माझ्याच सावलीचे रे झाड लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
आयाम लाभले रे नवरूप चेतनेचे
दृष्टांत जाहले रे सृजनक्षम कवीचे
गाणे सुखावणारे हलकेच ऐकिते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
अमृत तेज लाभो ज्योतिर्मयी प्रकाशी
शक्ती उरी शिवाची लक्ष्मी वसे कराशी
दुर्गेस प्रार्थनेचा नैवेद्य दाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
बरसात धुंद होता न्हाऊन चिंब झाले
श्वासात ओजसाचे दैवी सुगंध आले
बागेतल्या कळ्यांशी लाडीक बोलते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
डोळे मिटून कल्पे हर एक त्या क्षणाला
आभास गोड मोठे ओवाळती स्वत:ला
मायेत चिंबलेली दिपमाळ लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
भिजताक्षणी फुटावी नवपालवी मनाला
हिरवे निळे उडावे रावे क्षणाक्षणाला
स्वप्ने अमूल्य काही स्वप्नात पाहते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी
------- आदित्य देवधर
Tuesday, August 31, 2010
काय हे अमुचे जिणे!
रोज यंत्राच्या प्रमाणे मानवी कळ दाबणे
पावलीच्या चाकरीचे काय हे अमुचे जिणे!
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
रातिचे अवघे करोनी सोहळे, जलसे असे
चांदण्याचीही इथे जंगी निलामी होतसे
सूर्यही झाके स्वत:ला पाहुनी हे वागणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
भोवतालीची अधाशी पाशवी वृत्ती सले
झापडा बांधून डोळा चालतो आम्ही भले
जाहले वणव्यातले अमुचे खुळे बुजगावणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
आसवांनो दूर व्हा डोळ्यांकडे फिरकू नका
ओघळायाचे भुलोनी आतुनी रडणे शिका
येतसे आम्हा गिळोनी आसवे अमुची पिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
सांत्वनाचे शब्द आम्ही चार मोठे जाणतो
टचकनी डोळ्यांतुनी पाणी पुरेसे आणतो
विकुनिया या भावनांना पळभरी कुरवाळणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
स्वार्थ केवळ राहिले येथे भल्या नात्यांतुनी
मित्र सारे शोधलेले फायद्याचे पाहुनी
साचली खाती पुरेशी, प्रेम मायेचे उणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
मूठभर ती माणसे होती जयांना भ्यायलो
मान तुकवोनी उभे आम्ही कडेशी राहिलो
घेतले शिक्षण अशा शाळेतुनी शिकलो भिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
भूक होती पेरली येथे सुखाच्या भोवती
केवढी हाडे इथे नरकात पोटे जाळती
बापडे मश्गूल आम्ही येथ भरण्या बोकणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
'उडवतो गाड्या जराशा काय या अमुच्या चुका?
चोचले पुरवू जिभेचे भागवू अमुच्या भुका
काच खाली घेउनी देतो गरीबाला चणे'
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
वस्त्र लज्जा झाकण्या पुरते कुणा ना सापडे
मोजुनी पैसे हजारो होत कोणी नागडे
फाडती कपडे नव्याने 'ते जुने होते' म्हणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
एकही आवाज येईना जरी मी बोललो
आग पेटवण्या कधी ठिणगी इथे मी जाहलो
विझवुनी तिजला दिले हाती जुनेसे तुणतुणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
--------- आदित्य देवधर
पावलीच्या चाकरीचे काय हे अमुचे जिणे!
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
रातिचे अवघे करोनी सोहळे, जलसे असे
चांदण्याचीही इथे जंगी निलामी होतसे
सूर्यही झाके स्वत:ला पाहुनी हे वागणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
भोवतालीची अधाशी पाशवी वृत्ती सले
झापडा बांधून डोळा चालतो आम्ही भले
जाहले वणव्यातले अमुचे खुळे बुजगावणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
आसवांनो दूर व्हा डोळ्यांकडे फिरकू नका
ओघळायाचे भुलोनी आतुनी रडणे शिका
येतसे आम्हा गिळोनी आसवे अमुची पिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
सांत्वनाचे शब्द आम्ही चार मोठे जाणतो
टचकनी डोळ्यांतुनी पाणी पुरेसे आणतो
विकुनिया या भावनांना पळभरी कुरवाळणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
स्वार्थ केवळ राहिले येथे भल्या नात्यांतुनी
मित्र सारे शोधलेले फायद्याचे पाहुनी
साचली खाती पुरेशी, प्रेम मायेचे उणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
मूठभर ती माणसे होती जयांना भ्यायलो
मान तुकवोनी उभे आम्ही कडेशी राहिलो
घेतले शिक्षण अशा शाळेतुनी शिकलो भिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
भूक होती पेरली येथे सुखाच्या भोवती
केवढी हाडे इथे नरकात पोटे जाळती
बापडे मश्गूल आम्ही येथ भरण्या बोकणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
'उडवतो गाड्या जराशा काय या अमुच्या चुका?
चोचले पुरवू जिभेचे भागवू अमुच्या भुका
काच खाली घेउनी देतो गरीबाला चणे'
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
वस्त्र लज्जा झाकण्या पुरते कुणा ना सापडे
मोजुनी पैसे हजारो होत कोणी नागडे
फाडती कपडे नव्याने 'ते जुने होते' म्हणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
एकही आवाज येईना जरी मी बोललो
आग पेटवण्या कधी ठिणगी इथे मी जाहलो
विझवुनी तिजला दिले हाती जुनेसे तुणतुणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!
--------- आदित्य देवधर
Monday, August 30, 2010
पाउस येता....
येता पाउस दाटुनी तममयी आभाळ हो जाहिले
मृद्गंधी दव न्हाउनी कवडसे क्षितिजावरी पाहिले
धारा कोसळूनी उडे चहुकडे आनंद हृदयातुनी
शालू नेसून गार गार हिरवा धरती सुखाने डुले
ओला चिंब झरा पडे उसळुनी खाली प्रपातातुनी
मोत्यांची बरसात झेलून कुणी नाचे तुषारांतुनी
थेंबांच्या जणु आरशातुन बघे रंगीत नवसुंदरा
नवलाई डवरून अंगावरी तेजाळ कांती फुले
गारा वेचुन डोलुनी मयुर हा शोभे विहंगाग्रणी
वाटा काढुन धावती शतमुखी फेसाळ सा-याजणी
नाजुक नाजुक पान पान थिरके वा-यास बोलावुनी
रत्नांचे कित्येक घड इथे लडिवाळ रेंगाळले
धारांचा रचुनी सुरेल मुखडा मल्हार आरंभिला
अस्मानी धून जादुई मदभरी छेडून नभ डोलला
ताना घेउन वीज कडकडकडे थाटात षड्जावरी
टाळ्या वाजवुनी नभी गडगडे कुंभात जल सोहळे
डोंगरवट कुरवाळती घन-धुके होई प्रभा धूसरी
गालीचा मऊ रेशमी पसरला वाटे जणू भूवरी
पडदा ओढुन थंडिचा लपतसे यौवन हिरवे निळे
करती किलबिल पाखरे सभवती आनंदरस ओघळे
--------- आदित्य देवधर
Wednesday, August 18, 2010
पानिपत
विश्वास पाटील यांचं 'पानिपत' वाचलं. त्यावर काही लिहिल्याशिवाय रहावत नाही. कायमचा लागलेला डाग, सततची बोच, गेलेला विश्वास, झालेली हानी..!!! सगळं काही परत न मिळवता येण्यासारखं. पानिपत जनमानसात एवढं कोरलं गेलंय की पानिपत आणि 'वाताहात', 'दाणादाण' वगैरे शब्द समानार्थी वाटायला लागतात. 'पानिपत झालं' एवढ्यातच काय ते कळुन चुकतं. एखादी घटना, स्थळ एवढं रुजावं की वाक्प्रचारासारखं वापरलं जावं, ही काही साधी गोष्ट नव्हे. पानिपतला सदाशिवराव काय एका महिन्यात हरले नाहीत, ती बरीच मोठी 'पुण्याई' होती. रघुनाथराव अटकेहून परतल्यानंतर पेशव्यांच्या दशा काही चांगल्या नसाव्यात. जरीपटका अटकेपार लहरून आला पण त्याने मिळालं काय तर कर्ज आणि अंतर्गत दुही. पराक्रम झाला खरा पण त्याचं सत्तेत रूपांतर झालं नाही. एवढा मोठा इतिहास घडवताना पेशवे राजनैतिक महत्वाकांक्षा दाखवण्यात कमी पडले, असं मला वाटतं. दिल्ली काबीज केल्यानंतर बाद्शाहापादाची सूत्रे हाती घ्यायच्या ऐवजी आम्हाला त्यांचे रक्षणकर्ते होण्यातच धन्यता वाटली. पानिपताची कारणे आणि परिणाम हा आपल्यासारख्यांसाठी एक धडा आहे. गेल्या कित्येक पिढ्या लोकं डोळ्यांच्या कडा ओलावून पानिपत सांगत आहेत, ऐकत आहेत. पानिपताचे परिणाम आपण अजूनही भोगत आहोत . खरं तर या पराभवातून खूप शिकण्यासारखं आहे. किती शिकलो माहित नाही. काही कारणं, ज्याला घोडचुका म्हणता येईल, अशी काही नमूद करण्याचा माझ्या परीने केलेला प्रयत्न.
पानिपताच्या आधीच दिल्ली मराठ्यांच्या पायाशी लोळण घेत होती. तिथला बादशाहा फक्त बाद होणं बाकी होता. त्यावेळीच मीरबक्ष नजीब आणि तमाम सुभेदारांना देहदंड करून किंवा मांडलिक होऊन राहण्याची आज्ञा करण्या ऐवजी मराठे तहास तयार झाले. मिळालेला मामुली मान, तूट भरून काढता येईल इतपतच खजिना आणि फुटकळ किताब आणि सुभेदारी याच्या मोहापायी त्या धूर्त नजीबाशी केलेला तह हा कुठल्याच राजकारणी मुत्सद्द्यास शोभणारा डावपेच नव्हता. त्याचवेळी रघुनाथरावांनी बादाशाहापादाची सूत्रे हाती घेउन तो नेहमी छत्रपतींच्या सेवेत राहील अशी हमी किंवा तरतूद केली असती तर काय बिशाद होती त्या पठाणांची की त्यांने हिंदुस्थान च्या दौलतीकडे डोळे वर करून बघावं! शिवाजी महाराजांची १०० वर्षांपूर्वीची ----' अटक ते कटक आणि काश्मीर ते सिंहल प्रांतापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा '--- त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवली असती तर पेशवा फक्त पुणेरी उरला नसता तर हिंदवी झाला असता. हिंदुस्थानातील रहिवाशांचच या पवित्र भूमीवर राज्य उदयाला येताना दिसलं असतं.
सगळं शौर्य, पराक्रम एका बाजूला आणि अंतर्गत कलह एका, अशा तराजूत कलहाचं पारडं जड झालेलच बघायला मिळेल. मराठ्यांच्या बाबतीत तर जास्तच. शिवाजी महाराजांनीही हे खूप भोगलं. तत्कालीन राजघराणी आणि सरदारांमध्ये असे बरेच कलह होते. हेवेदावे होते. त्यातूनच सुरु झालेल्या राजकारणी खेळ्यानी घात करायचा तो केलाच. पानिपत याला अपवाद नाही. अहो, आमचा शत्रू निदान धर्माच्या नावाखाली एकत्र येतो हो..!! आम्ही तर भाषा, प्रांत, धर्म या सगळ्याबाबतीत एकच होतो. पण तरी निरनिराळ्या कारणांसाठी एकमेकांवर खार खात राहिलो. जात-पात, वर्ण भेद वारसा हक्क, सुभेदारी अशा नाना भांडणांनी मराठयांची भक्कम तटबंदी वेळोवेळी खिळखिळी केली आहे. त्यासाठी कुठली मुलुख-मैदान लागली नाही. इतर सरदारांपेक्षा आपलं महत्व जास्त असावं म्हणून काय काय कारस्थानं केली असतील! किती जीव अशा चढाओढी मुळे खर्ची पडले असतील!! होळकर जर वेळीच शिंद्यांच्या मदतीला गेले असते तर दत्ताजी सारखा मोहरा मराठ्यांना गमवावा लागला नसता.
नजीबाने मराठ्यांची तत्कालीन राजनैतिक परिस्थिती योग्य ओळखली होती. थोरल्या बाजीरावांबरोबरीने घोडी उधळलेली सरदार मंडळी आता जुनी झाली आली होती. सैन्याचे लगाम आता नव्या दमाच्या रक्ताच्या हातात होते. अर्थात या बुजुर्ग मंडळींचे केस जरी पांढरे झाले असले तरी तरी तलवारीची रक्ताची तहान मात्र तशीच होती. परंतु वाटाघाटी आणि डावपेचातलं महत्व मात्र कमी झालं होतं. हे नेमकं हेरून नजीबानं मल्हारबाबांकडे आश्रय घेतला. अर्थात मल्हारराव त्याला सामील नव्हते. परंतु जिथे मुळात ज्याला ठेचायला हवा होता, त्याला दूध पाजणं चाललं होतं. इकडे मराठे नजीबाला धरण्यास राती जाळत होते, आणि नजीब मल्हाररावांबरोबर त्यांच्याच डे-यात भीक मागायचं नाटक खेळत होता. जर मल्हारराव त्याचे डाव हेरून त्याला जेरबंद करण्यात यशस्वी झाले असते, तर पुढचा इतिहास वेगळा झाला असता.
अब्दाली दिल्ली जिंकायला परत येणार हे कळल्यावर रघुनाथ राव स्वत: उत्तरेकडे निघावायास हवे होते. पण तिथेही भाऊबंदकी नडली. तुलनेने कमी चढाया केलेले सदाशिवराव आणि कोवळा विश्वास यांच्यावर एवढी मोठी मोहीम सोडून रघुनाथराव पुण्यात गाद्या गरम करत बसले. एवढा शूर माणूस पण बायकोचा धूर्तपणा आणि सखाराम बापूंच्या लबाड पणामुळे त्यांनी तलवार म्यानात घातली. तीच जर पानिपतात तळपती, तर पानिपत पठाणांचे झाले असते आपले नाही. कर्तृत्व युद्धात असो किंवा राजकीय कारभारात असो, मोल कमीजास्त याने ठरत नसतं. पण कारभा-यांनी युद्धात हिशेब मांडणं किंवा शूर सेनापतीने दप्तरीत जमाखर्चाचा ताळमेळ घालणं याला कुठला न्याय समजावा?
सदाशिवराव मोठ्या फौजफाट्यासह उत्तरेच्या मोहिमेवर निघाले. फक्त फौज नाही तर निम्मं पुणं घेऊन निघाले. बाया-बायका, त्यांचे दास दासी व नातेवाईक , यात्रेकरू, ब्राह्मण, कितीतरी भाट आणि हुजरे असे कितीतरी. एवढा लवाजमा घेऊन जायची गरज ती काय. यांच्या सुरक्षेविषयी थोडाही विचार डोक्यात आला नाही?. जरी 'खाशा' नी हट्ट केला तरी योग्य-अयोग्य उमजून पावलं उचलायला नको होती का पेशव्यांनी? राज्य चालवायला शिरावर घेतलेली जबाबदारी अशा हट्टापायी विसरायची? यामुळे झालं असं की आपला पडाव योजनेच्या मानानं दोन दोन महिने उशिरा पडायला लागला. चार महिन्यांची मोहीम ८-९ महिने लांबली. हा वाढलेला खर्च कुठून भरून काढणार होते? लुटून? तेच करावं लागलं शेवटी. मूळ उद्देश बाजूला ठेउन लूट करायाला गेलो आहोत आम्ही असा झालं. चुकलंच पेशव्यांचं!
जर सदाशिवराव आणि तमाम दिग्गज आपलं हेर खातं चोख राखते, तर कदाचित युद्ध पानिपतात झालंच नसतं. दिल्लीजवळ अब्दाली यांच्या पापण्यां खालून अलगद आपलं सैन्य घेऊन अलीकडे येतो आणि आम्हाला काळातच नाही. कळतं ते समोर आल्यावरच! शिवाजी महाराजांनी ज्या हेर खात्यामुळे कित्येक कठीण प्रसंगी बाजी मारली आहे,शत्रूला हातावर तुरी दिली आहे ते खातेच मुळी नव्हते इथे! ऐनवेळी समोर आलेला शत्रू पाहून देखील एक वेळ अशी होती की आपण जिंकलो असतो पण नियतीला हे मंजूर नव्हतं. तिथेही आपण आपल्याच लोकाना नीचा दाखवायला गेलो आणि घात झाला. इब्राहीम गार्दीच्या तोफा अब्दालीची अक्षरश: चाळण उड़वत होत्या. पण गार्द्याला मदत करण्याऐवजी आपले काही शहाणे सरदार मधेच उभे ठाकले. शत्रु कोण अणि मित्र कोण अशी परिस्थिती असताना मित्रच शत्रु म्हणून समोर आला. तोफा शांत करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे अब्दालीने डाव साधला. त्याच्या तोफा धडाडल्या आणि अवघ्या काही घटिकात मराठ्यांना पळता भुई थोड़ी केली. पठाणांनी झाडून सगळ्यांना कापला(जे पळून आले त्यांचा अपवाद सोडून). हिरवे झेंडे फडकवून, भाल्याच्या टोकावर मुंडकी नाचवून हिंसेचा नंगा नाच केला पठाणांनी. कोणालाही सोडलं नाही. नाव, पैसा, वेळ, ताकद, मुलूख सगळं धुळीत मिळालं. पुणं तेव्हा खूप भेसूर रडलं असेल.एक एक किंकाळी घराघरातून घुमली असेल. एक एक वीट हादरली असेल.
एवढं सगळं होउनही आपण यातून शिकत नाही. राजकारणी सोडा हो पण अगदी तुमच्या आमच्या सारखी सामान्य लोकंही पुन्हा पुन्हां त्याच चुका करतो आहोत. वर दिलेली आणि अशी अजूनही कारणं असतील यामागे. मी केवळ एक पुस्तक वाचून केलेला हा उहापोह कोणाला चुकीचा वाटू शकतो. याला इतर आयामही असू शकतात. पण ही कारणं मात्र चुकीची नाहीत. आणि ती समजून आणि सुधारून आपण अजूनही काही घरगुती, कौटुंबिक, सामाजिक पानिपतं टाळू शकतो असं मला वाटतं.
(कोणास काही गैर वाटल्यास दिलगीर आहे. तपशील चुकीचा असल्यास जरूर कळवावे.)
------आदित्य देवधर
Thursday, August 12, 2010
निराशा
आटला आहे किनारा आटली हर एक आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा
बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा
सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा
खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'
दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
-----आदित्य देवधर
Subscribe to:
Posts (Atom)