अलगद अल्लड गाणे
नाजुक तारा शोधुनी परी छेड़े लोभस  गाणे
शब्द शोधती क्षितिजाच्याही पलीकडले मधु गाणे
गाता गाता मंजुळ सुस्वर गाती तुझेच गाणे

अंगावरती फुललेल्या मोरपिसाचे गाणे
चंद्रावरती भुललेल्या नक्षत्राचे गाणे
कमलावरती थिजलेल्या थेंबाचेही गाणे
फूल चुम्बुनी भ्रमराच्या प्रेमाचेही गाणे
मेघ बरसुनी धरतीवरती वर्षाकाळी गाणे
ताल धरुनी पानांवरती ओघळणारे गाणे
जीव भरुनी दगडांमधुनी पाझरणारे गाणे
निळ्या जांभळ्या प्रतलावरती हिरवळणारे गाणे

हे गाणे तू गाऊन जा, स्वर हृदयी बरसून जा

-------आदित्य देवधर 

पाहते

पाहते तुज पाहते लाजते मी लाजते
भावगंधित होउनी भाळते मी भाळते

मोहरून शहारती अंगअंगीची पिसे
काननी मयुरासवे नाचते मी नाचते

फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी हासते

चंद्रकोर उजाडुनी रात ना जावो कधी
कोवळ्या किरणांतुनी भारते मी भारते

बासरी कुठुनी बरे सूर छेडी लाघवी
कुंद धुंद सुरावरी डोलते हिंडोलते

सागरावर लाट येता मनासी वाटते
अर्पुनी अवघे स्वत: वाहते मी वाहते

सांजवेळ किनारली, कृष्णवेडी सावली
दीप मी चरणी तुझ्या लावते, ओवाळते

अंतरी नयनातुनी पाहिले रे मी तुला
राजसा तव मीलना, धावते मी धावते

-------- आदित्य देवधर

Tuesday, March 23, 2010

ताटातूट

बोलावयास माझ्यापाशी कुणीच नाही
मी हाक मारलेली, आले कुणीच नाही 

गाण्यात भावनांची दाटी तुडुम्ब झाली
बाजार संगिताचा येथे उगीच नाही

कुंथून गावयाच्या झाल्या फुशारक्याही
अर्थास दाद देण्या दर्दी कुणीच नाही

झाकून पाहिले मी, हासून पाहिले मी
डोळ्यांस आसवांची ताटातुटीच नाही

देवास वाटलेले थोड़े समोर यावे
भक्तात दर्शनाची दृष्टी मुळीच नाही

------- आदित्य देवधर

जाऊ नको

विझवून रात माझी, तू आज जाऊ नको
भरतीस लाट येता , आटून जाऊ नको

नुकतेच चंदनाने मी आज गंधाळले
नुसताच एकट्याने चंद्रात न्हाऊ नको

कसली शराब मजला, डोळ्यातुनी मिळाली
असल्या नशेत धुंदी होण्या सराऊ नको

अजुनी न वेळ गेली, रातीस चाखण्याची
अंधार जागवूनी  तू दूर राहू नको

असले कसे तुझे रे प्रेमास लाजावणे
निरपेक्ष जोगियाच्या गीतास गाऊ नको

तुजला कळे न माझे होणे परीसापरी
मधुस्पर्श मीलनाचा सोडून जाऊ नको

--------- आदित्य देवधर

Monday, March 22, 2010

गर्दी

प्रेमात भावनांची गर्दी उगीच झाली
नशिबातली कहाणी आता खरीच झाली

बागेतली गुलाबी झाडे मलूल झाली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

आव्हान देत होतो दररोज वेदनांना
जखमा उगाळण्याची चर्चा बरीच झाली

स्वप्नांत जाळण्याला दिधल्या कितीक राती
झोपेत जागण्याची बुद्धी उगीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली

मी पाहिला दिखावा खोटाच भोवताली
अंगात लक्तरांची मारे जरीच झाली!

---------- आदित्य देवधर

Friday, March 19, 2010

साक्ष

गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

हात हाती घेतलेला
मी असा घामेजलेला
तू करारी  पाहुनी मी
धीर मोठा वेचलेला
तू दिलासाही दिलेला
श्वासही धीरावलेला
हे निघालो दोन प्रेमी
सोडुनी नाती निकामी
साथिला होताच सारा
भोवताली धावणारा
.......गार वारा बोचणारा

वेग होता या मनाचा
चांदण्याला गाठण्याचा
सावल्यांची खूण होती
वेळ ही नव्हता क्षणाचा
मी निघालो वायुवेगे
भारलेली प्रीत रंगे
धूळकाटया सोबतीला
रातिचा काळोख संगे
बेत होते कोण जाणे
ठार वेडे की शहाणे
साक्ष देई दूर तारा
चांदण्याचा ही इशारा
.......गार वारा बोचणारा

हाय जेव्हा झोक गेला
काळ सामोरीच आला
मी मनाशी ठाम होतो
एकट्याने वार केला
देवही खोटे निघाले
दैत्य सारे एक झाले
घेउनी गेले तिला ते
रक्त माझे क्षुब्ध  झाले
पाठलागी लागलो मी
धावलो मागे तया मी
घेउनी तिजला निघालो
आड़ वाटा शोधुनी मी
संकटांची फौज मागे
धावताना ठेच लागे
तेथ होता मार्ग एकच
घेतल्या शपथांस  जागे
दोन प्रेमी पाखरे ती
धावुनी टोकास जाती
देउनी आलिंगना ते
सोडुनी देहास देती
शेवटी एकत्र आले
प्राण-देही एक झाले
मिसळले मातीतुने ते
श्वासही तेथे निमाले

घोर तेथे लावणारा
साक्ष सारी वेचणारा
दोन थेंबे सांडताना
गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

-------------- आदित्य देवधर

Thursday, March 18, 2010

एवढेचि मागणे

दे अम्हाला दान देवा एवढेचि सांगणे
ज्ञान शक्ती दे विवेकी, एवढेचि मागणे

काळ रात्री पाचवीला आमुच्याचि पूजिल्या
सूर्य येथे मज दिसावा एवढेचि मागणे

पोट झाले पापभीरू, सांगतात आतडी
जेवण्यासी घास द्यावा एवढेचि मागणे

माजले आहेत येथे मंदिरात भामटे  
बाहु माझे सळसळूदे एवढेचि मागणे

सूर आले माझिया दारी कसे नभातले
ते गळी राहो भरोनी एवढेचि मागणे

माझिया देहास लाभो भाग्य दीपकापरी
प्राण राहो वा न राहो एवढेचि मागणे

------- आदित्य देवधर 

करणार आहे

आज श्वास मी मोकळा भरणार आहे    
मुक्त वाट डोळ्यांतुनी करणार आहे

मागची  लढाई जरी बिनधास्त होती
आज मी  युद्धाचा बळी ठरणार आहे

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

तांबड़े  रक्त वाहिले धरित्रीस मागे
रंग तोच  मातीतुनी उरणार आहे

काळ होत मी बांधुनी कफनी ललाटी
आग ओकुनी  वादळी  उठणार आहे

कायदा जरी बाटला  मगरूर हाती,
न्याय तोच जो मी दिला असणार आहे

एवढ्यात का हो तुम्ही केली चढ़ाई?
एकटाच भारी रणी ठरणार आहे

------- आदित्य देवधर

Friday, March 12, 2010

खादाड पंगत

खाउनिया गोड | साखरेची जोड |
चरण्याची खोड | लागलेली  ||

पंगतीचे पान | भरोनिया छान |
विसरून भान | खाऊ लागे ||

पानाचिये पुढे  | तुटोनिया पड़े  |
वाढप्यांची उड़े | तारांबळ ||

जेवताना श्लोक | म्हणण्याचा षोक |
पुण्यवंत लोक  | राखतात ||

आग्रहाचा घास | भरवाया ख़ास |
बायकोचे पास | जाऊ लागी ||

बायकोने घ्यावं | नव-याचे नाव  |
लाजण्याचा आव | आणोनिया ||

पैजेचाही खेळ | कितीतरी वेळ |
हिशेबाचा मेळ | घालितासे ||

संपता पंगत | तोंड ही रंगत |
खादाड संगत | आजूबाजू ||

पडावे निवांत | दुपारी एकांत |
घोरोनिया प्रांत | हादरावा ||

पुढच्या सणात | कोंणाच्या कशात |
चर्चा ही घरात | चालू राही ||

भूक भागावी | इतकेचि खावे |
म्हणतात सारे | संतजन ||

म्हणोनि  अभंग |  भरोनिया रंग |
खादाडांसी दंग | चला करू ||

------- आदित्य देवधर

व्हायचे ते

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?

आज आले जरी अवसान हाती
पार नेण्या तुला पुरले कधी का? 

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?

धूमकेतू झणी स्फुरता ,  करंटे
आडवाया तया धजले कधी का

हस्तरेषा ख-या पुसल्या कुणीही
व्हायचे ते जगी चुकते कधी का?

 ---------- आदित्य देवधर

Sunday, March 7, 2010

कधीच ... नाही !!

देवाच्याही मदतीला कधीच गेलो नाही
जळलोही पण पुरता कधीच मेलो नाही

मज होते फुटलेले पंख नवे, उडण्याचे
परवाने मिळवाया कधीच गेलो नाही

प्रेमाचा अश्रू ओला डबडबलेला हाती
मिटून घेण्यासाठी कधीच गेलो नाही

गरजांना उघडे माझे दार तिजोरीचे
गरजूंचा हिशोब करण्या कधीच गेलो नाही

अभिमन्यूसम मी निधडा पडलो धारातीर्थी
भीक मागण्या पायी कधीच झुकलो नाही

अंगावरच्या ताज्या युद्धाच्या जखमा माझ्या
मिरवून विकण्यासाठी कधीच गेलो नाही

-------- आदित्य देवधर

उष्टे

महालातुनी भोगलेले
सूर उष्टे झोंबले
मुक्यानेच देती शिव्या
दरिद्री खुराडयातले

फितूरी अशी का जाहली
माझ्याच आसवांची
विझविती चितेस अश्रू
माझ्याच डोळ्यातले  

करायास चैनी लांडगे
मोकाट भोवताली
मला टाकती उष्टे, शिळे
यांच्याच ताटातले  

कधी लाभला पूर
मनसोक्त भोगावया
कधी मजवरी थुंकले
पंडिती थाटातले

यांचाच रंग येतो
देवा तुझ्या राऊळी
जरी गाळले येथे
मी तांबडे रक्तातले

----- आदित्य देवधर

सांग तुला मी काय म्हणू

म्हणेल कोंणी तुला अप्सरा
गगनाची तारका जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू

लाल चुटुकसे ओठ तुझे
गुलाबास लाजवील असे
दोन पाकळ्या भिजलेल्या
तीवर नाजुक थेंब दिसे
दाखवुनी वाकुल्या मला
ओठांना लागले म्हणू
"रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू "

न्हाउनी उजेडात कुंतल
सोनेरी निर्झरी दिसे
लबाड वारा संधीसाधू
उधळे स्पर्शभरित पिसे
कानामधला झुमकाही मग
वाजू लागे रुणूझुणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


हास्य तुझे मोहक लोभस
भान हरपुनी न्हात बुडावे
नजरेमधुनी खट्याळ खोडी
करताना तू मनी वसावे
तुझ्या अनोख्या अंदाजाने
शहारले मम अणू अणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


नक्षत्रांची सखी म्हणू की
खळखळणारी नदी म्हणू
लसलसणारी कळी  कोवळी
की पुनवेची परी म्हणू
नभी साजिरा चमचमणारा
शुक्र लाजला तुला जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


--------आदित्य देवधर

Wednesday, March 3, 2010

मिटोनिया पापण्या

दुपारची शांतता काय सांगते बरे
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

रुसेल का पाहुनी टीम लीड चावरा
बगांस मी झेलुनी रोज काम आवरे 

समोरचा लैपटॉप नको आज वाटतो
फितूर या पापण्या आज काम फार रे

कसाबसा संपला कोड रिव्ह्यू आजचा 
उठोनिया पेंगुनी मी मलाच सावरे

लगाम मी घातला घोरण्यास चोरटा
नको नको सांगती श्वास होत घाबरे  

कधीतरी येत जाग डोकवून आतुनी
इथेतिथे पाहती लपून नयन  बावरे

भिऊ नको तू उगा कोण काय बोलती
जळोनिया आतुनी हे तुझे कलीग रे

करोनिया बाजुला डॉक्यूमेंट फालतू
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

जमावया लागता  झोप डोळीयांवरी
झुकोनिया डेस्कवरी  मस्त झोपतो बरे  

 -------- आदित्य देवधर

Tuesday, February 23, 2010

स्वामीसाधन

        एका कॉलेजातून एक कोर्स चालवला जातो. शिस्तीत डिग्री मिळते. 'बी. ए. इन स्वामीसाधन' अशा नावाची.गेल्या तीन वर्षां पासून इथे मुलींसाठी देखील कोर्स सुरु केलाय. त्यानांही हल्ली फार डिमांड आहे. इथे प्रत्येक जण स्वत:ला हवी ती पदवी घेऊ शकतो. सांगायचंच   झालं तर बाबा, बुवा, बापू, बाई, आई, ताई यांपैकी काहीही. दरवर्षी एखाद्या क्रिएटिव्ह पदवीला बक्षीसही मिळतं. याची पात्रता म्हणाल तर मात्र  फार अवघड आहे. सायन्स, मानस शास्त्र यांची माहिती पाहिजे. शिकलेलं असायची गरज नाही. फाटके कपडे घालायची सवय, दाढी वाढवणे, रात्री भटकणे, पत्ते, चरस, गांजा, बाटली यांची ओढ़ असल्यास फायदेशीर आहे. Admission सोपी होते हो..!!
        पहिल्या वर्षापासून यांचं Proffessional Training सुरु होतं. गणवेश मिळतो. यात पण choice आहे बरं का ! कोणी पांढरा डगला, तर कोणी काळा, कोणी भगवा सदरा तर कोणी पिवळा कुर्ता. तसंच साड्यांचं. हे रंग 'Major' प्रमाणे ठरतात. इथे दोन शाखा आहेत. एक 'अघोरी' तर एक 'अध्यात्मिक'. तुम्हाला पहिल्या वर्षापासुनच निवडावी लागते. दोन्ही शाखांना सामान स्कोप आहे. अघोरी शाखेला 'लिंबू विज्ञान' शिकवलं जातं तर अध्यात्मिक ला 'गूढ़ शास्त्र' असतं. एका अध्यात्मिक पास आउट चा मी Interview पहायला मिळाला. पहायला म्हणजे काय.. योगायोगानेच! एक भक्त त्याला प्रश्न विचारत होता. ( भक्त आणि तमाम शिष्य गण यांचे मुख्य मार्केट आहे.)
(स्वामी भगवा डगला घालून एका खोलीत गुबगुबीत गादीवर बसले होते. कपाळावर टिकली एवढ कुंकू. गळ्यात उपरणं. उदबत्ती आणि धुपाचा सुळसुळाट..स्पष्ट दिसू नये इतपत. 'ॐ' वाजणारी टेप. खोलीबाहेर गर्दीचा आव. )
भक्त : स्वामी ,  अर्घेश्वराय नम: !!! ( हे या पंथातलं 'Hello' किंवा नमस्कार शी समानार्थी ब्रीद. आणि अर्घेश्वर स्वामी हे यांचे   नामकमल! हा भक्त इतर आणि स्वामी यांना जोड़णारा दुवा आहे. मधली खाबुगिरी आणि लोचटगिरी चांगली जमते यांना )
स्वामी : कल्या SSSSSSSS ण !!!! (आणि मागे घंटेचा आवाज --- back ground music हो ....!!!!)
भक्त :  प्रातर्विधीत काही बाधा तर नाही ना ..!! ( भलते अर्थ काढू नका .... संध्या, पूजा, ध्यान वगैरे म्हणायाचं  आहे !!)
स्वामी : क्षेम आहे (उपकाराचे  भाव . नाहीतर  भाव कसा मिळेल?? )
भक्त : (छताकडे बघून आणि हात उगीच वर नेऊन) अनंत उपकार आहेत !!! (समोर साक्षात् दत्त बसल्याचा भाव.आणि यांच्या प्रातर्विधी मुळे उपकार कसे झाले  कोणास ठाऊक! ) काही गण आले आहेत ( जण च्या ऐवजी चुकून गण आलं बहुतेक तोंडात)
(काहीही न बोलता स्वामी मान डोलावतात. भक्त मागे वळून खेकसतो )
भक्त : दोघांना पाठव रे !!!! ( आत पाठवणारा गुपचुप दोघांना आत पाठवतो. याचा खिसा ही 'गळकी' दक्षिणा पेटी आहे हे लक्षात येतं.)
(दोन जण आत येतात. शिकविल्याप्रमाणे नमो नम: करतात आणि अपराध्यासारखे मान खाली घालून उभे राहतात.)
भक्त :स्वामी गांजले आहेत हे. काही प्रश्न घेउन आले आहेत.
( त्याला 'गंजले' म्हणायाचं असेल . सारखा चुकतोय हा दुवा. ते  दोघं गांजलेले  नक्कीच वाटत नव्हते . सुटलेलं पोट आणि फवारलेले कपडे घालून गांजलेले कमी पण माजलेले जास्त वाटत होते. एकमेकाना ओळख़त नसावेत. स्वामी काहीही न बोलता तोबरा प्राशन करून असतात. मंद स्मित करून मान डोलावतात. भक्त पात्र पुढे करतो. स्वामी त्यात पेंटिंग सुरु करतात.)
प्रश्नार्थी १: बिझनेसमन आहे. पैसा खुप आहे. पण झोप शांत नाही.
स्वामी: (स्मित चालूच आहे) या उपभोगाच्या मायाजालातून  कोण सुटले आहे? मोक्षाचा मार्ग खडतर आहे.
प्रश्नार्थी ला काहीही कळत नाही. तो पुन्हा तोच वाक्य उच्चारतो ' पण झोप येत नाही.'
(डॉक्टर कड़े जायचं सोडून इथे का आलाय हा ......??)
स्वामी: ( पेंटिंग करत ) ध्यान धारणा करा. प्रभूच तुम्हाला मार्ग दाखवेल.
(भक्त तर आडवा पडण्याच्या बेतात आलाय. वाकून वाकून..
( प्रश्नार्थी बहुतेक झोप विकत घ्यायच्या उद्देशाने आला होता. त्याला असलं काहीतरी म्हणजे चेष्टाच वाटली. त्याने परत एक प्रयत्न करून बघितला)
प्रश्नार्थी 1 : जमवलेला पैसा निघून  तर जाणार नाही याची सतत चिंता वाटते. लक्ष्मीचा लहरीपणा तुम्हाला माहितच आहे.
(या वाक्याने स्वामी जरा चपापतात. याला कसं माहीत अस एक प्रश्न चाटून जातो. पुन्हा भानावर येउन स्मित क्रमश: चालू...)
स्वामी: दान करा(मला दया) गरजूंना मदत करा. आश्रमासाठी खर्च करा. कल्याण होइल. चिंता मुक्त होशील. ..!!!
(प्रश्नार्थी भारावून जातो. नमस्कार वगैरे करून पाठ न दाखवता मान वाकवून उलटा चालत जातो . भक्त बाहेर खूण  करून योग्य तो निरोप पोचवतो
आता पाळी दुसरयाची)
प्रश्नार्थी २: स्वामी तुम्ही वेद आणि गीता  वाचलेत का ? मला काही प्रश्न आहेत. तुमचा सल्ला घ्यायला आलोय.
(पहिलाच बॉल बाउंसर. दोन क्षण स्वामी आणि भक्त त्याकडे पहातच बसतात. हा अता याची विकेट  घेणार असं वाटून मीही खुष होतो.)
स्वामी: बोल वत्सा..(नाही म्हणून कुठे जाणार ....)
प्रश्नार्थी २: माणूस मेल्यावर त्याच्यासाठी उदक का सोडतात ?
(यॉर्कर... डायरेक्ट बुंध्यात !)
स्वामी: आत्म्याला शांती मिळावी म्हणून वत्सा...!(अत्तापुरती वाचवली विकेट)
प्रश्नार्थी २: एखाद्या संगमावर पाणी सोडून मेलेल्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? आणि एवढीच इच्छा असेल तर तो जिवंत असताना असं का करत नाहीत?
(स्वामींना घाम फुटतोय. भक्त प्रश्नार्थी कड़े रागाने अणि स्वामींकडे आशेने बघतोय.)
(अर्धा मिनिट कोणीच काही बोलत नाही. स्वामी पाणी मागवतात. पण पीतच  नाहीत. वेळकाढूपणा... दुसरं काय ..?)
प्रश्नार्थी २: गीतेत म्हटल्याप्रमाणे माणूस आपले कर्म करत असतो. ते त्याने केलेच पाहिजे. चालू असलेला जन्म त्याच्या पाप पुण्याचा हिशोब आहे. मग अतिरेकी जे करतायत त्याला काय म्हणायाचं?
(आता भक्तही बेशुद्ध व्हायच्या मार्गावर  आहे. स्वामींचा बहुतेक हा विषय राहिला असावा दोन चारदा. स्वामी विश्रांतीची वेळ झाली म्हणून उठतात आणि पुढची Appointment देतात.)

श्रद्धेचा बाजार झालाय सध्या. आणि या सारख्या स्वामींमुळे खरया साधक लोकांची सुद्धा चेष्टा होतीए. लोकांनी ठरवायाला हवे. अशा तोतया लोकांना किती थारा द्यायचाते.
मी त्या प्रश्नार्थी ला जाऊन भेटलो. तो एक पत्रकार होता. संस्कृत  मधून डिग्री घेतली होती.  आणि आशा बाबा लोकांचे बिंग फोड़ण्याचे एका संस्थेचे काम करत होता. कौतुक वाटले. तोही उत्साहात होता आणि पुढच्या appointment ची नोंद करून निघून गेला. अजुन एका स्वामींकडे!!!

Sunday, February 21, 2010

लढाई

मी लढाई मांडली जेव्हा स्वत:शी
घाव बुद्धीने दिला होता मनाशी

काय होता माज आलेला मतीचा
काय झाला खेळ भांडूनी कुणाशी

आर्जवे केली जरी त्याची हजारो
ठाम होता आज तो अपुल्या मताशी

थोरव्यांनी धीर ही मजला दिलेला
पाठ फिरता शेपटी त्यांची बुडाशी

लाळ गाळी  जात कुत्र्यांची भिकारी
चाटुनी टाचा जमविती आज राशी

दान देताना खिसा माझा रिकामा
भीक घेता फाटली झोळी उपाशी

शेवटी जाता चितेवर प्राण माझे
आसवांची वाट मी पाहे चितेशी

 -----आदित्य देवधर

चंद्रसाक्षी

तुझ्याकडेच पाहुनी निमिष मात्र एकदा
पुन्हा पुन्हा उरातुनी उसळला ग चंद्र हा

कधी न जाणली तुझी मौनबद्ध मालकी
कधीच हा गुलाम तू पूर्ण जिंकला पहा

तुझ्याच आठवांतुनी रोज सांडला सडा
फुलून मोगरा तुझा दरवळेल गंध हा

ललाट रेषीचे तुझे लाल बिंब देखणे
सकाळची उजाडती स्वर्गसुन्दरी तरहा

हळूच डोळीयांतुनी तू भावपूर्ण पाहिले
कसे असेल वाटले समीप येउनी पहा

मुक्त सोडुनी दिली मनातली मी पाखरे
तुझ्याकडेच धावली न सांगता कुणी स्वत:

चंद्रसाक्षी प्रेम हे जपून ठेव साजणे
देह श्वास भारुनी अशीच व्यापुनी रहा

----- आदित्य  देवधर

नकळत....

नकळत सारे घडून जाई कधी न लागे पत्ता
स्वप्नांमधुनी  स्पर्शामधुनी ह्रुदयामाधुनी
तुझीच मूर्ती तुझीच तू अलबत्ता
आता कुठे जगाची चिंता

मी हरवलो विकला गेलो लिलाव माझा झाला
तुझ्या रुपाने केली खेळी खेळ संपला सारा
गुलामीतही आहे गोडी, तुझी गुलाबी सत्ता
आता कुठे जगाची चिंता

रस्ते वाटा गल्ली न गल्ली तुझ्याच घरला धावे
दिशादिशातुन कणाकणातुन तुझे चित्र उभरावे
आहेस तू जर अवतीभवती अशीच येताजाता
आता कुठे जगाची चिंता

ठाऊक आहे मजला तुझिया गुपीत हृदयातले
गवताचे मऊ पाते ओले  लवलवते पावसातले
भान हरपुनी तू  भिजलेली मिठीत माझ्या असता
आता कुठे जगाची चिंता


------ आदित्य देवधर

मन जुळले

शब्दाशब्दातून मन जुळले
घडले कसे हे सांगशील काय
स्पर्श रेशमी देऊन जाते गालावरची गुलाबी साय

खुणा दिशांच्या विस्कटलेल्या
काळवेळचे भानही नाही
वाट विचारी पत्ता मजला
काही केल्या उमगत नाही
तरी पावले रस्ता तुडवी दिशा तयांना देशील काय

डौलदार कमळावरती
पाण्याचाही मोह जड़े
सूर मारुनी क्षणोक्षणी
निर्झरातुनी उदक पड़े
सूर उधळूनी प्रीत झरा तुषार अंगी उडवून जाय

निर्मळ सुस्वर येती कानी
हसतेस मलमली जेव्हा
कृष्ण सावली सळसळती
केसात माळशी  तेव्हा
छाया निर्मळ प्रेमाची तू केवळ मजला देशील काय

फुलेही पड़ती फिकी जयाने
गंध तुझा मी ल्यालेला
कोकीळ होई मुग्ध बापडा
सूर तुझा ओठी आलेला
प्रेमबंध  सार्थकतेची पावती मजला देशील काय 

------ आदित्य देवधर

विसर

धुंदीत फुलला पिसारा मनाचा
खुजा वाटताहे पसारा नभाचा
तुझा स्पर्श होता मन हे थरारे
जसा थेंब पाण्यावरी पावसाचा

गर्द नभ काळा मनी दाटलेला
वरुण  तयाची खूण झाकलेला
बरसला शुष्क कोरड्या धरेवर
चिंब भिजला जीव चातकाचा

दूर उभी ओली भिजलेली
मिठीस माझ्या आसुसलेली
मृदगंध स्वच्छंद  उन्मत्त होता
विसर पडला क्षणाक्षणाचा

पावसात रे  भिजता भिजता
ओला स्वर कानी रुणझुणता
मोती गालांवर ओघळता
टिपून घे हा क्षण प्रेमाचा

साक्ष द्यावया हाजिर सारे
अड़खळलेले श्वास सख्यारे
डोळे मिटूनी सावरला मग
धडधडता आवेग उराचा

सौख्य लाभले असे मला
सजवूनी  तव मोह  झुला
हिंदोळे घेताना  अलगद
विसर पडला क्षणाक्षणाचा

------- आदित्य देवधर

Monday, February 15, 2010

तुला की मला

सूर अनोखे  निनादले
तुला दिले की मला दिले
कसे कुणास लाभले
तुला दिले ते मला दिले

गंधर्वाने तार छेड़ता
आसमंत व्यापून जाता
रंग नभी जे मधाळले
तुला दिले की मला दिले

मिसळून जाता रंगांमधुनी
भाव मर्म रूपात न्हाउनी
चित्र मनीचे चितारले
तुला दिले की मला दिले

तान थिरके न्यास मांडुनी
मल्हाराचे गीत गाउनी
थेंब धरित्रीवरी झुले
तुला दिले की मला दिले

वास करुनी अनंतातुनी 
ज्योत कोवळी देही तेवुनी
जीवन अमृत शिंपडले
तुला दिले ते मला दिले

 ------- आदित्य देवधर

चाहुल

इंद्रधनूच्या कड़ेकडेने अन किरणांच्या पडद्याआडुन
मंद लालसर सायंकाळी वारा फिरला उन्हें थबकली
जशी पाउले तुझी वाजली

पानांवर ओझरते पाणी हबकले जागीच थबकले
जाळीतुन विणलेली खूण दिसे परि मार्ग खुंटले
क्षणार्धात पानापानातुन नाजुक सळसळ झाली
जशी पाउले तुझी वाजली

वारा धावे सैरावैरा भान विसरुनी  क्षितीजाचे
वीज डोकवी दाट ढगांतुन आभाळी करुनी खाचे
तुझ्या स्वागता थेंब निघाला चाहुल तुझी लागली
जशी पाउले तुझी वाजली

फुले तयांची करती उधळण भ्रमरही घिरट्या घाले
ओल्या हिरव्या वाटेमधुनी ओला मृदगंध दरवळे
वसुंधरेच्या कणा कणावर तुझीच जादू झाली
जशी पाउले तुझी वाजली

दूर वळणावर भिजलेली हसलीस तू पाहून मला
डोळ्यामधुनी अंतरातल्या शब्दांना आवाज दिला
रंगांची लेउन  झालर सांज मन्मनी हसली
जशी पाउले तुझी वाजली

------आदित्य देवधर

तुझा...

शब्दात सापडे अर्थ तुझा गीतामधुनी भाव तुझा
रडतानाची ओढ़ तुझी अन हास्याचा रंग तुझा

थेंब गवतावरती पिवळ्या ओलावा थेंबात तुझा
लवलवणारी नाजुक पाती भिजण्याचा भास तुझा

संध्यासमयी पश्चिमेकडे लाल केशरी रंग तुझा
रात्रीच्या काळोखामधुनी अंधारी एकांत तुझा

चंद्र चांदणे  अवकाशी निरखे सुंदर रूप तुझे
नक्षत्रांची तुझी पालखी अन पुनवेचा चंद्र तुझा

पाट पाट वाहे सरितेचा ओघवणारा मोह तुझा
सागरातुनी मिसळून जाण्या आतुरलेला थेंब तुझा

रूप पल्लवी तुझी अनोखी रसिक फुलांचा रंग तुझा
गंध वाहतो दिशादिशातून पण वारयाचा रोख तुझा

शब्दांवाचुन गाणे माझे गाणारा आवाज तुझा
मौनातुनही  मर्म उमजुनी  ऐकू येई सूर तुझा


-------- आदित्य देवधर

ग्रहण

कधी फाटलेला नभ माझ्या दिशेला
कधी थेंब परक्यास भिजवून गेला

मी वाट चाळलेली सोडून मुक्त झालो
पक्षी उडून गेला पिंजऱ्यात कोंडलेला

सोंगटी नसे उरली पटावरी तयाच्या
भिकारी तरी अपुले दान टाकून गेला

रातीस झोपलेली बद-जात माणसांची
मौनासवे तमाचे तो खेळ मांडून गेला

ओठांवरी उमटता तम-शब्द गूढ काही
ऐकून चंद्र भासे मजला ओशाळलेला

वाती जळून रात्री तेलात काजळीच्या
प्रकाशाने उपाशी अंधार चाख़लेला

सूर्यास झाकणारा छायेतुनी स्वत:च्या
कित्येक धुंद राती उजळून भोगलेला

ग्रहण लावणारा अवसेस फक्त मजला
मिरवुनी उधारीच्या तेजात गोठलेला

----- आदित्य देवधर

सावर सखे

श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
नाव धाव घेऊ पाहे सोडुनीया तीर

ओठ टेकवून माथी उष्ण उष्ण भास
कोवळे तव कुंतल गाली चेतविती श्वास
नयन ओघळी चिंब भिजलेले नीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

जीव ओतुनी वदती पापण्या गुलाबी
भाव डोळ्यातले धुंद भासती शराबी
गूज काय सांगतो मुकेच पैलतीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

स्वप्न तुझे आतले हळूच सौम्य हासले
अबोल तुझे सूर मला प्रेमगीत भासले
पात्यांवर प्रीतछंद न्यास झिरझिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

शोधू पाही पारा अवघे थेंब करी गोळा
ह्रुदयाचाही चाले मग धडधडता चाळा
कोर नांदुनी ओठांवर नजर भिर भिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

---- आदित्य देवधर 

शपथ

दीर्घ दीर्घ श्वासांचे वादळ
तप्त सख्त रक्ताची सळसळ
उचंबळूदे गगनी भिडूदे
ठोक बिलंदर मेघ गर्जना उभी धरा गलित गात्र होउदे

झटकून झापड़ क्षुद्र मतिचे
तोड़ बंध बुरसट जातीचे
गंध माखुनी तव  रक्ताचे
भीष्मरक्त मग  रक्तापाशी ललकारी देण्यास निघूदे

व्यसने मम चरणांच्या पाशी
आसक्ती झटकली सुखाची
चिता जाहलो स्वत: स्वत: ची
ज्वालाही आक्रंदून माझ्या भ्रष्ट मत्त जंजाल फुंकूदे

लगाम घे दुनियेचा हाती
लक्ष लक्ष पेटवून वाती
धारदार खड्गाची पाती
लवलवती सरसावून हाती बंडाचे रणशिंग फुंकूदे

शपथ तांबडया इतिहासाची
निरपराध अमुच्या रक्ताची
पात चमकावून परशूची 
कफ़न ललाटी बांधून अंगी कालीचा संचार होउदे

-----आदित्य देवधर

Thursday, January 7, 2010

असे वाटते

असे वाटते
असे वाटते झेप भरावी आज मनाच्या आत खोलवर
आरशातल्या अथांग वाटा  साद घालती कुठे दूरवर
असेल कोणी तिथे राहते, हृदयामधले कंप जाणते
नसांमधुनी रोज वाहते असे वाटते

असे वाटते टाकुन द्यावी वस्त्रे लाजेची शोभेची
झटकून द्यावी धूळ तनाची फोल फुकाची भीती जनाची
तोंड फाडूनी बंद डोंगरी उष्ण उकळूनी गंधकापरी
लेउन लाव्हा अंगी दाही दिशांमधुनी मुक्त जळावे
असे वाटते 

असे वाटते षडजावरती एक देखणे घर असावे
लहरींवरती विरघळणारे सूर अंतरंगी शिरावे
तानपुरा मग तार छेडूनी कंठ मनीचे मर्म छेदुनी
लख्ख ओंजळीतुनी स्वरांचे तीर्थ आपुल्या शिरी पडावे
असे वाटते

असे वाटते शब्दांसगे घ्यावे झोके चंद्रावरती
नक्षत्रांच्या ओवून माळा कवितेमधुनी गळ्याभोवती
क्षणात पुढच्या अवकाशातुन मंतरलेल्या पटलावरती
शब्दांच्या पलीकडले काही भावविश्व मग जूळून  यावे
असे वाटते

असे वाटते हात असावा तिचा आपुल्या हाती
मंद सुरांचे झरे अन धुके ओलसर भवती
हरवून स्वप्नामधुनी , ती मिठीत माझ्या रमता
थिजून क्षण तो विसरून सारे श्वास तेवढे फक्त उरावे
असे वाटते

-----------आदित्य देवधर

Friday, November 27, 2009

सलाम

आग लागुदे रक्त सांडुदे उठूदे ज्वाळा शोकांच्या
घरात बसुनी आम्ही ऐकतो गाथा सरल्या प्राणांच्या
उसना आणून गहिवर गोळा करुनी दुबळ्या हाती
सलाम करतो शूरा, जाशी  चितेत हसुनी बाणांच्या

मातीमधुनी पाय रोवण्या धीर जमवला नाही
अलंकार जखमांचे लेण्या वार पेलला नाही
सौख्य आमुचे असेच निद्राधीन उबेतुन गादयांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या

थंड जाहले  रक्त आमुचे  पाठ  घोकुनी मोलाचे
देऊन  दीक्षा  विकुनी विद्या  दूकान फळले  पैशाचे
घाव घालण्या तलवारीचे पदव्या कसल्या कामाच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या

घोर लढाई चाले पेटे होळी ज्यांच्या  देहाची
सैतानाचे हात टांगती लक्तर वेशी वस्त्रांची
मिटून डोळे करू प्रार्थना करुणा भाकू देवांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या

स्मरण करतो आम्ही न चुकता ठरल्या दिवशी
शांत राहती  कुणी  कुणाचे  हात वक्षापाशी
कुणी ठेवतो आहे चरणी देह आपुल्या मातेच्या
वंदन करतो शूरा गातो गाथा तुझिया शौर्याच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या

------- आदित्य देवधर

Tuesday, November 24, 2009

तुझ्याविना

श्वास असा हृदयात दाटला
खोल खोलवर रुतू लागला
ह्रदय आंधळे पिसाट धावे
ठोका चुकतो तुझ्याविना

नाव उमटते तुझेच  लिहिता
शब्द धावती तुझ्याकडे
आठवणींतून गुरफटलेला
जीव अधूरा तुझ्याविना

एक एक हुंकार दाटला
कंठामधला शब्द आटला
गात्रामधुनी खोल आतला
स्पर्श लोपला तुझ्याविना

तार एक मी छेडिलेली
धून एक अवघडलेली
गळा दाटुनी आला आणिक
सूर फाटला तुझ्याविना

भिंतीमधून अचेतन घरच्या
निराश वाहे लकेर कसली
पाश उदासीन अवतीभवती
मजला वेढी तुझ्याविना

खिडकीमधुनी उभा एकटा
शून्य गोठते डोळ्यांमधले,
वाट पाहुनी उड़े पारवा
सांज घेउनी तुझ्याविना

मिटून डोळे घेतो मी मग
पापण्यांतुनी उदास तगमग
हलके ओठांवरती पाणी
आसू भरती तुझ्याविना

--------आदित्य देवधर

Monday, November 23, 2009

गरम पाणी

गरम पाणी लागे वाहू
कुण्डं उसंडे शेजारी
निखारयातुनी ओले होता
दोन नद्या त्या थेट उरी

धार संतत धार चालू
ओढ़ आतली धरुन  किनारी
मार्ग आखुनी मार्ग मोकळे
प्रवाहातली  बोच  जिव्हारी

लाल जाळे लागे पसरू
शुभ्र मोकळ्या पटावरी
आरशावरी अनेक बिन्दु
ठेउन गेल्या कैक सरी

शांत जाहला पूर शेवटी
धग थांबली नसे जरी
शेष जाहती खुणा तयातुन
खारया वाटा दिसती परी

मिटूनी कळ्या डोहावरती
दव साचले कड़ेवरी
आत दाटली धूसर चित्रे
बंद ओलसर कुण्ड तरी

---------आदित्य देवधर

Saturday, November 21, 2009

तुझ्या देशीच्या वाटा

कुठे वाहती वारे इथले 
कुठे धावती लाटा
मला सोडुनी धरती सारे 
तुझ्या देशीच्या वाटा

दिसले नाहीत रंग नेटके 
फिकट उदासीन फुलांतुनी
रंगहीन पाखरे भटकती 
धुके पसरते क्षणांतुनी
मैफल सरली रंगांची 
अन उरी अडकला काटा
मला सोडुनी धरती सारे 
तुझ्या देशीच्या वाटा

डाग लागला चंद्रावरती 
दिशाहीन ही ध्रुवतारा
शुद्ध हरपली रातीची अन 
नभी व्यापला मळ सारा
पुनवेलाही ग्रहण लावुनी 
प्रकाश थरथरला खोटा
मला सोडुनी धरती सारे 
तुझ्या देशीच्या वाटा

वाळू थिजुनी रुते किनारी 
थबकुनी साचे जलातुनी
बोडकी जुनी झाडे देखिल 
समाधीत साधनेतुनी
सूर विराणी गाऊन जाती
जून फाटक्या लाटा 
मला सोडुनी धरती सारे 
तुझ्या देशीच्या वाटा

गंध एक परि आला धावून 
निरोप देण्यासाठी
पाऊस कोसळे कुंद ऋतूचा 
विरह सोसण्यासाठी
वारा सत्वर आला इथवर 
धरती ओली होता
गाव दूरचा सोडून धरल्या 
तुझ्या देशीच्या वाटा

---------- आदित्य देवधर

Thursday, November 19, 2009

जगाची कहाणी

ऐक ज़रा तू लक्ष देउनी
गोल जगाची फोल कहाणी

हजारदा घोके गाथा
भस्मातुन लपलेला माथा
अर्थ टांगुनी वेशीवरती
हातावरुनी पाणी

उंच भरजरी नेसून कपडे
परमार्थी हे कैक आंधळे
भीक मंदिरी देती आणून
डोळ्यामध्ये पाणी

मयत जाता काष्ठांवरती
अग्नि देऊन देहावरती
वाट पाहती कितीक
खाण्या टाळूवरचे लोणी

पेशींमधुनी स्वार्थ कोंबला
कर्मांनी विश्वास सोलला
पानीपत मग घडते पुन्हा 
रूप वेगळे तीच कहाणी

-------- आदित्य देवधर

Tuesday, November 17, 2009

निकाल सुख दु:खाचा

सुख कोठून पड़ते पदरी कुणी सांगाल का हो मजला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

गर्दीतून काढून वाटा मी रोज हाकतो गाडी
खड्डयांतून हिंदकळताना मणक्यांचे तुकडे पाडी
वर काम मारण्या माथी साहेब टपुनी बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

रोज रोजची कामे तशीच करतो आहे
हिशोब आकड्यांचे अचूक लावतो आहे
मित्र मात्र अमुचा पायरी वरची चढला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

ती कोणे एके काळी मला भावली होती
डोळ्यांच्या कोनामधुनी ती हळूच हासली होती
आज अचानक भाळी कुंकवाचा ठिपका दिसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

प्रश्न सोडवताना अमुचे ध्यान कुठेही नसते
कोरुन कोरुन चित्रे अवघे उत्तर सुरेख सजते
घंटा होता कळते की पेपर अर्धा सुटला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

खर्चाची मांडून गणिते मी बाकी मोजत बसतो
हप्ते देऊन देऊन आता खिसे रिकामे करतो
संसार उभा करण्या कर्जाचा डोंगर बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

मी कष्ट करुनी खातो घामाची भाजी भाकर
चहा रोजचा एकच अन त्यातून मोजून साखर
पेला नव्हता माझा कसला पूर्ण कधीही भरला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला

-------- आदित्य देवधर

Sunday, November 15, 2009

वेळ

वेळ हा असा शब्दाय की ती 'असते' पण आणि 'असतो' पण. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्ही लिंगात वापरतात. वेळ आली असते, वेळ गेला असतो या दोन्ही वेळांमध्ये फरक आहे. हा कालवाचक शब्द घटना आणि कालावधी या दोन्ही संदर्भाने वापरता येतो. परीक्षेची वेळ आली आणि परीक्षेला अजुन वेळ आहे यात पाहिली वेळ घटना दर्शक तर दूसरा वेळ कालावधी दर्शक आहे. 'तो' वेळ 'त्या' वेळेचं अनेक वचन आहे.
शब्द द्वयर्थी असतात पण एकाच संदर्भात एका शब्दाचा  असा 'लिंग' बदल विरळाच!
कोणाला अजुन असे काही माहित असल्यास इथे जरूर भेट दया आणि कळवा.


--------- आदित्य देवधर

प्यादं


        विनायक बाल्कनी मध्ये चहा पीत बसला होता. आज रविवार असल्याने घरी तरी होता, नाहीतर एव्हाना तो ऑफीस मध्ये जाऊन जुना झालेला असतो. गेली सात वर्ष तो एका कंपनीत मार्केटिंगचं काम करतोय. नाव तेच असलं तरी कामाचं स्वरुप मात्र बरंच बदललय.त्याने सेल्समन म्हणुन सुरुवात केली होती आणि आता तो 'Stategic Marketing' चं काम करायला लागलाय. सिनीअर पोस्ट वर. रिपोर्ट, प्लान, बजेट असल्या शब्दांमध्ये आणि कसल्याशा अंकांमध्ये बुडालेला असतो. सात वर्षातली ही प्रगती कौतुकास्पद आहे आणि डोळ्यात येणारी पण. पस्तिशीची माणसं सर सर करत मागे हिंडतात त्याच्या. कधी कोणी याचं कारण, स्पष्टीकरण विचारलं तर त्याचं एकाच उत्तर असतं 'प्रत्येक कुलुपाची एक तरी किल्ली असतेच. ती शोधायची नाहीतर कोंडून घ्यायचं.' त्याला कधी कोंडीत अडकायचं माहितच नव्हतं. सतत कसल्याश्या शोधात, कामात असायचा. आत्ताही तो त्याच्या laptop वर काहीतरी करत होता.
        त्याच्या कामाबद्दल शंका घ्यायचा काही प्रश्नच नव्हता. विनायक कमालीचा मेहनती, चतुर आणि हुशार होता . त्याचे वडिल गेले तेव्हा तो बारावीला होता आणि त्याची धाकटी बहिण,माधवी नववीला. आई घरी मेस चालवायची. त्यामुळे शिक्षण घराजवळच्याच शाळा कॉलेजातून झालेलं. तिथून त्याने जे कमावलय त्याचा अभिमान असल्यास त्यात काही गैर ठरणार नाही. त्याने जे काम केलय त्याचं चीज तर झालच आहे. पण खरंतर काही अवांतर गुणांमुळे तो इथवर आलाय. त्याच्या ओळखी. ओळख कोणाशी किती कधी आणि काशी वाढवायची हे तो कुठल्या शाळेत शिकलाय कुणास ठाऊक. त्याला ती कला जमली आहे. किराणामालाच्या दुकानावर बसलेल्या बनिया पासून साहेबाच्या इम्पोर्टेड कार मधून उधळलेल्या पोरापर्यंत सगळे याच्या ओळखीचे. खिशातालेच म्हणा ना! त्याच्या कंपनीचा मालक सिंधी आणि पोरगा नालायक. पण तोही चक्क ऑफिसला यायला लागला होता या विन्याच्या नादाने. पोराला बापाने पार्टनर करून घेतलं होतं. केवढं चपखल गणित जुळलं होतं. मग का करणार नाही विन्या 'केवल' शी मैत्री !! विनायक तसा हरहुन्नरी होता. फारसे मित्र वगैरे नसले तरी पार्ट्यांमधे एकदम वॉन्टेड होता.  तो गिटार वाजवायचा, गाणीही बरी म्हणायचा पण करियर पुढे त्याने या कलांवर पाणी सोडलं होतं. पुढे जायचं असेल तर काहीतरी सोडावच लागतं. पण संधी मात्र त्याने कधीही सोडली नव्हती.
        विनायकने माधवीला म्हणजे त्याच्या बहिणीला आपल्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज टाकायला सांगितलं. तिने Computer Engineering केलं होतं. आणि तिला सध्याच्या ठिकाणी फार काही मिळत नव्हतं. इथे तिला दुप्पट तरी पगार मिळणार होता. आणि तिला सिलेक्ट व्हायला फारसा काही त्रासही होणार नव्हता . साहजिकच होतं ते. मोठया खुशीत ती नवीन ठिकाणी जाऊ लागली. ती केवलच्या Department मधे होती. वर्षभरातच  त्या दोघांची चांगली wavelength जमली. ती आता कामासाठी उशीरा पर्यंत थांबू लागली. शनिवार-रविवार घरी राहेनाशी झाली. तिच्याकडे आता नवीन स्कूटी आली होती. पगारवाढ़ झाली होती.  महागडा मोबाईल आला होता. गळ्यातला नेकलेस आणि हातातलं ब्रेसलेट दर महिन्याला बदलत होतं. केवल तर पक्का सिंधी गोडबोल्या होता. त्याची साखरपेरणी जोरात चालू होती. तो आता बार मधल्यापेक्षा ऑफिसला जास्तं वेळ दिसत होता. ऑफिस मध्येही याची चर्चा होती. त्याच्या बापानुसार हे क्रेडिट विनायकला जात होतं. आणि ते वाढीव Allowance बरोबर दर महिन्याच्या पगारातून खात्यामध्ये रुजू होऊ लागलं होतं. दारी एक लांबडी  कार नांदू लागली होती.
        एका दिवस आई आणि विनायक घरी जेवण्यासाठी माधवीची  वाट बघत  होते. अकरा वाजले तरी माधवी घरी आली नव्हती. फोन केला तरी नुसती रिंग जात होती.
"ही काय पद्धत आहे काम करण्याची! वेळेचं भान ठेवता येत नाही का काही. मुलींनी मध्यरात्री पर्यंत घराबाहेर राहू नये हे तुमच्या कंपनीला काळात नाहिए का?" आई उद्वेगाने म्हणाली.
" अगं आई We are responsible for customer business!!" विनायक ने असलं प्रेझेंटेशन मधलं उत्तर दिलं. खरं तर तोही ज़रा चिंतित झाला होता.
" काहीही गरज नाहीये. असल्या कामांपेक्षा तिने घरी बसलेलं चालेल मला. "
विनायक ने परत फोन करायला मोबाईल उचलला. आणि बेल वाजली. माधवी आली होती. डोळे लाल झाले होते. ज़रा अपसेटही वाटत होती.
"ही काय वेळ झाली का पोरी? कुठे होतीस? इतका वेळ का लागला? पडलीस का कुठे? " असे अनेक प्रश्न एकामागोमाग एक आले.
"काहीही नाही झालेलं यातलं. मेजर इश्यू आलाय. त्यासाठी थांबावं लागलं" माधवीचं कोरडं उत्तर.
"अगं मग फोन तरी करायचा. आणि फोन का उचलत नव्हतीस? आम्ही काय समजायचं?
"आई, तू मला आता लेक्चर देणारेस का? आधीच डोकं उठलय त्यात तू ताप देऊ नकोस!!" असं म्हणून माधवी आपल्या खोलीत निघून गेली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. जेवणाचं टेबल आवरून काहीही ना बोलता तीही झोपायला गेली.
          विनायकला हे ज़रा वेगळ वाटलं. माधवी असं कधी बोलली नव्हती आईला. त्याने लगेच केवल ला फोन केला. दोन रिंग नंतर लगेच त्याने उचलला.
" केवल, काय चालवलय हे. अती होतय. ही काय वेळ झाली का?"
पलीकडून फक्त हसण्याचा आवाज.
" तू दारू ढोसून बसला आहेस?
परत हसण्याचा आवाज!
"फक्त तुझ्या साठी माधवीला मी आपल्या कंपनीत यायचं सुचवलं  होतं. तुला ती आवडली होती म्हणून. तू नसतं काही पैदा केलं नाहीयेस ना?"
" नाही यार....! " नशेतलं उत्तर. "तसं काही नाहिए. आज तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि माझ्या दारू बद्दल कळलय.बास!!"
"केवल, मला हे जास्तं ताणलेलं नकोय. लवकर काय तो निकाल लाव. तुझ्या आधीच्या Divorce बद्दल अजुन कोणाला कळणार नाही याची काळजी घे. आणि हे संपवून टाक."
फोन नंतर काही भानगड झाली नाहीये याचाच विनायकला जास्त समाधान होतं.
        पुढच्या महिन्यातच माधवी-केवल च्या लग्नाची तारीख ठरली. आईला हे अजिबात मंजूर नव्हतं. पोरीचा हट्ट आणि त्यात मुलगाही चांगला. श्रीमंत होता. पोरीला सुखात ठेवेल या विचाराने तिने हो म्हटलं होतं.  चार महिन्यात त्यांचं लग्न झालं.   यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. सरड्याने रंग बदलले होते. आणि ऑफिस मध्येही रंग बदलले होते. विनायक आता "VP Marketing" झाला होता. त्याला नवीन केबिन ची किल्ली मिळाली होती. पण त्यासाठी त्याने अजुन एक प्यादं गमावलं होतं. घरातलंच एक. एक  "मी" नावाचं प्यादं मात्र एकटंच पुढे गेलं. मित्र, नाती, छंद, घर यांना पणाला लावून त्याने त्या  प्याद्याचा वजीर केला होता. आठ वर्षापूर्वीचं प्यादं  जे फक्त एक घर पुढे जात होतं,आख्खा पट आता  त्याचाच होता. मुक्त  संचार करता येणार होता.  राजाला शह देण्यासाठी त्याने जुळवाजुळव सुरू केली होती.


------- आदित्य देवधर

Sunday, November 8, 2009

पाऊस

संध्याकाळी पश्चिमेकडे  आभाळ फाटले दूर
पिवळ्या धूसर घुमटामधुनी गदगदला एक सूर
धूळ उडवित डोळ्यांमधुनी  वारा नाचत होता
देवाघरचा कमंडलू वर तिरका झाला होता

क्षितिजावरती रंगांची ही झाली होती गर्दी
सोने मिसळून अवघ्या भाळी आषाढाची वर्दी
सूर्य एका अंशामधुनी खाली लपला होता
अन आकाशाने धरतीवरती लंब टाकला होता

कण अन कण धुळीचा उठला होता आनंदाने
चातक धावला होता पहिल्या थेंबा आवेशाने
झाडांनीही लवुनी पाती मुजरा केला होता
वरुणाच्या दूताने खाली धावा केला होता

तडतड करुनी धरणीवर फोडणी पडली होती
अंगाअंगा वरची  लाही लाही फुटली होती
उष्ण उष्ण वाफांवर ओला शिडकावा झाला होता
मग मातीचा गंध हवेतून  दरवळला होता

रस्त्यांवरल्या लोकांची  धावपळ चालू झाली
छत्रीमधुनीही भिजण्याची गंमत मजला आली
टपरीवरती तेलामधुनी घाणा पडला होता
अन गार ओला वारा घेऊन पाऊस आला होता.

--------- आदित्य देवधर