रोज रोज मी मरतो येथे, कसे बसे मी जगतो येथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे.
कुठले ओझे डोक्यावरुनी जीव बिचारा वाहत जातो
कामाला मी घर सोडुनिया डोळे मिटुनी धावत जातो
कुठे नोकरी, कुठे चाकरी, रस्त्यावरती जेथे तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कर्ज काढुनी नटतो सजतो, तसे दिखाव्यापुरते नुसते
दिवस रात्र साहेबासाठी, घरी फक्त पळ-घटिका उरते
सुटला नाही साहेब देखिल अशा दुष्ट चक्रातुन येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
श्वास चालती प्रत्येकाचे घड्याळातल्या काट्यावरती
हिशोब अन वेळेची केवळ सूत्रे आठवणींतुन उरती
चंद्रसूर्यही उरकुन जाती दिवसरात्र नावाला जेथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
चालू असती व्यायामाचे महागडे क्लासेस नव्याने
कधी पेव योगाचे फुटते, कधी नृत्यही नवे-पुराणे
तरी औषधासाठी रांगा लांब लांब दिसतातच तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
स्टोरी आणिक स्टेटसचाही महापूर येताना दिसतो
प्रत्येकाच्या मैत्रीचा बाजार केवढा उत्तम भरतो
माणुस उरतो परी एकटा सोशल होता होता येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
नाती उरती कागदावरी केवळ सध्या घराघरातुन
एकच घरटे दिसायला पण वेगवेगळे मनामनातुन
रेशिमगाठी आता दिसती सैल सैल होताना येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कशास आणिक कुठली शर्यत चालू असते ठाऊक नाही
अंत कधीही, कुणासही, स्पर्धेचा येथे दिसला नाही
मरताना परि जाणिव होते, हाय! हरवले जगणे येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
---आदित्य