रंग कुणाचा, ढंग कुणाचा लेउन पुरता हरवुन गेलो
पाणी होऊन जगता जगता मर्म स्वत:चे विसरुन गेलो
मल्हाराचे स्वप्न पाहुनी उत्साहाने जरी नाचलो
थेंबा थेंबा मधून नुसते रडून निव्वळ वाहून गेलो
बोलायाचे होते तेव्हा शब्द जसे विरघळून गेले
ती गेल्यावर,गूज मनाचे स्वत:शीच मग बोलून गेलो
तेढ तेवढी नाही आता समाधान मज याचे की,
आठवणींच्या जखमांचे मी हिशोब चुकते करून गेलो.
आयुष्याची नशा पुरेशी घोळून उरता रिक्त शेवटी
उरले सुरले पेल्यामधले सत्य तेवढे रिचवून गेलो
किती दाबुनी ठेवू वादळ, दर्या तुमच्या भिंतीमागे
नका म्हणू मग नंतर सारे गाव बिचारे बुडवुन गेलो !
---आदित्य