Pages

Tuesday, February 15, 2011

तेवढ्यासाठीच

तेवढ्यासाठीच चोरून पाहतो चेहरा तुझा
आसवांना गाळतो की हासतो चेहरा तुझा

एवढे विनवूनही तू सोडुनी गेली अशी
आजही डोळ्यांसमोरी दाटतो चेहरा तुझा

आरशामध्ये बघूनी एकटा व्याकूळतो
त्यातही मागे कुठेशी भासतो चेहरा तुझा

आठवांच्या दूरच्या नगरीत मी जातो कधी
तेथल्या प्रत्येक दारी पाहतो चेहरा तुझा

दाटतो माझा गळा अन दाटते नयनी धुके
पत्रांतुनी जेव्हा लिहाया लागतो चेहरा तुझा

सोहळ्यांचे मुखवटे मी घालतो, तू भेटता
भावनांच्या झिरमिळ्यांशी खेळतो चेहरा तुझा 

----आदित्य  देवधर

No comments: