आठवणींच्या कट्ट्यावरती बसून येतो
हसून येतो, कधी मोकळे रडून येतो
विझू लागता निखार जळत्या धूनीमधले
श्वास उबेचे भात्यामध्ये भरून येतो
तुझ्या स्मृतींची पाने वाऱ्याने उलगडता
गंध फुलांचा तिथे अचानक कुठून येतो?
जिथून गेलो सोडुन अल्लड निखळ क्षणांना
तिथेच आता दुनियाभरचे फिरून येतो
रोजरोजची सगळी कटकट विसरुन पुन्हा
नव्यानेच मी स्वप्ने गोळा करून येतो
कणाकणाने रोज स्वत:शी मरता मरता
क्षणात सारे कट्ट्यावरती जगून येतो
---आदित्य