तिरीप रेंगाळून उन्हाची ओल्याने सळसळून जाते
गंध केशरी लावून भाळी, लाटांतुन विरघळून जाते मंद हासुनी क्षितिजावरती, ध्यानमग्न गंभीर जळाशी
खेळत खेळत बिंब मनोहर लाटांतुन खळबळून जाते
आठवणींचे जुने पिसारे पुन्हा उमलता मनी नव्याने
लाट मोकळी हासत हासत हृदयाशी खळखळून जाते
थवे दूरचे क्षितिजावरचे करिती स्पर्धा लाटांसंगे
वेचुन ऐशा माळा संध्या, गळी कोवळ्या माळून जाते
मऊ मऊ वाळूत खोडकर पाय नाचता संध्यासमयी
ठसे उमटती, वाहून जाती, सत्य केवढे कळून जाते.
एक एक लाटेच्या संगे खेळ चालती लोभसवाणे
खोड काढुनी पायांपाशी, घेऊन गिरक्या पळून जाते
खा-या खा-या चवीत ऐसे शहारणारे खारे वारे
पदर उडविता तुझा, मनोमन नजर तुझ्यावर भाळून जाते
दोन तेवढी प्रेम पाखरे दूर बैसती बेटावरती
यौवन तेथे नव्या दमाने वा-यावर सळसळून जाते
हातांमध्ये हात तिचा अन डोळ्यांमध्ये तिचेच रुपडे
श्वास तेवढे निव्वळ बाकी, अंतर सारे गळून जाते.
किनार ऐसी समुद्रतीरी लेऊन ओली उन्हे उतरती,
भाव भावना दाटुन येता, हृदय मुके कळवळून जाते
----- आदित्य देवधर
No comments:
Post a Comment