Pages

Friday, October 31, 2014

परछाई

परछाईयों से डरता हूँ
पर उनकेही संग रहता हूँ
कभी दूरसे कभी पासमे
उनकेही संग चलता हूँ

डर जाती है अंधेरेमे
परछाई, और छुप जाती है
दिया जलाके रिश्ता अपना
और उजागर करता हूँ

शाम डूबती परछाईको
ले जाएगी दूर जहां में
वही कही वो बस जाती है
मैं एक तनहा सो जाता हूँ

सूरज की परछाई भी
खो जाती है किसी शहर में
सूरज बन के उस सूरज को
कुछ परछाई दे देता हूँ

-- आदित्य 

गाफिल


डोळ्यांदेखत मनास चोरून नेले पुरते
हृदय आजच्या इतके गाफिल कधीच नव्हते

ठोका चुकला तेव्हा कळले धोका झाला
कटात हृदयाचे धडधडणे सामील  होते

रोज स्वत:ला समजावून मी सांगत असतो
रोज नेमकी नजर तिच्या नजरेशी भिडते

कसे कळेना हुरहुर वाटे हवी हवीशी
कसे कळेना तिचेच हसणे स्वप्नी दिसते

--आदित्य
 

Tuesday, October 28, 2014

ठेच


मनास माझ्या थांबायाला सांगत नाही
ठेच लागुनी पडलो तरीही लागत नाही

वारा वादळ पिउन निघालो सूर्य गिळाया
तसे एवढ्यानेच पुरेसे भागत नाही

शब्दांना मी भावनांमध्ये म्यान करवतो
परी धार पिंजऱ्यात राहणे मानत नाही

भूक जाळण्यासाठी इंधन नकोच आता
झॊप तशी भरलेल्या पोटी लागत नाही

सावर आता जरा स्वत:ला, रोज सांगतो
तोल फक्त सांभाळुन नुसते चालत नाही

मनस्वितेची गुलाम सवयी आणिक व्यसने
उपभोगुनही बुद्धी आता बाधत नाही

--- आदित्य
 

Wednesday, October 22, 2014

दिवे लागले

मूक मनाच्या अव्यक्ताला 
अस्तित्वाचे तेज लाभले 
अंधाराच्या पणतीमध्ये 
चैतन्याचे दीप लागले 

कर्माच्या पुण्याईवरती 
लकेर आशेची अवतरली 
काळ स्मृतीतुन मागे सरला, 
तमास जाळुन तेज दाटले  

उन्मेषाची ज्योत कोवळी 
मोहक सृजनाने थरथरली 
ओंजळीतुनी जणू स्वत:च्या 
आनंदाचे अर्घ्य पाजले 

स्वर्गातुनही तारे येती 
खेळ खेळण्या पृथ्वीवरती  
खळखळते तेजामृत अवघ्या
मनी मनी उस्फूर्त वाहिले

दीप उत्सवामध्ये येथे 
प्रत्येकाची ज्योत तेवते 
हृदयामधले गीत सांगते 
दिवे लागले दिवे लागले

--- आदित्य 

Friday, October 17, 2014

तरंग


खडा टाकता पाण्यामध्ये कितीक उठती तरंग तेथे
निळे बुडबुडे सोडुन जाती भूतकाळचे तवंग तेथे

गहिऱ्या पाण्यावरती येती आणिक जाती कितीक लाटा
घेऊन येती स्वप्नांना अन ठेऊन जाती उमंग तेथे

कधी वादळे कधी उन्हाळे कधी धुक्याचे खेळ निराळे
तरी धरूनी असेल आशा आयुष्याचा पतंग तेथे

कडू तिखट ताटाचे जेवण रोज लाभते यथेच्छ येथे
परी शोधतो दोन घडीचा खाऊ थोडा खमंग तेथे

अशी कोठली शर्यत येथे पळतो आहे सदा सर्वदा
जिथे थांबतो पळता पळता उभा ठाकतो तुरुंग तेथे

अंधाराच्या वलयामध्ये नव्या नशेने पेटून उठतील
हजार डोळे, हजार जिव्हा, हजार वृत्ती सवंग तेथे


--- आदित्य

 

कधी जायचे

भविष्य केवळ रेघांमध्ये सोडुन  गेली
असी कशी आशाच निराशा करून गेली

'कधी जायचे' स्वप्नामध्ये काळ म्हणाला
'उद्या' म्हणोनी वेळ आजची मारून नेली

लाखांचीही उरली नाही फिकीर मजला
पैशांनी नात्यांची जेव्हा चिता मांडली

भले रोज मी नीटनेटका असतो तरिही 
घडी मनाची रोजरोजची विस्कटलेली

कधी वेळ सांगून का येते कोणावरती
हयात सारी वाट तिची बघण्यातच गेली


--- आदित्य