Pages

Wednesday, June 28, 2017

दरवर्षी पाऊस येतो

दरवर्षी पाऊस येतो
ओले ओले करून जातो
चिंब चिंब गात्रांना पुन्हा
झिंग नव्याने देऊन जातो

ओल्या हिरव्या रंगांमधल्या
नवलाईची धरणी वरती
मुक्त करांनी करुनी उधळण
मेघ रिकामे करून जातो

आडोशाला पक्षी दोघे
बावरलेले अल्लड थोडे
अंतर त्यांच्यामधले नकळत
मिठीमधूनी मिटवुन जातो

अंग अंग रोमांचित करुनी
मंत्रमुग्ध सहवास होऊनी
भिजलेल्या रात्रीतून देखील
स्पर्शाने पेटवून जातो

पाऊस ऐसा हृदयी वसतो
स्मृतींतूनी हळुवार झिरपतो
ओठांवरती अलगद ओले
गाणे त्याचे देऊन जातो

--- आदित्य

Tuesday, June 27, 2017

श्वास मोजके मागुन घेतो

श्वास मोजके मागुन घेतो

देवळात व्यवहार नेमके जगावयाचे मांडुन येतो
अन स्वप्नांना गहाण ठेऊन श्वास मोजके मागुन घेतो

आरशात दिसणारा माणूस कोण असावा बरे कळेना
ओळख त्याची पटण्यापुरती तिथेच त्याला ठेऊन घेतो

इतक्या लक्ष्मणरेषा अवतीभवती  माझ्या काढून गेले
तरी नव्याने रोज एकदा रावण मजला ओढून नेतो

रोज सकाळी सूर्य उगवता साठवून घेतो मी थोडा
कैक भुतांना जळण्याला मग माझ्याकडचा प्रकाश देतो

कोसळताना पाऊस त्याच्या सर्वस्वाला अर्पण करुनी
सृजनाचे चैतन्य नव्याने घटाघटातुन धरेस देतो

आठवणींनी शहारलेले श्वास स्पंदता कणाकणातून
धुंद स्मृतींचा सुगंध त्यांचा भूतकाळ ओलांडुन येतो

--- आदित्य

Friday, June 23, 2017

सावली

सूर्य अस्ताला निघोनी 
रात्र उगवू लागली
मी तरीही शोधतो 
अजुनी स्वतःला सावली

पांघरोनी भीड दिवसा 
कोंडलेल्या भावनांच्या
जाणिवांची वेदना 
रात्री पुरी ओशाळली

जे मिळाले तेच तैसे 
चालवोनी घेतले
स्वप्न स्वप्नातच पहाया 
झोप राखुन ठेवली

श्वास माझे जुंपलेले 
ओढण्या आयुष्य आणिक
चक्र माझ्या पावलांची 
आंधळयाने धावली

ऊन वा अंधार 
सोसायास मी निर्ढावलो
ओल मायेची स्वतःच्या 
आसवांनी साधली

आदित्य

Tuesday, June 20, 2017

धुंद वाटा

धुंद हरवल्या वाटांमध्ये
सापडलो मी आज मला
स्वप्नांमधुनी तरंगताना
बहर प्रेमाचा फुलला

भारून सारा आसमंत
वर्षावातून अनुरागाच्या
अल्लड अवखळ मेघ नव्याने
इंद्रधनू वरती झुलला

ओल्या हिरव्या रंगांमध्ये
न्हाऊन उडता दोन पाखरे
तुषार अवघ्या नभी उधळूनी
चिंब पिसारा अवतरला

गूज सांगते लाडिक बिलगून
धुके कुंद घनदाट असे
की वाटावे मिठीत येऊन
पाऊस गाणे गुणगुणला

भाव भावना मनी उमलता,
स्पर्श शहा-यातुनी वाहता
गंध मनीचा मिसळून
मातीसंगे भवती दरवळला

गोल टपोरे मोती बरसून
सजवे पाऊस रूप तुझे अन
स्मृतींत अलगद चिरतन क्षण हा
ओठांनी हलके टिपला

नितांत निर्जन रानामध्ये
हात घेऊनि हाती ऐसे
श्वासांमधले अंतर संपून
काळ मिठी मधुनी थिजला

----आदित्य