खडा टाकता पाण्यामध्ये कितीक उठती तरंग तेथे
निळे बुडबुडे सोडुन जाती भूतकाळचे तवंग तेथे
गहिऱ्या पाण्यावरती येती आणिक जाती कितीक लाटा
घेऊन येती स्वप्नांना अन ठेऊन जाती उमंग तेथे
कधी वादळे कधी उन्हाळे कधी धुक्याचे खेळ निराळे
तरी धरूनी असेल आशा आयुष्याचा पतंग तेथे
कडू तिखट ताटाचे जेवण रोज लाभते यथेच्छ येथे
परी शोधतो दोन घडीचा खाऊ थोडा खमंग तेथे
अशी कोठली शर्यत येथे पळतो आहे सदा सर्वदा
जिथे थांबतो पळता पळता उभा ठाकतो तुरुंग तेथे
अंधाराच्या वलयामध्ये नव्या नशेने पेटून उठतील
हजार डोळे, हजार जिव्हा, हजार वृत्ती सवंग तेथे
--- आदित्य
No comments:
Post a Comment