Pages

Monday, February 21, 2011

अभंग पामराचे

आज अमृताचे डोही
मन आनंदे न्हाइले
मन भरोनिया तुझे
रूप सुंदर पाहिले

दोन डोळियांची माझी
सार्थ झालीया प्रार्थना
ओघळती गंगधार
सुख नयनी मावं ना

माझा गुरू माझा ईश
तूच माझा मायबाप
दर्शनाने आज तुझ्या
टळे सर्व कष्ट ताप

त्राण नाही पायी माझ्या
पोटामध्ये कण नाही
सुचते ना मज काही
काय मागू काय नाही

माथा ठेऊन चरणी
मज मिळे समाधान
नांदे इथे चराचर
कुणी थोर कुणी सान

याच तुझ्या दर्शनासी
माझा घडू दे प्रवास
माझे वैकुंठ इथेच
माझे इथेच कैलास

देई पामरास शक्ती 
भवसागर तराया
नाम तुझेच राहुदे
माझ्या मुखी देवराया

----- आदित्य देवधर

उतरती उन्हं

तिरीप रेंगाळून उन्हाची ओल्याने सळसळून जाते 
गंध केशरी लावून भाळी, लाटांतुन विरघळून जाते

मंद हासुनी क्षितिजावरती, ध्यानमग्न गंभीर जळाशी
खेळत खेळत बिंब मनोहर लाटांतुन खळबळून जाते

आठवणींचे जुने पिसारे पुन्हा उमलता मनी नव्याने
लाट मोकळी हासत हासत हृदयाशी खळखळून जाते












थवे दूरचे क्षितिजावरचे करिती स्पर्धा लाटांसंगे
वेचुन ऐशा माळा संध्या, गळी कोवळ्या माळून जाते

मऊ मऊ वाळूत खोडकर पाय नाचता संध्यासमयी
ठसे उमटती, वाहून जाती, सत्य केवढे कळून जाते.

एक एक लाटेच्या संगे खेळ चालती लोभसवाणे
खोड काढुनी पायांपाशी, घेऊन गिरक्या पळून जाते

खा-या खा-या चवीत ऐसे शहारणारे खारे वारे
पदर उडविता तुझा,  मनोमन नजर तुझ्यावर भाळून जाते

दोन तेवढी प्रेम पाखरे दूर बैसती बेटावरती
यौवन तेथे नव्या दमाने वा-यावर सळसळून जाते 

हातांमध्ये हात तिचा अन डोळ्यांमध्ये तिचेच रुपडे 
श्वास तेवढे निव्वळ बाकी,  अंतर सारे गळून जाते.

किनार ऐसी समुद्रतीरी लेऊन ओली उन्हे उतरती,
भाव भावना दाटुन येता, हृदय मुके कळवळून जाते 

----- आदित्य देवधर

Tuesday, February 15, 2011

पोरके अनुबंध सारे

पोरक्या  खिडकीतुनी कोकीळ कोणाला पुकारे
मन्मनी काहूर माजे, पोरके अनुबंध सारे

ओल ना उरली कुठे हृदयात तुझियावाचुनी
कोरडे कारंज झाले, कोरडे झाले फवारे

शब्द देखील सोडुनी गेले पुराणी लेखणी
अर्थ ना उरले मुळी आता जरी लिहिले उतारे

पाय सोडून बैसलो असता नदीशी एकटा
घेउनी येती स्मृतींना बुडबुडे, स्फुरती शहारे

मूक मी अव्यक्त मी पण वादळे मन्वंतरी
वाहुनी कित्येक लाटा फोडती दगडी किनारे

"का असा उरलास मागे का असा झुरतोस मागे"
काळजाचा एक एक तुकडा फुटे, मजला विचारे

 ---- आदित्य देवधर 

तेवढ्यासाठीच

तेवढ्यासाठीच चोरून पाहतो चेहरा तुझा
आसवांना गाळतो की हासतो चेहरा तुझा

एवढे विनवूनही तू सोडुनी गेली अशी
आजही डोळ्यांसमोरी दाटतो चेहरा तुझा

आरशामध्ये बघूनी एकटा व्याकूळतो
त्यातही मागे कुठेशी भासतो चेहरा तुझा

आठवांच्या दूरच्या नगरीत मी जातो कधी
तेथल्या प्रत्येक दारी पाहतो चेहरा तुझा

दाटतो माझा गळा अन दाटते नयनी धुके
पत्रांतुनी जेव्हा लिहाया लागतो चेहरा तुझा

सोहळ्यांचे मुखवटे मी घालतो, तू भेटता
भावनांच्या झिरमिळ्यांशी खेळतो चेहरा तुझा 

----आदित्य  देवधर