एक सुगंधी श्वास माझिया
दाराशी अडखळतो आहे
माझ्याच गुलाबाच्या काट्यांशी
अडकुन तेथे झुरतो आहे
काय कसे सांगून तयाला
भरून घेऊ उरात माझ्या
काळ वाहुनी गंध तयाचा
क्षणाक्षणाने विरतो आहे
गुंफून सुंदर माळ अचानक
श्वास निखळला एक तयातुन
उसवून गेला लड श्वासांची
जी मी पुन्हा शिवतो आहे
उंबऱ्यावरी तडफडणारा
श्वास होऊनी जखमी अवघा
माझ्या अस्तित्वाला येऊन
मिळण्यासाठी लढतो आहे
सापडतो का बघ गे तुजला
दरवळणारा गंध तयाचा
तुझ्याच निःश्वासासाठी तो
तिथे कदाचित रमतो आहे
घालमेल श्वासाची माझ्या
मुक्यानेच का कळेल तुजला
शब्दांवाचून मौनातून तो
अविरत केवळ रडतो आहे
देशील का श्वासास माझिया
श्वास तुझा तू गंध माळुनी
याच एवढ्या आशेवरती
काटयांतुन मी जगतो आहे
-आदित्य
No comments:
Post a Comment