Pages

Saturday, July 18, 2020

मनात साठवलेला पाऊस

असा बरसुनी जातो पाऊस,
गहिवरलेला ओला पाऊस,
भरून येतो क्षणात पुन्हा
मनात साठवलेला पाऊस

तशी कोरडी जमीन होती,
गंध पालवी नवीन होती,
वीज तडकता कातर कातर
गळतो हिरमुसलेला पाऊस

स्वप्नांमधल्या ऐलतीरावर
वारा वादळ घेऊन येतो
अन धूसरशा पैलतीरावर
झरतो अवघडलेला पाऊस

कधी अवेळी भरून येते
मनात आभाळाचे गाणे
तरी हुंदके आणिक अश्रू
थांबवतो रुसलेला पाऊस

निळ्या जांभळ्या राती मजला
दूर खुणवती पाऊसवेळा
खोल घेऊनी जातो तेथे
स्वप्नी मंतरलेला पाऊस

क्षितिजावरती चालू होते
घननीळ्या वेणूची जादू
अन टपटपतो इथे माझिया
स्मृतींतुनी भिजलेला पाऊस

------- आदित्य देवधर

Tuesday, July 14, 2020

आठवण

अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी
अंधुक चित्रे जुळुनी आली लख्ख उजेडी सारी

पडदा पडला होता मोकळ्या मंचावरती
नशा शिल्लक होती केवळ माझ्यापुरती
लाल रंग होता डोळ्यांवरती चढला
काचेच्या तुकड्यांमधुनी तुझाच चेहरा दिसला
स्मृृती झळकली प्रेमाच्या त्या शपथांची मग सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

मी तिथेच अर्धा  पेला आलो होतो सोडून
डोळ्यात निखारा घेउन हृदयात शहारा घेउन
हात टाळ्या वाजवणारे थोटे झाले होते
नाटक अपुले मंचामगील खोटे झाले होते
बोच सोडुनी गेलीस तू कायमची जिव्हारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

बंद करुनी वाटा मी काजळ धुतले होते
रंग नव्याने भवती मजला दिसले होते
कुलूप ठोकले होते काळ्या कोनाडयावरती
पत्रे पडली  होती तेथे धुळीत चित्रांभवती
विस्कळीत अर्थाची पाने पाने माझी सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

आज सामोरी पाहून तुजला ज्योत जागली होती
नसांमधुनी आठवणींची सळसळ झाली होती
जखमा उलून आल्या खपली गळून पडली होती
आठवणींची सुरी माझिया हृदयी घुसली होती
विरली मग त्या आठवणींची भुते शेेवटी सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

-------- आदित्य देवधर

उत्तरे शोधू नको तू...

आपुले नाते कधी अपुल्यासही कळणार नाही
उत्तरे शोधू नको तू, प्रश्न मी पुसणार नाही

दूर मजपासून जाण्या, यत्न तू केलेस सारे
वाढले अंतर जरी ते तेवढे टिकणार नाही

तू वळूनी पाहताना पाहिलेले मी कितीदा
अन तुझे हे टाळणे आता असे पटणार नाही

झालीच जर नजरानजर तू लाजुनी हसतेस केवळ
लाजणे, हसणे असे आयुष्यभर पुरणार नाही

पाहतो मी वाट की मज भेटुनी जावीस तू पण
वेळ सरता थांबण्याची, मी तिथे असणार नाही

उमगली नाही अटींची लांब यादी, त्यातही अन,
ती कधी माझी नसावी, हे असे जमणार नाही

भांडण्यासाठी तरी भेटून जा मज एकदा तू
मी पुन्हा समजूतदारीचा गुन्हा करणार नाही

गुंतलेल्या भावनांना राहूदे ऐसेच आता
शेवटी कोडे तुझे माझे कधी सुटणार नाही

आदित्य

Monday, July 13, 2020

बाजी

रुद्राचा अवतार प्रकटला,
पावन झाली माती माझी
चंडी ची तलवार होऊनी
कडाडला शत्रूवर बाजी

दहा दिशातुन वीज कोसळे
काळोखाच्या छातीवरती
रक्ताचा अभिषेक घातला
स्वातंत्र्याच्या सूर्यावरती

अजस्त्र लाटा घेऊन आले 
बाणांचे वादळ ते जहरी
निधडी छाती झेलुन गेली
हसुन तयांना अष्टौप्रहरी

सडा सांडला रक्ताचा अन
श्वासांचा त्या खिंडीपाशी
तिथे वाहिली गंगा, झाली
ती या स्वातंत्र्याची काशी

अजूनही जयघोष शिवाचा
डोंगर वाटांतुन त्या घुमतो
तांडव करणारा तो बाजी
अजूनही मातीतुन दिसतो

आदित्य