Pages

Sunday, January 28, 2018

भेटला विठ्ठल अम्हाला

काय पुण्याई असे की वर कुणाचा लाभला

भक्तीने भिजूनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


पंढरीची वाट आम्हा लागली नाही धराया

घातले नाहीच लोटांगण तुझ्या पायी पडाया

न्हाऊनी आकंठ विठ्ठल आज गीतांतून प्याला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आमुच्या अंगात भक्ती, रक्त होऊनी प्रवाहे

श्वास होऊन स्वर तुझा प्रत्यक्ष गाभाऱ्यात राहे

नाद भक्तीचा स्मरोनी टाळ गाऊ लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


गांजल्या भक्तांस माया लाभूदे ऐसी निरंतर

पावुनी पतितास उद्धारून दे अवघे चराचर

आर्जवांचा ओघ नयनी मूक वाहू लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आदित्य

Wednesday, January 24, 2018

जाणतो ऐसे तुला की...

जाणतो ऐसे तुला की तू कधी माझीच होती
सोबतीची शपथ जैसे माझिया साठीच होती

यावरी विश्वास आता ठेवताही येत नाही
की जुन्या भेटींतली उब पेटण्यापुरतीच होती

वाटले विझवून टाकावे निखारे आठवांचे
आग हृदयातीलही केव्हातरी विझलीच होती

आसवांचे थांबले आहे जरी गळणे अताशा
कोरडी अन आटलेली वाट अश्रूंचीच होती

भूतकाळाच्या धुराचा दाटतो काळोख हल्ली
त्याच काळोखात जळती वातही माझीच होती

वाटते तुजला विचारावे तुझ्या हृदयातले
की तुलाही ओढ माझी तेवढ्यापुरतीच होती?

रंगल्या होत्या स्मृतींच्या परिकथा कित्येक पानी
पण भविष्याची पुरवणी आपली कोरीच होती

आदित्य

Tuesday, January 23, 2018

तू असताना

तू असताना माझ्यामधला मीच हरवतो
आयुष्याचा सूर नव्याने मग सापडतो

गंध दाटतो ऋतू ऋतूंचा तुझ्याच ठायी
धुंद तुझ्या सहवासामधुनी तो दरवळतो

तुझे नि माझे असे वेगळे नसे अताशा
श्वास सुद्धा एकाचा दोघांनाही पुरतो

रात्र तुझ्या उबदार मिठीतुनी मावळते
दिवस आपुल्या स्वप्नांसंगे उलगडतो

पडले अंतर जरी पुल्यामध्ये काही
थोडे तू अन थोडे मी चालुनी मिटवतो

सृजनाचा अध्याय नवा गे तुझा नि माझा
जीवनवेली वरती कोमल कळी फुलवतो

आदित्य

Monday, January 22, 2018

नजरेमधला तुझा दिखावा

नजरेमधला तुझा दिखावा तसा उशीरा कळला होता
मार्ग तुझा अपुल्याच दिशेला फसवुन जेव्हा वळला होता

अंधार दाटला असा अचानक डबडबलेल्या नभात जैसे
अवघडलेला सूर्य ढगांच्या आडून लवकर ढळला होता

वाळूमध्ये मी लिहिलेले नाव तुझे अन माझे जोडुन
लाटेने येऊन तुझा उल्लेख तेवढा पुसला होता

प्रत्येक माझी सांज तेवली होती अपुल्या प्रेमामध्ये
ठाऊक नव्हते नात्यामधला दिवा तुझा परि विझला होता

तुझ्यासाठी तो खेळच ठरला निरोप देण्याघेण्या पुरता
अन विरहाचा दंश माझिया अंगीअंगी भिनला होता!

एकदा जरी सांगितले असतेस मला तू खरे तेवढे
की गाण्याचा सूर मैफिली पुरता केवळ जुळला होता

रोज नव्याने स्वप्नांमध्ये तुला पाहतो शेवटचे मी
तोच तोच थिजलेला क्षण हृदयात खोलवर घुसला होता

तरळून गेल्या स्मृती तुझ्या गे डोळे  माझे मिटतानाही
आठवणींनी मृत्यू देखील क्षणिक तेवढा टळला होता

आदित्य