Pages

Wednesday, August 10, 2016

पावसापरी बरसून जा तू

पावसापरी बरसून जा तू
आलिंगन मज देऊन  जा तू
स्पर्श राहूदे इथेच ऐसे
शहा-यांतूनी उरून जा तू

गंधित ओले श्वास उष्णसे
हृदयामध्ये ओतून जा तू
आठवणीं चे नाजुक मोती
स्वप्नांमधुनी गुंफून जा तू

ओल्या ओल्या मिठीत माझ्या
हळुवार विरघळून जा तू
गात्रांना चेतवून साऱ्या
माझ्यामध्ये मिसळून जा तू

--आदित्य

Monday, May 30, 2016

बोचरी स्वप्ने सुखांची

बोचरी स्वप्ने सुखांची उसवुनी निद्रेस जाती 
बंद डोळ्यांनी अताशा जागतो कित्येक राती

कोरड्याने मेघ येती, हुंदक्यांना साथ देती
मात्र डोळे ओलित्याने वेदना-मल्हार गाती

घेऊनी आलो किती पत्रे तुझ्या अंगणात माझी
हाय धोका जाहला शिशिरात गळली सर्व पाती

या जगाचा मी कधी नव्हतो, कधी होणार नाही
सोडुनी मी नेहमी जातो सृजन-वेल्हाळ माती

तेल होते संपलेले जाळुनी स्वप्ने दिव्याची
उजळली आशा नव्याने भिजवुनी घामात वाती

---आदित्य

Thursday, May 19, 2016

अश्रूंचे अवकाळी तांडव

अश्रूंचे अवकाळी तांडव काळाच्या पटलावर घडले
आभाळाचे पाणी आभाळाच्या डोळ्यांमधेच थिजले
 
ऐन मैफिलीमधे समेवर मोजुन मापुन येता येता
हृदयाशी अवखळणारे ते सूर अचानक हवेत विरले

निरोप आला होता ज्याचा त्याला प्राक्तन घेऊन गेले
पाठीमागे आठवणींचे भूत नाचण्यापुरते उरले

श्वास रोजचे, भास रोजचे, घेऊन पुढचा दिवस निघाला
रोजरोजचे सूर्यबिंबही पूर्व क्षितीजावरी उगवले

--- आदित्य