Pages

Monday, September 19, 2011

खुणा

तुझ्या पुस्तकामध्ये 
जेवढी पाने असतील
प्रत्येक पानावरती 
माझ्याच खुणा दिसतील

गहिरे कागद वाचून 
काळीज ओले होता
शब्दांच्या माझ्या चिंध्या 
डोळ्यांच्या काचा पुसतील

माझी सारी स्वप्ने 
इथे स्वत: मी पुरली
इथेच आता त्यांची 
भुते नव्याने उठतील

तुझ्या सोहळ्यासाठी 
बरेच येतील, गातील
शब्दांच्या गर्दीमध्ये 
पण अर्थ तेवढे नसतील

जखमा पुसल्या जातील 
अश्रूंच्या  टपटपण्याने 
हृदयाच्या अंधारातील 
घाव मात्र चुरचुरतील

कशास पुन्हा काढू 
तुझी जुनी ती पत्रे
स्मृती विरूनी जातील 
नि भास उशाशी उरतील

आज भले तू गेलीस 
सोडून एकटे मजला
पण माझ्या असण्यासाठी 
तुझेच क्षण हुरहुरतील

----आदित्य देवधर

No comments: