Pages

Saturday, September 25, 2010

आनंदी क्षण


मातीत एक थेंब
पडताच दिला सांगावा
भारलेल्या चैतन्याचा
भविष्याच्या अस्तित्वाचा

डोळ्यांत एक थेंब
मिटलेल्या पापण्यात दडला
दडपण सरल्याची भावना
दाटून म्हणाली जरा थांब ना
असा ओघळू नको लगेच
थोडा धीर धर
तुला संधी मिळणार आहे
हासत हासत ओघळण्याची
तू हसताना येण्यासाठी
जन्माला आला आहेस
शेजारचं एक स्वप्न बघ
तिथेच वाढीला लागलंय
त्यालाही तुझी सोबत
आणि तुला त्याची
अस्तित्वाची सान्निध्याची

तू रुजायला लागशील
मिळेल ओजाचं पोषण
एक हिरवा अंकुर फुटेल
या अंकुराच्या दृष्टीने बघ जरा
सगळे तुला बघायला आतुर
हसून, उत्साहाने, चैतन्याने
त्यांच्या ठायीही तुला दिसेल
डोळ्यांत एक थेंब
आकार घेताना
आनंदी क्षणासाठी जन्माला आलेला

-------आदित्य देवधर

मालकीण

        आमच्या मालकीणबाई म्हणजे तसं फार मोठं प्रकरण! प्रगल्भ आणि तेवढंच गूढ. उदात्त आणि तेवढंच विक्षिप्त. कामाचा प्रचंड उरक आणि पुढच्या कामांसाठी सदैव तयार. फार मोठा पसारा सांभाळतात. म्हणजे मला जो माहीत आहे तो मोठाच म्हणावा लागेल. माझ्यासारख्या ब-याच जणांची जबाबदारी त्या लीलया पेलताहेत. म्हणा मला दुसरा काही पर्याय नाहीये पण अशा सगळ्यांनाच त्यांनी आपल्या छायेखाली आश्रय दिला आहे. स्वत:च्या आणि आमच्या कामांचा रगाडा हाकताहेत. रोज त्यांचा दरबार भरतो. आम्हाला कधी जावं लागत नाही तिथं, पण तिथेच सगळे हिशेब चालतात. त्यांचा एक हसबनीस  आहे. फार चतुर आणि कर्तबगार. त्याला सगळं येतं. तो सगळ्यांचा नियमाप्रमाणे चोख हिशेब ठेवत असतो. बिनचूक अगदी. बोट ठेवायला जागाच नाही कुठे.

       बाईंनी आम्हाला आमची कामं अगदी सुरुवातीपासूनच वाटून दिली आहेत. कामाप्रमाणे मोबदला मिळावा ही साधी अपेक्षा आहे की नाही? पण तसं होत नाही. त्यांच्या कारभाराविषयी मला फार माहिती नाही. पण जरा अगम्य आणि विचित्र आहे. मी थोडा शोधण्याचा प्रयत्न केला पण 'अपने बस की बात नही' हे कळल्यावर नाद सोडून दिला. मोबदला आणि काम यांचं गणित काही जुळत नाही. तो हसबनीस  काय करतो कुणास ठाउक. दाद मागायला गेल्यावर अशी काही समीकरणं मांडून दाखवतो की घेरीच यावी सोडवता सोडवता. तरी माझ्या एका मित्राने तसं प्रयत्न केला होता. पण समाधान न झाल्याने बिचारा तसाच राहिला. मोबदला तर दूरच अजून गाडाभर कामं मागे लावली.

        मला त्या फारशा आठवत नाहीत. कशा दिसतात कशा राहतात , माहीत नाही. पण त्यांची खूप रूपे असावीत. एवढी कर्तबगार प्रतिमा.. एक थोडच असणार आहे? मग मी त्यांना काळ्या डगल्यात, कधी श्वेत वस्त्रात कधी आईच्या रूपात तर कधी मायेच्या रूपात कल्पित करतो. त्यांना कधी बघायला मिळेल असं वाटत नाही. एकदाच कधीतरी फार पूर्वी त्यांना भेटल्याच पुसट आठवतंय. पण ते अगदी त्यांच्याकडे काम सुरु करण्यापुर्वी. बराच काळ लोटला आहे त्याला. मलाही आता सांगता येणार नाही. आमचा काय कामापुरता संबंध. कामं आली की ती संपवायची. दुसरी कामं तयारच असतात. यातून सुटका नाही. मला तर वाटतं की गेल्या आणि त्याआधीच्यांही जन्मांमध्ये हीच बाई असणार मालकीण म्हणून.

        परवा एक विलक्षण गोष्ट घडली. देवाकडे गेलेलो. ८० वर्षांनी गेलेलो. ब-याच गप्पा झाल्या. अन् अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या. त्यांची बोलणी सुरु झाली देवाशी. त्यातली एक अत्यंत तेजस्वी स्त्री होती. आणि एक करारी पण अत्यंत वृद्ध असा पुरूष होता. मला उगाच आमच्या मालकीण बाईंची आणि त्या हसबनिसाची आठवण झाली. असेच दिसत असतील ते ..मी मनात म्हणालो.उगाच हसू आलं. रिकाम्या वेळी मनाचे घोडे कुठेही पळतात. असो. इतक्यात देवाने मला हाक मारली....
'वत्सा..... यांना भेट. यांच्याच सांगण्यावरून तुला पुढची कामगिरी देत आहे. बोलून घे एकदा'
मी चपापलो. माझी अवस्था ओळखून देव म्हणाला.
'तू ओळखत नाहीस? अरे ही नियती आणि हा निसर्ग.....!!! हीच तुझी मालकीण आहे आता.'

----- आदित्य देवधर

अस्तित्वाचे ऋतू

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती
मनीचे ऋतू बदलले किती

रंगांचाही जन्म इथे जाहला
असंख्य छाया , गूढ छटांचा अर्थ इथे लागला 
तेजामधुनी मिसळून जाती
हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या
हृदयामधल्या भरकटलेल्या अंधारातील गती
छटेचे ऋतू बदलले किती

रिमझिमती, धारा कोसळती 
आरशामध्ये अवघडलेल्या सरी धरेवर कोसळती
काळ्या चष्म्याआतून धारा
रंगीत  गाणी गाऊन जाती
कुणास स्मरती नाजूक साजूक ओघळती
सरींचे ऋतू बदलले किती

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती

------- आदित्य देवधर 

चुका

मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या
सह्या प्रशस्ती पत्रांवरती उगाच झाल्या अमुच्या

ओरडताना देठातून आवाज बिचारा बसला
बडवून एकच बाजू अमुचा डग्गा पुरता फुटला
मैफिली समेशी धडपडणा-या सुन्याच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

झिंग एवढी चढली की दिवस रात्र उमगेना
अस्तित्वाच्या ऋतूंबरोबर घासाघीस जमेना
तोल सावरता सावरता नशाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

पेल्यांमधुनी पिता पिता लाव्हाही डचमळला
उष्ण उष्ण वाफांच्या खाली कोणतरी तडफडला
कारण वणव्यालाही साध्या चुळाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

एक शूळ उमटला कोठे मातीत घराच्या अंगणी
उघड्या जखमा अंगावरती अंत:करणी दुखणी
दवा औषधी मर्दुमकीच्या पुचाट ठरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

धडधडणा-या हृदयामध्ये देव पाहिला आम्ही
लटपटणा-या पायांना आधार जाहलो आम्ही
अश्रद्धांचे श्राद्ध घालण्या मुठीच पुरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

----- आदित्य देवधर

Friday, September 3, 2010

जगून घे

आता जरासे हसून घे
श्वासांस थोडे जगून घे

जाता निघोनी लवाजमा
मागून त्यांच्या रडून घे

मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे

क्रांती जिथे पेटुनी उठे
ज्वालांत तेथे जळून घे

जाशी करायास सांत्वना
थोडे स्वत:चे करून घे

स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे

आता कितीसे जगायचे
पुन्हा नव्याने मरून घे

प्राणांस त्यागून शेवटी
वाटेल तैसे जगून घे

-----आदित्य देवधर

गोडवे गाऊ कुणाचे

गोडवे गाऊ कुणाचे, गीत आसुसल्या मनाचे

रेशमाच्या पालवीचे, गार हिरव्या सावलीचे
कोवळ्याशा सायलीचे, चाफयाच्या बाहुलीचे
मायभोळ्या माउलीचे, सोहळ्याच्या चाहुलीचे
देवळाच्या पायरीचे, धावणा-या शेवरीचे
शांतणा-या भैरवीचे, मुग्ध कर्णी बासरीचे
कोरलेल्या कोयरीचे, कुंकवाच्या सोयरीचे
पौर्णिमेच्या चांदण्याचे, ज्ञानगंगा वाहण्याचे
उंच उंची नारळीचे, सागराच्या मासळीचे
निर्झराच्या गारव्याचे, संधीकाली मारव्याचे
डोलणा-या केशराचे, कूजणा-या पाखराचे
गोडवे गाऊ कुणाचे खेळ सारे या मनाचे

मोकळ्या मऊ कुंतलाचे, गौरकांती सुंदराचे
नीलकमला डोळियांचे,अन गुलाबी पाकळ्यांचे
कर्ण भूषण लोलकांचे, शांत रेखीव काजळाचे
खळखळोनी हासण्याचे, वेळवोनी पाहण्याचे
काननी मृग चालण्याचे, कोकिळेच्या बोलण्याचे
डौलदार आलिंगनाचे, प्रेमस्पर्शी चुंबनाचे
वाट माझी पाहण्याचे, थेंब काही गाळण्याचे
भेटण्याच्या कळकळीचे, अंतरंगी धडधडीचे
थांबलेल्या क्षणभराचे, संपलेल्या अंतराचे
प्रेयसीच्या संगतीचे मोहवेड्या रंगतीचे
गीत धुंदी यौवनाचे, गोडवे माझ्या प्रियेचे

----- आदित्य देवधर