Pages

Sunday, February 6, 2022

देव निघून गेला

देव निघून गेला

मायेचा ओलावा मागे ठेऊन गेला
देव तयाचे गावी अखेर निघून गेला

भक्तांच्या हृदयात वसावा असा निरंतर
प्रसाद दैवी स्वरा स्वरांतुन ठेऊन गेला

चाले ना नियतीच्या पुढती देवाचेही
हासत हासत निरोप प्रेमळ देऊन गेला

आशीर्वाद सुरांच्या रूपे देता देता
नतमस्तक अन डोळे ओले करून गेला

एक सूर विरहाचा लाखो ह्रदयांमधला
कृष्णाच्या वेणूत भैरवी भरून गेला

आठवणी उरतील तेवढ्या गाणी होऊन
तीर्थक्षेत्र गाण्याचे ऐसे बांधुन गेला

शब्द अपूरे पडले ज्या भगवंतासाठी
तोच स्वरांची ओंजळ पदरी घालुन गेला

चंद्र सूर्य हे उगवतील यापुढे सुद्धा, पण 
ग्रहण एक अदृश्य तयांना लावुन गेला

आदित्य

Friday, February 4, 2022

रात्र

हळुवार ओढुनी दुलई मंद धुक्याची
निःशब्द पहुडली रात्र निळ्या रंगाची
मी कवळुन घेता अंधाराला माझ्या
विसरूनिया जाते ओळख अस्तित्वाची

झिरपते चांदणे मंद मंद श्वासात
उतरते क्षितिज घेऊन चंद्र डोळ्यांत
बोलवता कुठला पैलतीर पायांना
तरळते अनामिक नशा गूढ रस्त्यांची

आकाशमितीचे स्पंदन अंगी येते 
मन गोठुनिया हृदयाशी गोळा होते
मी हरवुन जातो सृष्टीच्या रंगात
अन् अलगद नेतो काळ मला डोहाशी

अस्तित्वाच्या पलीकडल्या जगताचा
मी होऊन जातो भाग त्याच सृष्टीचा
स्वप्नांचा कोठे गाव लागतो तेथे
संबंध ठेवण्यापुरता मर्त्य जगाशी

मी रोज रोज त्या वेशीपर्यंत जातो
अन् तोच बंद दरवाजा तेथे असतो
मग कोण मला तेथुनिया ओढुन नेते?
परतीच्या वाटेवरती क्षितिजापाशी

रोज चालतो एकच प्रवास ऐसा
रात्रीच्या गर्भात हरवण्या जैसा 
मग ऐलतिरावर सूर्य उगवतो माझा
घेऊन मनीषा वास्तवात जगण्याची

आदित्य

Tuesday, February 1, 2022

किनारा किनारा

निळ्या सागराचा 
निळा गाज वारा
जुळू दे मनाशी
मनाचा किनारा

तुझा भास होतो,
तुझा श्वास होतो,
तुझे स्वप्न होतो,
शहारा शहारा

कधी सांजवेळी,
पहाटे अवेळी, 
तुझ्या आठवांचा
नभाचा इशारा

तुझ्या लाघवाचा
तुझ्या श्रावणाचा
उरी जन्म घेतो
सुगंधी धुमारा

तुझा हात हाती
निशी-गंध राती
सवे संथ अपुल्या
किनारा किनारा

आदित्य