Pages

Friday, February 13, 2015

नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले


नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले
स्वप्नांमधले अर्थ नेमके पुसून गेले

तगमग देखिल उरली नाही भेटीपुरती
दोन कोरडे थेंब मात्र मुसमुसून गेले

ग्रहण कोणते, कधी लागले कळले नाही
प्रश्न मात्र कायमची हुरहुर लावुन गेले

रोप लावले होते आपण अनुरागाचे
नवी पालवी येण्यापुर्वीच मरून गेले

तुला शोधण्या माझे डोळे कितीतरीदा
अनोळखी चेहऱ्यांच्या मागे धावून गेले

चिता लागली नाही मजला जळण्यासाठी
मी विरहाच्या वणव्या मध्ये जळून गेले

---आदित्य 

No comments: