Pages

Thursday, November 28, 2019

दोघांमध्ये

कशास काही विवाद व्हावा प्रेमामध्ये
मुक्यानेच संयोग घडावा दोघांमध्ये

तुझे ठेव तू तुझ्याच पाशी सल्ले सारे
उगा नको भलताच दुरावा नात्यामध्ये

तेच तेच ते रटाळ गाणे गाता गाता
फाटका तरी सूर जुळावा गाण्यामध्ये

असेच 'नाही' म्हण तू मजला लाजुन जाता,
की लाडिक होकार दिसावा जाण्यामध्ये

कधी भेटलो जर का आपण तसेच पुन्हा,
तशीच धडधड होईल का गे श्वासांमध्ये?

अजूनही मी लिहितो पत्रे तुला गुलाबी
अजूनही दव दिसेल तुजला शब्दांमध्ये

--आदित्य

Tuesday, November 26, 2019

ध्रुवतारा

यमदूताचाही जेथे जेथे थिजला पारा
उभा ठाकला रणी तूच होऊन सहारा
झेललास छातीवरती धगधगता वणवा
तूच अढळ शक्तीचा झेंडा , तू ध्रुवतारा

श्वास आजचे लाखो केवळ तुझ्याच पायी
एक एक किंकाळी घुमते ठायी ठायी
तिथे सांडले रक्त तुझे तू दैत्य जाळतो
नतमस्तक मी अभिषेकी अश्रूंस गाळतो

आदित्य

Monday, November 25, 2019

उरले सुरले

म्हणतो आता सारे काही
सोडुन द्यावे उरले सुरले
म्हणता म्हणता श्वास रातिल
इथे मोजके उरले सुरले

आरोपांच्या फैरी झडती
तुझ्या नि माझ्या कितीतरीदा
माफी मागुन संपवून टाकू
हे नाते उरले सुरले

नसतिल जर का खोल वेदना
हृदयामध्ये जिवंत काही
नकोत फुटकळ आनंदाचे
क्षण-बिण साधे उरले सुरले

कधी हरवतो काचांमध्ये
खरा मार्ग शोधूया म्हणता,
आरशात मी मज सापडतो,
बाकी तुकडे उरले सुरले

उत्तरेच प्रश्नांची काही
घेऊन येती प्रश्न नव्याने
दोन घोट घेऊ त्यापेक्षा
प्रश्नच रिचवू उरले सुरले

मित्र जवळचे शोधत जाता,
सापडतो संकटात, उरतो
एकटाच लढणारा मी,
बघणारे बाकी उरले सुरले

मीच कधी माझ्याशी करतो
द्वंद्व मूळ तत्वांच्या साठी
लिहून जातो शब्द काहीसे
असंबद्ध अन उरले सुरले

आदित्य

मी कधी आयुष्य होतो

मी कधी आयुष्य होतो
सर्जनाचा थेंब होतो
रंगुनी पानफुलांनी
डोलणारा वृक्ष होतो

खेळतो सूर्यासवे मी
रोज नवखा डाव ऐसा
चंद्र होतो पौर्णिमेचा
अन कधी अंधार होतो

मी कधी तलवार होतो
शत्रुचा संहार होतो
थेंब रक्ताचाच माझ्या
तळपुनी अंगार होतो

शुभ्र आकाशात मिसळुन
रंग पांघरतो निळा मी,
कोवळ्या अन भाबड्या
मन-पाखरांचे पंख होतो

मोकळे अवकाश काळ्या
काजळीने व्याप्त होता
वादळाचे रूप घेतो,
अन कधी मल्हार होतो

श्वास येथे अडखळोनी
घुसमटू लागे अताशा,
पाहता तडफड कुणाची
मी पुन्हा विश्वास होतो

भूत सारी अन रिपूही
मोकळे, मोकाट होता,
रोज सत्याचा असत्याशी
इथे संघर्ष होतो

संभ्रमामध्ये कधी मज
प्रश्न पडतो 'हेच का ते
विश्व माझे गर्भ-सुंदर?'
आणि मी व्याकूळ होतो.

आग, वणवे अन मशाली
पेटती दररोज येथे
पाहतो की रोज जगती
सर्जनाचा ऱ्हास होतो

बैसलो आहे रुतूनी
दलदलीमध्ये जगाच्या
त्यातल्या कमळापरी मी
भंगलेले फूल होतो

संपुनी जातात सारे
स्वप्नवत क्षण त्या स्मृतींचे
विसरुनी जातो अता की
मी कधी आयुष्य होतो

आदित्य

काही जसे घडलेच नाही

माझियावाचुन तुझे काही कसे अडलेच नाही?
आपल्यामध्ये कधी काही जसे घडलेच नाही!

मी किती अतृप्त होते कोरडी तुजवाचुनी रे
अन तरी तुज बरसुनी जावे असे सुचलेच नाही?

थांबले रस्ते तुझे तू मार्ग बदलूनी निघाला
चालले तैसेच मी, मज थांबणे कळलेच नाही

चांदण्यामध्ये तुझ्या मी फूल झाले रातराणी
मोहरोनीही अताशा मी तशी फुललेच नाही

पार ओहोटीच आहे लागली प्रेमास आता
तीर माझे आठवांचे मज पुन्हा दिसलेच नाही

फुंकूनी गेलास कैसी आग तू हृदयात माझ्या
सांडले अश्रू निखाऱ्यावर तरी विझलेच नाही

आदित्य

Monday, November 18, 2019

वाट दोघे पाहतो

तू नको बोलूस काही,
गप्प मी ही राहतो
'कोण आधी बोलते'
बस वाट दोघे पाहतो

तू मुके बोलाव मजला
शब्द ना उच्चारता
ऐकूही येता न काही
मी तुझ्याशी बोलतो

शब्द अडखळती तुझे
अन श्वासही हेलावती
मी तसा डोळ्यांमधूनी
अर्थ सारे जाणतो

भेट व्हावी याचसाठी
येउनी जातेस तू अन
ते तुझे येणे नि जाणे
मी लपूनी पाहतो

बोलक्या नजरेमधूनी
गोष्ट सारी होत जाते
तू कधी लाजून जाता,
मी मनोमन हासतो

वेळ साधुन मी कधी
मग भेटण्या येतो तुला
अन तुझे लटकेच रुसवे
केवढे सांभाळतो

आदित्य

Thursday, November 14, 2019

मौनाचा करार

मौन पाळले ओठांशी आलेल्या शब्दांनी माझ्या
करार होता कसाबसा केलेला ओठांनी माझ्या

शिकलो आता मुक्यानेच सांगायाचे सारे काही
धीर सोडला तरी कधी वाहुनिया डोळ्यांनी माझ्या

असे वाटते फक्त मला जमले नाही विसरून जाणे
जमले सारे तुला मात्र मी सजलो जखमांनी माझ्या

तशी हासुनी मारून नेली वेळ भेटता तू जेव्हा
कोपऱ्यातला ओलावा टिपलेला डोळ्यांनी माझ्या

दिसे उभी तू तटस्थ पुनवेच्या राती स्वप्नातुन अन
चिंब चांदणे रिमझिमते डोळ्यांतिल चंद्रांनी माझ्या

काय नेमके झाले ऐसे मार्ग वेगळे अपुले गे,
दिलेस नाही उत्तर तू अन हरलो प्रश्नांनी माझ्या

हाय! अपेक्षा तुझी तुला मी क्षणार्धात विसरून जावे
खोटे का क्षण सारे जे अनुभवले श्वासांनी माझ्या?

करार मौनाचा अपुला पाळुन ठरलो पुरता वेडा
अजूनही तो जपतो, रडतो अवचित शब्दांनी माझ्या

आदित्य

देव होईन म्हणतो

शुभ्र शुभ्र ढगांमध्ये
मोठा बंगला दिसतो
देव आमच्या घरचा
तिथे वरती राहतो

रोज खाली येतो बाप्पा
दिवेलागणीच्या वेळी
शुभंकरोती ऐकून
छान हसूनिया जातो

गोड आवडते त्याला
कधी बर्फी कधी पेढा
कधी साखरेचा फक्त
नैवेद्यही त्याला पुरतो

इथे वाईटशा गोष्टी
त्याला कळतात साऱ्या
ठेवतो तो लिहून हे
आणि शिक्षाही करतो

देवाशी मी कट्टी घेता
थोडा थोडासा रुसतो
झाल्यावरती अभ्यास
लगेच तो बट्टी घेतो

स्वप्नामध्ये येता कधी
जातो घेऊन ढगांत
खाली तिथून घरात
मोठा झालेला मी दिसतो

देवालाही कधी कधी
सुट्टी असे शाळेपरी
अशावेळी माझी आई,
माझा बाबा देव होतो

झाल्यावरती मी मोठा
देव होईन म्हणतो
छोट्या इवल्या जगी जो
मनापासून रमतो

आदित्य

Wednesday, November 13, 2019

पुरे ..

तेच तेच गोड गोड बोलणे पुरे तुझे
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे तुझे

रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोजचे 'उद्या उद्या' सुनावणे पुरे तुझे

एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता पुन्हा दुरावणे पुरे तुझे

गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त त्या कपास लावणे पुरे तुझे

साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक ती दुजा कुणास मारणे पुरे तुझे

संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज खेळणे अता पुरे तुझे

आदित्य

Saturday, November 2, 2019

दृष्टांत

खेळ भोवती चाले विझलेल्या दीपांचा
जगावेगळा उत्सव माझा अंधाराचा

प्रकाश ज्ञानाचाच असा तर मुळीच नसतो
उजेड पडतो चिकार येथे अज्ञानाचा

डोळे मजला लागत नाहित सुख शोधाया
दृष्टी घेते ठाव नेमक्या आनंदाचा

शब्द वेगळे, तर्क वेगळे, रंग वेगळे
अर्थ वेगळा होतो माझ्या आयुष्याचा

मिटून डोळे कळते मजला कोण भले ते
उघडुनही अंदाज कधी फसतो डोळ्यांचा

दिवसा ढवळ्या स्वप्न पाहतो पंख लावुनी
फरक तसा मग उरतच नाही रात-दिनाचा

चंद्र उजळला नाही माझा कधी तरीही
कृष्णदिव्यांनी लख्ख रोजचा सण अवसेचा

दीप नको मज मार्ग उजळण्यासाठी कुठला
मीच सूर्य माझ्या विश्वातिल वसुंधरेचा

एकच इच्छा भोळी भगवंताच्या ठायी
देत रहा दृष्टांत आंधळ्या विश्वासाचा

आदित्य