Pages

Monday, September 28, 2009

प्रवासी


                 मी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न वाटत होतं. सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन भाषा, नवीन देश, सगळं नवीन. सगळे जण अनोळखी. कौतुकाने बघत होते माझ्याकडे. मी नवीन होतो ना त्यांच्यासाठी! दोन चार चहरे ओळखीचे वाटलेले. आधीच्या गावाला भेटलो असेन कदाचित. वातावरण प्रसन्न होतं. माझी खूप काळजी घेत होते. मीही सगळ्या हौसा मौजा भागवून घेत होतो. एकंदरीत, प्रवासाचा हां टप्पा अगदीच दृष्ट काढण्यासारखा होता
              त्यांची नवीन भाषा बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण यायचच नाही बोलता. त्यांना माझी भाषा समजत नव्हती आणि मला त्यांची. रडूच यायचं सारखं. मी ठरवलं सगळं शिकून घ्यायचं. भाषा, रीती रिवाज, वागणं बोलणं सगळं शिकून घेतलं या नवीन देशात चांगलाच रुळलो. नवीन म्हणता म्हणता यातलाच एक होउन गेलो.
             नव्याचे नऊ दिवस संपले. जुना झालो सगळ्यांसाठी. प्रवाहाताल्या ओन्डक्याप्रमाणे वाहू लागलो. काही दिशाच नव्हती. आधीची चांगली माणसं आता स्वार्थी झाली होती. प्रत्येक जण आपापला फायदा बघत होता. मीही ओढला गेलो यातच.. नकळत. 'तुझे माझे' हिशोब, 'सुख दु:खाचा' बाजार सुरु झाला. सगळ्या गोष्टी फायद्यात मोजल्या जाऊ लागल्या. माझ्यासमोर इतरांची घरं पडत होती. लोकं घर सोडून निघून जात होते. नको झालं सगळं.
                मी पडलो प्रवासी. प्रवास करणे हेच माझे उद्दिष्ट्यं. थांबता येणार होतं थोडच? सगळं जपून प्रवास सुरूच होता. पण आता जवळची माणसंही अनोळखी वाटायला लागली होती. बरेच जण लांब कुठेतरी निघून गेले होते. प्रवासीच शेवटी ते!! माझही घर आता मोडकळीस आलं होतं. पोपडे निघायला लागले होते, कुठे गळती सुरु झाली होती. कौलं पडायला लागली होती. घर बदलायची वेळ आली होती. या देशात तसा खूप मोठा पसारा मांडला होता मी. पण मी एक दमडीही बरोबर घेणार नव्हतो. त्यामुळे भोवतालची सगळी भुतं एव्हाना विचारपूस करू लागली होती. हिशोब कागदावरून खिशात पाडायचा होता त्यांना. नाहीतर फक्त माझ्यासाठी म्हणून कोण येणार होतं?
                एके दिवशी अगदी पहाटे मी निघालो घर सोडून. एकटाच..! जसा आलो होतो तसाच. कोणाचाही निरोप द्यायचा-घ्यायचा नव्हता मला. कोणालाही बरोअर घ्यायचे नव्हते. बरोबर होता एक नकाशा आणि जमाखर्चाची डायरी.बस्स!! इथवरचा प्रवास संपला होता. नकाशावर पुढचा देश उमटला होता.मी किती दिवस, महीने, वर्ष तो देश शोधत हिंडत होतो माहीत नाही. खूप दमलो होतो. कित्येक जंगलं, नद्या समुद्र पार केले होते. शेवटी सापडला एकदाचा नवीन गाव. अंधारातून लांब कुठेतरी दिवा दिसावा तसा. धावतच वेशीपाशी आलो. वेशीतून गावात शिरताना अचानक भोवळ आली. काय झालं ते कळलच नाही. शुद्ध हरपली माझी . नन्तरचं काही आठवत नाही नेमकं काय झालं ते.
               मी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न वाटत होतं. सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन भाषा, नवीन देश, सगळं नवीन।!!!

-----आदित्य देवधर


Wednesday, September 23, 2009

दृष्टी

फुलं विकत घेता येतात पण गंध कसा घेणार? मूर्ती बघता येते, त्यातला देव कसा बघणार ? त्याला दृष्टी लागते। याचा बाजार मांडता येणार नाही। मला गंध हवाय, नुसती फुलं नकोत फवारे मारलेली। की जी नाकाला वास देतात। रातराणीचा, प्राजक्ताचा वास घेतल्यावर बागेश्री ऐकू येत नाही तोवर ती फुलं आणि वास दोन्ही फोलच। ही पण तशी एक दृष्टीच। तसा दृष्टीचा डोळ्यांशी संबंध नाहीए। डोळे पूर्णपणे अवयव आहेत। दृष्टी श्वासात, रक्तात लागते। धबधबा आणि समुद्र दोघांनाही पाणी म्हणणारी काय डोळस म्हणायची? असले डोळे म्हणजे प्रकाश बघणारी भिंग आहेत नुसती। अशांना अंधार कसा दिसणार? अंधार आहे म्हणुन प्रकाशाला महत्व आहे। अंधार नेहमीच वाईट नसतो। आपल्या शरीराताही अंधार आहेच की! थोडं या अंधारात डोकवायला पाहिजे। अंधार ऐकायला पाहिजे। इथे अवयव संपून दृष्टी सुरु होते। जिला मिति नसते, गती नसते। फक्त दृष्टांत देते ती ! दृष्टी !!

-------- आदित्य देवधर

कागद

डोळ्यांत पुरावा होता,
शब्दास मिळाला  होता
ओळीमधल्या रेघांतून
हा कागद संपला होता

रेघांच्या तिरक्या वाटा
मी मागे सारत होतो
वळणावर कोपऱ्यावरच्या
हुंकार थांबला होता

एका नाजुक ओळीवरती
जखम जाहली होती
अदृश्य तिथे रक्ताचा
मी थेंब पाहिला होता

वर्षे लिहिण्यातच गेली
अन बोटे झडली आता
अखंड हळव्या शाईचा
अतिरेक जाहला  होता

एका कातर सांजेला
आटली लेखणी माझी
रेघांच्या विळख्यातुन तेव्हा
हा कागद सुटला होता

----- आदित्य देवधर

Saturday, September 19, 2009

कमरा

यादे बंद कमरे में रखने की आदत है तुम्हे
कमरा बंद रखते हो पर चाबी खोने का गम नही
कोई झाँक कर देखे भी तो क्या देखे टूटी खिड़की से ,
अंधेरेसे गीली हुई जमीन और दीवारों पर नम कहीं

रौशन लकीरें तरस गयी है भीतर आने कों
खिड़की को भी साँस लेने दो कभी यूँही
ये सोई हुई यादें ताजा होने का डर है तुम्हें
और यादोंकों छुपना है सोये अन्धेरोमे कहीं.

अब यादोंको उजाला मिल भी जाए तो क्या हो
ये रोशन यादे जुगनू बनके उड़ने वाली नहीं
दीवारोंपे रंग भी लग जाए तो क्या हो
कमरे में बसी तस्वीर हटने वाली नही



--------------आदित्य देवधर

थेंब

दरवाजावर कोणीतरी ठोठावलं अवेळी
फटीतून हळूच बघितलं मी कोण आलय लपून
थोडा ओलावा आलेला भेटायला सहजच
मी दरवाजा बंद करून घेतला हसून
एक थेंब तरी आलाच अन अनेक त्यामागुन!

थेंबात मी पाहिले, त्याचे अंग थरथरले
ओठावरचे हसू होते पण किंचित ताणलेले
कुठेतरी जायचे होते त्याला भेटायला
कोणीतरी असेल त्याची विचारपूस करायला
वेळेची वाट बघत होता तो इथेच गप्प बसून
पण एक थेंब आलाच अन अनेक त्यामागुन!

काय सांगू , चंद्र गाठायचा होता त्याला
प्रेमाचा स्वर्ग साधायचा होता त्याला
खुप खटपट पाहिली होती मी त्याची
कोंडलेल्या वेदनेला शांत करण्याची
संवेदना जिंकली अन बांध पडला तुटून
इथेच रडायचे होते त्याला माझ्यापाशी बसून
पुन्हा एक थेंब आला आणि अनेक त्यामागुन!!!!


--------- आदित्य देवधर

Friday, September 18, 2009

स्वप्न

कल्पनेतली तुझी आठवण कशी साठवू नयनी
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी

विझलेल्या रातीच्या प्रहरी
गुडूप गाढ झोपली सारी
अशी जाहली गम्मत न्यारी
वाऱ्यावर उडवून बटाना टाकून कटाक्ष जुलमी
आली सुंदर नार सामोरी निखळ रम्य हासुनी

डोळ्यावर विश्वास बसेना
हृदयाचा ठोका चालेना
झाले मजला काय कळेना
हात धरुनी माझा हाती स्वप्नसुंदरी वदली
तुला भेटण्या आले इथवर सर्व बंध तोडूनी

काय मी वर्णू रूप तिचे
चंद्राला लाजवेल असे
नक्षत्राचे तेज दिसे
आकाशातून शोधून कोणी तिला जशी आणली
तिच्या अभावी जणू तारका व्यथित जाहल्या गगनी


----------------- आदित्य देवधर

Wednesday, September 16, 2009

सोबत

आर्त ओलसर डोळ्यांनी मी वाट पाहिली होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती
निरोप आला होता मजला खेळ संपल्याचा
स्मृतित तुझिया जगण्यामध्ये वेळ संपली होती

डोळ्यांच्या करुनी वाती मी रात्र जागवत होतो
लाल जांभळ्या पेल्यातून मी स्वत:स रिचवत होतो
डोळ्यांतुनी पेल्यात मूक आसवे झिरपत होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती

रात्र टपोरी होती न्हाऊन रूप उजळलेली
चंद्र उसळला होता नभी नक्षी विस्कटलेली
मी एकटाच चालत होतो , सावली सोडली होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती

दिसलीस मजला नदीकिनारी सोडून मोकळे केस
सोबत नव्हते कोणी चरणी निव्वळ अवखळ फेस
ओल्या वाळुत अलगद माझी अक्षरे उमटत होती
दूर कुठे वळणावरती मी हाक ऐकली होती



-------------------------- आदित्य देवधर