आज विवेक सकाळी लवकर उठला. म्हणजे जरा अंमळ लवकरच. त्याच्या कॉलेज च्या classmates ची Reunion Trip होती. आणि ट्रिप म्हणजे गाणी, गेम्स शिवाय काही खरं नाही. विवेक कॉलेजला असताना छान गायचा आणि त्याला हे माहित होतं. त्यामुळे याचा तो पुरेपूर फायदा करून घ्यायचा. गाणं कळणाऱ्या , ना कळणाऱ्या अशा सगळ्यांना तो हवा असायचा. चांगलाच भाव मिळायचा त्याला. ही ट्रिप पण याला काही अपवाद नव्हती. त्याचा गाण्याचा छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठीची गाणी, lyrics , त्यांचे tracks , स्पीकर वगैरे वगैरे तयारी चालू होती. सगळी कामं आटपुन, घरच्यांना टाटा बाय बाय करून विवेक ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहोचला. त्याला मुळात खात्रीच नव्हती कि बाकीचे वेळेत येतील. आधीचे ३५ येणारे आता १४ वर आले होते. एवढा 'दांडगा' उत्साह जरा चिंताजनकच वाटत होता त्याला. पण ७-८ ओळखीचे चेहरे बघून त्याला जरा बरं वाटलं. त्याला कल्पना नव्हती कि पुढे नेमकं काय घडणार आहे.
अक्षय, तुषार, मेधा वगैरे तेव्हाचे जवळचे चेहरे एकदम वेगळे दिसायला लागले होते. पोक्त, सुटलेलं पोट, डोळ्याखाली dark circles, टक्कल, पांढरे केस वगैरे वगैरे. वय वाढल्याची सर्व लक्षण अगदी सहजपणे दिसत होती. क्षणभर त्याला वाटलं, हेच का ते, ज्यांच्याबरोबर कॉलेज ला धम्माल केलेली...! अर्थात तोही बदलला होताच की. पण स्वतःलाच स्वतःमधले बदल सांगणारे आरसे अजून तयार व्हायचेत. त्यामुळे सगळेच जण एकमेकांची चेष्टा, मजा करत खिदळत जुन्या दिवसांची उजळणी करण्यात व्यग्र झाले होते.
तेवढ्यात विवेकला मागून "Hi विवेक " अशी हाक ऐकू आली. विवेकने Casually मागे वळून बघितलं. आणि क्षणभर त्याचं हृदय धडधडणं थांबलं. एक अनामिक शहारा अंगावरून सरसरत गेला. हाक मारणारी दुसरी कोणी नसून अमृता होती. विवेकला पूर्णपणे अनपेक्षित होती ती इथे. काही क्षण विवेक तिच्याकडे हरवल्यासारखा पाहतच राहिला. ते काही क्षण तिथे केवळ तो आणि अमृता असे केवळ दोघंच होते. ट्रिप, गाणी, गेम्स आणि बाकी सगळं विसरला होता तो. आयुष्यात असे काही क्षण येतात कि जे साठवून पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. असाच होता हा क्षण त्याच्यासाठी. एक सुखद धक्का. हवाहवासा वाटणारा. अमृता फक्त स्मितहास्य करत विवेकला न्याहाळत होती. तर आनंद, रुसवा, प्रश्न, उत्तरं अशा भावनांची चेहऱ्यावर सरमिसळ होऊन विवेकचा झालेला पुतळा बघण्यासारखा होता. अमृताला तो १२ वर्षांनी भेटत होता. आणि ती काळाला ना जुमानता आलेल्या एका सुखद स्वप्नासारखी प्रत्यक्षात समोर दिसत होती. तेच खट्याळ डोळे, लोभस हसणं, भरभुरणारे केस, गळ्यातल्या scarf शी चालू असलेला चाळा ..काय काय म्हणून साठवू असं झालं होतं त्याचं.
"विवेक... गुड मॉर्निंग ..! पुन्हा थोडी लाडिक हाक मारत तिने हात पुढे केला. विवेक अजूनही धक्क्यातच होता. त्याने तंद्रीत तसाच हात पुढे करून तिला विष केलं. "गुड मॉर्निंग." आणि एकदम तो भानावर आला. स्थळ काळ प्रसंग लक्षात आल्यावर तो चटकन वळला आणि इतर मित्रांशी बोलायला गेला. प्रचंड आनंद झाला होता त्याला. त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. अमृताही हसून इतरांशी बोलायला गेली. तिला यापेक्षा काही वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. तिला 'विवेक तस्साच आहे अजून .. 'असं वाटून बरं वाटलं. खरं तर तिची परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. तिलाही खूप खूप आनंद झाला होता. तिने तो चेहऱ्यावर दाखवला नाही.. बस्स.
आता हा सीन बघून 'हरकत नाही... चालायचंच ..!' वगैरे म्हणून सोडून देणारे ते मित्र कसले. ट्रिप ला लागणारा मसाला मिळाला होता त्यांना आयताच. सगळ्यांना त्यांच्या नात्याची आणि सद्य परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. पण तरी विवेकला चिडवणं सुरु झालंच होतं. विवेक लाजत होता, अमृता हसत होती, आणि दोघांनाही ते कुठेतरी आवडत होतं. वर्तमानाच्या साखळ्या थोड्या सैल झाल्या होत्या... भूतकाळात थोडावेळ फिरून येण्यापुरत्या.
सगळ्यांचं एकमेकांना जुजबी भेटून झाल्यावर सगळे बसमध्ये बसले. त्यांनी ट्रिप साठी एक रिसॉर्ट बुक केलं होतं. आणि तिथे जाऊन फुल्ल टाईमपास होणार होता. तसा reunion वगैरे ला फार काही वेळ लागत नाही. अर्धा पाऊण तास भेटून खरं तर जी व्हायची ती union होणार असते. पण हा अजेंडा नसतोच मुळी अशा ट्रिप ला. रोजच्या टाईमटेबल पेक्षा काहीतरी वेगळं, नेहमीच्या पब्लिक पासून दूर, काहीतरी नवीन अनुभवायचं असतं. किंबहुना अशी गरज असते प्रत्येकाची. असं काही केलं कि पुन्हा रोजच्या आयुष्यात oiling केल्यासारखं नव्याने तुमचं इंजिन पळायला तयार! ही ट्रिप पण अशीच होती. बसमध्ये बसल्यापासून दुसऱ्या दिवशी बसमधून उत्तरेपर्यंतचा प्लॅन तयार होता. विवेक ऑलरेडी आत जाऊन खिडकी पकडून बसला होता. हळूहळू सगळे आपापली सोय बघून कुणाकुणाच्या बाजूला जाऊन बसले. पण विवेकच्या शेजारी मुद्दाम कोणी बसलं नाही. सगळ्यांना वाटलं अमृता बसेल. विवेकलाही तसंच वाटलं. पण अमृता दुसरीकडेच जाऊन बसली. 'आपण का करतोय अपेक्षा हिच्याकडून? अशी कुठली आपुलकी उरली आहे कि तिने माझ्या शेजारी येऊन बसावं?' विवेक स्वतःलाच प्रश्न करत होता. पण जरा रागही आला होता त्याला. '१२ वर्षांनी भेटून देखील तिला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये की काय...? की मीच जास्त एक्ससिटेड आहे?' असही त्याला वाटून गेलं. थोडा खट्टू होऊन तो खिडकीबाहेर बघायला लागला आणि गाणी, भेंड्या, गप्पा सुरु झाल्यावर पुन्हा नॉर्मल झाला. विवेक आणि अमृता इतरांशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होते. पण एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत. दोघांची कित्येकदा नजरानजर झाली खरी. पण कधी विवेक नजर चोरत होता तर कधी अमृता. हे एक सोडलं तर ट्रिप ला लागणारे बाकी सगळे ingredients तिथे उपलब्ध होते. फक्त विवेक आणि अमृताचं reunion अजून झालं नव्हतं.
त्यांचा बसचा प्रवास ४-५ तासांचा होता. सुरुवातीचे २-३ तास सगळे किलबिलाट करून शांत झाले आणि जुन्या आठवणीत रमून गेले. विवेक अमृताची कट्टी अजूनही कायम होती. कोणी सुरवात करायची? काय बोलायचं? ... काय काय बोलायचं? असे अवघड प्रश्न भिंत बनून उभे होते दोघांच्या समोर. विवेक मनातून थोडा अस्वस्थ होता. त्याला अमृता भेटेल याची मुळीच अपेक्षा नव्हती. तिच्यासमोर कसं वागायचं, याची काहीच तयारी नव्हती त्याची. खरंतर बोलण्यासाठी एवढं होतं... पण शब्द अजूनही वाट शोधत होते बहुतेक. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाही बसमध्ये. पण धीर होत नव्हता कि शब्द सुचत नव्हते हे त्याचं तोच जाणे. अमृता पण excited होती पण ती prepared होती. विवेक भेटणार याचा तिला कोण आनंद झाला होता. पण तिला तिथे सगळ्यांसमोर चेष्टेचा विषय व्हायचं नव्हतं. त्यांचं नातं म्हणजे चेष्टा नव्हती. नियतीने चेष्टा केली होती ही गोष्ट वेगळी. तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होता. एक ट्रिप अपुरी होती त्यासाठी. पण अधीरपणे वागून तिला या संधीचा चार्म घालवायचा नव्हता. तिला खात्री होती की दोघांना त्यांचा असा एकांत नक्की मिळेल. त्यामुळे संपूर्ण प्रवासात ती एकदम relaxed होती.
रिसॉर्ट वर पोहोचल्यावर ठरलेल्या प्लॅन प्रमाणे कार्यक्रम सुरु झाला. अशा reunion ला काही उत्साही मंडळी फार गरजेची असतात. हे सगळं ठरवणारी. गाणी म्हणून म्हणून किती म्हणणार. गेम्स, अंताक्षरी, quiz वगैरे शिवाय अशा ट्रिप्स ना काही मजा नाही. विवेक खरंतर यात पडणारा नव्हता पण तोही सगळ्यांसोबत उत्साहाने सहभागी होत होता. कारण अर्थातच 'अमृता' होती. डिनर / ड्रिंक्स ला संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. एकूणच सगळा माहोल नॉस्टाल्जिक झाला होता. सगळे वयाने १४-१५ वर्ष लहान होऊन भूतकाळात गेले होते. Time Travel केल्यासारखं. जुन्या आठवणी, किस्से, एखाद्या सरांची मजा, जुनी अफेअर्स ..वगैरे वगैरे....आठवून, चघळून सगळे नुसते खिदळत होते. विवेक आणि अमृता एकाच टेबल वर समोरासमोर बसले होते. मंद प्रकाश होता. जुनी गाणी चालू होती. दोघंही आता एकमेकांशी बोलायला लागले होते खरे. पण अगदीच गरजेचं म्हणून. सकाळचा awkwardness मात्र थोडा कमी झाला होता. जमलेला प्रत्येक जण ट्रिप साठी ठरवून दिलेली आपापली जबाबदारी चोख बजावत होता. कोणी DJ होता, तर कोणी ऑर्डर चं बघत होतं तर काही जण ड्रिंक्स ... अचानक विवेकच्या लक्षात आलं तो आणि अमृताच बसले आहेत टेबल वर आणि बाकीचे कुठे ना कुठे बिझी आहेत. विवेक बळंच काहीतरी काम काढून उठला आणि जायला लागला.
"विवेक , थांब ना.. बस ना इथेच. " अमृता हळुच त्याला म्हणाली. विवेकने तिच्याकडे बघितलं. त्या मंद प्रकाशात किती सुंदर दिसत होती ती. तिने बस ना अशी हातानेच खूण केली. विवेकचा तिथून जायचा विचार क्षणार्धात मावळला. तसं त्यालाही वाटत होतंच कि फक्त त्या दोघांना थोडा वेळ मिळावा. विवेक बसल्यावर तिने विचारलं "कसा आहेस?"
"छान" असं विवेकने थोडं रुक्ष आणि पुस्तकी उत्तर दिलं.
"सकाळपासून तुला आत्ता सुचतंय हे विचारायचं." एक उपरोधिक कटाक्ष टाकून विवेक म्हणाला. वास्तविक पाहता तो तरी कुठे काय बोलला होता तिच्याशी... पण तरी... उपरोधिक...! अमृता फक्त हसली. ती विवेकला ओळखत होती आणि तो अजून तसाच आहे याची पुन्हा तिची खात्री पटली.
"छान दिसतियेस.. म्हणजे अजूनही तेवढीच छान दिसतियेस!" विवेक थोडा लाजतच म्हणाला.
"थँक्स .. मी रोजच अशी दिसते. " अमृता मिश्कीलपणे म्हणाली आणि डाव्या हाताने केसांशी खेळत विवेकच्या उत्तराची वाट बघायला लागली
विवेकला उत्तराचा रोख कळला. तोही हसत म्हणाला "रोज अशी भेटलीस तर रोज असंच म्हणीन.छान दिसतीयेस. " अमृताला हे आवडलं. ती मनापासून हसली आणि म्हणाली, "मला आवडेल तुला रोज भेटायला. भेटशील का असाच...?"
विवेक एकदम पटकन म्हणून गेला... "हो नक्कीच... पण जर तू सोडून गेली नाहीस तर. " दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. विवेक एकदम गंभीर झाला. अमृताची नजर खाली होती. तिच्याकडे रोखून बघत विवेक तिला म्हणाला, "का सोडून गेलीस मला... ?" विवेक इतके दिवस साठवून ठेवलेले प्रश्न आता एकामागून एक विचारात होता.
"जायच्या आधी ना निरोपाची भेट, पोचल्यावर ना खुशाली...काय समजायचं मी? तुला एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही? मी कोणीच नव्हतो का तुझा...? तू तिथे पोचल्यावर आठवडाभराने मला इतरांकडून कळलं तू सुखरूप आहेस.. इतपतच होतं का आपलं नातं? मी काळजी करत असेन, वाट बघत असेन असं जराही वाटलं नाही तुला?"
विवेकचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. एक एक प्रश्न जुन्या जखमांना ओले करून जात होता. अमृता मधूनच विवेककडे बघत होती. पण त्याचा आवेश बघून काही बोलली नाही. पुन्हा नजर खाली करून फक्त ऐकत होती.
"अमेरिकेतली नोकरी, छान देश, चांगलं काम यात तू विसरून गेलीस मला." विवेक अगदी उपरोधिक आणि टोचून बोलत होता. नव्हे, इतकी वर्ष मनात दबलेली आग ओकत होता. गेल्या १२ वर्षांमधले हे निखारे विझेलच नव्हते. आणि आज अचानक अमृता भेटल्यावर ते अजून भडकून पेटून उठले.
अमृता अजूनही गप्प होती. भावनांच्या भरात तिला नात्याचा कायमचा कडेलोट नको होता. अजूनही शेवटचा नाजूक धागा शिल्लक होता तिच्या दृष्टीने.
विवेकचं चालूच होतं. "बरं गेलीस ती गेलीस..... परत आल्यावर माझ्याशी तुला एकदाही बोलावं वाटलं नाही..? मला आयुष्यातूनच काढून टाकलंस तू. " विवेकचा आवाज कापरा झाला होता. "आणि आता मी रोज अशीच दिसते म्हणून माझ्या जखमेवर मीठ चोळताना काहीच वाटत नाही तुला..?"
विवेक रागाने अत्यंत विखारी बोलत होता. त्याला भान नव्हतं आपण कुठे काय बोलतोय याचं. भिंत फोडून पाणी वाहत सुटलं होतं नुसतं. किनाऱ्या वरील नुकसानाची तमा न बाळगता. आणि पूर मात्र अमृताच्या डोळ्यांना आला होता. तिने बराच वेळ दाबून ठेवलेलं रडू शेवटी कोसळलंच. तरीही ती काहीही बोलली नाही. विवेकचा प्रत्येक आरोपावर तिच्याकडे उत्तर होतं. पण त्याने काय सिध्द झालं असतं?
विवेक कडे तिने जाणून बुजून बघणं टाळलं आणि केवळ खाली बघून रडत राहिली. आणि त्याचं जळजळीत बोलणं सहन करत राहिली.
विवेकच्या ही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. विवेक उठला. अमृताकडेपाठ करून उभा राहिला. आणि म्हणाला,
" मला तेव्हाच कळायला हवं होतं अमृता, की प्रेम वगैरे काही नसतं. खोटं असतं सगळं. स्वार्थ दिसला की ते गुंडाळून ठेवता येतं. आणि कार्यभाग साधला की आहेच वेळ उरलेलं प्रेम करायला.... "
हे वाक्य ऐकलं आणि अमृताचा धीर सुटला. तिला हुंदका आवरता आला नाही. लहान मुलीसारखी तोंड हातात लपवून ती ढसाढसा रडायला लागली. तिला वाटलेलं की ट्रीपला विवेक भेटेल, जुन्या गप्पा होतील, एक जी दरी निर्माण झाली आहे ती कमी व्हायला मदत होईल... आणि हे भलतंच घडत होतं. विवेक इतकी टोकाची प्रतिक्रिया देईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं.
विवेक तिच्याकडे पाठ करून उभा होता. स्वतः च्या भावना लपवायला. खरंतर रडून कोणी दुर्बल ठरत नसतो. मनातल्या वादळाला वाट करून देण्यासाठी संयम सोडून वागण्यापेक्षा एक वेळ रडलेलं बरं. पण या तत्वज्ञानाच्या पलीकडे होती विवेकची मनस्थिती. जिची त्याने एवढी वाट बघितलेली, ती आता अशी परकी होऊन भेटल्यावर विवेक त्याच्या वागण्यातला ' विवेक ' आणि संयम विसरला होता. आणि याचा बळी ठरलं होतं अमृताचं प्रेम! जे तिला अजिबात सहन झालं नाही. बराच वेळ कुणीही काहीही बोललं नाही. अमृताने डोळे पुसले. रडून डोळे आणि नाक
लाल झालं होतं. कापऱ्या क्षीण आवाजात अमृता म्हणाली, "मी या सगळ्यांची उत्तरं देऊ शकते विवेक. पण हे कुठलं कोर्ट नाही आणि मला काहीही सिध्द करायचं नाहीये. मला एकच सांग... माझ्याशी लग्न करायला नाही का म्हणालास...?" विवेक काही बोलला नाही. अमृता उठली आणि त्याच्या समोर जाऊन म्हणाली, "मला उत्तर हवंय विवेक. तू लग्नाला तयार का नव्हतास? " अमृताचं रडणं चालूच होतं. पण आवाजात थोडी कठोरता होती.
"मला पटेल असं उत्तर दिलंस तर मी याक्षणी निघून जाईन आणि पुन्हा कधीही तुला तोंड दाखवणार नाही आयुष्यात."
एवढं एक वाक्यही ती न रडता बोलू शकली नाही. विवेक तिच्या समोरच होता. या प्रश्नाचं तिला पटणारं उत्तर मात्र विवेककडे नव्हतं. अधून मधून विवेक तिच्याकडे बघत होता पण तिच्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत होत नव्हती. अमृता थेट या प्रश्नावर येईल असं त्याला वाटलं नव्हतं.
१२ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा विवेकने नाही म्हणून सगळ्यांनाच धक्का दिला. विवेकला तेव्हा धड नोकरी नव्हती आणि आयुष्यात काय करायचंय याबद्दल तो अजिबात सीरियस नव्हता. या उलट अमृता एकदम sorted होती.
"मला अजूनही हा प्रश्न खात असतो विवेक, नेमकं काय कमी पडलं म्हणून आपण एकत्र येऊ शकलो नाही. मी काय केलं असतं म्हणजे तू तयार झाला असतास...?" स्वत:ला सावरत, डोळे पुसत थोड्या कडक शब्दात, जाब विचारण्याच्या सुरात ती म्हणाली.
विवेक काही बोलणार हे जाणून तीच पुढे म्हणाली,
"मी तुला हजारदा विचारलं होतं 'जाऊ का' म्हणून. तुझ्या मनात काय चालू आहे ते अजिबात कळू दिलं नाहीस."
आता अमृता थांबणार नव्हती. त्याच्याकडे नजर रोखून ती म्हणाली,
"मलाच काय तुझ्या घरच्यांनाही विचित्र वाटलं तेव्हा. मी जायच्या आधी तुझ्या आईलाही भेटून आले, नेमकं काय झालंय ते जाणून घ्यायला. तुला मी का नकोय ते समजून घ्यायला." हे बोलताना तिला पुन्हा रडू आलं. विवेकने चमकुन तिच्याकडे बघितलं. त्याला हे अजिबात माहीत नव्हतं.
अमृताचं रडणं रास्तच होतं. गेली १२ वर्ष ती भावनांचं, प्रश्नाचं आणि अपेक्षाभंगाचं ओझं वागवत होती. मधल्या काळात विसर पडला होता याचा पण आज आत्ता हे सहन होत नव्हतं.
"तुझं माझ्यावर प्रेम होतं ना...?" तिच्या आवाजाचा रोख बदलला. " होतं की नाही ......?" ओरडलीच ती जवळ जवळ. नुसतं मान डोलवून विवेक हो म्हणाला. अजूनही तो खालीच बघत होता. वर बघायची हिम्मत नव्हती त्याच्याकडे.
"हो ना.... मग मला एकदा सांगून बघायचंस रे की जाऊ नकोस म्हणून. मी आनंदाने थांबले असते आपल्यासाठी. " तिच्या आवाजात कमालीची अगतिकता होती. पण ती आता रडत नव्हती.
"आणि तू मला दोष देतोयेस...? लाज वाटली पाहिजे तुला. स्वतः च्या नाकर्ते पणाचं आणि घाबरट पणाचं खापर माझ्यावर फोडताना थोडा तरी विचार केलास आधी...?" हवेत तलवार फिरावी असं तिचं धारदार बोलणं विवेकच्या चिंधड्या करून गेलं.
धक्का बसून डोळे विस्फारून तो अमृताकडे बघत होता. काय बोलावं काहीच सुचेना. ' नाकर्तेपणा, घाबरटपणा ' हे शब्द कानात गरम शीशाच्या रसाप्रमाणे ओतले गेले. असं याआधी त्याच्याशी याविषयावर कोणीच बोललं नव्हतं. स्वतःच रंगवलेल्या भ्रमाचा फुगा फाटकान फुटला होता.
"तुझी आर्थिक परिस्थिती, नोकरी धड नव्हती, तुझ्या मनासारखी नव्हती, म्हणून मी स्वार्थी? माझ्या भावना खोट्या? माझी महत्त्वाकांक्षा चुकीची? " अमृता हाताची घडी घालून भुवया उंचावून त्याला जाब विचारत होती. विवेककडे यावर त्याची बाजू मांडता येईल असं काही नव्हतं. अमृता जे बोलत होती त्यात त्याला तथ्य दिसत होतं.
"खरी गोष्ट अशी आहे की तुला स्वतःला तुझ्या प्रेमाबद्दल विश्वास नव्हता. प्रेम निभावणं सोडून तू सोपा मार्ग पत्करलास. एकत्र न येण्याचा."
विवेकचं अवसानच गळून गेलं हे ऐकुन. दोन मिनिटं कोणीच काही बोललं नाही. विवेकच्या डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला जुने दिवस आठवत होते. प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहत होते. आणि तो स्वतःला चुकीचं वागत असताना बघत होता. आत्ता...... १२ वर्षांनी.
तो शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याला स्वतःबद्दल वाटणारी सहानुभूती पार धुळीला मिळाली होती. ' मी अमृतापेक्षा कमी प्रतीचा दिसेन म्हणून मी पळवाट काढली?' स्वतः ला तो हा प्रश्न विचारत होता आणि याचं उत्तर त्याला ' हो ' असं मिळत होतं. त्याच्या इतक्या वर्षांच्या धगधगत्या ज्वालामुखीवर अमृताच्या आजच्या बोलण्याने अमर्याद पाणी ओतलं होतं. त्याला रडू आवरलं नाही. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांतून पाणी ओघळत होतं. दोन्ही बाजूंनी त्याचं मन खात होतं. एकीकडे अमृताला मुद्दाम टोचून बोलल्याबद्दल आणि भूतकाळातल्या घटनांबद्दल. पण वेळ निघून गेली होती आणि खूप उशीर झाला होता. काळ कोणासाठी थांबत नाही, मात्र सरल्याच्या खुणा नक्की सोडून जातो, बोच ठेऊन जातो. वर्तमानकाळातील ही बोच दोघांनाही सलत होती. पण भविष्यकाळ मात्र त्यांच्या हातात होता. आज ट्रीपला जे घडलं ते घडणं गरजेचंच होतं. मळभ निघून गेल्याशिवाय मोकळ्या निरभ्र आकाशात वावरता येणार नव्हतं.
बराच वेळ कोणीही काही बोललं नाही. विवेकला असं रडताना बघून अमृतालाच जरा वाईट वाटलं. ती या ट्रीप ला त्याच्या चुका दाखवायला, हिशोब करायला आली नव्हती. तिला फक्त विवेकला भेटायच होतं. तिला हे कळत होतं की...जुने दिवस परत येणार नाहीत पण पुढचे दिवस जुनं विसरून नव्याने नक्की जगता येतील, चांगले मित्र बनून..!
ती विवेक च्या जवळ गेली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विवेक डोळे मिटून च बसला होता. "विवेक" तिने हळूच हाक मारली. विवेक स्तब्धच.
"I am sorry विवेक." ती शांतपणे म्हणाली. "मला तुला दुखवायचं नव्हतं." विवेक काहीच बोलला नाही.
" मला खरंच तुला सॉरी म्हणायचंय. एक गोष्ट मला आयुष्यभर खात राहील.अमेरिकेहून परत आल्यावर मी तुला भेटायला हवं होता. इगो पायी नाही भेटले. भेटले असते तर आत्ता चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. या चुकीची शिक्षा मी आजवर भोगतिये. " तिच्या आवाजात खंत होती. पश्चात्ताप होता.
"तुझ्याकडे याची कबुली दिल्यावर मला जरा बरं वाटेल. किती दिवस हे ओझं घेऊन जगणार आपण. मला आपलं नातं liability म्हणून नकोय तर एक asset म्हणून हवंय."
विवेक एव्हाना थोडा शांत झाला होता. डोळे पुसून तो उठला. आणि एकदम अमृताला मिठी मारली.
"I am sorry अमू. तुला कल्पना नाहीये तुझ्या असण्याने मी किती आनंदी असतो. आज तू मला बोलली नसतीस तर मी आयुष्यभर असाच मनात राग आणि विचारांत विखार घेऊन राहिलो असतो."
अमृताने त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि आश्वासक हसली.
" मी immature वागलो. पण म्हणून मी प्रेम केलं नाही असं नाही. माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर किंबहुना आहे. तू दूर होणार हे मला तेव्हा सहनच झालं नाही."
दोघांनाही एकदम हलकं, हायसं वाटलं. नंतर बराच वेळ दोघं बोलत होते. एकमेकांबद्दल, एकमेकांच्या घरच्यांबद्दल, आणि त्यांच्या नात्याबद्दल. फक्त त्यांच्या अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दिव्यावरची काजळी निघून गेली आणि लख्ख प्रकाश पडला.
त्यांना असं बघून इतका वेळ दबा धरून बसलेली उरलेली reunion शिट्ट्या मारत बाहेर आली. अमृता त्यांना thanks म्हणाली.... त्या दोघांना वेळ दिल्याबद्दल. दोघांनी एकमेकांचे नंबर save करून घेतले. त्यांना परत जायची इच्छा नव्हती पण जावं तर लागणारच होतं. त्यांचा वर्तमान त्यांची वाट पहात होता. आणि दोघंही आनंदाने एकमेकांना आपापल्या वर्तमानात सामवून घेणार होते. सकाळी सगळे आवरून बस मध्ये बसले. आता मात्र विवेक आणि अमृता शेजारी शेजारी बसले होते. ४- ५ तासांचा प्रवास होता. आणि त्या दोघांची मॉर्निंग कोणी गुड न म्हणताच गुड झाली होती.
आदित्य