Pages

Wednesday, March 31, 2010

आई

मायेचा परमेश्वर तू, वात्सल्याचा वसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

दैवी अमृताचा तू पान्हा मजला दिला
संस्कारगंध माझ्या श्वासात आरोहिला
परतोनी माय देऊ गंधास आता कसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

हाक कानी पहिली तुझीच ऐकू आली
दृष्टीस माझ्या, आई, तुझीच मूर्ती आली
शब्दास लाभला तुझिया, गंधर्वाचा ठसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

अंगणात अडखळताना आधार तुझा होता
भूक लागता मजला पहिला घास तुझा होता
डोळ्यात आनंदाचा गंगौघ दाटला जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

पिलास चिमण्या देशी तू ढगाएवढी माया
पंखाखाली घेशी माझी इवली इवली काया
थोपटताना पाठीवरला  हात राहुदे असा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

आशीर्वाद पाठी मजला तुझा सर्वदा मिळे 
पूत अंजनीचा जावोनी मग सूर्यालाही गिळे
तुझ्याच चरणी अर्पण माझ्या कर्तृत्वाचा पसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

तुझी घडावी सेवा आई भाग्य लाभुदे मला
कोटि कोटि उपकार तुझे, वंदन माते  तुला
निरपेक्ष तू, निस्वार्थ तू, कर्मयोगी जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

-------- आदित्य देवधर

Friday, March 26, 2010

गाणे

मज ठाऊक आहे तुझ्या मनीचे ओले भिजलेले गाणे
रुसवे फुगवे लाख लाख परी मृदुल तराणे गाणे
हृदयामधुनी ओठांवरती अलगद अल्लड गाणे
नाजुक तारा शोधुनी परी छेड़े लोभस  गाणे
शब्द शोधती क्षितिजाच्याही पलीकडले मधु गाणे
गाता गाता मंजुळ सुस्वर गाती तुझेच गाणे

अंगावरती फुललेल्या मोरपिसाचे गाणे
चंद्रावरती भुललेल्या नक्षत्राचे गाणे
कमलावरती थिजलेल्या थेंबाचेही गाणे
फूल चुम्बुनी भ्रमराच्या प्रेमाचेही गाणे
मेघ बरसुनी धरतीवरती वर्षाकाळी गाणे
ताल धरुनी पानांवरती ओघळणारे गाणे
जीव भरुनी दगडांमधुनी पाझरणारे गाणे
निळ्या जांभळ्या प्रतलावरती हिरवळणारे गाणे

हे गाणे तू गाऊन जा, स्वर हृदयी बरसून जा

-------आदित्य देवधर 

पाहते

पाहते तुज पाहते लाजते मी लाजते
भावगंधित होउनी भाळते मी भाळते

मोहरून शहारती अंगअंगीची पिसे
काननी मयुरासवे नाचते मी नाचते

फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी हासते

चंद्रकोर उजाडुनी रात ना जावो कधी
कोवळ्या किरणांतुनी भारते मी भारते

बासरी कुठुनी बरे सूर छेडी लाघवी
कुंद धुंद सुरावरी डोलते हिंडोलते

सागरावर लाट येता मनासी वाटते
अर्पुनी अवघे स्वत: वाहते मी वाहते

सांजवेळ किनारली, कृष्णवेडी सावली
दीप मी चरणी तुझ्या लावते, ओवाळते

अंतरी नयनातुनी पाहिले रे मी तुला
राजसा तव मीलना, धावते मी धावते

-------- आदित्य देवधर

Tuesday, March 23, 2010

ताटातूट

बोलावयास माझ्यापाशी कुणीच नाही
मी हाक मारलेली, आले कुणीच नाही 

गाण्यात भावनांची दाटी तुडुम्ब झाली
बाजार संगिताचा येथे उगीच नाही

कुंथून गावयाच्या झाल्या फुशारक्याही
अर्थास दाद देण्या दर्दी कुणीच नाही

झाकून पाहिले मी, हासून पाहिले मी
डोळ्यांस आसवांची ताटातुटीच नाही

देवास वाटलेले थोड़े समोर यावे
भक्तात दर्शनाची दृष्टी मुळीच नाही

------- आदित्य देवधर

जाऊ नको

विझवून रात माझी, तू आज जाऊ नको
भरतीस लाट येता , आटून जाऊ नको

नुकतेच चंदनाने मी आज गंधाळले
नुसताच एकट्याने चंद्रात न्हाऊ नको

कसली शराब मजला, डोळ्यातुनी मिळाली
असल्या नशेत धुंदी होण्या सराऊ नको

अजुनी न वेळ गेली, रातीस चाखण्याची
अंधार जागवूनी  तू दूर राहू नको

असले कसे तुझे रे प्रेमास लाजावणे
निरपेक्ष जोगियाच्या गीतास गाऊ नको

तुजला कळे न माझे होणे परीसापरी
मधुस्पर्श मीलनाचा सोडून जाऊ नको

--------- आदित्य देवधर

Monday, March 22, 2010

गर्दी

प्रेमात भावनांची गर्दी उगीच झाली
नशिबातली कहाणी आता खरीच झाली

बागेतली गुलाबी झाडे मलूल झाली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

आव्हान देत होतो दररोज वेदनांना
जखमा उगाळण्याची चर्चा बरीच झाली

स्वप्नांत जाळण्याला दिधल्या कितीक राती
झोपेत जागण्याची बुद्धी उगीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली

मी पाहिला दिखावा खोटाच भोवताली
अंगात लक्तरांची मारे जरीच झाली!

---------- आदित्य देवधर

Friday, March 19, 2010

साक्ष

गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

हात हाती घेतलेला
मी असा घामेजलेला
तू करारी  पाहुनी मी
धीर मोठा वेचलेला
तू दिलासाही दिलेला
श्वासही धीरावलेला
हे निघालो दोन प्रेमी
सोडुनी नाती निकामी
साथिला होताच सारा
भोवताली धावणारा
.......गार वारा बोचणारा

वेग होता या मनाचा
चांदण्याला गाठण्याचा
सावल्यांची खूण होती
वेळ ही नव्हता क्षणाचा
मी निघालो वायुवेगे
भारलेली प्रीत रंगे
धूळकाटया सोबतीला
रातिचा काळोख संगे
बेत होते कोण जाणे
ठार वेडे की शहाणे
साक्ष देई दूर तारा
चांदण्याचा ही इशारा
.......गार वारा बोचणारा

हाय जेव्हा झोक गेला
काळ सामोरीच आला
मी मनाशी ठाम होतो
एकट्याने वार केला
देवही खोटे निघाले
दैत्य सारे एक झाले
घेउनी गेले तिला ते
रक्त माझे क्षुब्ध  झाले
पाठलागी लागलो मी
धावलो मागे तया मी
घेउनी तिजला निघालो
आड़ वाटा शोधुनी मी
संकटांची फौज मागे
धावताना ठेच लागे
तेथ होता मार्ग एकच
घेतल्या शपथांस  जागे
दोन प्रेमी पाखरे ती
धावुनी टोकास जाती
देउनी आलिंगना ते
सोडुनी देहास देती
शेवटी एकत्र आले
प्राण-देही एक झाले
मिसळले मातीतुने ते
श्वासही तेथे निमाले

घोर तेथे लावणारा
साक्ष सारी वेचणारा
दोन थेंबे सांडताना
गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

-------------- आदित्य देवधर

Thursday, March 18, 2010

एवढेचि मागणे

दे अम्हाला दान देवा एवढेचि सांगणे
ज्ञान शक्ती दे विवेकी, एवढेचि मागणे

काळ रात्री पाचवीला आमुच्याचि पूजिल्या
सूर्य येथे मज दिसावा एवढेचि मागणे

पोट झाले पापभीरू, सांगतात आतडी
जेवण्यासी घास द्यावा एवढेचि मागणे

माजले आहेत येथे मंदिरात भामटे  
बाहु माझे सळसळूदे एवढेचि मागणे

सूर आले माझिया दारी कसे नभातले
ते गळी राहो भरोनी एवढेचि मागणे

माझिया देहास लाभो भाग्य दीपकापरी
प्राण राहो वा न राहो एवढेचि मागणे

------- आदित्य देवधर 

करणार आहे

आज श्वास मी मोकळा भरणार आहे    
मुक्त वाट डोळ्यांतुनी करणार आहे

मागची  लढाई जरी बिनधास्त होती
आज मी  युद्धाचा बळी ठरणार आहे

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

तांबड़े  रक्त वाहिले धरित्रीस मागे
रंग तोच  मातीतुनी उरणार आहे

काळ होत मी बांधुनी कफनी ललाटी
आग ओकुनी  वादळी  उठणार आहे

कायदा जरी बाटला  मगरूर हाती,
न्याय तोच जो मी दिला असणार आहे

एवढ्यात का हो तुम्ही केली चढ़ाई?
एकटाच भारी रणी ठरणार आहे

------- आदित्य देवधर

Friday, March 12, 2010

खादाड पंगत

खाउनिया गोड | साखरेची जोड |
चरण्याची खोड | लागलेली  ||

पंगतीचे पान | भरोनिया छान |
विसरून भान | खाऊ लागे ||

पानाचिये पुढे  | तुटोनिया पड़े  |
वाढप्यांची उड़े | तारांबळ ||

जेवताना श्लोक | म्हणण्याचा षोक |
पुण्यवंत लोक  | राखतात ||

आग्रहाचा घास | भरवाया ख़ास |
बायकोचे पास | जाऊ लागी ||

बायकोने घ्यावं | नव-याचे नाव  |
लाजण्याचा आव | आणोनिया ||

पैजेचाही खेळ | कितीतरी वेळ |
हिशेबाचा मेळ | घालितासे ||

संपता पंगत | तोंड ही रंगत |
खादाड संगत | आजूबाजू ||

पडावे निवांत | दुपारी एकांत |
घोरोनिया प्रांत | हादरावा ||

पुढच्या सणात | कोंणाच्या कशात |
चर्चा ही घरात | चालू राही ||

भूक भागावी | इतकेचि खावे |
म्हणतात सारे | संतजन ||

म्हणोनि  अभंग |  भरोनिया रंग |
खादाडांसी दंग | चला करू ||

------- आदित्य देवधर

व्हायचे ते

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?

आज आले जरी अवसान हाती
पार नेण्या तुला पुरले कधी का? 

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?

धूमकेतू झणी स्फुरता ,  करंटे
आडवाया तया धजले कधी का

हस्तरेषा ख-या पुसल्या कुणीही
व्हायचे ते जगी चुकते कधी का?

 ---------- आदित्य देवधर

Sunday, March 7, 2010

कधीच ... नाही !!

देवाच्याही मदतीला कधीच गेलो नाही
जळलोही पण पुरता कधीच मेलो नाही

मज होते फुटलेले पंख नवे, उडण्याचे
परवाने मिळवाया कधीच गेलो नाही

प्रेमाचा अश्रू ओला डबडबलेला हाती
मिटून घेण्यासाठी कधीच गेलो नाही

गरजांना उघडे माझे दार तिजोरीचे
गरजूंचा हिशोब करण्या कधीच गेलो नाही

अभिमन्यूसम मी निधडा पडलो धारातीर्थी
भीक मागण्या पायी कधीच झुकलो नाही

अंगावरच्या ताज्या युद्धाच्या जखमा माझ्या
मिरवून विकण्यासाठी कधीच गेलो नाही

-------- आदित्य देवधर

उष्टे

महालातुनी भोगलेले
सूर उष्टे झोंबले
मुक्यानेच देती शिव्या
दरिद्री खुराडयातले

फितूरी अशी का जाहली
माझ्याच आसवांची
विझविती चितेस अश्रू
माझ्याच डोळ्यातले  

करायास चैनी लांडगे
मोकाट भोवताली
मला टाकती उष्टे, शिळे
यांच्याच ताटातले  

कधी लाभला पूर
मनसोक्त भोगावया
कधी मजवरी थुंकले
पंडिती थाटातले

यांचाच रंग येतो
देवा तुझ्या राऊळी
जरी गाळले येथे
मी तांबडे रक्तातले

----- आदित्य देवधर

सांग तुला मी काय म्हणू

म्हणेल कोंणी तुला अप्सरा
गगनाची तारका जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू

लाल चुटुकसे ओठ तुझे
गुलाबास लाजवील असे
दोन पाकळ्या भिजलेल्या
तीवर नाजुक थेंब दिसे
दाखवुनी वाकुल्या मला
ओठांना लागले म्हणू
"रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू "

न्हाउनी उजेडात कुंतल
सोनेरी निर्झरी दिसे
लबाड वारा संधीसाधू
उधळे स्पर्शभरित पिसे
कानामधला झुमकाही मग
वाजू लागे रुणूझुणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


हास्य तुझे मोहक लोभस
भान हरपुनी न्हात बुडावे
नजरेमधुनी खट्याळ खोडी
करताना तू मनी वसावे
तुझ्या अनोख्या अंदाजाने
शहारले मम अणू अणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


नक्षत्रांची सखी म्हणू की
खळखळणारी नदी म्हणू
लसलसणारी कळी  कोवळी
की पुनवेची परी म्हणू
नभी साजिरा चमचमणारा
शुक्र लाजला तुला जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


--------आदित्य देवधर

Wednesday, March 3, 2010

मिटोनिया पापण्या

दुपारची शांतता काय सांगते बरे
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

रुसेल का पाहुनी टीम लीड चावरा
बगांस मी झेलुनी रोज काम आवरे 

समोरचा लैपटॉप नको आज वाटतो
फितूर या पापण्या आज काम फार रे

कसाबसा संपला कोड रिव्ह्यू आजचा 
उठोनिया पेंगुनी मी मलाच सावरे

लगाम मी घातला घोरण्यास चोरटा
नको नको सांगती श्वास होत घाबरे  

कधीतरी येत जाग डोकवून आतुनी
इथेतिथे पाहती लपून नयन  बावरे

भिऊ नको तू उगा कोण काय बोलती
जळोनिया आतुनी हे तुझे कलीग रे

करोनिया बाजुला डॉक्यूमेंट फालतू
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

जमावया लागता  झोप डोळीयांवरी
झुकोनिया डेस्कवरी  मस्त झोपतो बरे  

 -------- आदित्य देवधर