Pages

Sunday, May 7, 2023

मेघ काही...

आठवांचे मेघ  हल्ली  दाटुनी येतात काही
परतुनी जातात काही, रडवुनी जातात काही

उसळूनी येता अचानक हुंदक्यांचे उष्ण वारे
कोरड्या डोळयात देखिल आसवे दिसतात काही

संपता साऱ्या अपेक्षा चालतो परतून आता
मागुनी निःशब्द हळव्या सावल्या उरतात काही

भाबड्या सप्नांत माझ्या गाव होता सोबतीला
एकटा असतो अता अन पावले दिसतात काही

संपली आहेत जर नाती अताशा भावनांची
का अजूनी ओळखीच्या सावल्या दिसतात काही?

स्वच्छ आकाशी मनाच्या विहरतो मी मुक्त आता 
पण तिथे तुझिया स्मृतींचे मेघही फिरतात काही

आदित्य

पालखी वाहून नेली देवळाच्या पायरीशी
देव नसतो पण तिथे आता, असे म्हणतात काही!

Friday, March 31, 2023

शेवटची भेट

 अपुल्या शेवटच्या भेटीचा 

पाऊस अजूनही आठवतो

कधी अवेळी एकांती मग

पुनश्च डोळ्यांतुन कोसळतो


कधी उमगले नाही की ती

भेटच शेवटची होती

क्षण ओसरले किती तरीही

श्वास एकटा गहीवरतो


गहिऱ्या हिरव्या डोहामध्ये 

तुझ्या स्मृतींना लोटून देखिल

विस्कटलेल्या आठवणींतुन

जीव अजूनी घुटमळतो


क्षितिजावरती पेरत जाता

अपुल्या आठवणींच्या बागा

सुगंध मुक्याने इथे कोरड्या

अश्रूंसंगे दरवळतो


आदित्य

अमृताचे कुंभ जैसे..

 अमृताचे कुंभ जैसे चांदण्यातुन ओघळावे,

मी तुला हलकेच माझ्या भोवताली पांघरावे.


दाटले असता कधी नयनी बिलोरी चंद्र माझ्या,

मेघ मोती होत जावे अन मिठीतुन कोसळावे


ओंजळीतुन सांडता कविता कधी वाळूप्रमाणे,

वेचताना शब्द तेथे मोतियाचे सापडावे


शब्द माझे बापडे होतात जेव्हा मूक काही,

तू अशा कवितेस माझ्या डोळीयांतुन ओळखावे.


भेटलो नाही जरी प्रत्यक्ष आपण एकदाही,

पापण्यांतुन स्वप्न माझे रोज नयनी पाझरावे.


आठवांच्या पुस्तकाचे नेमके ते पान यावे,

हासणे ते आठवावे, अन् तुझे मी होत जावे


आदित्य