Pages

Sunday, September 16, 2018

गुड मॉर्निंग - 2


अमृताची आज ऑफिस ला जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. काल तिचं बॉस बरोबर मोठं भांडण झालं होतं आणि आज परत जाऊन, खोटा गुड मॉर्निंग चा मुखवटा लावून बॉसचं तोंड बघावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. घरून निघताना ती आदळ आपट करतच निघाली. अनिकेत तिला गमतीने म्हणाला ‘दोन माणसं पाठवू का.. They will take care of the situation. ‘
‘जोक्स नको करू रे…..! अमृता एकदम जिकिरीला येऊन  म्हणाली.

‘बापरे……..! तू एवढं काकुळतीला येऊन बोलतीएस म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोल.. नेमकं काय झालंय?’ अनिकेत पुढचं शरसंधान झेलण्यासाठी सरसावून बसला. नशीब एवढंच की ते त्याच्यावर होणार नव्हतं.

मग पुढची 5-10 मिनिटं अमृताने पुरेपूर तोंडसुख घेतलं तिच्या बॉसवर. अनिकेत फक्त ‘हो ना..’ ‘मग काय’ ‘याला काय अर्थ आहे?’ एवढं बोलण्याइतपतच हजर होता. अमृताची एकतर्फी आगपाखड चालू होती.

बऱ्यापैकी वाफ गेल्यावर इंजिन जरा शांत झालं.

‘किती डोक्यात ठेवतेस अगं! सोडून दे की.. रात गयी बात गयी.. !’ अनिकेत समजावत होता. अमृता तशी शांत झाली होती.

‘दिलं सोडून… आज आता दुसरं काहीतरी पकडते.. ‘ हसत हसत गमतीने ती म्हणाली. तिला मनात साठलेल्या कोंडीला वाट करून दिल्याबद्दल समाधान वाटत होतं.

ती आता नॉर्मल झाल्याचं अनिकेतच्या लक्षात आलं. आपण पुन्हा एकदा यशस्वी रित्या dustbin झालो याचा एक नवरा म्हणून त्याला उगाच अभिमान वगैरे वाटला.  

एकमेकांना बाय बाय करून दोघंही आपापल्या रोजच्या रस्त्याने निघाले. Cab मध्ये बसता बसता अमृताचा फोन वाजला. New whatsapp मेसेज. चक्क नवीन ग्रुप request होती. ‘Nostalgic hysteria’ अशा नावाचा ग्रुप होता आणि त्यात अमृताला कोणीतरी add केलं होतं.

गुड मॉर्निंग… वेलकम…. सुप्रभात वगैरे मेसेजेस चा खच पडत होता. ताजा ताजा ग्रुप होता एकदम...

अमृताला नेमकं कळलं नाही कसला ग्रुप आहे पण नाव वाचून हसू आलं. तिने मेंबर्स लिस्ट वर नजर टाकली 32 जण already मेम्बर होते. तिच्या कॉलेज च्या दोघी तिघी होत्या पण तेवढ्याच. पण एकंदरीत ग्रुप कॉलेजशी संबंधित आहे एवढं तिला कळलं. कोणी फार ओळखीचं वाटत नव्हतं.  काहींचे DP दिसत होते पण ओळखू येत नव्हते. काही नावं ओळखीची होती पण DP नव्हते.

Scroll करता करता एकदम एका DP वर ती थांबली. अंगावर सर्रकन शहारा आला आणि अनामिक हुरहूर सोडून गेला. DP ओळखीचा होता. चांगलाच ओळखीचा. आणि जवळचा सुद्धा. तिला जाणवत होतं की तिची धडधड वाढतीए.  

‘Really….…? हा पण आहे? आणि admin पण आहे…? यानेच ऍड केलय की काय मला? अजूनही तसाच दिसतोय. वेडा…… ‘ अमृता स्वतःशीच बोलत होती. हसत होती. लाजत होती.

DP मधला तो वेडा म्हणजे विवेक होता. तिने विवेकला न ओळखणं शक्यच नव्हतं. विवेक सुरनिस. नुसत्या नावानेच कॉलेज च्या चार वर्षांचा अख्खा सिनेमा तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. स्वप्नवत.

हा सिनेमा चालू असताना अमृता त्या स्वप्नात पूर्णपणे रमली होती ...स्वतः character होऊन.

‘ ओ madam … गेट आलं. ‘ ड्रायव्हर बोलला. आणि अमृता जागी झाली.  सिनेमा अर्धवट सोडून ती कॅब मधून उतरली. विवेकच्या नुसत्या संदर्भाने ती खुलून गेली होती. कालचं ऑफिस चं भांडण विसरून गेली होती. जुनी शाळेतली कवितेची वही परत सापडल्या सारखा आनंद झाला होता तिला. ठेवणीतल्या काही कविता नव्याने कळणार होत्या.  काही अपूर्ण कविता पूर्ण करता येणार होत्या. नव्या लिहिता येणार होत्या…

ऑफिस मध्ये रोजची ठराविक कामं करून झाल्यावर अमृताने पुन्हा पुन्हा विवेकचा DP उघडून बघितला. आनंदी व्हावं की दुःखी अमृताला कळत नव्हतं. म्हटलं तर ती विवेकला भेटू शकणार होती. पण भेटावं का?बोलावं का?तिला नेमकं कळत नव्हतं. तिने खूप वाट पाहिली होती. पण गेली 10 वर्षं विवेक अजिबात बोलला नव्हता की भेटला नव्हता. ‘रंजीश ही सही…दिल ही दुखाने के लिये आ... ‘ अशी कुठली रंजीश पण उरली नव्हती त्यांच्यात.. तिला खूप बोलायचं होतं… खूप काही सांगायचं होतं. ऐकायचं होतं. पण आयुष्य नावाच्या सर्कशीत नाचता नाचता सगळं सगळं राहून गेलं होतं.

हो नाही करता करता तिने शेवटी बोलायचं ठरवलं. आधी विवेकचा कॉन्टॅक्ट save केला.  तिला उगाच बरं वाटलं. तिने whatsapp वर Type करायला सुरुवात केली.

‘Hi विवेक. अमृता here. कसा आहेस?’

तिने अजून पोस्ट केलं नव्हतं. Type करता करता ती ऑलरेडी पुढच्या स्टेशन वर जाऊन तो कसा react करेल, काय respond करेल, Direct फोन करेल का वगैरे वगैरे विचारात हरवली होती. आणि तिला एकदम जाणवलं की तिचा DP नाहीए आणि स्टेटस पण नाहीए. झालं..! DP लावायचं motivation तिला मिळालं होतं. तिने type केलेलं delete केलं आणि स्वतःचा एक छानसा फोटो DP म्हणून लावला. आणि ‘रंजीश ही सही …..’ चं स्टेटस पण. आता ऑल सेट.. ! तिने परत type केलं.

‘Hi विवेक. अमृता here. कसा आहेस?’ पोस्ट करायच्या आधी परत तिच्या गाडीने track change केला.

तो रिप्लाय तरी करेल का.. आणि त्याने ignore केलं तर? खरं तर त्याने आधी पिंग करायला पाहिजे.  मी group वर आहे की नाही हे त्याने चेक पण केलं नसेल का…? कदाचित माझा DP नव्हता म्हणून पटकन नोटीस पण केलं नसेल? .. एक ना दोन शंभर प्रश्नचिन्ह.

Lets wait! आता तर DP आणि स्टेटस दोन्ही आहे. हे notice करून तरी पिंग करतो का बघू. नाहीतर जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रत्यक्षच भेटू असं म्हणून तिने type केलेलं पुन्हा delete केलं. आणि ऑफिस च्या कामाला लागली. अधून मधून ती whatsapp चेक करत होती विवेकचा काही मेसेज आहे का ते बघायला. दिवस अखेर पर्यंत एकही मेसेज नव्हता. ना ग्रुप वर ना PM. थोडी हिरमुसली पण हरकत नाही. नवीन ग्रुप पुढे नवीन काहीतरी घडायला सध्या पुरेसा होता.  तिने रंजीश ही सही चं status काढून टाकलं. इतरांना उगाच चघळायला विषय नको म्हणून…. आणि ‘My life my rules’ असं नवीन स्टेटस लावलं.

त्या दिवशी घरी परत जाताना अमृता तशी खुश होती. फक्त विवेक चा DP दिसला म्हणून. जुने दिवस तरुण होऊन परत समोर आले होते. College days पासून तिला विवेक आवडायचा. थोडा वेडा, पटकन चिडणारा, काहीसा फटकळ पण लगेच emotional होणारा, घाऱ्या डोळ्यांचा ढापण्या विवेक.. तिला एकदम हसुच आलं. छान गायचा. चष्मा नीट करत केसातून हात फिरवतानाचा विवेक तिला अजूनही जसाच्या तसा आठवत होता…. भांडणांसकट.

एकदा तर अमृता बोलत नाही म्हणून त्याने तिचा email id ब्लॉक वगैरे केला होता आणि अमृताला मग त्याचं हे रुसणं निस्तरावं लागलं होतं. दोघांच्या बाबतीत जरा उलटंच होतं.अमृता विवेक पेक्षा 8 महिन्यांनी मोठी होती. त्यांच्या भांडणांमध्ये बहुतेक विवेकच जास्त रुसायचा. आणि अमृता समजूत काढायची. तिला त्याच्यातला बालिशपणा आवडत होता. अजूनही विवेक असाच असेल का… रुसून बसलेला… माझी वाट बघत…?

10-12 वर्षांपूर्वी अमृताने long term साठी बाहेर जायचा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हाच दोघांच्या घरच्यांनी लग्न करून टाका अशी टूम काढली होती. अमृताची इच्छा होती पण विवेक पटकन हो म्हणाला नाही आणि त्याचं हे वागणं अमृताला दुखावून गेलं. ती जायच्या आधी एकदा ते त्यांच्या नेहमीच्या हॉटेल मध्ये भेटले होते. इकडल्या तिकडल्या बऱ्याच गप्पा मारल्या. मूळ विषय बोलणं मात्र दोघेही टाळत होते. निघताना अमृताने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली

‘विवेक मी long term साठी जातीये. इथलं सोडून. मी राहू शकेन का रे? तुला सोडून… ?’ तिने मुद्दाम असं विचारलं.

‘नक्कीच. तू ठरवलं आहेस ना अमू… नक्की जमवशील सगळं व्यवस्थित. ‘ विवेक तिला धीर देत समजावणीच्या सुरात म्हणाला. त्याने नुसता आव आणलेला समजूतदारपणाचा. त्याचे डोळे वेगळंच सांगत होते.

‘मी तुला खूप miss करीन विवेक’ आता तरी नको जाऊस म्हण रे…. असं तिला झालं.

‘तू असं अजून बोलत राहिलीस तर मी कदाचित रडीन… please आपण जाऊ आता….यावर अजून काही नको बोलायला ‘ असं म्हणून तो उठला आणि त्याने तिला मिठी मारली.  त्याचे डोळे पाणावले होते. डोळ्यात जे दिसत होतं ते ओठावर मात्र आलं नाही.

‘All the best अमू.... तुझी वाट बघीन मी.’ तो हसल्यासारखं करून तिला म्हणाला आणि दोघे आपापल्या रस्त्याने निघाले…

त्या दिवसानंतर आजतागायत हे रस्ते एकत्र आलेच नाहीत.

हे सगळं आठवून अमृताच्या डोळ्यांची कड ओली झाली. कुठेतरी काळे ढग दाटून आले होते दडलेल्या आणि अवघडलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी. जरा अवेळी आणि उशिरा आलेला हा असा पाऊस अमृताला हुरहूर लावून गेला. काय कमी होतं…? नेमकं कुठे काय बिनसलं होतं…. याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण तिला ते शोधायचं होतं. आणि याची संधी लवकरच समोर आली.

कॉलेजच्या ग्रुप वर ‘re union’  चे वारे वाहू लागले आणि date venue plan ठरला सुद्धा. या विवेक ला whatsapp ची alergy होती की काय कोणास ठाऊक. येस नो ओके व्हाय व्हॉट याच्या पलीकडे काहीही type करणं म्हणजे त्याला अपमान वाटत असावा. अमृता इतक्या वेळेस त्याच्याशी ग्रुप वर बोलायची संधी शोधत होती पण हा गडी ढिम्मच. DP आणि status लावूनही काही उपयोग झाला नाही. Re union च्या overnight outing ला मात्र तो येणार आहे एवढं तिला कळलं.

तिला एवढं त्याला भेटावं असं वाटत होतं पण त्याचं काय.. ?? त्याला असं वाटतंय का.. भेटायची, बोलायची इच्छा आहे का हे तिला कळत नव्हतं.

‘विसरला असेल तो मला? की मुद्दाम ignore करतोय?भेटल्यावर बोलेल तरी का?’ अशा सगळ्या विचारांचे बंगले बांधून ती त्याला भेटायची तयारीच करत होती जणू.  

ट्रिप चा दिवस उजाडला. ठरलेल्या स्टॉप पाशी जमून तिथून सगळे बस ने कोकणात जाणार होते. अनिकेत तिला सोडायला आला होता. गाडीतून उतरताना तिची नजर विवेकला शोधत होती आणि तो दिसलाच तिला. तिचा जीव भांड्यात पडला. तो आला नसता तर ही ट्रिप व्यर्थ होती. ती फक्त तो भेटणार आहे म्हणून जात होती.

तिने आरशात बघून केस वगैरे नीट केले. एक बट मुद्दाम डाव्या कानासमोरून पुढे काढली. कानातले दिसतील असे adjust केले. बाकी make-up ची फार गरज नव्हतीच तिला. अनिकेत ला बाय करून ती गाडीतून उतरली. बाकीचे ग्रुप मेंबर्स जमलेले बघून अनिकेत परत निघाला.

‘बाय गं.. मस्त time pass करा… आणि काळजी घे. ‘ अनिकेत निघता निघता म्हणाला.

‘हो रे… चल बाय… ‘ असं म्हणून अनिकेत ला hug करून  ती निघाली.

अनिकेत गाडी वळवून निघून गेला आणि अमृताने तिचा मोर्चा विवेक च्या दिशेने वळवला.

‘गुड मॉर्निंग विवेक’

दोघांची नजरानजर झाली. विवेकला काही सुचेचना. काय बोलावं तेही कळेना.. ‘अमू तू….?’ असं म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला wish करण्यासाठी आणि लाजत हळूच सोडून दिला. गुड मॉर्निंग वगैरे बोललाच नाही.. थोडा वेळ दोघंही तसेच डोळ्यांनी बोलत होते एकमेकांशी. इतर मित्रांच्या आवाजाने अमृता भानावर आली आणि पटकन दुसरीकडे निघून गेली. विवेकदेखील सगळं नॉर्मल असल्यासारखा इतरांमध्ये मिक्स झाला.

दोघांचीही मॉर्निंग special झाली होती हे नक्की. आणि पुढची ट्रिप सुद्धा नक्कीच special ठरणार होती.

No comments: