मी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न वाटत होतं. सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन भाषा, नवीन देश, सगळं नवीन. सगळे जण अनोळखी. कौतुकाने बघत होते माझ्याकडे. मी नवीन होतो ना त्यांच्यासाठी! दोन चार चहरे ओळखीचे वाटलेले. आधीच्या गावाला भेटलो असेन कदाचित. वातावरण प्रसन्न होतं. माझी खूप काळजी घेत होते. मीही सगळ्या हौसा मौजा भागवून घेत होतो. एकंदरीत, प्रवासाचा हां टप्पा अगदीच दृष्ट काढण्यासारखा होता
त्यांची नवीन भाषा बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण यायचच नाही बोलता. त्यांना माझी भाषा समजत नव्हती आणि मला त्यांची. रडूच यायचं सारखं. मी ठरवलं सगळं शिकून घ्यायचं. भाषा, रीती रिवाज, वागणं बोलणं सगळं शिकून घेतलं या नवीन देशात चांगलाच रुळलो. नवीन म्हणता म्हणता यातलाच एक होउन गेलो.
नव्याचे नऊ दिवस संपले. जुना झालो सगळ्यांसाठी. प्रवाहाताल्या ओन्डक्याप्रमाणे वाहू लागलो. काही दिशाच नव्हती. आधीची चांगली माणसं आता स्वार्थी झाली होती. प्रत्येक जण आपापला फायदा बघत होता. मीही ओढला गेलो यातच.. नकळत. 'तुझे माझे' हिशोब, 'सुख दु:खाचा' बाजार सुरु झाला. सगळ्या गोष्टी फायद्यात मोजल्या जाऊ लागल्या. माझ्यासमोर इतरांची घरं पडत होती. लोकं घर सोडून निघून जात होते. नको झालं सगळं.
मी पडलो प्रवासी. प्रवास करणे हेच माझे उद्दिष्ट्यं. थांबता येणार होतं थोडच? सगळं जपून प्रवास सुरूच होता. पण आता जवळची माणसंही अनोळखी वाटायला लागली होती. बरेच जण लांब कुठेतरी निघून गेले होते. प्रवासीच शेवटी ते!! माझही घर आता मोडकळीस आलं होतं. पोपडे निघायला लागले होते, कुठे गळती सुरु झाली होती. कौलं पडायला लागली होती. घर बदलायची वेळ आली होती. या देशात तसा खूप मोठा पसारा मांडला होता मी. पण मी एक दमडीही बरोबर घेणार नव्हतो. त्यामुळे भोवतालची सगळी भुतं एव्हाना विचारपूस करू लागली होती. हिशोब कागदावरून खिशात पाडायचा होता त्यांना. नाहीतर फक्त माझ्यासाठी म्हणून कोण येणार होतं?
एके दिवशी अगदी पहाटे मी निघालो घर सोडून. एकटाच..! जसा आलो होतो तसाच. कोणाचाही निरोप द्यायचा-घ्यायचा नव्हता मला. कोणालाही बरोअर घ्यायचे नव्हते. बरोबर होता एक नकाशा आणि जमाखर्चाची डायरी.बस्स!! इथवरचा प्रवास संपला होता. नकाशावर पुढचा देश उमटला होता.मी किती दिवस, महीने, वर्ष तो देश शोधत हिंडत होतो माहीत नाही. खूप दमलो होतो. कित्येक जंगलं, नद्या समुद्र पार केले होते. शेवटी सापडला एकदाचा नवीन गाव. अंधारातून लांब कुठेतरी दिवा दिसावा तसा. धावतच वेशीपाशी आलो. वेशीतून गावात शिरताना अचानक भोवळ आली. काय झालं ते कळलच नाही. शुद्ध हरपली माझी . नन्तरचं काही आठवत नाही नेमकं काय झालं ते.
मी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न वाटत होतं. सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन भाषा, नवीन देश, सगळं नवीन।!!!
-----आदित्य देवधर
-----आदित्य देवधर