Pages

Thursday, June 28, 2018

सवाल आहे एवढाच की

सवाल आहे एवढाच की तुझ्यात गुंतावे की नाही
सवय एवढी लागावी अन व्यसनाधिन व्हावे की नाही

श्रावणातल्या ओल्या हिरव्या नभात वारा पिऊन सारा
पाऊस होऊन फक्त तुझ्यावर अविरत बरसावे की नाही

प्रेम म्हणू की ओढ म्हणू की भासाच्या सावल्याच नुसत्या
आभासी मृगजळात ऐशा नाते रुजवावे की नाही

एका भेटीमधली ठिणगी उठवुन गेली वादळ वणवा
हव्याहव्याशा आगीतील या निखार विझवावे की नाही

कधी वाटते जावे आणिक संपवून टाकावे सारे
चिठ्ठीतुन शेवटचे तिजला निरोप कळवावे की नाही

तू असताना वा नसताना उंच खालती घेऊन झोके
धुंद नशेचे वा विरहाचे प्याले रिचवावे की नाही

नसतील ध्यानी तुझ्या जराही माझे असले प्रश्न कदाचित
अशात तुझिया स्मृतींत मी स्वप्नांना भिजवावे की नाही

जखमा माझ्या हृदयावरच्या तशा खोलवर नाहीत अजुनी
याच समाधानावर आता स्वतःस रिझवावे की नाही

भिडल्या जर दोघांच्या नजरा उमजुन सारे मुकेच नकळत
मोजुन मापुन दोन क्षणी मग खुशाल बिघडावे की नाही

आदित्य

Tuesday, June 26, 2018

तहानलेला

अन्योन्याच्या नात्यामधला समुद्र ऐसा गहिवरलेला
'अथांग पाणी सभोवताली असूनही मी तहानलेला'

निमित्त परतोनि भेटण्याचे कसेबसे साधले तरीही
पाय घराच्या उंबरठ्यावर नकळत माझ्या अडखळलेला

रोज इथे मी मूक झुरावे प्राजक्ताच्या झाडाखाली
रोज तिथे दारात तुझ्या पाऊस फुलांचा ओघळलेला

स्वप्नामध्ये क्षितिजाच्या पलीकडे तुला मी भेटून येतो
आणिक उरतो गात्रांमधुनी स्पर्श तेवढा शहारलेला

पक्षी होऊन मन माझे घुटमळते तुझिया खिडकीपाशी
गाऊन जाते गूढ मारवा कातरवेळी अवघडलेला

कुठेतरी जाणतो तुलाही ओढ असावी माझ्याइतकी
क्षण एखादा तरी असावा स्मृतींत माझ्या विरघळलेला

दोन किनारे दोघे आपण रोज वाहतो सोबत तरिही
थेंब माझिया पाण्यामधला तुला भेटण्या आसुसलेला

आदित्य

Friday, June 22, 2018

विरघळून जाती मने

ओल्या ओल्या पावसातल्या गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अल्लड अवखळ थेंब नाचती सभोवताली
छेड काढुनी केसांशी ओघळती गाली
ओठांनी हळुवार तयांना टिपण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

कोसळणारा पाऊस बघता खिडकीमधुनी
आठवणींचे तुषार उडती अंगावरूनी
विसरून जाते भान तशातच झुरण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

उसळून सागर मनात वादळ घेऊन येतो
हजार लाटांनी आलिंगन देण्या हुरहुरतो
वाट पाहता तुझी किनारी भिजण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

पावसामध्ये रुजून येती शब्द नव्याने
भाव उमलती अस्फुट उत्कट कळीप्रमाणे
प्रेमाच्या फांदीवर डोलत फुलण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

असा पेटतो वणवा अंगी स्पर्शामधुनी
धुके पसरते उष्ण धुराच्या वाफांमधुनी
चिंब ओल्या मिठीमधुनी जळण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अनुरागाचे सूर आपुले अवघे जुळले
नवे अर्थ सहवासामध्ये तुझ्या मिळाले
पावसातले स्पंदन उतरे गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

आदित्य