वेचिली मी जी फुले ती हाय दुसऱ्याचीच होती
हिंडलो शोधीत ज्यांना ती तुझ्यापाशीच होती
अंगणी बहरून आले झाड गंधाचे नव्याने
पण तुझ्या-माझ्या कळीची पाकळी मिटलीच होती
ओंजळीमध्ये फुलांचा ओघळे पाऊस हल्ली
भागली नाहीच तृष्णा ओल ती फसवीच होती
शोधतो नजरेस तुझिया मैफिलीमध्ये स्वरांच्या
ओढ गाण्याची मलाही तेवढयासाठीच होती
व्यापुनी तू टाकले आहेस मजला एवढे की
अंतरीची सावली माझी तुझ्यापाशीच होती
एकटा उरलो तुझ्यावाचून मी गर्दीत सखये
सोबती होती स्मृती जी माझियापुरतीच होती
घातली मी व्यर्थ तुजला साद गे कित्येक वेळा
परतुनी जी हाक आली ती सुद्धा माझीच होती
मी असे नकळत स्वतःचे दार ओलांडून आलो
तू तिथे माझ्या समोरी आरशामधलीच होती
मी जरी नसलो कुठेही बावऱ्या स्वप्नात तुझिया
धुंदशा कवितेमधुनी मात्र तू माझीच होती
-आदित्य
No comments:
Post a Comment