Pages

Sunday, October 27, 2019

रोज दिवाळी

अवतरली दीपांची माला
नक्षत्रांची प्रभा लेऊनी
लाजेने निस्तेज चांदण्या
अन उजळे अवसेला अवनी

प्रकाश उधळे कणाकणातुन
असंख्य किरणे नवतेजाची
तिमिर ओसरे अज्ञानाचा
लख्ख सोयरी दिशादिशांची

लखळखणारे कैक काजवे
दिवे घेउनी पाठीवरती
लवलवत्या ज्योतींच्या समयी
जणू अंगणी स्वैर नाचती

उजळोन काळा निजतम अवघा
सूर्य उगवला प्रत्येकाचा
राख जाहली रिपू रिपूंची
राम चहुकडे आनंदाचा

सृजनाचा अवतार दीप हा
हाच दीप उद्धार तमाचा
प्रेमाचीही ऊब तयाची
तेजस्वी ओंकार मनाचा

चला जागवू ज्ञानदीप मग
तुमच्या अमुच्या रोज मनातुन
सौख्याचा नित घडो महोत्सव
रोज दिवाळी घरा घरातुन

आदित्य

Friday, October 25, 2019

काळ कधीही कोणासाठी थांबत नाही

काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
रोजच मरणे, तिळतिळ तुटणे संपत नाही

एक मित्र अन गुरू लाभला निर्गुण ईश्वर
निर्विकार पण तोही काही बोलत नाही

सोडुन आलो कितीक शहरे तुला विसरण्या
स्मृती तयांची परंतु पिच्छा सोडत नाही

मावळतीला सूर्य बुडोनी गेल्यावरती
उजेड नाही म्हणून रडणे चालत नाही

शेवट काही नसेल जर दु:खांचा माझ्या
वेदनेस गोंजारून जगतो, हरकत नाही

पाप पुण्य चे हिशोब माहित असून येथे
कोण भक्त होऊन आमिषे भोगत नाही?

वाट पाहतो रोज तुझी मी निर्मळ कविते
मुक्त निरंतर घन-घन जोवर बरसत नाही

आदित्य

पौर्णिमेचा चंद्र माझा

पौर्णिमेचा चंद्र माझा
चांदण्याचा रंग माझा
गंधवेड्या चांदराती
तू कधी होशील माझा

रातराणी दरवळूदे
गंध माझा विरघळूदे
अंतरी येशील का तू
होऊनिया श्वास माझा

चांदण्यांमधुनी भिजावे
अन तुला भिजवून जावे
मी तुझा पाऊस होते
अन तुझा मृदगंध माझा

चांदण्याचा स्पर्श व्हावा
आठवांवर न्यास व्हावा
अन उठावे भास ऐसे
की शहारे देह माझा

लहरुनी पानांवरोनी
झिरपुनी खिडकीमधूनी
चांदणे देऊन जातो
पौर्णिमेचा चंद्र माझा

आदित्य

Sunday, October 20, 2019

काळे काळे

नकोच काही आता जगती काळे काळे
सफेद कपडे कृत्य झाकती काळे काळे

निळे निळे आभाळ कधी का नको कुणाला
परी ढगांचे रंग सुखवती काळे काळे

पांढरपेशा स्वच्छ मनांवर दिसती पाट्या
'नको मुखवटे आणिक चेहरे काळे काळे'

निषेध होतो सच्च्या शब्दांचा कारण की
डाग कागदावरती पडती काळे काळे

आरशामध्ये उमटे ना प्रतिबिंब अचानक
तेजही कसे होऊन गेले काळे काळे

लावला जरी आज दिवा प्रत्येक घराशी
अथांग हे अवकाश उद्याचे काळे काळे

आदित्य

Saturday, October 19, 2019

पुरे अता

तेच तेच गोड गोड बोलणे पुरे अता
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे अता

रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोज तू 'उद्या उद्या' सुनावणे पुरे अता

एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता तुझे दुरावणे पुरे अता

गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त तू कपास लावणे पुरे अता

साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक तू अशी दुजास मारणे पुरे अता

संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज रोज खेळणे पुरे अता

आदित्य