Pages

Friday, December 31, 2010

पाठमोरी

पाठमोरी पाहुनी तिजला उभी माझ्यापुढे
ओढला गेलो कसा मजला कळेना तिजकडे
संमोहुनी जागीच मजला कापरे भरले तिथे
गोठलेल्या आसमंती वीज 'ती' देई तडे

केस होते लांब काळे गुंफली होती जुई
गंध दरवळता उसासे आतुनी सोडे भुई
हे कसे हुंकार होते की कुणाचे बोलणे
आणि मजला भासले होते शहारे जादुई

गौरवर्णी पावले होती तिची मऊ शेवरी
कोण ना मी पाहिली असली परी या भूवरी
डौल होता चालताना अन कमानी देह हा
वेड लावी या जिवाला, आतुनी जखमी करी

रानवेली गात होत्या गीत रातीचे जसे
धाउनी वारा कपारीतून शिळ घालीतसे
पाखरूही फडफडे चमकून तिजला पाहुनी
एक किंकाळी फुटे अन लांडगे वेडेपिसे

या अशा अंधार राती ही निघाली झरझरा
ती पुढे माझ्या नि मी मागे तिच्या आलो खरा
आसमानी चंद्र होता पाहताना नाट्य हे
तो मला सांगे ' भल्या , बघ लोभ हा नाही बरा.'

माझिया हातात नव्हते थांबणे आता मुळी
पाय होते चालले मागे तिच्या हिरव्या तळी
घेउनी ती जात होती मज कुठे बोलावया?
स्वागताला वाघुळे अन सर्प पायी सळसळी

शुभ्रवस्त्रा चालली होती कुणा वाडयाकड़े
दूरच्या काठावरी अन या तळ्याच्या पलिकडे
खोल जाता आतमध्ये शूळ उमटे बोचरा
अन तरंगे संथ पाण्यावर कुणाचे चामड़े

दूर दिसले लाल डोळे रोखताना मजवरी
श्वास माझे धडधडोनि  नजर होई घाबरी
हासती घुबडे फिरवुनी मान उलटी केवढी
दार वाडयातील मग जबडया प्रमाणे करकरी

आत जाता ऐकली मी हाक मंजुळ गोडशी
वाजुनी पैजण मला दावी दिशा जणु उर्वशी
अर्धमेले दार ढकलून मी जसा गेलो पुढे
आलिंगना होती उभी ती लाजुनी तेथे जशी

हनुवटी उचलून मी डोळ्यांत उतरून पाहिले
खोल गहिरे अन निळेसे जहर जैसे पाजले
लागलेले रक्त थोड़े लाल त्या ओठांवरी
दात विचकुन हासुनी मजला तिने न्याहाळले

ढकलुनी मजला ती माझ्या बैसली छातीवरी
रुतवुनी दातास मग घामेजल्या मानेवरी
उड़वुनी रक्ताळ चिळकांडया तशा अंगावरी
तडफडोनी शांत होता झोपली प्रेतापरी

आज पुन्हा पाहतो मी एक माझ्यासम उभा
वीजही होती तिथे करुनी किनारा वर नभा
रोखुनी डोळे उभा तो पाठमो-या तिजकडे
पाठमोरा मी तिथे होतो तिच्यासंगे उभा!!

------ आदित्य देवधर

Thursday, December 30, 2010

चूक झाली

सहन मी केले उन्हाला, चूक झाली
सावली झालो तुम्हाला, चूक झाली.

झेलताना गार वारे आणि गारा
पाजले पाणी तुम्हाला, चूक झाली

बंद करुनी वेदनांना खोल गात्री
'हासरा' दिसलो  जगाला चूक झाली 

खंत ना कुठली उराशी ना अपेक्षा 
कोरडे केले मनाला, चूक झाली

घातले पोटी चुकांना रोज तुमच्या 
दोष मी दिधले स्वत:ला, चूक झाली

भान ओवाळून उरलो देहमात्रे 
पारखा झालो जिवाला, चूक झाली

एकटा मी जागलो माझ्या प्रतिज्ञा 
देवही ऐसे म्हणाला 'चूक झाली'

तोंड वेंगाडून आला काळ जेव्हा
वाटले जगलो कशाला, चूक झाली.


------- आदित्य देवधर

Monday, December 27, 2010

तेवढे सांगा मला..

पाखरांनो दूर जा दाही दिशांना भोवताली
तेवढे सांगा मला माझी प्रिया कोठे निघाली

धाडली कित्येक पत्रे मारल्या कित्येक हाका
एकही प्रतिसाद ना आला,न कुठली हाक आली

एवढे का रागवोनी जायचे सोडून मजला
एवढी गे काय मोठी चूक मज हातून झाली

श्वास माझे भारले होते तिच्याशी बोलताना
वाहतो माझ्याच श्वासांची अता ओझी, हमाली

थांबती वाटा अताशा दूरच्या क्षितिजा तळाशी
वाट पाहूनी अता मनपाखरे थकली, निमाली

------ आदित्य देवधर

Thursday, December 23, 2010

मोजदाद

भाग, बाकी आणि हातचे,
चिन्हांसंगे संपुन जावे
देणा-याने देउन जावे ,
घेणा-याने घेउन जावे !

पाण्यासंगे वाहून जावे
ओलाव्यापरी राहून जावे
पावसामध्ये धुंद होऊनी
कणाकणाने चिंब भिजावे

कधी फुलावे झाडांवरती
कधी मंदिरातुनी जळावे
कधी झुरावे चातकापरि
कधी कोकीळेसवे रमावे

मोजदाद का निव्वळ कोणी
करे नभाची अन रंगाची
आयुष्याच्या नभात केवळ
आनंदाचे रंग भरावे

ओलांडुन उंबरा जगाचा
स्मृतींतुनी हृदयात उरावे
मायाभूमीतली माणके
जाता जाता ठेउन जावे.

----- आदित्य देवधर

Tuesday, December 21, 2010

नभ रडवेले

सवय एवढी झाली की
अश्रू विसरे रडणे
घन बरसावे तैसे केवळ
आनंदाने पडणे

कधी कुणाला वाटे ना
पाउस हा रडवेला..
अंधा-या रातीला मजला
रडताना दिसलेला

भिजतो मीही आसवांतुनी
बरसातीच्या संगे
रडता रडता घेता येती
भिजणा-याची सोंगे

रडणा-या आभाळाचे मी
गातो हिरवे गाणे
पाउस येथे सांडत जातो
मोत्या एवढे दाणे

'का रडतो बा मुक्या नभा तू'
प्रश्न तया मी केला
विजेएवढा तडा केवढा
नभातुनी चमचमला

'धरणी माझी सखी एकली
कुणी प्रिया ना मजला
क्षितीजाच्याही पल्याड माझ्या
प्रिय सजणीचा बंगला'

'इतुके धावून जातो तेथे
प्रिया मीलनासाठी
तितुक्या तितुक्या लांबत जाती
प्रेमळ भेटीगाठी'

फुटून येतो बांध शेवटी
पाउस येतो धाउन
निघून जाते मळभ तेवढे
अश्रूंमधुनी वाहून

थेंब थेंब मग भेटून जातो
धरती होते ओली
भाव दाटती रम्य मनोहर
उत्कट सभोवताली

अता उमगले गुपीत सारे
ढगाळल्या गाण्याचे
भिजता भिजता रडण्याचे
अश्रूंच्या हसण्याचे

व्याकुळलेले डोळे गाती
गाणे हे भिजलेले
श्रावणमासी बरसून जाती
नभ ऐसे रडवेले

----आदित्य देवधर

असे कसे जमायचे

कधीतरीच भेटते, उगा मला अव्हेरते
अशातही रुसायचे, असे कसे जमायचे?
असे कसे जमायचे?

तुझीच वाट पाहतो, तुझेच चित्र काढतो
उद्या तरी दिसेल ती, मनास रोज सांगतो
अशीच चित्रं काढुनी स्वप्न रंगवायचे
कितीक दीस जायचे, असे कसे जमायचे

तुझी न ये कधीच हाक पत्र ही कधी न ये
घरासमोर वाट पाहतो तुझीच गे सये
चुकून ना कधीच मान वेळवोन जायचे
किती ग भाव खायचे असे कसे जमायचे

नवे नवे गुलाब फूल काय ऐक सांगते
'फुलून येत पाकळी पाखरू शहारते
मधाळ स्पर्श गंध धुंद एकरूप व्हायचे'
तरी तुझे रुसायचे, असे कसे जमायचे

दमेल रात्रही अता रुसेल चंद्र चांदणी
झोपतील तारका थंड रुक्ष या झणी
अता तरी पुरे सखे नको नको म्हणायचे
मला अता तुझ्यासवे रमायचे रमायचे

------आदित्य देवधर

Monday, December 6, 2010

त्रिवेणी

आलो होतो कशास इकडे, सुखे भोगण्यासाठी?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी?
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी?

कितीक  येतील लाटा आणिक विरून जातील
बरीच वाळू काठावरची घेउन जातील
नव्या ओलसर अस्तित्वाला ठेउन जातील

रोज सकाळी वाट पाहतो मावळतीची
रात्र जागतो स्वप्नांमधल्या अंधाराची
तरी वाट संपत नाही, की रात्र संपत नाही

दिसते मजला रूप तुझे तु इथे समोरी नसतानाही
कुठे हरवतो मी माझा स्वत:च, कारण नसतानाही
बघ, तुझ्याच पाशी असेन मी, तू रडतानाही हसतानाही !

-----आदित्य देवधर

Friday, December 3, 2010

आठवतो मज..

आठवतो मज, अलगद प्रेमळ हात थोपटे पाठीवरती
स्पर्श तयाचे उब तयाची स्वप्नांच्या गावी मज नेती
डोळे मिटुनी शांत झोपता शिळ मायाळू मधुवंती
घालून जातो  एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज, बोट धरोनी पाय चालती वाट नव्याने
उंच भरारी मारत जाती पंख कोवळे क्षणाक्षणाने
वाट आडवी उडता उडता, कुणी शिकारी उगा दमाने
खोड मोडतो एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज कुशी एक मायेची मजला लपण्यासाठी
ठेच लागता, दुखता खुपता घरी येउनी रडण्यासाठी
फुंकर घालून जखमेवरती केवळ माझ्या हसण्यासाठी
पाय चेपतो एक विठोबा माझ्यासाठी आठवतो मज.

----आदित्य देवधर

मी अन् तू

आरशामध्ये मजला दिसलो मी अन् तू ही
एकटाच मग अपुला हसलो मी अन् तू ही

रोजरोजच्या रडगाण्याना बळेच चाली
लावत जाता हसलो रडलो मी अन् तू ही

एकटे कधी वाटे हृदयी, डोळे मिटता
चेहरा तुझा पाहून फसलो मी अन् तू ही

सावली कधी पळून जाता क्षितिजावरती
सावली तुझी होऊन बसलो मी अन् तू ही

पाठीशी हा उभा तुझ्या मी अन् तू माझ्या
तसे एकटे  पुरून उरलो मी अन् तू ही

आता मजला तुझियावाचुन करमत नाही
दर्पणातले नाते झालो मी अन् तू ही

---- आदित्य देवधर