Pages

Monday, October 29, 2018

रेशिमनाती

गुंतलो असा मी तुझ्यात लेऊन रेशिमनाती
श्वास तुझे श्वासात माझिया तरळुन जाती

धागा धागा जोडत जाई नाते अपुले
गुंफून नाजूक प्रेमबंध दोघांच्या हाती

शब्दांच्या पलीकडल्या विश्वामधली क्षितिजे
धुंद मीलनाच्या वर्षावामधुनी न्हाती

गर्दीमध्ये उरतो केवळ तुझ्यासवे मी
आणिक संवेदना तुझ्यातच मिसळुन जाती

तुझ्या पावसामध्ये भिजतो चिंब रोज अन
गंध ऋतूंचे फुलवी मोहक ओली माती

भेटतेस तू धुंद नशेची बनून कविता
जिवंत होऊन शब्द स्वतःचे गाणे गाती

स्वप्नामधल्या कुंद कोवळ्या तुझ्या कळ्यांची
स्फुरते गंधाळून नवी निशिगंधा राती

तू नसताना खिडकीमधला दिवा एकटा
विझतो जाळुन आसवांत भिजलेल्या वाती

आदित्य

Wednesday, October 24, 2018

सोडुनी गेलीस तू...

दाटुनी आले जरी डोळे तरी रडलोच नाही
सोडुनी गेलीस तू अन मी कुठे उरलोच नाही

घेउनी गेलीस माझ्या स्पंदनाचे मर्म सारे
जीव मागे राहिला पण मी पुन्हा जगलोच नाही.

पेटला वणवा उरी स्वप्नातल्या बागेत माझ्या
राख झालेली फुलांची  मी परी विझलोच नाही

उमगले नाही कधी कैसे जुळावे सूर अपुले
मूक नजरेतून आणिक मी तुला कळलोच नाही

वाट ती नव्हतीच अपुली चाललो जी एकट्याने
हट्ट होता एवढा मागे कधी वळलोच नाही

एकट्याची पाऊले कित्येक दिसली स्वैर मजला
गुंतलो गर्दीत त्या मी अन कधी सुटलोच नाही

गंध प्रेमाचाच केवळ होऊनी मी राहिलो पण
फूल होऊनी कधी अंगणी तुझ्या रुजलोच नाही

आदित्य