Pages

Friday, June 23, 2017

सावली

सूर्य अस्ताला निघोनी 
रात्र उगवू लागली
मी तरीही शोधतो 
अजुनी स्वतःला सावली

पांघरोनी भीड दिवसा 
कोंडलेल्या भावनांच्या
जाणिवांची वेदना 
रात्री पुरी ओशाळली

जे मिळाले तेच तैसे 
चालवोनी घेतले
स्वप्न स्वप्नातच पहाया 
झोप राखुन ठेवली

श्वास माझे जुंपलेले 
ओढण्या आयुष्य आणिक
चक्र माझ्या पावलांची 
आंधळयाने धावली

ऊन वा अंधार 
सोसायास मी निर्ढावलो
ओल मायेची स्वतःच्या 
आसवांनी साधली

आदित्य

1 comment:

Unknown said...

मनाला चटका लावून जातात ह्या पंक्ती,
प्रत्येक कष्टकरी आणि आशावादी जीव या वाटेने जातोय असे भासते,
खूप बोलके ! खूप छान