Pages

Tuesday, March 23, 2021

शहीद-पर्व

मुक्त मोकळ्या स्वातंत्र्याचा साज चढवला मातेला
अर्पण प्राणांच्या ज्योती उगवाया स्वतंत्र सूर्याला
सुपुत्र तू अवतार ईश्वरी तारून नेले देशासी
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

बीज रोवले अभिमानाचे तू कणखर मातीमध्ये 
कल्पवृक्ष बहारोनी आले ओजस्वी हृदयामध्ये
स्वप्न उतरले वास्तवामध्ये पडलेले जे आईला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

तेजस्वी बलिदानाचे फळ आज भोगतो गर्वाने 
उंचावुनिया मान, दाखवू दिशा यशाची ज्ञानाने
हीच आज श्रद्धेची ओंजळ अर्पण दैवी त्यागाला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

एक असे वरदान दे अम्हा, नको करंटेपणा अता
अंश तुझ्या रक्ताचा लाभो ठायी ठायी इथे अता
तुझ्याच आशीर्वादाने मग बळ देऊ या देशाला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

आदित्य

Sunday, March 21, 2021

कृष्ण सख्या..

घननीळ्या पावसापरी नित येत रहा तू
आठवणींचे मोरपिसारे देत रहा तू

वास्तवातली नाती अपुली नसोत जुळली,
स्वप्नांच्या आनंद महाली नेत रहा तू

अधीन रे आहेच तुझ्या मी अष्टौप्रहरी,
तरी सुगंधी स्वरांतुनी मोहीत रहा तू

नको वाजवू पावा आता दुसरा कुठला
श्वास माझिया वेणूतुन फुंकीत रहा तू

दहा दिशांतुन तुला भेटण्या जावे वाटे,
जाणाऱ्या प्रत्येक नव्या वाटेत रहा तू

विरह नको अन त्याग तुझा मज नकोच आता,
कृष्ण सख्या , या राधेच्या समवेत रहा तू

आदित्य

कविता

कुठे जरासा अवघडलेला 
विचार येता घडते कविता
अव्यक्ताच्या डोहातुन मग
जिवंत अवखळ झरते कविता

बंद कुंद कोनाड्यामधुनी
एक स्वयंभू ठिणगी पडता
अंधाराच्या कडेकडेने 
प्रकाशणारी दिसते कविता

अतर्क्य अघटित लाटांवरूनी
स्वार होऊनी बळ जी देते
आयुष्याच्या वादळातली
जन्मजान्हवी ठरते कविता

सृजनाचे वरदान होऊनी
अशी लेखणी झरू लागते,
आईच्या उदरात जणू की
गर्भ होऊनी स्फुरते कविता

स्वप्नांच्या अन क्षितिजांच्याही
पल्याड मजला घेऊन जाते
आणिक माझ्या अस्तित्वाचे
रूप घेउनी फुलते कविता

अथांग काळ्या कागदावरी 
शब्द मनस्वी उधळण करता
अवकाशाच्या पटलावरती
नक्षत्रांची बनते कविता

तुटलेल्या हृदयाच्या तारा
जोडत जातो कसाबसा मी
आठवणींच्या पडद्याआडुन
रोज निरंतर झुरते कविता

नभात काळ्या अश्रू अवघे
पाऊस होऊन साठत जाता
बांध फुटावा नयनी तैसे
ढगातुनी कोसळते कविता

आदित्य

Friday, March 5, 2021

परतीचा प्रवास

परतीच्या वाटेने चालू प्रवास आता..
हिशोब सारे सांगावे मी कुणास आता..?

रमता रमता बागेमधल्या फुलांमधूनी
दरवळतो मी होउन तेथे सुवास आता

सोन्याच्या घरट्यातिल पक्षी होण्यापेक्षा
सोडुन देतो मुक्त मोकळे मनास आता

इतक्या झाल्या शोभेच्या या इमारती की,
देव नकोसा वाटावा मंदिरास आता?

दहा दिशांतुन बघतो मी बहराचा मौसम
कुठेच नाही शिल्लक काही भकास आता...!

उंबरठा ओलांडू कुठल्या क्षितिजावरचा?
दारे, खिडक्या, भिंती नाहित घरास आता

नव्या ठिकाणी असेल सारे हवेहवेसे..
तेवढाच तो काय दिलासा जिवास आता

शब्द तेवढे उरतिल मागे साक्ष सांगण्या..
आठवणींच्या पावसातल्या उन्हास आता

फूल गळोनी मिसळुन जाता मातीमधुनी,
मृदगंधाचे वस्त्र मिळावे तयास आता.

आदित्य