Pages

Wednesday, September 23, 2009

कागद

डोळ्यांत पुरावा होता,
शब्दास मिळाला  होता
ओळीमधल्या रेघांतून
हा कागद संपला होता

रेघांच्या तिरक्या वाटा
मी मागे सारत होतो
वळणावर कोपऱ्यावरच्या
हुंकार थांबला होता

एका नाजुक ओळीवरती
जखम जाहली होती
अदृश्य तिथे रक्ताचा
मी थेंब पाहिला होता

वर्षे लिहिण्यातच गेली
अन बोटे झडली आता
अखंड हळव्या शाईचा
अतिरेक जाहला  होता

एका कातर सांजेला
आटली लेखणी माझी
रेघांच्या विळख्यातुन तेव्हा
हा कागद सुटला होता

----- आदित्य देवधर