Pages

Wednesday, October 22, 2014

दिवे लागले

मूक मनाच्या अव्यक्ताला 
अस्तित्वाचे तेज लाभले 
अंधाराच्या पणतीमध्ये 
चैतन्याचे दीप लागले 

कर्माच्या पुण्याईवरती 
लकेर आशेची अवतरली 
काळ स्मृतीतुन मागे सरला, 
तमास जाळुन तेज दाटले  

उन्मेषाची ज्योत कोवळी 
मोहक सृजनाने थरथरली 
ओंजळीतुनी जणू स्वत:च्या 
आनंदाचे अर्घ्य पाजले 

स्वर्गातुनही तारे येती 
खेळ खेळण्या पृथ्वीवरती  
खळखळते तेजामृत अवघ्या
मनी मनी उस्फूर्त वाहिले

दीप उत्सवामध्ये येथे 
प्रत्येकाची ज्योत तेवते 
हृदयामधले गीत सांगते 
दिवे लागले दिवे लागले

--- आदित्य 

No comments: