Pages

Sunday, September 18, 2011

हत्या

मुक्यानेच ती जाता जाता रडून गेली
माउली तिला कशी एकटी टाकून गेली

डाव साधला ऐसा या दैवाने देखिल
कळी बिचारी फुलण्याआधीच खुडून नेली

तेजस्वी गंधाने पोटी दरवळणारी
ज्योत  देखणी पाण्यामध्ये विझून गेली

चैतन्याची धार वाहिली उगमातुन पण,
सृजनाची ती नदी कोरडी आटून गेली

गळा घोटला तिचा तिच्या जन्माच्या आधी
आमच्याच आईची जैसे हत्या केली

ती जोडून होती तुम्हास तुमची सृष्टी होऊन
नाळ तिच्या सृष्टीची का हो कापून नेली

--आदित्य देवधर

No comments: