जुन्या स्मृतींच्या अडगळीतुनी बघ मी तुला सापडतो का
पाने माझी उलगडताना हात तुझा थरथरतो का
कितीक गहिऱ्या भाव भावना असतील थिजल्या मनामधे
अर्थ तयांचे कधी उमजता शब्द कुठे अडखळतो का
तू नसताना श्वास मला मी उधार देऊन शिल्लक उरतो
मी नसताना मला शोधण्या श्वास तुझा धडधडतो का
शिशिर कधीचा सहवासाची पिवळी पाने गाळत आहे
कधी वेचता निवडक पाने जीव तुझा गहिवरतो का
पाऊस हल्ली मजला पूर्वीइतका ओला भासत नाही
बघ ओलावा त्याच्याकडचा तुझ्याकडे सापडतो का
मी जाताना अश्रू माझे सोडून जाईन तुझियासाठी
सांग तुझ्या डोळ्यातून नंतर अश्रू तो ओघळतो का
आदित्य
No comments:
Post a Comment