Pages

Tuesday, July 23, 2019

गंधवेल

ओल्या ओल्या हळदीमध्ये सांज रंगली
उन्हे सरींच्या सोबत अवघ्या नभी गुंतली
पाऊस होऊन मिसळुन जाता मातीतुन मी
गंधवेल सर्वांगी सृष्टीच्या दरवळली

मी धावावे तुला भेटण्या थेट नभातुन
अन भिजवावे तुजला हिरव्या दिशादिशातुन
कुंभ रिते तुझियावर होता माझे सारे
धरा सावळी रोमारोमातुनी हरली

सुरू जाहले वाऱ्याचे थैमान भोवती
केशर कुंद धुक्यातुन उधळे धुळीसोबती
थरथरत्या वेलीस बिलगता तुषार अवचित
धुंद मिठीतुन तारुण्याची कळी उमलली

शुभ्र कळ्यांची काच तडकते गगनामधुनी
थेंब चमकती आकाशाच्या आरशातुनी
पाण्यावरती तरंग उठता अन ओसरता
पावसातली गाणी ओठांवर अवतरली

चैतन्याचा पाट खळाळे जागोजागी
कणाकणातुन सुप्त स्पंदने होती जागी
मिसळुन जाता सूर पावसातिल नात्याशी
तुझ्या नि माझ्या नात्याची चांदणी उगवली

कोरून जाता पाऊस ऐसी संध्या हृदयी
इंद्रधनूची उधळण मनपटलावर होई
गंधवेल उगवून माझिया अंगणामध्ये
आनंदाची धारा आयुष्यात बरसली

आदित्य

Friday, July 19, 2019

क्षणात एका जगून जातो

नजर भेटता नजरेला मी
खोल कुठेसे बुडून जातो
कितीक क्षण मी आयुष्याचे
क्षणात एका जगून जातो

तुषार उडवत हलके हलके
झरे फुलविशी लोभसवाणे
तुझ्या तेवढ्या हास्यावरती
सर्वस्वे मी लुटून जातो

मेघ अंबरी विहरून येतो
श्रावण होउन माझ्यापुरता
ऋतूत तुझिया चातकापरी
पावसात त्या भिजून जातो

काळ थांबतो, श्वास थांबतो,
नजर तेवढी बोलत असते
बांध मुक्या शब्दांच्या वेगे
डोळ्यांमधुनी फुटून जातो

अवघी सृष्टी जुळून येते
पूर्ण होउनी माझ्याभवती
त्याच ठिकाणी येउन पुन्हा
त्याच क्षणांना जगून जातो

वाट तुझी मी होतो अन तू
प्रवास होशी माझा सारा
तुझी सावली होतो मी अन
तुझ्याच वाटेवरून जातो

आदित्य

तुझेच होऊन गेले सारे

तुझेच होऊन गेले सारे माझे काही उरले नाही
सरला नाही असा एकही क्षण की विरही झुरले नाही

कातरवेळा घेऊन येती पाऊस ओला वाऱ्यावरती
पण विरहाच्या सरींमधुनी निखार काही विझले नाही

मधेच पडला पडदा मंचावरती माझा प्रवेश होता
उभी तिथे मी तिष्ठत अजुनी नाटक तैसे संपले नाही

खिडक्या दारे बंद जाहली तशी अडकले घरात माझ्या
रातीचा मग चंद्र निमाला, कुठे चांदणे उरले नाही

मार्ग थांबले की थांबवले, जरी पावले उमटत होती
तुझी पावले जशी हरवली, मार्गही पुढचे दिसले नाही

आदित्य

आठवणींची पालवी

आठवणींची पालवी जशी गळू लागली
चाहूल शिशिराची हृदयातुन सलू लागली

मोहरणे स्वप्नातच आता उरले केवळ
कळी कळी खुलण्याच्या आधिच मिटू लागली

थांबवले दररोज स्वतःला जळण्यापासून
आणि स्वप्नं बर्फ़ाची माझी जळू लागली

हातावरल्या रेषांमधले मार्ग बदलता
नियतीच्या खेळाची पद्धत कळू लागली

जाग अचानक आली मजला हुंदके ऐकून
अन प्राजक्तासवे रात्र ओघळू लागली

गर्दीमध्ये अनोळखी मी धडपडताना
सावलीसुद्धा माझी आता लपू लागली

आदित्य

फक्त एवढे जाता जाता

फक्त एवढे जाता जाता करून जा तू
आठवणींतून माझ्यापाशी उरून जा तू

बाग कोवळी सुकून गेली आहे माझी
गंध फुलांच्या श्वासांमध्ये भरून जा तू

काय म्हणावे अपुल्यामधील नात्याला या
एकदा तरी उत्तर याचे लिहून जा तू

हसता हसता निरोप घेताना शेवटचा
तुझे तेवढे डोळे ओले पुसून जा तू

जाशिलही ओलांडुन दर्या क्षितिजापाशी
किनाऱ्यासही थोडे ओले करून जा तू

साठवलेला पाऊस आता आटत आहे
शेवटचे डोळ्यांतून माझ्या गळून जा तू

आदित्य