Pages

Tuesday, December 31, 2019

यापुढे रडणे नाही

गेलेले क्षण आता काही मिळणे नाही
पुस तू डोळे, ठरव यापुढे रडणे नाही

वणव्यामध्ये सुद्धा अश्रू पिऊन अवघे
जळेन पुन्हा परंतु ओले उरणे नाही

खुशाल बघ तू स्वप्न उद्याचे आणि जाण की,
स्वप्न पाहणे, स्वप्नामध्ये रमणे नाही

असेलही तो ढगाएवढा ध्यास, सिद्धता
चुकेलही पण चुकूनही घाबरणे नाही

गीतातिल अर्थात खरी बघ गंमत आहे
गाणे म्हणजे कंठशोष ओरडणे नाही

मृत्यूलाही थांबवेन मी या शब्दांनी
जगलो नाही तोवर आता मरणे नाही

आदित्य

पुन्हा

रात्र ती हरखेल पुन्हा
तारका नटतील पुन्हा
संपलेल्या उत्सवांचा
सूर्यही उगवेल पुन्हा

एरवी थंडावलेल्या
शांतशा या मध्यरात्री
हरवलेली अचानक
माणसे दिसतील पुन्हा

काळ तो सरतोच आहे
वेळ ही भरतोच आहे
पण तरीही कोणते हे
सोहळे सजतील पुन्हा?

का उगा प्रश्नांस साऱ्या
रोज कवटाळुन बसावे
आज सोडू मोकळे, अन
ते उद्या हरतील पुन्हा

ओंजळीमध्ये जरासे
मावणारे क्षण सुखाचे
येउनी एकत्र येथे
मन्मने जुळतील पुन्हा

विसरुनी दुःखास आम्हीं
झिंगतो धुंदीत थोडे,
जोडतो अन धीर ऐसा
की मने लढतील पुन्हा

आदित्य

Tuesday, December 24, 2019

मन मारुन जगणे

निःशब्द करारांचे ऋण जिकिरीचे झाले आहे
मन मारुन जगणे आता सवयीचे झाले आहे

पापाच्या अन पुण्याच्या लक्ष्मण रेखांनी येथे
आयुष्याला कुंपण-पण सक्तीचे झाले आहे

आनंदाने तुरुंग नियमांचा उपभोगत जाता,
लालुच-लक्षण ध्येयाच्या पूर्तीचे झाले आहे

असुराला, दैत्याला घाबरता घाबरता आता,
पूजेचे कारण सुद्धा भीतीचे झाले आहे

खोट्या फसव्या चेहऱ्यांच्या या जगात साधे,
खरे बोलणे चुकूनही, चोरीचे झाले आहे

दिवसा ढवळ्या राज्य चालते अवसेचे जैसे,
शहर आंधळे कुचकामी दृष्टीचे झाले आहे

'नको सांत्वने, नको दिलासे, एकांत हवा मजला'
असे काहिसे म्हणणे या सृष्टीचे झाले आहे

चितेवर तरी मनाजोगता जगेन जळता जळता,
दोन घडीचे जगणे ते मर्जीचे झाले आहे

आदित्य

Thursday, December 19, 2019

रोज रोज ..

रोज रोज मी मरतो येथे, कसे बसे मी जगतो येथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे.

कुठले ओझे डोक्यावरुनी जीव बिचारा वाहत जातो
कामाला मी घर सोडुनिया डोळे मिटुनी धावत जातो
कुठे नोकरी, कुठे चाकरी, रस्त्यावरती जेथे तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

कर्ज काढुनी नटतो सजतो, तसे दिखाव्यापुरते नुसते
दिवस रात्र साहेबासाठी, घरी फक्त पळ-घटिका उरते
सुटला नाही साहेब देखिल अशा दुष्ट चक्रातुन येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

श्वास चालती प्रत्येकाचे घड्याळातल्या काट्यावरती
हिशोब अन वेळेची केवळ सूत्रे आठवणींतुन उरती
चंद्रसूर्यही उरकुन जाती दिवसरात्र नावाला जेथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

चालू असती व्यायामाचे महागडे क्लासेस नव्याने
कधी पेव योगाचे फुटते, कधी नृत्यही नवे-पुराणे
तरी औषधासाठी रांगा लांब लांब दिसतातच तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

स्टोरी आणिक स्टेटसचाही महापूर येताना दिसतो
प्रत्येकाच्या मैत्रीचा बाजार केवढा उत्तम भरतो
माणुस उरतो परी एकटा सोशल होता होता येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

नाती उरती कागदावरी केवळ सध्या घराघरातुन
एकच घरटे दिसायला पण वेगवेगळे मनामनातुन
रेशिमगाठी आता दिसती सैल सैल होताना येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

कशास आणिक कुठली शर्यत चालू असते ठाऊक नाही
अंत कधीही, कुणासही, स्पर्धेचा येथे दिसला नाही
मरताना परि जाणिव होते, हाय! हरवले जगणे येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे

---आदित्य

पिंपळपान

नसेल आता तुझे असे उरलेले काही, हरकत नाही
स्मृती सुद्धा काहीशा अपुऱ्या जगण्यासाठी, हरकत नाही

निघून तू गेलीस जरीही कायमची मार्गातुन माझ्या
रोज तरी मी ओघळेन प्राजक्त होऊनी, हरकत नाही

कधी रडावे असे वाटता कुशीत तुझिया येऊन मजला,
पाखरांसावे धाडीन अश्रू तुझ्याच पदरी, हरकत नाही

आठवणींच्या कवितेमधुनी तरळुन जाइन अलगद अस्फुट
भेटत राहीन पिंपळपानापरी वहीतुन, हरकत नाही

जिथे कुठे असशील अता तू, झरे सुखाचे फुलतिल तेथे
इथे स्मृतींचा राहील थोडा ओलावा, पण हरकत नाही

आदित्य