Pages

Sunday, December 2, 2018

रिकामे

स्वप्नांमधुनी येती, सरती प्रश्नांचे आभास रिकामे
उरती केवळ मंद निरुत्तर गहिवरलेले श्वास रिकामे

अंतापर्यंत जगण्याच्या मी वाट पाहतो मोजत घटका
संपत नाही जीव परंतु जळून जाती तास रिकामे

मैफिलीत कोरड्या शोधतो ओलाव्याचे थेंब जरासे
आणि उचलतो प्याले हासत लावुनिया ओठांस रिकामे

साथ सोडता तुझी हरवलो गर्दीमध्ये असा एकटा
की भरलेले जगही वाटे मला पुन्हा जगण्यास रिकामे

ओहोटीचा एकच आता असेल जर पर्याय समोरी
कशास मग लाटांच्या वरूनी स्वार व्हायचे ध्यास रिकामे?

मुक्तीच्या रांगेत पाहतो स्वतःस मी  पिंजऱ्याच्या आडुन
आ वासुनिया मला चिडवती बाहेरिल गळफास रिकामे

विरून जातील तुझे नि माझे शेवटचे संदर्भ अताशा
गळतिल अश्रूंसवे स्मृतींचे उरलेले सहवास रिकामे

--आदित्य