Pages

Thursday, June 16, 2022

सल

पुन्हा भेट व्हावी सुगंधी क्षणांची
कुपी ओघळावी तुझ्या अत्तराची
नभी मेघ यावे निळ्या पावसाचे
मिठी घट्ट व्हावी तुझ्या आठवांची

पुन्हा रानजाई सजावी नव्याने
कळी शुभ्र ऐसी भिजावी दवाने
धुके पांघरोनी निळी सांज यावी
नवी भेट व्हावी जुन्या सावल्यांची

पुन्हा काजव्यांची मैफिल जमावी
जुनी शीळ अलवार ओठी रूळावी
उजळून याव्या स्मृती धुंद साऱ्या
फुले पाझरावी क्षणिक आसवांची

निळा डोह भरतो निळ्या चांदण्याने
झरे शब्द होतात अल्लडपणाने
कुठे भावनांच्या उसळतात लाटा
भिजे नाव अश्रूंत मग कागदाची

निर्माल्य होतात क्षण ते फुलांचे
गंधाळलेल्या मुक्या आठवांचे
उरतो तिथे डोहात एकटा मी
लेऊन डोळ्यांत सल चांदण्याची

आदित्य