अपुल्या शेवटच्या भेटीचा
पाऊस अजूनही आठवतो
कधी अवेळी एकांती मग
पुनश्च डोळ्यांतुन कोसळतो
कधी उमगले नाही की ती
भेटच शेवटची होती
क्षण ओसरले किती तरीही
श्वास एकटा गहीवरतो
गहिऱ्या हिरव्या डोहामध्ये
तुझ्या स्मृतींना लोटून देखिल
विस्कटलेल्या आठवणींतुन
जीव अजूनी घुटमळतो
क्षितिजावरती पेरत जाता
अपुल्या आठवणींच्या बागा
सुगंध मुक्याने इथे कोरड्या
अश्रूंसंगे दरवळतो
आदित्य