मायेचा परमेश्वर तू, वात्सल्याचा वसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
दैवी अमृताचा तू पान्हा मजला दिला
संस्कारगंध माझ्या श्वासात आरोहिला
परतोनी माय देऊ गंधास आता कसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
हाक कानी पहिली तुझीच ऐकू आली
दृष्टीस माझ्या, आई, तुझीच मूर्ती आली
शब्दास लाभला तुझिया, गंधर्वाचा ठसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
अंगणात अडखळताना आधार तुझा होता
भूक लागता मजला पहिला घास तुझा होता
डोळ्यात आनंदाचा गंगौघ दाटला जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
पिलास चिमण्या देशी तू ढगाएवढी माया
पंखाखाली घेशी माझी इवली इवली काया
थोपटताना पाठीवरला हात राहुदे असा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
आशीर्वाद पाठी मजला तुझा सर्वदा मिळे
पूत अंजनीचा जावोनी मग सूर्यालाही गिळे
तुझ्याच चरणी अर्पण माझ्या कर्तृत्वाचा पसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
तुझी घडावी सेवा आई भाग्य लाभुदे मला
कोटि कोटि उपकार तुझे, वंदन माते तुला
निरपेक्ष तू, निस्वार्थ तू, कर्मयोगी जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?
-------- आदित्य देवधर
No comments:
Post a Comment