Pages

Saturday, September 25, 2010

मालकीण

        आमच्या मालकीणबाई म्हणजे तसं फार मोठं प्रकरण! प्रगल्भ आणि तेवढंच गूढ. उदात्त आणि तेवढंच विक्षिप्त. कामाचा प्रचंड उरक आणि पुढच्या कामांसाठी सदैव तयार. फार मोठा पसारा सांभाळतात. म्हणजे मला जो माहीत आहे तो मोठाच म्हणावा लागेल. माझ्यासारख्या ब-याच जणांची जबाबदारी त्या लीलया पेलताहेत. म्हणा मला दुसरा काही पर्याय नाहीये पण अशा सगळ्यांनाच त्यांनी आपल्या छायेखाली आश्रय दिला आहे. स्वत:च्या आणि आमच्या कामांचा रगाडा हाकताहेत. रोज त्यांचा दरबार भरतो. आम्हाला कधी जावं लागत नाही तिथं, पण तिथेच सगळे हिशेब चालतात. त्यांचा एक हसबनीस  आहे. फार चतुर आणि कर्तबगार. त्याला सगळं येतं. तो सगळ्यांचा नियमाप्रमाणे चोख हिशेब ठेवत असतो. बिनचूक अगदी. बोट ठेवायला जागाच नाही कुठे.

       बाईंनी आम्हाला आमची कामं अगदी सुरुवातीपासूनच वाटून दिली आहेत. कामाप्रमाणे मोबदला मिळावा ही साधी अपेक्षा आहे की नाही? पण तसं होत नाही. त्यांच्या कारभाराविषयी मला फार माहिती नाही. पण जरा अगम्य आणि विचित्र आहे. मी थोडा शोधण्याचा प्रयत्न केला पण 'अपने बस की बात नही' हे कळल्यावर नाद सोडून दिला. मोबदला आणि काम यांचं गणित काही जुळत नाही. तो हसबनीस  काय करतो कुणास ठाउक. दाद मागायला गेल्यावर अशी काही समीकरणं मांडून दाखवतो की घेरीच यावी सोडवता सोडवता. तरी माझ्या एका मित्राने तसं प्रयत्न केला होता. पण समाधान न झाल्याने बिचारा तसाच राहिला. मोबदला तर दूरच अजून गाडाभर कामं मागे लावली.

        मला त्या फारशा आठवत नाहीत. कशा दिसतात कशा राहतात , माहीत नाही. पण त्यांची खूप रूपे असावीत. एवढी कर्तबगार प्रतिमा.. एक थोडच असणार आहे? मग मी त्यांना काळ्या डगल्यात, कधी श्वेत वस्त्रात कधी आईच्या रूपात तर कधी मायेच्या रूपात कल्पित करतो. त्यांना कधी बघायला मिळेल असं वाटत नाही. एकदाच कधीतरी फार पूर्वी त्यांना भेटल्याच पुसट आठवतंय. पण ते अगदी त्यांच्याकडे काम सुरु करण्यापुर्वी. बराच काळ लोटला आहे त्याला. मलाही आता सांगता येणार नाही. आमचा काय कामापुरता संबंध. कामं आली की ती संपवायची. दुसरी कामं तयारच असतात. यातून सुटका नाही. मला तर वाटतं की गेल्या आणि त्याआधीच्यांही जन्मांमध्ये हीच बाई असणार मालकीण म्हणून.

        परवा एक विलक्षण गोष्ट घडली. देवाकडे गेलेलो. ८० वर्षांनी गेलेलो. ब-याच गप्पा झाल्या. अन् अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या. त्यांची बोलणी सुरु झाली देवाशी. त्यातली एक अत्यंत तेजस्वी स्त्री होती. आणि एक करारी पण अत्यंत वृद्ध असा पुरूष होता. मला उगाच आमच्या मालकीण बाईंची आणि त्या हसबनिसाची आठवण झाली. असेच दिसत असतील ते ..मी मनात म्हणालो.उगाच हसू आलं. रिकाम्या वेळी मनाचे घोडे कुठेही पळतात. असो. इतक्यात देवाने मला हाक मारली....
'वत्सा..... यांना भेट. यांच्याच सांगण्यावरून तुला पुढची कामगिरी देत आहे. बोलून घे एकदा'
मी चपापलो. माझी अवस्था ओळखून देव म्हणाला.
'तू ओळखत नाहीस? अरे ही नियती आणि हा निसर्ग.....!!! हीच तुझी मालकीण आहे आता.'

----- आदित्य देवधर

No comments: