Pages

Monday, May 30, 2016

बोचरी स्वप्ने सुखांची

बोचरी स्वप्ने सुखांची उसवुनी निद्रेस जाती 
बंद डोळ्यांनी अताशा जागतो कित्येक राती

कोरड्याने मेघ येती, हुंदक्यांना साथ देती
मात्र डोळे ओलित्याने वेदना-मल्हार गाती

घेऊनी आलो किती पत्रे तुझ्या अंगणात माझी
हाय धोका जाहला शिशिरात गळली सर्व पाती

या जगाचा मी कधी नव्हतो, कधी होणार नाही
सोडुनी मी नेहमी जातो सृजन-वेल्हाळ माती

तेल होते संपलेले जाळुनी स्वप्ने दिव्याची
उजळली आशा नव्याने भिजवुनी घामात वाती

---आदित्य

No comments: